आमच्या निफाडच्या अकोलखास गल्लीतील मारुती मंदिर माझ्या मनात गच्च रुतून बसलेले आहे. ते मंदिर म्हणजे गल्लीच्या मधोमध दुमजली माडी असलेली पवित्र वास्तू. दगडी जोत्यांवर आणि लाकडी खांबांवर वीटबांधकाम केलेली. मला ते मंदिर चांगले मोठे वाटायचे. आमच्या गल्लीत प्रामुख्याने धनगर लोकांची वस्ती; बाकी मग लोकांची छान सरमिसळ. होळकर चाळीतील शेखसर, दोस्ती नावाच्या चाळीतील सिंधीभाभी, कुमावत मिस्तरी, मिलिटरीमॅन सोनारे, डॉक्टर चौधरी, चिंतामण अहेर, डी एन भगुरेसर अशी वेगवेगळ्या भागांतील माणसे आमच्या गल्लीत राहण्यास होती. अशाच कुटुंबांमुळे माझी गल्ली मला वैश्विक वगैरे वाटे ! गावातील चार-दोन प्रसिद्ध ब्राह्मणही आमच्या गल्लीत राहण्यास होते. त्यामुळे आम्ही मुले गर्वाने फुगून जायचो. जणू देवबाप्पाच आमच्या गल्लीत राहण्यास आहेत ! तसा मान त्यांना निफाड गावही आवर्जून देत असे.
मारुती मंदिरात दर्शनासाठी वगैरे भल्या पहाटेपासून लगबग सुरू होई. मंदिर तसे चोवीस तास उघडेच असे. आम्हा मुलांच्या शाळा-कॉलेजच्या परीक्षा असल्या की मुलांचे मंदिरात येणे हे व्हायचेच. “देवा, मला पास कर, चांगले मार्क्स मिळू देत” म्हणून मनोभावे पाया पडणारी मुले हमखास दिसत असत किंवा कोणाशी छोटेमोठे भांडणतंडण झाले किंवा एखादी खुन्नस झाली तर, आम्ही ‘जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली !’ असे काही तरी द्वाडपणे म्हणायचो. आम्ही मारुतीदेवावर कोठलाही भार टाकून निर्धास्त होत असू !
मंदिरात मारुतीरायाची मूर्ती आधी दगडाची होती. तीन-साडेतीन फुटी उभी, दणकट मूर्ती. एका हातात पर्वत आणि दुसऱ्या हातात गदा असलेली. विलक्षण देखणी आणि बोलक्या भावमुद्रेची अशी ती होती. हनुमान जयंतीला मंदिराची रंगरंगोटी झाली की देवाला स्वच्छ न्हाऊ-माखू घालून व्यवस्थित शेंदूरलेपन होई. मग आमचा मारुतीराया आणखी रुबाबदार दिसायचा. देवासमोरच्या दोन उभ्या पितळी समयाही घासून-पुसून लख्ख होत. तेथे असलेले इतर देव म्हणजे गणपती, महादेवाची एक पिंड. ते देवही छान स्वच्छ केले जात. मंदिरातील देवांचे, संतांचे फोटो स्वच्छ पुसले जात. हनुमान जयंतीला मंदिरात गर्दी होई, तेव्हा आम्ही मुले जरा जास्तच माकड व्हायचो !
मारुती जन्माच्या दिवशी जणू गल्लीचा वाढदिवस असे. घराघरातून उत्साह ओसंडून वाहत असे. मात्र आमच्या गल्लीशेजारच्या माणकेश्वर चौकाचा मान हा आमच्यापेक्षा जरा मोठाच वाटे. भजन, कीर्तन, सप्ताह यामुळे माणकेश्वर चौक गजबजलेला असे. शिवाय, त्या चौकात रामाचे, गणपतीचे, माणकेश्वराचे, हरिहरेश्वराचे अशी अधिकची चार मंदिरेही आहेत. आणखी इतिहासप्रसिद्ध फणसे वाडा, 1919 साली स्थापन झालेले ‘अ’ वर्गाचे माणकेश्वर सार्वजनिक वाचनालय, वैनतेय विद्यालय आणि निफाड इंग्लिश स्कूल अशा दोन माध्यमिक शाळा, तलाठी कार्यालय, तालुका मास्तरांचे कार्यालय, गावाची पाण्याची टाकी, महत्त्वाचे म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे जन्मस्थान याच चौकाच्या एका बाजूला असल्यामुळे आमची गल्ली माणकेश्वर चौकाच्या तुलनेने काहीशी दुय्यम वाटे, पण तरीही एकमेव मारुती मंदिरामुळे की काय, आम्ही गावात किंचित वरचढ ठरत असू. अर्थात हे आपले आमचे मुलांचे मत. गावचा बैलपोळा, मेंढीपोळाही आमच्याच गल्लीतून फुटे. मारुतीसमोर गावचे बैल झोकात सलामी देत. मग आमची कॉलर ताठ होई. धुळवडीला वीर नाचण्याची किंवा डसन डुक्करची सुरुवातही आमच्याच मारुती मंदिरापासून होई.
गीतकार राम उगावकर मुंबईहून गावी निफाडला स्वतःच्या गल्लीत आले, की मारुतीचे दर्शन हमखास घेत. ‘आई तुझं लेकरूऽ येडं गं कोकरुऽऽ रानात फसलंयऽऽ रस्ता चुकलंयऽऽ सांग मी काय करूऽऽऽ ?’ असे अलवार गीत लिहिणारे ‘आली गं… आली गं… सुगंधा गावात आली !’ सारखी फक्कड लावणी लिहिणारे हेच का आपल्या गल्लीतले थोर माणूस ! असे म्हणून आम्ही त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असू.
नवीन लग्न झालेल्या नवरानवरीला वरातीपूर्वी मारुती मंदिरात आणून बसवत. तेव्हा रात्रीच्या वराती अशा काही रंगत, की गल्ली नुसती गजबजून जाई. मारुतीरायामुळेच आमच्या गल्लीला तो मोठा मान मिळत होता. मारुतीराया तसा आम्हा मुलांचा खास मित्रच होता. मारुतीचा प्रसाद, त्याला भाविकांनी टाकलेल्या सुट्ट्या पैशांची चिल्लर, मंदिराचे उभे खांब – धराधरीचा खेळ, संध्याकाळचा भरगच्च हरिपाठ, आषाढी- कार्तिकीला निघणारी गावदिंडी, भजने वगैरे या सर्वांत आम्ही मुले आघाडीवर असायचो. आम्ही मंदिराची माडी, मंदिराच्या सातआठदहा खिडक्या, दोन ओटे, पुढचे मैदान यांत सदानकदा धुडगूस घालत असू. मंदिर जणू आमच्यासाठी दुसरे घर होते ! मंदिराबाहेर मोठी मोकळी जागा किंवा मैदान असल्याने आम्ही तेथे क्रिकेट, कबड्डी, विटी-दांडू, भोवरे, गोट्या, आंबाकोयी, चिंचोके, चोर-पोलिस, आबाधोबी लिंगोरचा, वाळूचे खोपे, गज खूपसा-खूपशी… असा प्रत्येक खेळ. मोठी माणसे क्वचितच रागावत. मंदिरासमोर आमचे खेळणे रात्री उशिरापर्यंत सुरू असे. काहीच नसले तर मंदिरांसमोरचे दोन ओटे आम्हाला गप्पा छाटण्यास आणि त्या गप्पा ऐकण्यास बरे पडत. काही थोराड मुले मंदिराच्या माडीवर जाऊन तेथे पत्ते, सोरट असे खेळ खेळत. तेथेच बसून चोरून बिड्याथोटके ओढत. तंबाखू खात. आम्हाला ते विलक्षण थ्रिलिंग वगैरे वाटे ! आम्ही लिंबूटिंबू मुले अंपल चंपल, सागरगोटे यांसारखे बैठे खेळ खेळत असू. आमच्यासाठी मंदिर हक्काचे आणि अपार आनंदाचे निधान होते.
गल्लीतील रघुनाथ पगारे बाबा मंदिराचे पुजारी होते. सर्वजण त्यांना न्हाईबाबा म्हणत. त्यांना तीन मुली, पैकी मोठया कमलताईंचे लग्न झालेले. शकुताई आणि उमा या दररोज मंदिरात झाडलोट करत. वडिलांप्रमाणेच त्या दोन मुलींचाही आवाज गोड होता. आम्ही त्यांना मोहम्मद रफी आणि लता-आशा म्हणायचो. पगारे कुटुंबाला मारुती मंदिराकडून विशेष अशी मिळकत नव्हती. मात्र ते पद मानाचे म्हणून त्यांनी स्वतःकडे ठेवले असावे ! त्याच अधिकाराने न्हाईबाबा मंदिरात दंगामस्ती करणाऱ्या वात्रट मुलांवर चिडत – त्यांच्या अंगावर रागाने धावून जात. त्यामुळे न्हाईबाबांना पाहिले की वात्रट मुले तेथून धूम ठोकत. मंदिराचे काही विश्वस्त किंवा कारभारी असावे. त्यात उगावकर आप्पा, माधवनाना शिरसाठ, कांदळकर बाबा, मारुती जन्माचा अभंग (पाळणा) अप्रतिम म्हणणारे यादवराव गाजरे, बाळूमामा सावंत, खंडूशेट आहेरराव, बाबुराव आहेरसर, प्रभाकर तांबे, बाबुराव खालकर, जगताप, ढेपले, मोरे, जाधव, साबळे अशी मंडळी होती. हनुमान जयंतीच्या वेळी किंवा अशाच एखाद्या वेळप्रसंगी त्यांची छोटीमोठी कामे करताना आम्हा मुलांना धन्य वाटे ! ‘एक पिवळा हत्ती आण, एक लवंगी बिडी बंडल आण, एक गायछाप पुडी आण, सुतळीचा तोडा आण …’ अशी ती छटाक कामे असत. आम्हा मुलांना गल्लीतील वडीलधारी माणसे हक्काने कामे सांगत. आम्ही ती कामे आनंदाने आणि उत्साहात करत असू.
होळीला घरोघरी जाऊन ‘व्हळी व्हळीच्या पाच पाच गवऱ्या ऽऽऽ !’ असा गगनभेदी आवाज देऊन आमचे घसे हमखास बसत. गल्लीची मोठी होळी बघून गाव आमचे कौतुक करत असे. तेथील विस्तू, त्यांच्या गल्लीतील होळी पेटवण्यास घेऊन जात. त्यावरही आम्ही खुश होऊन जात असू. त्यावेळेच्या त्या भरपूर गवऱ्यांनी भरलेले आमचे मारुती मंदिर डोळ्यांसमोरून जात नाही. वेडेपणाच आमचा, की आम्ही त्यावेळी भली मोठी होळी पेटवायचो आणि त्यानंतर एक मोठेसे झाड तोडून होळीत आणून टाकायचो. त्या होळीवर साधारण आठवडाभर गल्ली गरम पाणी करायची. आमच्या मारुती मंदिरात केव्हाही जा, तेथे कोणी नाही ! असे सहसा व्हायचे नाही. पाया पडण्यास येणारे स्त्री-पुरुष, काही बाबालोक, वाटसरू, वारकरी, आरोग्य विभागाची डास फवारणी करणारी टोळी, एखादा भिकारी… असे कोणी ना कोणी तेथे असेच. म्हातारे असे बनकरबाबा चकमक घेऊन चिलीम कसे पेटवतात हे आम्हाला मारुती मंदिरातच बघण्यास मिळे. तेव्हा तो लयदार धूर पाहत आणि चिलिमीचा उग्र वास घेत आमचा वेळ जाई. मंदिराच्या सावलीत चालणारे भांडे कल्हई काम, गाद्या भरण्याचे काम असे कोठलेही छोटेमोठे उद्योग आम्ही तासन् तास पाहत असू.
कोर्टातील दत्तुकाका डोंगरे दररोज देवदर्शन झाल्यानंतर देवाला सुट्टे पैसे टाकत. त्यावरही आमचे लक्ष असे. दत्तुकाका स्वभावाने शांत व प्रेमळ होते. माधवनाना शिरसाठ यांच्या हरिपाठात मीही एक मुलगा होतो. त्यावेळी हरिपाठ, आरत्या, काही अभंग पाठ झाले होते. पुढे, दहावी-बारावीच्या अभ्यासामुळे माझा हरिपाठ बंद झाला. पण जमेल तसे दररोज मारुतीचे दर्शन घेणे मात्र सुरूच राहिले. कोणी आसपास नाही हे पाहून मी मारुतीशी माझ्या मनातील भरपूर बोलून घेत असे. त्यामुळे कोठेही-कधीही डोळे मिटले की माझ्या या मारुतीचे रूप मी पाहू शकत असे. माझ्या प्रत्येक अडचणीच्या व संकटाच्या वेळी मला मारुतीचा मोठाच आधार वाटे.
दरवर्षी निमित्ताकारणाने आमच्या या मारुतीच्या मूर्तीला शेंदूरलेपन करून करून, त्या मूर्तीवरील शेंदराच्या मोठमोठ्या खपल्या निघू लागल्या. शिवाय तेल-पाण्याच्या रोजच्या अंघोळीमुळे दगडाच्या मूर्तीची कळत नकळत झीजही सुरू झाली. ती बाब सर्वांच्याच लक्षात आली. त्यावरून एके दिवशी मंदिरात गंभीरपणे एक बैठक झाली. मी एका कोपऱ्यात बसून होतो. मारुतीच्या दगडी मूर्तीऐवजी नवीन धातूची म्हणजे तांब्याची मूर्ती तेथे बसवावी ! असे निश्चित झाले. त्यासाठी पैशांची जमवाजमव सुरू झाली. मूर्तिकार माप घेऊन गेले. नवीन मूर्ती येईपर्यंत मंदिरात एखाद्या फोटोची पूजा करावी ! असे बैठकीत ठरले. शिवाय मंदिरातील बाकी देव होतेच ! मला वाटले, तांब्याचा मारुती कोण कोठून कसा केव्हा कशाला आणील? दगडाची असलेली मूर्ती काढून घेण्याचे ठरले. त्यामुळे मंदिर ओकेबोके वाटण्याची भीती सर्वांना होती. पण देवाचा फोटो ठेवण्याची वेळ काही आली नाही. पहिल्या दगडी मूर्तीमागे एका दगडी चिऱ्यात मारुतीची मूर्ती तेथे आयतीच मिळाली ! सर्वांना खूप आनंद झाला. त्या निमित्ताने आम्हाला मूळ मारुतीचेही दर्शन झाले, मग त्यालाच शेंदूर लावून, काही पूजाविधी करून त्याची रीतसर पूजा सुरू झाली.
वर्ष-सहा महिन्यांतच तांब्याच्या धातूची सुबक मूर्ती आणली गेली. हुबेहूब पहिल्या मूर्तीसारखी. सर्वांना खूप आनंद झाला. नव्या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा, गाव मिरवणूक, प्राणप्रतिष्ठा… असा देखणा, भक्तिमय सोहळा झाला. प्रसाद वगैरे झाला. नवे कोरे मारुतीबाप्पा आम्हाला मिळाले. मात्र मी मनोमन हिरमुसलो होतो. आमच्या पहिल्या दगडी मूर्तीचे ते प्रसन्न रूप मनातून काही केल्या जाईना. त्यात आमचा दिलीप तांबे नावाचा मित्र मला चिडवू लागला. “‘आमचा तांब्या’चा मारुती आहे, बरं का ! आता त्याच्याच पाया पडत जा… समजलं का !”
वय वाढत गेले… माझी अकोलखास गल्ली सुटली. पुढे, निफाड गावही नोकरीनिमित्त सुटले. प्राणप्रिय अशा मारुतीला सोडून जाणे माझ्या जिवावर आले होते. पण काय करणार? जुन्या ओढीने कधी मारुती मंदिरात जाणे होते. मी ज्याच्याशी भरपूर बोलत असे, त्या आमच्या मारुतीशी पूर्वीसारखा संवाद आता होत नाही. नवा देव दिसण्यास जुन्यासारखाच असला तरी माझ्या मनातील तो मारुती आणि हा मारुती यांची तुलना कळत-नकळत होऊ लागली. पूर्वी संपूर्ण एकाग्र होणारे माझे मन मनोमन तुटत राहिले. असे का झाले असावे ते मला समजलेले नाही. मध्ये चळवळीत वगैरे काय काय वाचलेले. त्यामुळे की काय मी मनोमन कोरडाठाक होत गेलो आहे असे मला वाटत राहिले आणि ती पूर्वीची श्रद्धा, तो भक्तिभाव कोठे व कसा हरवला ही भावना मनाला छळत राहिली.
मानवी मन काही अपरिहार्य बदल स्वीकारतच नाही का? मानवी मन बालपणासारखे निरागस, कोवळे का राहत नाही? माणसाच्या मनाचा असा दगड कोण करत असते? माणूस वयाने वाढतो की निबर होत जातो, ते माणसाच्या मनातील प्राणप्रिय देवाबाबतही घडत असते?
हनुमान जयंतीला मारुती मंदिरात बऱ्याच काळाने जाणे झाले. पाहतो तर काय, मूर्ती तीच… आमची तांब्याची ! आणि पूर्वीचे ते दगडी जोत्याचे, लाकडी खांबांचे, वीटकामातील मंदिर, आता एकदम नवेकोरे म्हणजे छानपैकी आधुनिक आणि सुंदर झालेले वाटले. चला, मंदिर छानच बदललेय, पण निदान आपला तांब्याचा मारुती तरी तोच आहे ! तेथून निघताना, कवितेच्या दोन ओळी मनात पिंगा घालत होत्या – मातीतल्या माणसाचा धर्म कुठे गेला, काळजाचा खोपा कसा दिसेनासा झाला !
– विवेक उगलमुगले 9422946106 vivekugalmugale1137@gmail.com