मैत्रेयी नामजोशी – तिचा कॅनव्हासच वेगळा!

4
44
carasole

‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मधून चित्रकलेचे शिक्षण घेतेलेली मैत्रेयी नामजोशी जेव्हा ‘आयआयटी’मध्ये थिसिस प्रोजेक्ट करत होती तेव्हा, तिला तिने कागदाची चौकट मोडून खुल्या दिलाने तिची कला मांडली पाहिजे असे वाटले आणि मग चहाच्या एका कट्ट्याचा कायापालट झाला!

मैत्रेयी सांगते, “जेव्हा मी प्रोजेक्ट सुरू केले तेव्हा फार विचार न करता मोठ्या भिंतीवर माझ्या ब्रशला करामत करू द्यायची इतकेच डोक्यात होते, पण हळुहळू चित्र आकार घेऊ लागले. तेव्हा जाणवले, की यामागे काही विचार असला, काही संकल्पना असली तर गंमत आहे … चित्र पूर्ण झाले तेव्हा त्या जागेशी लोक वेगळा संवाद साधू लागले … वेगळा आनंद आणि अनुभव घेऊ लागले तेव्हा एक डिझायनर म्हणून मला समाधान मिळाले.”

मैत्रेयीसाठी एक चित्रकार, एक डिझायनर म्हणून तो अनुभव नवी दिशा देणारा होता. जेव्हा ‘मास्टर ऑफ डिझाईन’ अभ्यासक्रमाची सांगता झाली आणि प्लेसमेंट नक्की होऊ लागल्या तेव्हा आयटीच्या क्षेत्रात इंटरफेस डिझायनर म्हणून काम करण्याला पुष्कळ वाव होता आणि पैसाही चांगला होता, पण मैत्रेयीच्या मनात मोठ्या कॅनव्हासवर मोकळ्या मनाने काम करण्याचे जबरदस्त आकर्षण होते. तिने त्याच कलेला व्यावसायिक रूप देण्याचे ठरवले. ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये चित्रकलेचे तंत्र आणि कसब उत्तम रीतीने शिकवले जाते आणि संकल्पनात्मक विचाराचे शिक्षण ‘इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर’मध्ये झाले होतेच, पण केवळ कलाकार म्हणून काम करून पुरेसे नव्हते, त्या कामाला पूर्णवेळ व्यावसायिक स्वरूप देणे हे वेगळे आव्हान होते.

मैत्रेयी म्हणाली, “लोकांशी बोलणे, माझे काम त्यांना समजावून सांगणे, माझ्या संकल्पना त्यांच्यापर्यंत पोचवणे, त्यांना काय अभिप्रेत आहे हे समजून घेणे आणि  सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक बाजू सांभाळून काम करणे या नवीन गोष्टी मी शिकले.”

भिंती रंगवण्याचे काम व्यावसायिक पद्धतीने करणारे बरेच लोक मार्केटमध्ये आहेत, मग अशा वेळेला वेगळे काम कसे करावे याचे उत्तर तिला तिच्यामधील डिझायनरने दिले. एखाद्या जागेकडे लोक कोणत्या दृष्टीने पाहतात … मैत्रेयी घराकडे किंवा ऑफिसकडे सांगण्यासारखे काय आहे याचा विचार करून डिझाईन करू लागली … प्रत्येक ठिकाणी वेगळे डिझाईन, वेगळी अभिव्यक्ती … सुरुवातीला लोक कॅटलॉग आणि मेनू मागत असत … “हल्ली सर्वांना टेम्पलेट पाहून निवड करण्याची सवय असल्याने मला समजावून सांगणे कठीण जात असे, पण मग मी स्केच काढणे, एक फूट बाय एक फूट रंगवून दाखवणे अशा पद्धती वापरून माझी कल्पना क्लायंटला समजावू लागले. मग गोष्टी सोप्या झाल्या.”

मैत्रेयीला दहा वर्षांच्या मुलीची खोली डिझाईन करायची होती, तेव्हा तिला तिच्याशी संवाद निर्माण करावा लागला. तिचे जग समजावून घ्यावे लागले आणि मग तिच्या चित्रकलेच्या पुस्तकातीलच संदर्भ घेऊन मैत्रेयीने काम केले. आव्हान हे होते की दहा वर्षांच्या मुलीला ती जागा आवडली पाहिजे आणि ती मोठी होत असताना पुढची पाच-सहा वर्षे तिचे भावविश्व सामावेल अशीही ती असली पाहिजे.

ती कला शिकली होती, पण पैसे कसे वापरावे, घ्यावेत, त्याचे व्यवस्थापन कसे करावे हे सर्व मैत्रेयी प्रोजेक्टमधून शिकली. कधी कोणी पैसे बुडवले तर कधी अगदी मोकळ्या मनाने तिच्या कलेची कदर करत, सकारात्मक सहभाग घेत तिला खुलून काम करू दिले. उद्योजक किर्लोस्करांच्या घरी मैत्रेयीला खूप समाधान देणारा आणि आत्मविश्वास देणारा असा अनुभव मिळाला. कधी वाटरप्रूफिंग करताना चित्र खराब झाले आणि मग नव्या दृष्टीने विचार करून त्या चित्राला पुन्हा एक नवीन जीवन द्यावे लागले.

सुरुवातीला फक्त पाच हजार रुपये मानधन घेऊन काम करणारी मैत्रेयी फेसबुकसारख्या मोठ्या कंपनीसाठी आत्मविश्वासाने प्रोजेक्ट करत आहे. या प्रवासात तिला सहकलाकार आणि कुटुंब यांचा चांगला पाठिंबा मिळाला. स्वतः कलाकार असलेली आई आणि डिझायनर असलेल्या भावाने नवीन कल्पना दिल्या, तर सासरच्या मंडळींनी घराची काळजी घेणे, वेळेअवेळी बाहेरगावी असणे, प्रवास करणे या सर्व बाबींना समजून घेतले. मैत्रेयीची तिची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अडीच हजार रुपये प्रती स्क्वेअर फूट या दराने ती मोठी कामे घेते. स्त्री असूनही तिला कधी व्यावसायिक दुजाभावाचा अनुभव आला नाही, फक्त एकदा मोठ्या परातीवर चढून तू कशी काम करणार असे एका क्लायंटने विचारले, इतकेच.भविष्यात ज्यूट, विनाइल सारख्या नवीन मटेरियलमध्ये नवीन तंत्र वापरून काम करणे आणि अनामोर्फिक 3D खोली असलेले प्रकल्प घेऊन स्वत:चा ठसा उमटवावा असे मैत्रेयीचे स्वप्न आहे.

– चिन्मय भावे

About Post Author

4 COMMENTS

  1. I know this is too late to
    I know this is too late to reply on this article. But its never too late. Your work is amazing. You are a true inspiration. Just loved your observation and how you put it in your work.

Comments are closed.