व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा धडपड मंच

5
78
carasole

प्रभाकर झळके नाशिक जिल्ह्याच्या येवले गावात राहतात. ते व्यंगचित्रकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. पण ते जादूचे प्रयोग करतात, विनोदावर आधारित कार्यक्रम करतात, प्रवचन करतात आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गावात ‘धडपड मंच’ निर्माण केला आहे. त्या मंचातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

झळके यांना काम करताना प्रसिद्धीची हाव नाही, आर्थिक हपापलेपण नाही, राजकीय वर्तुळातील माणसांशी परिचय असल्याचे कौतुक आहे, पण त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. समाजोपयोगी कामे करणे हा त्यांचा सहजधर्म आहे. ते येवल्यातील शाळेतून चित्रकला शिक्षक म्हणून निवृत्त झाले. झळकेसर एकोणऐंशी वर्षांचे आहेत. त्यांच्या नावाचा येवल्यात दबदबा आहे. त्यांना तेथील सामाजिक जीवनात आदराचे स्थान आहे.

त्यांनी औरंगाबाद येथून चित्रकलेत पदवी घेतली. ते लहानपणी ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत ते पुढे चित्रकला शिक्षक झाले. मुळात, सरांचा ओढा व्यंगचित्रकारितेकडे आहे. त्यांच्या घरात चित्रकलेचा वारसा नव्हता, पण प्रभाकर यांना मात्र लहानपणीच चित्रे काढण्याची गोडी लागली. त्यांना दिवाळी अंकांतील व्यंगचित्रे आकर्षून घेत. हरिश्चंद्र लचके, शं. वा. किर्लोस्कर यांची व्यंगचित्रे ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या मासिकांतून प्रसिद्ध होत असत. प्रभाकर स्वतः दीनानाथ दलाल, श्रीकांत ठाकरे, शि. द. फडणीस यांची व्यंगचित्रे निरखत व्यंगचित्रे काढू लागले. तेथून पुढे त्यांचे त्या क्षेत्राशी अतूट नाते जुळले. बाळासाहेब ठाकरे आणि ‘मार्मिक’मधील त्यांची व्यंगचित्रे हा प्रभाकर यांच्या अभ्यासाचा विषय ठरला.

दरम्यान, ‘मार्मिक’च्या १९६३ सालच्या एका अंकामध्ये ‘वस्त्रे अशी अब्रू घेतात’  या शीर्षकाखाली व्यंगचित्रे स्पर्धा जाहीर झाली. प्रभाकर झळके यांनी स्वतः काढलेले व्यंगचित्र स्पर्धेसाठी पाठवले आणि ते पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले! येवल्यासारख्या छोट्या गावात राहणाऱ्या प्रभाकर यांना इंग्रजी नियतकालिके हातात पडण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे विदेशी व्यंगचित्रकारांची कला त्यांच्या पाहण्यात तेव्हा आली नाही. त्यामुळे त्यांच्या रेखाटनांवर परदेशी व्यंगचित्रकारांची छाप नाही.

प्रभाकर झळके यांचीही व्यंगचित्रे तेव्हापासून ‘मार्मिक’मध्ये नियमितपणे झळकू लागली. मात्र ते शाळेतील नोकरीमुळे राजकीय व्यंगचित्रे रेखाटण्यापासून दूर राहिले. सरांचा हातखंडा हास्यचिन्हे आणि शब्दविरहित चित्रे रेखाटण्यात आहे.

त्यांची सामाजिक दांभिकतेवर बोट ठेवणारी व्यंगचित्रे लक्षणीय ठरतात. महागाई, धकाधकीचे चोवीस तास, दहशत, घोटाळे, जातीय तणाव यांनी आधुनिक मानवी जीवन बरबटलेले आहे. त्यामुळे होणाऱ्या घालमेलीचा निचरा करून, मनाला विसावा देणारे एकमेव औषध म्हणजे हास्यचित्रे असा झळकेसरांचा विश्वास आहे. व्यंगचित्रकाराला साहित्यिकाचा दर्जा मिळू शकत नाही ही प्रभाकर झळके या व्यंगचित्रकाराची खंत आहे.

झळकेसरांना ठाकरे यांच्या हस्ते तीन वेळा पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय त्यांना ‘अंजली’, ‘किर्लोस्कर’ या दिवाळी अंकांची प्रथम पारितोषिके लाभली आहेत. त्यांना अखिल भारतीय व्यंगचित्र स्पर्धेत १९८६ साली तिसरे बक्षीस मिळाले; इतकेच नाही, तर झळकेसरांनी रेखाटलेले व्यंगचित्र जर्मनीत घेतल्या गेलेल्या स्पर्धेतही पारितोषिकप्राप्त ठरले.

सरांचे सामाजिक भान तीव्र आहे. जित्याजागत्या माणसाची अनेक प्रकारची भ्रांत सतत काहीतरी मार्ग काढण्यासाठी खुणावते. सर स्वतःच्या गावातीलच नव्हे तर आसपासच्या अनेक गावांतील मुलांना, तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी धडपडू लागले. एकदा शिक्षण संचालक चिपळूणकर शाळेत आले होते. त्यांनी सरांचा उल्लेख ‘धडपडे शिक्षक’  असा केला. झळकेसरांनी स्वतःच्या प्रयत्नात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी ‘धडपड मंचा’ची  स्थापना केली. मंच १९८३ पासून कार्यरत आहे. स्पर्धांचे आयोजन हा त्यांच्या कामातील मुख्य भाग.

सरांनी महालक्ष्मी डेकोरेशन स्पर्धा जाहीर केली आणि बायका उत्साहाने कामाला लागल्या. दरवर्षी चाळीस-पंचेचाळीस स्त्रिया तीत भाग घेतात. ‘धडपड मंचा’च्या माध्यमातून ती स्पर्धा वीस वर्षें नियमित घेतली जाते. गतवर्षी दुष्काळामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांचे देखावे सादर करण्यात आले. स्पर्धेतील बक्षिसांसाठी प्रभाकर झळके स्वतः खर्च करतात.

त्यांचे कुटुंब म्हणजे ते, पत्नी आणि त्यांची मुलगी. मात्र हृदयविकाराच्या रूपात समोर दिसलेल्या मृत्यूने खूप काही शिकवले असे सर सांगतात. त्यांनी ठरवले, की त्यानंतरचे पुढील आयुष्य समाजासाठी खर्च करायचे.म्हणाले, “माझी बँकेत शिल्लक नाही. कुठे इस्टेट नाही. दोन खोल्यांचे राहते घर आहे. तेथेही मी दुर्मीळ वस्तूंचा संग्रह असणारे वस्तुसंग्रहालय जमवतोय. मी १९९६ साली निवृत्त झालो. फंड मिळाला. कुटुंबाला गरजेपुरता भाग ठेवून इतर सर्व भाग समाजासाठी वापरणार. देहदानाचाही अर्ज भरून ठेवला आहे. सांगून ठेवले आहे घरात, “गेलो, की कोणाला बोलावण्याच्या फंदात पडू नका. तीन तासात देह सत्कारणी लागला पाहिजे.” हे सांगताना सर “निदान प्रत्येकाने नेत्रदान तरी करा हो” असे आवाहन करतात.

ते गोकुळाष्टमीला तीन वर्षांच्या आतील मुलांना कृष्णरूपात नटवून आणायला सांगतात. त्या मुलांच्या गोजिरवाण्या रुपात त्यांना कृष्णदर्शनाचा आनंद मिळतो. गावागावांतील भगिनींची यादी करून दणक्यात रक्षाबंधन साजरे केले जाते. राख्याही भाऊच घेऊन जातात. बहिणींना साडीचोळी देतात.

दिवाळीदरम्यान दारापुढील रांगोळी स्पर्धा आयोजित करतात. तीन गटांत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांना भेटवस्तू आणि प्रत्येक गटातील विजेत्यांना बक्षीस म्हणून सेमी पैठणी दिली जाते. सारे गाव रात्री १० ते १ जागून या स्पर्धेचा आनंद लुटते.

गावागावांतील बालवाड्यांमध्ये बडबडगीत स्पर्धा १ जानेवारीला घेतली जाते. प्रचंड प्रतिसाद मिळतो. स्टेजवर येऊन मुले गाणी म्हणतात. त्यांनी गाणे कसेही म्हटले तरी त्यांचे भेटवस्तू देऊन कौतुक होते.

मेंदी स्पर्धा, नृत्य स्पर्धा नित्याच्या.

विशेष स्पर्धा म्हणजे शरीरसौष्ठव स्पर्धा. ती पूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी असते. दरवर्षी सत्तर ते नव्वद तरुण स्पर्धेत सहभागी होतात. झळकेसर म्हणतात, ‘’शरीरसौष्ठव हा हेतू नजरेसमोर ठेवला की तो तरुण कायम निर्व्यसनीच राहणार !”

दिवाळीत ‘धडपड मंचा’तर्फे ‘एक करंजी मोलाची’ हा उपक्रम राबवला जातो. गावातून घरोघरी जाऊन ती गोळा करताना भलाभक्कम फराळ जमा होतो. तो आसपासच्या पाड्यापाड्यांत जाऊन वाटला जातो. नवरात्रोत्सवात तीर्थक्षेत्र कोटमगाव येथे ‘धडपड मंचा’चे कार्यकर्ते दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या चपला दिवसभर आळीपाळीने सांभाळतात.

‘एक वस्त्र मोलाचे’ हा असाच आणखी एक उपक्रम. ‘वाटून टाकायचे’ हे त्यामागचे सूत्र.

पोळ्याला गावातून मिरवणूक निघते. पाच धष्टपुष्ट बैलांच्या मालकांचा सत्कार करतात. त्यांना आर्थिक मदतही केली जाते.

सर एप्रिल – मे मध्ये  ‘मोफत वाचनालय’ चालवतात. सहा-सातशे मुले रोज येऊन पुस्तके घेऊन जातात.

दुष्काळाच्या परिस्थितीत पारंपरिक रंगपंचमीला फाटा देऊन कोरडा टिळा लावून रंगपंचमी साजरी करण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे किमान पाच लाख लिटर पाण्याचा अपव्यय थांबला.

मंचाचे कार्यकर्ते मोडकळीस आलेल्या मंदिरांची डागडुजी-रंगरंगोटी, जूनमध्ये गावागावातून मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, अपंगांना सायकल वाटप, गरिबांच्या अंत्यविधीसाठी मदत अशी कामे तर सातत्याने हाती घेतात.

प्रभाकर झळके यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे.

पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवले गावात अनेकांना पैठणीसाठी विना मोबदला रंगचित्रे काढून देणारा या कलाकाराचा हात अजूनही त्याच ताकदीने आणि नजाकतीने थिरकत असतो.

– अलका आगरकर

About Post Author

5 COMMENTS

  1. मला गर्व आहे की मी एक
    मला गर्व आहे की मी एक कार्यकर्ता आहे धडपड मंचचा

  2. झळके सरांची परीपुर्ण माहिती…
    झळके सरांची परीपुर्ण माहिती मिळाली
    धन्यवाद

  3. दिनांचा वाली.बालकांचा पिता…
    दिनांचा वाली.बालकांचा पिता.महीलांचा भ्राता..कलाकार व सच्चा समाजसेवक!!!

Comments are closed.