Home वैभव गावांच्‍या अंतरंगात खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर

1
394

पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूर्व क्षितिजावर आलेला चंद्र आकाशात वर येऊ लागतो आणि पूर्वाभिमुख असलेल्या कोपेश्वर मंदिरावर त्याची किरणे पडू लागतात. मंदिर शुभ्रधवल चंद्रप्रकाशाने उजळू लागते. शरद ऋतूमधील आल्हाददायक चैतन्यमय वातावरण आणि त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे उल्हसित करणारे भासते. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री तारकाकृती मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या छतावरील वर्तुळाकार झरोक्यातून चंद्रकिरण मंदिरात आत प्रवेश करतात. झरोक्याखाली असलेली रंगशिळा चंद्रप्रकाशात उजळून जाते. वर्षातून एकदा, फक्त त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री काही घटिकांपुरता होणारा हा सोहळा कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य अंतर्बाह्य खुलवतो.

हे प्राचीन शिव-विष्णू मंदिर शिल्पकृतींनी संपन्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावचे मंदिर वेगवेगळ्या राजवटींचे साक्षीदार आहे. मंदिराची निर्मिती सहाव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत घडत गेली. तेथे विकसित झालेला शिल्पकलेचा ठेवा आगळ्या सौंदर्याचा आहे. सहाव्या शतकात वातापीच्या चालुक्य राजाने देवळाची पायाभरणी केली. कृष्णा नदीजवळ त्या वेळेस कोपल नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावात देवळाच्या निर्मितीस सुरुवात झाली. देवळाच्या बांधकामासाठी आवश्यक असा कोपल गावात न आढळणारा पत्थरपण कृष्णा नदीमार्गे जलवाहतूक करून दूरवरून आणला गेला. शिल्पकामात कसबी कारागीर काम करू लागले. ते काम काही दशके सुरू राहिले.

दरम्यान, राष्ट्रकूटांनी चालुक्यांचा पराभव केला. राष्ट्रकूटांच्या राजवटीतदेखील शिल्पकलेचा विकास झाला. मात्र ते देऊळ त्यानंतर आलेल्या राजवटींमध्ये काही शतके दुर्लक्षित राहिले. त्याच्या बांधकामात अडथळे आले. देवळाचे काम संघर्षलढाया यांमुळे अपूर्णावस्थेत राहिले. परंतु नंतर आलेल्या शिलाहार राजवटीत (अकराव्या शतकात) शिल्पकलेला पुन्हा आश्रय मिळाला.

मंदिराच्या शिल्पकलेच्या कोरीव कामात वेगवेगळ्या शैलींचा आविष्कार आढळतो. शिलाहारांच्या कुलदैवत असलेल्या सप्तमातृकांचे शिल्प मंदिरात आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे, तारकाकृती आहे. मंदिर पाषाणात असून, कंगोरा-खोबणी (interlock) पद्धतीने पाषाण एकमेकांना जोडून घेतले आहेत. मंदिराची रचना स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी आहे. दगडी प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर मंदिराचा स्वर्गमंडप येतो. कोरीव कामांनी सजलेल्या, अठ्ठेचाळीस खांबांनी तोलून धरलेल्या गोलाकार स्वर्गमंडपाला आगळे सौंदर्य आहे. त्या काळात मंदिरांकडून विद्याभ्यास; तसेच नृत्य-गायन-वादन अशा विविध कलांना आश्रय दिला जात असे. कलावंत मंदिरातील रंगशिळेवर कला सादर करत असत.

शिळा मंदिरातील स्वर्गमंडपामध्ये आहे. छतावरील वर्तुळाकार झरोक्यातून त्रिपुरी पौर्णिमेला रात्री चंद्रकिरण बरसतात. कलावंतांचा गौरव करण्यासाठी छताची अशी आगळी रचना केली असल्याचे म्हटले जाते. स्वर्गमंडपामधील स्तंभांवर छताजवळ इंद्र, अग्नी, वायू, यमकुबेरवरुणईशान आणि निर्ऋती हे अष्टदिक्पाल आणि विष्णू असे सर्वजण सपत्नीक आणि त्यांच्या त्यांच्या आयुधांसह आहेत. अष्टदिक्पाल, विष्णू आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती वाहनांवर बसलेल्या आहेत. मंदिरातील एकशेसव्वीस स्तंभ वर्तुळाकार, चौकोनीषट्कोनी असून त्यावर अप्रतिम कोरीव काम आहे. मंदिरात पौराणिक कथा, पंचतंत्रातील कथा, रामायण-महाभारत यांतील घटना शिल्पांकित करण्यात आल्या आहेत.

गाभाऱ्याबाहेर द्वारपाल आहेत. गाभाऱ्यात दोन लिंगे आहेत. पैकी एक कोपेश्वर म्हणजे शंकर आणि दुसरे धोपेश्वर म्हणजे विष्णू अशा त्या दोन देवता आहेत. तेथे विष्णू लिंग स्वरूपात आहे ! गाभाऱ्यातही देखण्या शिल्पकृती आहेत. मंदिराची गवाक्ष कलाकुसरीने विलोभनीय आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतींवर यक्ष, सुरसुंदरी, विषकन्या; तसेच गणपती, विष्णू, सरस्वतीकालभैरवचंडिका अशा देवतांची शिल्पे घडवली आहेत. मदन व रती या कामदेवतेचे शिल्प तेथे आहे. मंदिरावर असलेले अरब व चिनी पुरुषाचे शिल्प त्या काळात तेथे येणारे परदेशी प्रवासी, व्यापारी यांची नोंद करणारे आहे. मंदिरावर सर्वात तळाला असलेला गजथर (म्हणजे एका ओळीतील हत्तीशिल्पे) मूळचा आकर्षक आहे.

कोपल गाव मोगल राजवटीत खिदरखान नावाच्या सरदाराच्या ताब्यात होते. त्यामुळे गावाचे नाव झाले खिद्रापूर. नंतर नेर्लेकर नावाचा मराठ्यांचा सरदार त्या परिसरात प्रमुख होता.परंतु मंदिराचा असा इतिहासक्रम नोंदलेला आढळत नाही. इतिहासक्रमात झालेल्या विध्वंसक तोडफोडीच्या खाणाखुणा अंगावर बाळगत असलेला गजथर, त्यावर नरथर यावरील थक्क करणारे कोरीव काम; हत्तींची गतीत्यांचे अलंकारमाणसांचे भावक्रियाअलंकारकेशभूषावेशभूषा असे अनेक बारकावे आहेत. मंदिरावर शिलालेख कन्नड भाषेतही आहेत. एक शिलालेख देवनागरी भाषेत असून त्यामध्ये खिद्रापूर गावाजवळचे कुरुंदवाड गाव येथील मंदिराच्या व्यवस्थेसाठी इनाम दिल्याचा तपशील आहे. शिवमंदिराचे सार्वत्रिक वैशिष्ट्य असलेला नंदी तेथे नाही. मात्र जवळच असलेल्या येडूर गावात फक्त नंदीचे देऊळ आहे.

त्या गावात दोन मोठ्या लढाया झाल्या. चालुक्य राजा अहवमल्ल आणि चोल राजा राजेंद्र यांच्यात 1058 मध्ये झालेले युद्ध आणि त्यानंतर शिलाहार राजा भोज दुसरा आणि देवगिरी यादव राजा सिंघन- दुसरा यांच्यात झालेले युद्ध… त्यांच्या स्मरणशिला असलेले वीरगळ मंदिराच्या परिसरात आढळतात. चालुक्य राजवटीतील पुलकेशी राजांनी आरंभ केलेले हे शिल्पसौंदर्याचे आगळे लेणे म्हणजे शिल्पकलेचा संपन्न वारसा आहे. मात्र कोल्हापूर परिसरात पंचगंगा व इतर नद्या येणाऱ्या पूराचा धोका या मंदिरालाही जाणवत आहे. काही वर्षांपूर्वी मंदिरात पूराचे पाणी घुसल्याच्या आठवणी स्थानिक सांगतात. 

–  रजनी देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. खूप छान आणि तपशीलवार वर्णन! अभिनंदन आणि आभार! शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here