देवीहसोळची देवीभेट कातळशिल्पावर

0
6

कोकण हा पुरातत्त्व शास्त्रासाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर, लांजा आणि देवगड या तालुक्यांच्या पट्टयात जमिनीतून, अचानक वर यावीत तशी कातळशिल्पे-शिल्पचित्रे-खोदचित्रे (Petroglyph) गेल्या काही वर्षांत समोर आली ! रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळपास दोनशेऐंशीपेक्षा जास्त कातळशिल्पे सापडली आहेत. आमच्या कशेळी व राजापूर या भागांत देवाचे गोठणेजवळ ही भव्य कातळशिल्पे सापडली, त्याची ही माहिती…

ग्रीक भाषेत Petroglyph ‘पेट्रोग्लिफ’ या शब्दाचा अर्थ खडकावर केलेले कोरीव काम असा आहे. ही संज्ञा लेण्यांमधील शिल्पकलेसाठी समर्पक मानतात, तरी ती कोकणातील (आदि)मानवाने सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी कठीण कातळावर कोरलेल्या शिल्पकलेलाही तितकीच लागू होऊ शकते. जांभ्याच्या संपूर्ण उघड्या व विस्तीर्ण सड्यांवर ही कातळशिल्पे किंवा खोदचित्रे कोरलेली आहेत. त्यामध्ये विविध प्राणी-पक्षी, अगम्य भौमितिक रचना, अनाकलनीय चित्रलिपी असे गूढ असले तरी तो एक मानवनिर्मित सुंदर आविष्कार आहे. त्या गूढरम्य आकृती येथे कोणी व का कोरल्या…? त्यांचा उद्देश काय…? त्यातून त्या प्राचीन मानवाला काय अभिप्रेत होते…? याची माहिती नाही. त्यावर अभ्यासकांचे संशोधन चालू आहे. अनेक ठिकाणी मगर, साप, मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी, त्याचबरोबर मानव व पक्षी यांच्या आकृती-चित्रे दिसतात. हत्ती आणि वाघ या प्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. तसेच, मानवी चित्रे तुलनेने जास्त आढळतात. हे सर्व निश्चितच अद्भुत आहे..!

त्यांपैकी एका ठिकाणी अनुभवास आलेले आश्चर्य असे, की त्या मानवी आकृतीच्या पोटावर जर होकायंत्र ठेवले तर ते चुकीची दिशा दाखवते ! त्या आकृतीमध्ये काही चुंबकीय क्षेत्र तयार होते. तो चौकोन अंदाजे वीस चौरस फूट लांबीरुंदीचा आहे. तेथे कोठेही होकायंत्र नेले तरीसुद्धा दिशा चुकीचीच दिसते ! कातळशिल्प खोदताना त्या मंडळींना याची माहिती होती असे नक्कीच वाटते. मग त्याच ठिकाणी असे का खोदले गेले असेल…? वर्तमानकाळात प्रसिद्ध असलेली चुंबक चिकित्सा त्या काळी ज्ञात होती का? त्यासाठीच झोपलेल्या मानवाची ही आकृती आणि तेथे होकायंत्राची गडबड यांचा काही संबंध असेल का…? त्या काळी होकायंत्रे तरी कोठे होती?

खोदचित्रांमागे काही ना काही संकेत नक्की आहेत. त्या कातळशिल्पाच्या जवळ विहीर नाही, मात्र पाण्याचे छोटे कुंड आहे. संशोधकांना तेथे मोठे भुयार सापडले आहे. बाहेरून तरी ते खूप खोलवर गेलेले दिसते. त्याचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

देवीहसोळ या गावी सुंदर कातळशिल्प आहे. राजापूरच्या पुढे असलेल्या ‘भू’ या एकाक्षरी नावाच्या गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर देवीहसोळ येते. तेथे आर्यादुर्गा देवीचे सुंदर मंदिर आहे. ती आम्हा कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबांची (लक्ष्मीनारायणासह) कुलदेवता आहे. त्या मंदिराच्या अलिकडे व मंदिराला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फूटांची चौकट आखलेली दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आकृती कोरलेल्या आहेत. त्यांतील काही समजतात, काही अनाकलनीय आहेत. चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेले असते.

देवीहसोळच्या जवळ भालावली नावाचे गाव आहे. त्या गावात नवदुर्गेचे मंदिर आहे. देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव मार्गशीर्ष वद्य अष्टमीला असतो. त्यावेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी त्या देवीच्या भेटीला येते. त्या दोन गावाच्या दोन देवींची भेट त्यावेळी कातळशिल्पावर होते ! त्या भेटीच्या वेळी कातळशिल्पाच्या मधोमध असलेल्या खोलगट भागात फुरसे नावाचा विषारी साप येतो आणि तो तेथेच दिवसभर बसून असतो अशी दंतकथा आहे. त्या कातळशिल्पापासून देवीच्या मंदिरापर्यंतचे अंतर शंभर मीटर आहे. तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी आढळतात. काही कातळशिल्पे कोरताना अर्धवट सोडलेली आहेत. ती कातळशिल्पे मानवी संस्कृतीच्या अभ्यासाला समृद्ध करणार आहेत.

– जयंत विठ्ठल कुळकर्णी, न्यूयॉर्क jvkny1@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here