आमच्या कुळकर्णी घराण्याची श्रीमंती खूप होती. त्याची ख्याती जंजिऱ्यापर्यंत पोचली होती. सिद्दी चाचे लुटमार करण्याकरता कशेळी येथे 1870 साली समुद्रावरून आले होते. त्यांनी वाड्यात येऊन स्त्रियांच्या वस्त्रांसकट दागदागिन्यांची लुटमार केली होती. मात्र, एका धाडसी कुळकर्णी महिलेने हाताला लागेल तेवढे सोने अंगावर घालून जवळच्या विहिरीत उडी मारली. ती चाचे जाईपर्यंत तेथेच दडून बसली होती. त्यामुळे ती वाचली. तिच्या अंगावर सोने इतके होते, की त्यातून मिळालेल्या पैशांवर पुढे कुळकर्ण्यांच्या चार पिढ्या जगल्या. परंतु श्रीमंती गेली होती !
कशेळीत कुळकर्ण्यांची चार घरे ओळीने होती. एक- दादानानांचे, दुसरे- आमचे, तिसरे- बळवंतभाऊंचे व चौथे- दामुबाबांचे. ‘अमृत्या’ फणस हा आमच्या जुन्या घरासमोर आहे. जुन्या घराचा ताबा बळवंतभाऊंकडे गेला. सर्व कुळकर्ण्यांची देवी ‘लक्ष्मी’ आहे व तीही त्याच घरात आहे. आम्ही राहतो तो भाग वरचा वाडा. बळवंतभाऊ हे पोस्टमास्टर होते. ते डाकघर घरातूनच चालवत असत. मी लहानपणी आईबरोबर कशेळीला जात असे, त्यावेळी पत्रावर शिक्के मारण्यासाठी बळवंतभाऊंना मदत करत असे. ते जुने घर लहान व तेथील विहिरीला पाणी कमी म्हणून 1933 साली मोठे-प्रशस्त-मोकळे दुमजली व उत्तम रचना असलेले भक्कम घर सव्वा एकर जागेत बांधले. ते कशेळकर व पळसुले-देसाई ह्यांच्यामध्ये होते. तेथील विहिरीला पाणी भरपूर होते. घराची जमीन वरच्या जांभीपासून ते खाली पऱ्यापर्यंत आहे. घराचे काम करणारा धोंडू सुर्वे घराच्या गोठ्यामागे राहत होता. त्यावेळी घर बांधण्यासाठी किंवा घराचा विस्तार करण्यासाठी मजूर किंवा कामगार मिळत नसत. ती कामे घरचीच माणसे मेहनत घेऊन करत असत. घरोघरी नारळ-पोफळीचे उत्पन्न प्रमुख असे. जो भाग सपाट आहे तेथे प्रत्येकाची शेतजमीन ही वरच्या व खालच्या वाड्यात होती. कशेळीच्या घरांची रचना दोन डोंगरांच्या उतरणीवर आहे. त्यामुळे घर बांधणे हे सोपे काम नसे. मला आठवते, की आमची आई पावसाळ्यात मोठ्या आईला मदत व घरकामासाठी मुंबईहून काही महिने कशेळीला जाऊन राहत असे. सर्व कुळकर्णीकरांना कशेळीबद्दल खूप प्रेम वाटत होते. आमचे आजोबा-आजी (भाऊ-मोठी आई) गेल्यानंतर आमच्या वडिलांची- अण्णांची बहीण वेणुआक्का ते घर सांभाळत होती. आमची मोठी आई बुद्धिमान होती, ती गुणकारी घरगुती औषधे बनवून आजारी लोकांना देत असे. त्यामुळे मोठी आई गावात लोकप्रिय होती.
कशेळी म्हणजे कऱ्हाडे ब्राह्मणांचे गाव समजले जाते. आमचे आजोबा हरी गणेश कुळकर्णी. कशेळकरांना कशेळीच्या प्राथमिक शाळेनंतर पुढच्या शिक्षणासाठी राजापूर, चिपळूण, मुंबई असा प्रवास करावा लागत असे. आमचे अण्णा (माझे वडील वि.ह.) कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईत, फणसवाडीत जगन्नाथाच्या चाळीत गोविंदकाकांकडे राहण्यास होते. त्यांनी शिकवण्या व लिखाण करून स्वखर्चाने झेवियर्स कॉलेजमधून एम ए केले होते. अण्णा कशेळीच्या मंडळींना खर्चासाठी पैसेही पाठवत.
वेणुआक्का गेल्यावर, अण्णांची आतेबहीण गंगुताई कुवळेकर तिची मुलगी मालू हिच्यासह कशेळीच्या घरी राहण्यास आल्या होत्या. गंगुताईंनी घराची उत्तम काळजी घेतली. कशेळीला वीज त्याच सुमारास आली. गंगुताईंनी घरी वीज घ्यावी असा आग्रह धरला. अण्णांनी गंगुताईंची इच्छा मान्य केली. घरी वीज आली आणि स्वप्नातही येणार नाही अशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विजेचे काम नीट न केल्याने, झोपाळ्यावर बसलेल्या गंगुताईंना विजेचा जबरदस्त शॉक बसला. त्यात त्यांचे निधन झाले! त्यानंतर ते घर दुर्लक्षित झाले, जमीनदोस्त झाले; सर्वांचा उत्साहच निघून गेला. त्याचा फायदा पूर्वी घरकाम करणाऱ्या धोंडू सुर्वे याच्या मुलाने घेतला. त्याने घरावर जी गोठ्याची व इतर जागा होती ती बळकावली. त्याने स्वतःचे घर त्या जागेत बांधले, जमीनदोस्त घराच्या आवारात झाडी आली. तो सव्वा एकर जमिनीचा तुकडा हे ओसाड रान झाले.

बरीच वर्षे निघून गेली. कुळकर्णी पूर्वजांनी दूरदृष्टीने घरापासून दूरवर, एक मोठा भूखंड घेऊन ठेवला होता. एकूण बेचाळीस एकर जागा होती. ती जमीन राज्याच्या योजनेसाठी सरकारला हवी होती. जागा, हरी गणेश (माझे आजोबा) ह्यांच्या नावावर होती. ती जमीन कायद्याने व पुराव्यानिशी कागदोपत्री सिद्ध करण्याची कठीण जबाबदारी केदार व प्रसाद यांनी पूर्ण केली. त्याचे लाखो रुपये मिळाले. ते समप्रमाणात म्हणजे, कुटुंबाला 21-21 एकरांच्या हिशोबाने विभागले गेले. ते पैसे पूर्वजांच्या श्रमाचे-कष्टाचे होते. त्याचे पुण्य आम्हा पुढील पिढ्यांच्या पदरी पडले ! ‘हरी विठ्ठल स्मृती’ची ‘वास्तु शांत’ समारंभपूर्वक 25 मार्च 2016 ला झाली. ‘हरी विठ्ठल स्मृती’ ह्या वास्तूला आम्हा कुळकर्णी भावंडांचा आर्थिक हातभार लागला आहे. ती आमची-कुळकर्ण्यांची वास्तू आहे. पुढील पिढ्यांना आपल्या ‘अमृत्या’सह कशेळीचा इतर मेवा खाण्यास मिळणार आहे !
अशोक व मी अमेरिकेत असतो. आम्ही वेळ काढून कोकण रेल्वेने जाऊन कशेळीला तीन दिवसांची फेरी मारली. शेजारी श्रीकांत व नीलिमा कशेळकर, सदाशिव पळसुले-देसाई ह्यांनी चांगला पाहुणचार केला. अशोकने तो विश्व-व्यावसायिक वास्तुरचनाकार असल्याने त्यांच्या घराची तपासणी केली. अशोक-पन्नाने परदेशात अनेक वर्षे राहूनही तेथे जाऊन कशेळीबद्दलचे प्रेम प्रत्यक्षपणे दर्शवले. त्यानेच ‘हरी विठ्ठल स्मृती’ घरासाठी साजेसा उत्तम रचना असलेला घराचा नकाशा तयार केला होता.
– जयंत विठ्ठल कुळकर्णी, न्यूयॉर्क jvkny1@gmail.com