कशेळी हे उगवत्या सूर्याचे गाव समजले जाते. एका बाजूला पसरलेला अथांग व विस्तीर्ण अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला डोंगरात विसावलेले निसर्गरम्य, हिरवेगार असे शांत गाव. लाल मातीची चिरेबंदी कौलारू घरे, बाजूला असलेल्या कळंब्यांच्या विहिरी, गुरांचे गोठे, खोप्या, झोपाळे, शेणाने सारवलेल्या पडव्या व पुढे-मागे प्रशस्त आगर असा गावचा डौलदार थाट. बैलगाड्या हे सर्वांच्या घरचे वाहन असे.

कशेळीला भाऊच्या धक्यावरून बोटीने किंवा एसटीने जावे लागत असे. तो अनेक तासांचा खडतर प्रवास असे. बोट मुसाकाजी येथे किंवा पूर्णगड बंदराजवळ लागे. मग, छोट्या पडावात सामानासह बसून मैलभर अंतरावर असलेल्या बंदरावर उतरायचे. तेथून पुढे चार-पाच मैल चालत किंवा बैलगाडीने घर गाठावे लागत असे. एस टी ने गेले तर रत्नागिरीला उतरायचे आणि दुसरी एस टी घेऊन राजापूरला जायचे. तेथून कशेळीच्या बांधावर उतरायचे. मग, एक-दोन मैल चालून घरी पोचणे होई. गंमतीदार किस्सा असा: आमच्या घरी भिकू बावकर काम करत असे. तो खालच्या आगारातील एका अतिउंच नारळाच्या झाडावर चढत असे. तेथून तो पूर्णगड बंदरावर लागलेली बोट पाहत असे. ती बंदराजवळ आली, की आम्हाला आणण्यासाठी म्हणून तो बैलगाडी घेऊन घरातून निघत असे. मी माझ्या आईबरोबर लहानपणी कशेळीला अनेकदा बोटीच्या केबिनमधून फर्स्ट क्लासने प्रवास केला होता. बोटीने जाताना काही वेळा अरबी समुद्राच्या किनाऱ्याचे विहंगम दृश्य सुरेख दिसायचे. त्यावेळी ’ठायीं ठायीं पांडवलेणीं सह्याद्रीपोटीं | किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठी || तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडिचाहि | लढवय्या झुंझार डोंगरी तूंच सख्या पाही || सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल | दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल ||’ ह्या महाराष्ट्रगीताचे न चुकता स्मरण होत असे.
कोकण रेल्वे, नवे डांबरी रस्ते व झालेल्या नव्या वाटा यांमुळे कमी वेळात कशेळीला मोटारने जाणे नव्या काळात सुखावह झाले आहे. त्यामुळेच कोकणदर्शनच्या सहली सुरू झाल्या व ऐतिहासिक कनकादित्य व लक्ष्मीनारायण या प्रशस्त मंदिरांमुळे कशेळीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गावांना शहरी रूप येत आहे. निसर्गाची देणगी मिळालेल्या कशेळी गावाला मात्र अजूनपर्यंत शहरी रूपाचा स्पर्श झालेला नाही. त्यामुळे लोकांमधील जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता व आपुलकी जुन्यासारखीच शिल्लक आहे. आमच्या पूर्वजांनी जी पारंपरिक बांधलेली घरे होती किवा आहेत, त्यांची तुलना हल्लीच्या घरांशी होणार नाही. कारण, पूर्वीची घरे प्रशस्त, रचनेने विचारपूर्वक, पैशाने परवडणारी व सर्व दृष्ट्या सोयीची अशी बांधली गेली होती.

सहकारी कौल कारखाना फार वर्षांपासून अच्युतराव कुळकर्णी यांच्या मूळ कल्पनेने कशेळीला सुरू झाला होता. कौले तांबड्या, सकस, कणखर मातीची असत. तसेच, रत्नागिरी शहर नव्या मार्गाने कशेळीला जवळ आल्याने, व्यवसाय व नोकऱ्या यांच्या दृष्टीने स्थानिक लोकांना फायदेशीर झाले आहे. कशेळीच्या एका भागाला लागून जो समुद्रकिनारा आहे तो काळ्या दगडांनी व्यापलेला आहे. प्रचंड लाटांबरोबर येणाऱ्या-फेसाळणाऱ्या पाण्यामुळे एका कोपऱ्यात गुहा निर्माण झाली आहे. तेथून लक्ष्मी-नारायण देवस्थानाला समुद्रावरून येण्यासाठी चोरवाट आहे. ती जेथून सुरू होते त्याला ’नारायण घळ’ असे म्हणतात. गाभाऱ्याच्या मागे बुजलेले गवाक्ष आहे. तेथे समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो असे सांगतात, मात्र ’नारायण घळी’जवळ जाणे धोकादायक आहे. दिवसा आकाश न दिसणारी, दाटीवाटीने असलेली हिरवीगार उंच झाडे, संपन्न फळाफुलांच्या बागायती, भाजीपाला-तांबूस भाताचे मळे, पाटाचे-विहिरीचे पाणी, मोजकी दुकाने, एकमार्गी अरुंद पाऊलवाटा-रस्ते, चिरेबंदी-पोवळी-पापडी-दगडी असलेली घरांची व मंदिरांची प्रशस्त आवारे दिसतात.
माझ्या वडिलांनी वि.ह. कुळकर्णी यांनी प्रसिद्ध साहित्यिक मित्रांची खास सहल कशेळीला आयोजित केली होती. त्यात अनंत काणेकरही होते. मुंबईला आल्यावर त्यांनी कशेळीवर एक आठवणवजा लेख लिहिला होता. त्यांनी म्हटले होते, ‘कशेळी हे नुसते कऱ्हाडे ब्राह्मणांचे गाव नसून तेथे काजूची उसळ व कुळकर्ण्यांचा नावाप्रमाणे अत्यंत गोड-रसाळ असा बरका ’अमृत्या’ फणसही प्रसिद्ध आहे. ह्या अमृत्याची कीर्ती संपूर्ण रत्नागिरीपर्यंत पोचली आहे.’
आम्ही-नातेवाईकांनी, नव्याने छोटेखानी टुमदार घर बांधले आहे. आजोबांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याला ’हरी गोविंद स्मृती’ असे नाव दिले आहे. नव्या वास्तू परिसरातदेखील आमचा अमृत्या फणस वृक्ष आहे.
(माझे वडील, प्रख्यात साहित्य समीक्षक वि.ह.कुळकर्णी यांनी पूर्वी ‘आमची कशेळी – शहरी वातावरणापासून दूर’ हा कशेळीबाबत लेख लिहिला होता.)
– जयंत कुळकर्णी jvkny1@gmail.com
