करण चाफेकर – जिद्दी जिनिअस!

1
32
carasole

करण चाफेकरचा ओढा शाळेत असल्यापासून मुंबईतील वरळीच्या ‘नेहरू सायन्स सेंटर’कडे असायचा. तो राहायचा डोंबिवलीला, पण अधूनमधून नेहरू सायन्स सेंटरला भेट द्यायचा. त्याची विज्ञानामध्ये असलेली आवड त्याच्या वडिलांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याला मुंबईतील विविध विज्ञान प्रदर्शनात घेऊन जायला सुरुवात केली. करणने शाळेत असताना तंत्रज्ञानातील आवडीतून सिरिंजच्या साहाय्याने जे.सी.बी.सारखे छोटे यंत्र तयार केले तर दहावी-अकरावीत हॉवरक्राफ्ट बनवले. त्याने बनवलेल्या उपकरणांचे आय.आय.टी. तसेच अन्य नामांकित विज्ञान प्रदर्शनात आणि इतर स्पर्धांत कौतुक करण्यात आले. मात्र करण बारावीत असताना, त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि त्याची सर्व गुणवत्ता आणि धडपड निष्फळ ठरण्याची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी करणच्या आईने दिलेल्या किडनीचे त्याच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले. आज करण प्रचंड जिद्दीच्या जोरावर बंगळुरूस्थित कंपनीत संशोधन आणि विकास विभागात इंजिनीयर म्हणून काम करत आहे.

करण चाफेकर. वय वर्षे सव्वीस. तो बंगलोरच्या ‘फ्रक्टरवर्क’ या कंपनीत संशोधन आणि विकास विभागात (आर अँड डी) मध्ये इंजिनीयर म्हणून काम पाहतो. तो कंपनीचे काम मुंबईतून करतो.

करणला तांत्रिक गोष्टींबद्दलची आवड त्याच्या आजोबांकडून वारसाहक्काने मिळाली. करणला लहानपणापासून तांत्रिक उपकरणे आकर्षित करू लागली. त्याला उपकरणे कशी बनतात, कशी चालतात, हे पाहणे गंमतीशीर वाटू लागले. करण पाचवीपासून वरळीच्या ‘नेहरू विज्ञान केंद्रा’त नियमितपणे जाऊ लागला. ‘विज्ञान केंद्रा’मुळे त्याच्या आवडीनिवडीला अधिक प्रोत्साहन मिळाले. करण तांत्रिक उपकरणे कशी बनत असतील यावर विचार करत असे. तो स्वत: उपकरणे बनवून पाहू लागला. त्याने शाळेत असताना बनवलेले ‘जेसीबी’सारखे छोटे यंत्र आणि ‘हॉवरक्रॉप्ट’ कमी किंमतीत तयार केल्या होत्या. त्याने उपकरणांसाठी लागणारे सुटे भाग सहज मिळणा-या गोष्टींतून जमवले होते. त्यामुळे एखादे उपकरण तयार करताना त्याच्या प्रयत्नांचा आईवडिलांवर विशेष आर्थिक ताण पडला नाही. त्या वेळी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धा फक्त ‘आयआयटी’चा परिसर आणि इतर काही मोजक्या ठिकाणी होत असत. त्यामध्ये करणने बनवलेल्या यांत्रिक उपकरणांचे भरभरून कौतुक झाले. त्यामुळे करणने पुढे जाऊन इंजिनीयर बनण्याचे ठरवले.

करण बारावीला असताना, त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या, ती २००६ ची गोष्ट. किडनीची शोधाशोध केल्यानंतर आईची किडनी त्याला जुळली. बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. श्रीरंग बिच्छू यांनी करणवर शस्त्रक्रिया केली. ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली, तरी त्याला सुरुवातीला काही वर्षें नव्या किडनीबरोबर जुळवून घेताना थोडा त्रास झाला. त्याला आईने किडनी दिल्यानंतर त्याचा जीवनप्रवास नव्याने सुरू झाला. त्या नव्या जीवनसंघर्षातून, जिद्दीतून त्याच्या ठायी कणखरपणा निर्माण झाला. करणच्या वागण्या-बोलण्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची कणखरता जाणवत राहते. करण चाफेकर हे व्यक्तिमत्त्व म्हणजे माणसाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे उत्तम उदाहरण आहे. विज्ञानावर प्रचंड विश्वास असलेला करण खूप आशावादी आहे. विज्ञान जीवनाचा कायापालट करू शकते यावर त्याचा ठाम विश्वास आहे.

करणची आई नीलिमा चाफेकर या बँकेत कामाला आहेत. वडील सतीश चाफेकर हे खासगी क्लास घेतात. वडिलांना नामांकित, प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्ष-या जमवण्याचा छंद आहे. त्‍यांनी विविध क्षेत्रात शिखर सर करणा-या व्यक्तींच्या स्वाक्ष-या जमवल्‍या आहेत. सचिन तेंडुलकर असो, की लता मंगेशकर, देशविदेशातील कला, क्रीडा, साहित्य अशा विविधांगी क्षेत्रांतील व्यक्तींच्या स्वाक्ष-या त्यांच्या संग्रही आहेत. त्यांच्या त्या छंदापायी लोकांनी त्यांना ‘सह्याजी’राव’ म्हणायला सुरुवात केली आहे. छंद, आवड-निवड याबद्दल जागरूक असलेल्या करणच्‍या पालकांनी त्‍याच्‍याकडे बारकाईने लक्ष दिले. करणच्या आवडनिवडी लक्षात घेऊन त्या जोपासल्या.

करणला बारावीत जास्त गुण मिळाले नव्हते. त्याने इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या आवडीमुळे  ऐरोलीच्या ‘दत्ता मेघे तांत्रिक महाविद्यालया’त प्रवेश घेतला. त्याने प्रोग्रॅमिंग करून सर्वांत जलद असा रोबो २०११ मध्ये साकारला. त्या रोबोने लोणावळा येथे पार पडलेल्या ‘रोबोलिगा’’ स्पर्धेत राज्यातून प्रथम पारितोषिक मिळवले. त्यानंतर करणने १८० अंशात फिरणारा छोटेखानी ‘रोबोआर्म’’ तयार केला होता. त्यासाठी त्‍याने ‘माउण्टन बोर्ड’ व ‘सर्व्हो मोटर’ यांचा वापर केला. त्या प्रोग्रॅमिंगमध्ये त्याने त्रिमिती सूत्राचा वापर केला. विशेष म्हणजे करणने ती दोन्ही उपकरणे कुठलाही क्लास न लावता, कुणाकडे शिकायला न जाता तयार केली.

पुढे, कॉलेजमध्ये असताना करणने ‘कॉम्प्युटर न्युमॅटिक कंट्रोल’ (सी.एन.सी.) मशीन बनवले, कार्व्हिंग करणारा राऊटर बनवला. त्याला राऊटर बनवण्यासाठी दोन महिने लागले. ती यंत्रे खूप मोठी असतात. सी.एन.सी. म्हणजेच राऊटर मशीनमुळे कॉम्प्युटरमध्ये फीड केलेल्या डाटावरून लाकडावरील कोरीव काम सहजपणे करता येते. करणने बनवलेल्या सी.एन.सी. मशीनमध्ये ‘मेमरी कार्ड’ची व्यवस्था असल्यामुळे काम करण्यासाठी कॉम्प्युटरची गरज नव्हती. त्यासाठी त्याने ‘जी कोड’’ ही भाषा वापरली होती. तशा यंत्रांची किंमत भरमसाठ आहे. मात्र त्याला अशी यंत्रे तयार करायची होती, जी स्वस्त असतील आणि ज्यांचा उपयोग घरात, शाळेत सहजपणे करता येणे शक्य होईल.

करणने कार्व्हिंग मशिन केवळ सात हजार रुपयांत तयार केले. ते तयार करताना त्याला अनेक सुटे भाग मिळणे अवघड होते. त्याच्या तब्येतीची तक्रारही होती. मात्र, तरीही त्याने जिद्दीने ते मशीन तयार केले.

करणचे इंजिनीयरिंगचे शिक्षण आजही सुरू आहे. त्याचे मन शिक्षणातील ढोबळ अभ्यासक्रमाऐवजी सर्जनशीलतेत रमते. तो बंगलोरला ‘फ्रक्टरवर्क’मध्ये काम करण्‍यासाठी गेला तेव्हा त्याला तेथील हवामान मानवले नाही. त्याची जीवनशैली सर्वसामान्यांसारखी असली तरी त्याला बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यास वर्ज्य आहेत. त्यामुळे त्याला खाण्यापिण्यातील नियम पाळावे लागतात. मग त्याने मुंबईहून कंपनीचे काम करण्यास सुरुवात केली. ती कंपनी करण व त्याच्या मित्रांनी मिळून बनवली आहे. ती कंपनी ‘थ्री-डी प्रिंटर’ बनवते. चार-पाच वर्षांपूर्वी ‘थ्री-डी प्रिंटर्स’ भारतात आयात करावे लागत असत. आता त्याचे उत्पादन भारतात होते. त्यामुळे ‘थ्री-डी प्रिंटर्स’ आज इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्तात उपलब्ध आहेत. विशेष म्‍हणजे करणने भारतातील पहिला असेंबल केलेला ‘’थ्री-डी प्रिंटर’’ बनवला आहे.

करणला ‘थ्री-डी प्रिंटर्स’चे वेड लहानपणापासून होते. त्याने कॉलेजमध्ये असताना ‘यू ट्युब’’वर ‘थ्री-डी प्रिंटर्स’चा अभ्यास सुरू केला. त्याच्या लक्षात आले, की ‘थ्री-डी प्रिंटर’’ हा फक्त परदेशात बनवला जातो. ‘रिप-रॅप’’ ही त्यांची कम्युनिटी होती. तोपर्यंत भारतात मात्र कुणी ‘थ्री-डी प्रिंटर’’ बनवलेला नव्हता. ‘थ्री-डी प्रिंटर’’मुळे त्याला हवे ते खेळणे, इमारतीचे मॉडेल, प्लॅस्टिकचे सुटे भाग तो सहजपणे तयार करू शकत होता. तशा कामासाठी जगभर ‘थ्री-डी प्रिंटर’’ वापरले जातात, मात्र ते महागडे होते.

सामान्यांना किंवा शाळांना न परवडणारे होते. म्हणून करणने त्या ‘प्रिंटर’’चे ‘‘व्हर्जन’’ तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी करण सतत ‘रिप-रॅप कम्युनिटी’’च्या सदस्यांच्या संपर्कात होता. करणने प्रिंटर बनवण्यासाठी आवश्यक साहित्य चीन, स्पेन, अमेरिका या देशांतून मागवले आणि त्यांच्या साहाय्याने ‘थ्री-डी प्रिंटर’’ तयार केला. करणने जे भाग भारताबाहेरून मागवले होते ते भाग त्याच ‘थ्री-डी प्रिंटर’’वर तयार केलेले होते. करणने तयार केलेला प्रिंटर हे भारतातील त्या प्रकारचे पहिलेच मशीन होते. ‘‘थ्री-डी प्रिंटर’’ बनवण्याचे तंत्रज्ञान हे ओपन प्रोजेक्ट असल्यामुळे त्यावर कोणी पेटंटसाठी दावा करू शकत नाही. करणने त्यावेळी बनवलेल्या ‘थ्री-डी प्रिंटर’’चा फायदा आर्किटेक्ट लोकांनाही झाला.

थ्री-डी प्रिंटर कसा काम करतो? व्यक्तीने त्याला हव्या असलेल्या वस्तूचे थ्री-डी डिझाइन कॉम्प्युटरवर तयार केल्यावर सॉफ्टवेअरमधून वस्तूच्या गरजेनुसार प्रमाणात सेट करायचे. प्रमाण सेट झाल्यावर ‘प्रिंट कमांड’ दिली, की प्रिंटरमध्ये बसवलेल्या ‘‘पॅलिलॅक्टिक अॅरसिड वायर्स’’च्या ‘लेअर्स’’ येण्यास सुरुवात होते. त्‍यावेळी प्रिंटरमध्‍ये साधारणतः एकशेनव्वद अंश सेल्‍सिअस उष्णता निर्माण होते आणि पहिले प्लॅस्टिक वितळून ते मशीनमध्ये बेडवर पडते. त्याचे तापमान नव्वद अंश सेल्सिअस असते. त्यामुळे ते सर्वप्रथम खाली चिकटते. मग त्यावर 0.5 मायक्रॉनचे ‘लेअर’ पडायला सुरुवात होते. नंतर विशिष्ट कालावधीत ती वस्तू तयार होऊन प्रिंट म्हणून हातात येते. चिमटा किंवा अतिलवचिक वस्तू तयार करण्यासाठी ‘ए.बी.एस. प्लॅस्टिक’ योग्य ठरते. ‘प्रिंटर’ला ‘एल.सी.डी. स्क्रीन’’ किंवा ‘की बोर्ड’’ लावला तर तो ‘एसडी कार्ड’’ किंवा ‘’पेनड्राइव्ह’’च्या मदतीनेदेखील प्रिंटिंगचे काम करता येते.

करणने ‘आयआयटी’मध्ये ‘’पदार्थ’’ या विज्ञान प्रदर्शनात त्याने तयार केलेला ‘थ्री-डी प्रिंटर’ ठेवला होता. तो पाहून सर्व विद्यार्थी-प्राध्यापक वर्गाने करणला शाबासकी दिली होती. आता करणने थ्री-डी प्रिंटरच्‍या क्षेत्रातही भरारी घेण्‍यास सुरूवात केली आहे. त्‍याने KCBOTS ही थ्री-डी प्रिंटर तयार करणारी कंपनी स्‍थापन केली आहे.

करणला तांत्रिक आवडीबरोबरच चित्रपट पाहणे आणि व्हिडिओ गेम खेळायला आवडते. तो त्याच्या यशाचे श्रेय वडिलांना आणि त्याचबरोबर इंटरनेटलाही देतो. पूर्वीच्या काळी पुस्तक लोकांना गुरूसमान होते. आजच्या काळी इंटरनेट हाच लोकांचा गुरू बनला आहे. इंटरनेट या माध्यमात लपवाछपवी, वशिलेबाजी नसते असे करणचे मत आहे. भारतामधील मुलांमध्ये क्षमता आहे. पण त्यांना प्रयोग करण्यासाठी साधनसामग्री खूप कमी उपलब्ध आहे. भारतीय मुलांमध्ये असलेल्या चिकाटी आणि जिद्द या गुणांमुळे ते यशस्वी होऊ शकतात असा आशावाद करण व्यक्त करतो.

करण चाफेकर – 9769980704

– वैभव शिरवडकर

About Post Author

1 COMMENT

  1. अप्रतीम आहे. आपणास शुभेच्छा.
    अप्रतीम आहे. आपणास शुभेच्छा.

Comments are closed.