हरखचंद सावला यांची ‘जीवनज्योत!’

5
78
carasole

हरखचंद सावला यांचे व्यक्तिमत्त्व परळ येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या परिसरात राहणाऱ्यांना नवीन नाही. पांढरा शुभ्र पायजमा-कुर्ता, प्रसन्न चेहरा ही त्यांची पहिली ओळख. ते कर्करोगग्रस्तांची व त्‍यांच्‍या नातेवाईकांची आस्थेने चौकशी करून त्यांना आधार देत असतात. ते कर्करोग्यांचे आधारवड बनले आहेत. त्यांचे माध्यम ‘जीवनज्योती’ हा ट्रस्ट! त्‍यांनी शेकडो रुग्णांना नवी आशा दिली आहे. त्यांनी रुग्णसेवेचा यज्ञ परळ भागात गेली तीस वर्षें अव्याहतपणे धगधगता ठेवला आहे.

हरखचंद यांचा जन्म गुजरातमधील कच्छ येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. संस्कारक्षम वयात एका आजोबांनी त्यांना सांगितले, की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे! त्या एका वाक्याने त्यांचे आयुष्य बदलले. त्‍यांनी लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे याची मनाशी खुणगाठ बांधली. ते अडचणीत असलेल्या व त्यांच्यापर्यंत पोचलेल्या प्रत्‍येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करू लागले. त्‍यांच्‍या लहानपणी त्यांचा मित्र शाळेची फी भरू शकत नव्हता, तेव्हा सावला काही महिने शाळेत पायी गेले आणि त्‍यांनी त्‍यांच्‍या बसप्रवासाला लागणारे पैसे वाचवून त्यातून त्‍यांच्‍या मित्राची फी भरली.

त्‍यांच्‍या गावातील एक बाई त्यांच्याकडे 1985 साली आली. तिच्या आईला स्तनांचा कर्करोग झाला होता. तिचे मुंबईत कोणीच नव्हते. सावला तिला टाटा हॉस्पिटलमध्‍ये घेऊन गेले, टाटा हॉस्पिटलला जनरल वॉर्ड आहे, तेथे मोफत उपचार मिळतात. ती बरी झाली. अशिक्षित किंवा गावाकडून येणाऱ्या ज्‍यांच्‍याकडे पैसे नसतात आणि ज्यांना योग्‍य ती माहितीही नसते, ज्‍यांची मुंबईत राहण्याची सोय नसते अशा रुग्णांना मदतीची गरज आहे याची जाणीव सावला यांना त्या प्रसंगातून तीव्रतेने भिडली. त्यांनी तसे रुग्ण आणि त्‍यांचे नातेवाईक यांना मदत सुरू केली. तेव्हा त्यांचे हॉटेल लोअर परेल भागात होते. ते सांभाळत त्‍यांनी रुग्णसेवेचे काम सुरू ठेवले. ते पेशंटजवळ बसणे त्‍यांना मानसिक आधार देणे, अशिक्षित लोकांना पोस्टकार्ड लिहून देणे, त्यांना अन्न आणि औषधे पुरवणे ही कामे करत. रुग्ण दगावला आणि त्याचे कोणी नातेवाईक नसतील तर ते मृताच्या अंत्यसंस्काराचे कामदेखील पाहू लागले. कर्करोग पसरला तर रुग्णाचे अवयव कापून त्याला जीवदान दिले जाते. पण तशा अपंग झालेल्या रुग्णांना आधारासाठी इतरांची गरज भासते. ती गरज ओळखून ते रुग्णांना कृत्रिम अवयवदेखील मिळवून देऊ लागले.

सावला याचा कामाचा व्याप वाढत होता तशी त्‍यांना पैशांची चणचण भासू लागली. त्यांनी घराघरांतून जुने कपडे, भांडी, औषधे अशा वस्तू गोळा केल्या. जुन्या कपड्यांपासून गोधड्या शिवल्या आणि त्या रुग्णांना थंडीच्या काळात दिल्या. वर्तमानपत्रांची रद्दी विकूनसुद्धा निधी गोळा झाला. त्यातून रुग्णांना पावसाळ्यात छत्र्या पुरवणे असेदेखील उपक्रम सुरू केले. एकट्याने तसे काम बारा वर्षें केल्यावर मग त्यांनी ’जीवनज्योती ट्रस्ट’ स्थापन केला. त्यामुळे देणग्या मिळवणे सोपे झाले. एक रुपया दिला तरी ते पावती देतात, इतका पारदर्शक व्यवहार संस्थेतर्फे करण्यात येतो!

कोणीतरी सावला यांच्याविरुद्ध महापालिकेत तक्रार केली, की सावला बेकायदेशीर पद्धतीने अन्नाचे वाटप करतात. महापालिकेचे काही लोक आणि वॉर्ड ऑफिसर नियमांचे पुस्तक घेऊन आले. त्यांनी सरकारी खाक्या दाखवत जबाब नोंदवण्‍यास सुरुवात केली. पण सावला यांच्या कामाचे स्वरूप कळताच त्यांची लेखणी थबकली. काम चांगले असेल तर व्यवस्थादेखील नमते घेते! एकदा एका बाईने खोटी कागदपत्रे दाखवून मदत मागितली. अशा लोकांमुळे त्यांना काही वेळेला मनस्तापसुद्धा झाला तरी सावला यांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केले!

‘जीवनज्योत’ ही संस्था सेंट जॉर्जेस, कामा आणि टाटा हॉस्पिटल येथे सुमारे सातशे लोकांना दोन वेळचे जेवण देते. औषध बँक, सिक बेड सर्व्हिस, लहान मुलांसाठी टॉय बँक (खेळणी पुरवणे), त्‍यांच्‍या सहलींचे नियोजन आणि कृत्रिम अवयव बनवून देणे या अन्य सुविधा रुग्णांना पुरवते.

सावला मुक्या प्राण्यांची काळजीदेखील घेतात. त्‍यांनी 26 जुलैच्या प्रलयानंतर विविध ठिकाणांहून तीन हजार जखमी कबुतरांना आणून त्यांची देखभाल केली. त्यांना पाणी, अन्न देत त्यांचे प्राण वाचवले. रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना काही इजा झाली तर त्यांचीदेखील काळजी ‘जीवनज्योत’ ही संस्था घेते. ते रस्त्यावरील भिकाऱ्यांना अंघोळपांघोळ घालून स्वच्छ करतात आणि रुग्णालयात दाखल करतात. रस्यावरील भिकारी हे बऱ्याच वेळा मानसिक रुग्ण असतात. रुग्णालयात उपचारादरम्यान त्‍यांना त्यांचे घर किंवा नातेवाईक आठवले तर त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था केली जाते. सावला यांनी अनोखा हृदयस्पर्शी ’घर वापसी’ सोहळा अनेकदा अनुभवला आहे. काही जणांची कुटुंबे त्‍यांना पुन्हा सामावून घेण्यास नकार देतात. अशा वेळी, त्‍यांना पुन्हा मुंबईला आणून अनाथाश्रमात दाखल करण्याचे कामही ते तितक्याच आत्मीयतेने करतात.

सावला यांनी आतापर्यंत एकशेदोन वेळा रक्तदान केले आहे. सावला यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण त्यांनी स्वतःला झगमगाटापासून दूर ठेवले आहे. त्यांचे स्वप्न कर्करोग्यांची काळजी आत्मीयतेने घेणारे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचे आहे. त्यांची पत्नी त्यांच्या कार्यात त्यांच्याबरोबर आहे. चिंतन आणि नियासा ही त्यांची मुले त्यांच्या कार्यात जमेल तशी सहभागी होतात. चिंतनचा स्वत:चा व्यवसाय आहे. नियासा डॉक्टर आहे. ‘जीवनज्योती ट्रस्ट’ची वेबसाईट तयार करण्यात तिचा वाटा आहे.

हरखचंद सावला यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. योग, व्यायाम इत्यादी नित्यक्रम आटोपल्यावर, ते साडेआठ वाजता काम सुरू करतात. मग दिवसभरात जशी गरज असेल त्याप्रमाणे सेवा करतात. झोपण्‍याची वेळ नक्की नसली तरी झोपी जाताना त्यांच्या चेह-यावर समाधान असते!

हरखचंद सावला 9869064000

– रोहन नामजोशी 99750 21543

About Post Author

Previous articleरांगोळी-नृत्यकलाकार – भूषण पाटील
Next articleरोहिडा ऊर्फ विचित्रगड – शिवकाळाचा साक्षीदार
रोहन नामजोशी हे मूळचे नागपूरचे. ते २०१२ साली पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या पदविका परीक्षेत विद्यापीठात पहिले आले. सध्‍या ते मुंबईत पत्रकारिता करतात. नामजोशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठी विविध पुस्तके लिहितात. ते 'टार्गेट प्रकाशन' या संस्थेत प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्‍याचे 'टार्गेट प्रकाशन'तर्फे पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या पदांच्‍या परीक्षांसाठीचे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स'मध्‍ये स्पर्धा परीक्षांवर लेख लिहितात. त्‍यांनी 'पुणे सकाळ'मध्ये काम केलेले आहे. नामजोशी यांना समाजकारण, राजकारण, साहित्य या विषयांवर लिहिण्याची आणि वाचण्याची आवड आहे. लेखकाचा दूरध्वनी 99750 21543

5 COMMENTS

  1. हरखचंद सावलाजी आपल्या कार्यास
    हरखचंद सावलाजी आपल्या कार्यास सलाम, तो ही आदराने.
    हरखचंद सावला
    आपल्या सारखा
    मानव विरळा
    आज तीस वर्षांनी
    आपल्यातला मानवी
    भाव आजचं कळला.

  2. सावला यांच्या कामाप्रती खुप
    सावला यांच्या कामाप्रती खुप आदर वाटला.कॅन्सरपीडित लोकांची आज तीस वर्ष केलेल्या कामाबद्दल त्यानां शतःशा नमन.

  3. सलाम हरखचंदजी..तुमचा अभिमान
    सलाम हरखचंदजी..तुमचा अभिमान वाटतो.

  4. आपण अपंगासाठी काय मदत करू
    आपण अपंगासाठी काय मदत करू शकता का? ८०८७८२४७६० या नंबर वर मेसेज करा. please……

  5. सावलाजी आपल्या कार्यास सलाम…
    सावलाजी आपल्या कार्यास सलाम.कॅन्सरपीडित लोकांची आज तीस वर्ष केलेल्या कामाबद्दल त्यानां शतःशा नमन.

Comments are closed.