मराठी भाषासंस्कृती धोक्यात (Marathi Language and Culture in Danger)

सुधीर रसाळ हे संभाजीनगरचे सुविख्यात समीक्षक. ‘विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. त्यामुळे त्या घटनेची विशेष प्रशंसेने दखल घेतली गेली. संभाजीनगरच्याच ‘मुक्त सृजन’ संस्थेने रसाळ यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार केला. त्यावेळी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित, ज्येष्ठ समीक्षक प्रभाकर बागले, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, लोकसाहित्याचे अभ्यासक विश्वनाथ शिंदे अशी प्रमुख वक्ते मंडळी होती. त्या निमित्ताने वृंदा देशपांडे-जोशी यांनी ‘अमृताचे बोल’ नावाचा ब्लॉग लिहिला. त्यात रसाळ यांचे पूर्ण भाषण शब्दन् शब्द उद्धृत केलेच, पण स्वतःच्या भावनाही व्यक्त केल्या.

त्या म्हणतात- मला आठवतं, सर निवृत्त झाले ते 1994 साली. मी त्या वेळेला दहावीमध्ये होते. माझे वडील मला आवर्जून सरस्वती भुवनच्या जालान सभागृहात सरांच्या सत्कार समारंभाला घेऊन गेले होते. वडिलांना कळत होतं, चांगल्या माणसांना ऐकण्याचे संस्कार या जीवावर जाणीवपूर्वक केले पाहिजे. सरांना ऐकायला मिळालं. सरांचं पहिलं वाक्य होतं, “माझा सत्कार का होतोय हे मला कळत नाही, कारण मी शिकवून फार काही वेगळं केलं नाही. मी केवळ माझं कर्तव्य केलेलं आहे. त्याच्यासाठी पगार घेतलेला आहे, त्यात सत्कार वगैरे करण्यासारखं काय आहे?” आणि त्या दिवसापासून आजतागायत पाहते आहे; हा माणूस कधीच निवृत्त झालेला नाही ! एखाद्या तपश्चर्येसारखी ज्ञानाची आवर्तनं एकापाठोपाठ चालू आहेत. आम्ही सरांकडे पाहतो आहोत, सरांना ऐकतो आहोत, सरांचं कार्य जवळून अनुभवत आहोत. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, त्या वेळेला अभिनंदन करण्यासाठी आम्ही घरी गेलो, तेव्हा सरांना म्हटले, किती काम करता तुम्ही? तर सर उत्तरले, “काम संपलं की माणूस संपतो” !

सुधीर रसाळ यांनी वेगवेगळे चार मुद्दे मांडून त्यांचे भाषण नेमके व नेमक्या वेळात केले. त्यांतील मराठी भाषेसंबंधीचा मुद्दा प्रासंगिक महत्त्वाचा वाटल्याने तो येथे उद्धृत करत आहोत. अर्थात त्यातील निरीक्षणे चिरकालीन आहेत. “महाराष्ट्र हा प्रांत आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या भाषेबद्दल अतिशय उदासीन आहे. ‘त्रिभाषा सूत्र’ लावले गेले आणि महाराष्ट्रातली संस्कृत विद्येची परंपरा नष्ट झाली. तिला ब्राह्मणी वगैरे म्हणून तोडले गेले. कोणतीही भाषा एका जातीची नसते. अतिशय श्रेष्ठ असे संस्कृत पंडित महाराष्ट्रात होते. आज महाराष्ट्रात संस्कृत नाही, त्याचा परिणाम असा झाला की मराठी भाषेमध्ये वेगवेगळे, नवे शब्द घडवण्याची जी प्रक्रिया चालू होती, ती पूर्ण संपुष्टात आली. ती हिंदीमध्ये आहे. हिंदी समीक्षेमध्ये जे नवे नवे शब्द, संज्ञा निर्माण केल्या जातात त्या संस्कृतमधून. आम्ही आपल्या इंग्रजी संज्ञा घेऊन कसेबसे भागवतो. तेव्हा ‘त्रिभाषा सूत्र’ आले आणि आमचे नुकसान झाले.

“हिंदी प्रदेशाने हिंदी, इंग्रजी व संस्कृत या तीन भाषा स्वीकारल्या. आम्ही इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषा स्वीकारल्या. त्यानंतर पाचवीपासून हिंदी सुरू झाले. हिंदी एक ‘संपर्क भाषा’ म्हणून या देशात राहिली पाहिजे अशी सगळ्यांचीच भूमिका आहे, माझीही आहे. किंबहुना महाराष्ट्राने हिंदीला कधी विरोधच केला नाही. मध्ययुगातील अनेक मराठी संतांनी हिंदीमध्ये काव्यरचना केली. गणपतीची सुप्रसिद्ध हिंदी आरती ही मराठी संतांनी लिहिली आहे. हिंदीला महाराष्ट्राने कधी विरोध केला नाही. पण तुम्ही पहिलीपासून जेव्हा हिंदी लागू करायला पाहता तेव्हा त्याचा अर्थ असा, की ‘तुम्हाला मराठी भाषेचे अस्तित्व नको आहे’. लहान वयामध्ये भाषेभाषेमधील फरक मुलांना कळत नाही. हिंदी शब्द मराठीतही लहान मुले वापरायला लागतील. मराठी शब्द हिंदीमध्ये वापरायला लागतील. त्यांच्या बोलण्यातून हिंदी व्याकरण मराठीमध्ये घुसेल. त्याचा शेवटी परिणाम असा होईल की मराठी ही हिंदीची एक ‘उपभाषा’ बनेल. ‘बंबइया हिंदी’ जशी निर्माण झाली किंवा महाराष्ट्रामध्ये ‘दखनी भाषा’ जी निर्माण झाली ती याच प्रकारे निर्माण झालेली आहे. अनेक मराठी भाषक जेव्हा मुस्लिम धर्माचा स्वीकार करायला लागले, तेव्हा ते जे उर्दू बोलायला लागले त्यात मराठी मोठ्या प्रमाणात होते. ‘च’ हा एक (प्रत्यय) दखनी भाषेत वापरला जातो, तो मराठीमधून आला आहे. “मै खाताच नही” असा ‘च’ चा वापर केला जातो. मी उर्दूतून शिकलेलो आहे. तिसरीपासून आम्हाला उर्दू होते. माझे मराठी उर्दूमिश्रित मराठी आहे. आमच्या पिढीने आमच्या भाषेतले उर्दू शब्द जाणीवपूर्वक 1948 साली काढले. भाषा बिघडवण्यासाठी बालपणातच दुसरी भाषा मुलाला शिकवावी; म्हणजे मग तो जे भाषेचे मिश्रण करतो ते पाहण्यासारखे असते आणि जशी आज एक ‘राजस्थानी’ आहे किंवा या प्रकारच्या ‘हिंदी उपभाषा’ आहेत, तसे मराठीचे रूप हे पन्नास-साठ वर्षांनी होणार ! …. आणि तेव्हा ‘ज्ञानेश्वर’ आणि ‘तुकाराम’ यांच्याशी तुमचे काय नाते राहणार ? हा विचार तुम्ही केला पाहिजे.

“याचा अर्थ असा की तुमची सगळी संस्कृती या ‘शैक्षणिक धोरणां’मुळे धोक्यात आलेली आहे आणि याचे कोठलेही भान मराठी माणसाला नाही. तो अगदी निवांतपणे बसलेला आहे. दक्षिणेकडची राज्ये हिंदीला विरोध करतात तसा विरोध आपण करण्याचे कारण नाही. पण आपल्या संस्कृतीवर जर एखादी भाषा आक्रमण करत असेल तर आपण उभे राहिले पाहिजे, असे मला वाटते. आणि दुर्दैवाने हे होत नाही.

“इंग्रजी भाषेमुळे आणि आता हिंदीमुळे मराठीमध्ये लेखकांच्या पिढ्याच निर्माण होत नाहीत. मी जेव्हा विचार करतो की अठरा-वीस वर्षांची मुलं मराठी कविता लिहित आहेत, कशा लिहित आहेत, त्यामधल्या काहींच्यामध्ये स्फुल्लिंग आहे, प्रतिभा आहे, विकास होऊ शकतो असे तरुण लेखक मला मराठीमध्ये दिसत नाहीत. विशी-बावीशीतली मुलं मराठी लिहिणारी मला तरी दिसत नाहीत. मग आता जी पिढी लिहिते आहे ती अस्तंगत झाल्यानंतर तिची जागा घेणारा नवा लेखकांचा वर्ग मराठीमध्ये निर्माण झालेला असेल का? जर तो निर्माण होणार नसेल तर मराठी वाङ्मयाचे काय? हाही विचार आपण करत नाही. तेव्हा ’मराठी वाङ्मय आणि संस्कृती’ ही एका भीषण अशा ऱ्हासपर्वात आलेली आहे. त्याचे भान मराठी लेखकांना नाही, मराठी भाषकांना नाही. सगळे स्तब्ध आहेत. कोणीही या सगळ्या परिस्थितीबद्दल एक अवाक्षरही काढत नाही. आणि जो समाज स्वतःच्या संस्कृतीबद्दल उदासीन असतो, त्या समाजाला त्याची ‘संस्कृती’ कधीच राहात नाही. मला वाटते, की आपली संस्कृती टिकावी ही आकांक्षा जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत ही अशी अवस्था राहणार आहे. म्हणून हा विचार प्रत्येकाने करावा, अशी विनंती मी करतो. ज्या क्षणी मराठी माणसाची सांस्कृतिक अस्मिता जागृत होईल त्या क्षणी मराठी भाषेला आणि संस्कृतीला उर्जितावस्था येऊ लागेल.”

– वृंदा देशपांडे-जोशी 9403410791 vrundavdeshpande@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here