सोलापूरचे नीतिन वैद्य यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक, ‘त्र्यं.वि. सरदेशमुख : सा
नीतिन वैद्य यांना लेखक सरदेशमुख यांचा प्रत्यक्ष सहवास बारा वर्षांचा लाभला. त्यांचा पुढील तेरा वर्षांचा प्रवास लेखकाच्या मृत्यूमुळे लेखकाविना जरी झाला असला तरी, ते ‘सतत बरोबर’ होते. कारण लेखकाने त्यांचे संपूर्ण दप्तरच वैद्य यांच्या ताब्यात दिले होते ! त्या दप्तरात कात्रणे, लेख, निबंध, डायऱ्या, पत्रे, चिठ्ठ्या, टिपणे, वह्या, अध्यापन-अध्ययनासाठी काढलेल्या नोट्स, पुस्तके- पुस्तकांवरच्या नोंदी, खुणांनी व्यापलेले तपशील, पुस्तकाच्या कव्हर्सच्या आत ठेवलेल्या चिठ्ठ्या-चपाट्या, नकलवून घेतलेली पत्रे, लेख, वाचनाच्या छंदामुळे जमा केलेली संग्रहातील कित्येक पुस्तके- त्या पुस्तकांवर नोंदवलेल्या तारखा, सुट्या कागदांवरच्या कविता, विचार-सुविचार-आठवणी-संवाद असे विविध बहुमूल्य प्रकाशित व अप्रकाशित साहित्यविश्व बांधून पडलेले होते. वैद्य यांनी प्रत्येक तुकडा नि तुकडा आणि त्या त्या तुकड्यावरील प्रत्येक अक्षर नि अक्षर वाचून काढले; नुसते वाचून काढले असे नाही तर ते त्यांच्या मनात पेरले गेले, रुजले गेले आणि ‘जवळिकीची सरोवरे’च्या रूपात उगवून बाहेर आले ! त्या पुस्तकामागे मनन आहे, चिंतन आहे, शोध आहे आणि संशोधनही आहे. त्या पुस्तकाला अविनाश सप्रे यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत प्रस्तावनाकाराने पुस्तकाचे मर्म अचूक उलगडून दाखवले आहे.
‘जवळिकीची सरोवरे’ हे पुस्तक म्हणजे त्र्यं.वि. सरदेशमुख यांच्या साहित्यात व्यक्त झालेल्या विचारांच्या शंभर नोंदी आहेत. नीतिन वैद्य यांनी त्या नोंदी सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दीच्या (22 नोव्हेंबर 2018 ते 22 नोव्हेंबर 2019) निमित्ताने वर्षभरात फेसबुकवर लिहिल्या. वैद्य यांनी ती नोंद लिहितानाही निमित्त पाहिले. वैद्य जी नोंद लिहिणार त्यातील संबंधित व्यक्तीचा जन्मदिवस, शताब्दी, पुण्यतिथी, स्मृतिदिन, वाढदिवस असे काही असे. त्या नोंदींतील साहित्यिक-वैचारिक-समीक्षात्मक व संशोधनात्मक मूल्य इतके प्रभावित करणारे असे, की वाचक त्यांतील आशयाच्या प्रेमातच पडत ! त्यांची त्या नोंदींशी वर्षभर इतकी ‘जवळीक’ निर्माण झाली की डिंपल पब्लिकेशन्सने त्यातून पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले.
सरदेशमुख यांच्या साहित्याच्या संकलित केलेल्या शंभर नोंदी (त्यात आणखी पस्तीस नोंदी होत्या, पण त्या पुस्तकात समाविष्ट झालेल्या नाहीत) इतकेच या पुस्तकाचे वर्णन नाही. पुस्तकाचा फॉर्म, त्याचा आवाका, त्याची रचना व लेखनशैली यामुळे ते पुस्तक मराठी विश्वातील अनोखे ठरते. मला ते पुस्तक म्हणजे ‘Dictionary of Sardeshmukh’s Thoughts’ अशा स्वरूपाचा कोश आहे असे वाटते.
नीतिन वैद्य यांनी नोंदींची शास्त्रीय पद्धत अनुसरली आहे- नोंद क्रमांक, नोंद शीर्षक, दिनांक, नोंदीचे प्रास्ताविक/प्रस्तावना, विषयाची नोंद, तळाशी टीप/टिपा/हेतू/निमित्त अशी. नोंदींसाठी आराखडा सर्वत्र हाच असतो.
नोंदीचे प्रास्ताविक/प्रस्तावना येथून नोंदीला प्रारंभ होतो. परंतु ते प्रास्ताविक नोंदलेखकाचे म्हणजे नीतिन वैद्य यांचे आहे. त्या लेखनातून नोंदलेखकाच्या संशोधन वृत्तीचा आणि पद्धतीचा पडताळा येतो. सरदेशमुख यांच्या विविध लेखन साहित्यातून एकत्र करून सादर केलेले तपशील हा त्या नोंदलेखनाचा विशेष आहेच; परंतु त्याचे तपशील उदाहरणार्थ डायरी, सुटे कागद, दप्तर, पुस्तकाचा आसपास, कव्हर्स, वही, टिपणे अशा साधनांचा उपयोग केलेला पाहिला की वाचकाचे मन थरारून जाते. सरदेशमुख यांच्या साहित्याच्या नीतिन वैद्य यांनी केलेल्या तेरा वर्षांच्या अभ्यासध्यासाची ती फलश्रुती आहे. मग सुरू होते मुख्य नोंद. ती देशमुख यांच्या साहित्यातील उतारा, संक्षिप्त भाग, अंशात्मक किंवा संपादित पद्धतीने सादर केलेली- सरदेशमुख यांच्याच शैलीतील- त्यांच्या शब्दांत साकार झालेली नोंद कधी एकाच लेखातील, कधी वेगवेगळ्या लेखांतील, पुस्तकांतील, डायरी-
नोंदीमधील लेखनशैली, विचार, वाक्यरचना, पद्ध
वैद्य यांना एकाच नोंदीत तीन-चार नोंदींचा ऐवज देण्याची किमयाही करावी लागली आहे. तसे व तितके वेगवेगळे तपशील एकाच व्यक्तीच्या बाबत सरदेशमुख यांनी विविध ठिकाणी नोंदवून ठेवले आहेत ! उदाहरणार्थ, राम गणेश गडकरी यांच्यावरील नोंद (पृष्ठे 45-50). त्यात एक नोंद अशी आहे, की सरदेशमुख यांच्या दप्तरात वैद्य यांना एक सुटे पान सापडले. त्या कागदावर सरदेशमुख यांनी 23 जानेवारी 2005 ही तारीख होती आणि त्या पानावर ‘वाग्वैजयंती’मधील कवितांची केवळ शीर्षके लिहिली होती. आवडत्या कवीची स्मृती जागवण्याचा तो एक अनोखा नमुना ! लिहिणारा ग्रेट आणि त्याच आत्मीयतेने तो कागद वाचणारा आणि वाचण्यास उपलब्ध करून देणाराही ग्रेट ! नीतिन वैद्य यांनी लिहिलेल्या प्रत्येक नोंदीला रोमांचकारी इतिहास आहे, तीमागे मूळ लेखकाची दृष्टी आहे, व्यासंग आहे, कष्ट आहेतच; आणि मुख्य म्हणजे त्या प्रवासाचा शोध घेणारा संशोधकही वैद्य यांच्या रूपाने लेखकाला लाभला आहे. सरदेशमुख यांची विचारशैली महत्त्वाची आहे. ती वाचकास आकर्षित करून घेते. ती विचारप्रवृत्त करणारी आहे, प्रेरणादायी आहे. विचारांचा तोच ठेवा पुस्तकाचे प्रस्तावनाकार अविनाश सप्रे यांनी अधोरेखित केला आहे व तसे दाखले दिले आहेत (पृष्ठे 16-17). काही उदाहरणे-
ज्ञानदेवांवरील नोंदीत : “जाणीव म्हणजे ज्ञानाचा अहंकार असा अर्थ देऊन ज्ञानदेव जाणीव व ज्ञान भिन्न करतात आणि जाणिवेचे वेगळे दर्शन सरदेशमुख घडवतात (पृष्ठे 26-27). राम गणेश गडकरी यांना सरदेशमुख यांनी लावलेले “युगान्तक’ हे विशेषण (पृष्ठे 46) लक्षवेधी ठरते. गांधी यांच्यावर लिहिताना, त्यांना हिंसा विरूद्ध अहिंसा ही मांडणीच अतार्किक आणि अतात्त्विकं वाटते. हिंसा हे कर्म आहे तर अहिंसा हे माणसाच्या वर्तनाला आणि मनोधारणेला दिशा देणारे एक मूल्य (पृष्ठ 51) आहे.
या पुस्तकाचा आणखी एक विशेष असा, की त्र्यं.वि. सरदेशमुख यांचे चरित्रात्मक तपशील त्यातून हाती येतात. ते चरित्र साकार करायचे झाल्यास ती साधने उपलब्ध होतात. वाचक, अभ्यासक, समीक्षक, कादंबरीकार-नाटककार-कवी, विद्यार्थी, शिक्षक, मित्र, सहकारी-वडील-पती-पुत्र अशी नाती जपणारा संवेदनशील माणूस, वेदना-दुःख सहन करणारा-पचवणारा सोशीक माणूस, पत्रांतून व्यक्त होणारा- अबोल मनातील सांगणारा पत्रलेखक…. सरदेशमुख यांची अशी कितीतरी रूपे या नोंदींत सामावलेली आहेत. वैद्य यांनी सरदेशमुख यांच्या साहित्याची सूची पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. त्यात सरदेशमुख यांचा चरित्रपट आहेच, त्याचाही उपयोग अभ्यासकाला होऊ शकतो.
नीतिन वैद्य यांनी सरदेशमुख यांच्या साहित्याचा अभ्यास तेरा वर्षे केल्यानंतर जन्मशताब्दी वर्षात सरदेशमुख यांची चार पुस्तके आणि पीएच डी पदवीसाठीची दोन संशोधने साकार झाली आणि तरीही त्यांचे अप्रकाशित, असंग्रहित साहित्य उरलेच आहे!
‘जवळिकीची सरोवरे’ हे नाव निशिकांत ठकार यांनी काढून दिले आहे. त्याला गीता आणि ज्ञानेश्वरी यांचा संदर्भ आहे. पण ती ओवी वा श्लोक मात्र त्यात दिलेला नाही. तो श्लोक असा- मच्चित्ता मग्दत प्राणा बोधयंतः परस्परम्। कथयंतश्च मां नित्यं तुष्यंति च रमतिच ।। (गीता 10 : 9) त्याचा अर्थ सोनोपंत दांडेकर यांनी दिला आहे असा – “माझ्या ठिकाणी ज्याचे चित्त आहे (म्हणून जे मद्रूप आहे) व माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत (म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झाले आहेत) असे (ते ज्ञानी) परस्परांना (माझ्याविषयी) ज्ञान देत आणि नित्य माझ्या (गुणांचे) वर्णन करत समाधान पावतात व आनंदात मग्न होतात” (पृष्ठ 297). या एका श्लोकासाठी श्री ज्ञानदेव महाराज 119 ते 128 एवढ्या ओव्या रचतात. त्यांपैकी ग्रंथशीर्षक ज्या ओवीत येते ती ओवी आहे एकशे एकविसावी.
दांडेकर त्याचा गद्यानुवाद असा करतात, की “ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन तळी उसळली असता, त्यांचे पाणी उसळून एकमेकांत मिसळते, अशा स्थितीत लाटांना लाटांची घरे होतात.” (पृष्ठ 297). केशवरावमहाराज देशमुख यांनी असा अर्थ दिला आहे, की “शेजारी शेजारी असलेले पाण्याचे तलाव ज्याप्रमाणे पाण्याने भरून जाऊन एकमेकांत मिसळून जातात आणि दोहोंतील पाणी तरंगरूपाने त्यांच्याच अंगावर खेळू लागते, त्याप्रमाणे त्या समानजातीय भक्तांना भेटीत परस्परांचा आनंद एकमेकांत मिसळून जातो व ते बोधरूप होऊन, त्या बोधाने सुशोभित झालेले दिसतात.” (पृष्ठ 238). ‘जवळ जवळ’च्या ऐवजी ‘शेजारी शेजारी’ आणि ‘लाटां’च्या ऐवजी ‘तरंग’ असा अर्थ केल्याबरोबर दृष्टीसमोर चित्र साकार होते.
वाचन, लेखन, मनन, चिंतन, टिपण करणारे त्र्यं.वि. सरदेशमुख हे ज्ञानाच्या जगातील ‘महात्मे’ होते, ज्ञानी पुरूष होते व त्यांच्या लेखनातून संवाद साधून ते ‘बोध’ करू पाहत आहेत. वाचकांना त्यांचा ‘बोध’ संवादसुखात नेतो. बोधाची ज्ञानदानातील ही वाचक सरोवरे ‘जवळिकीची’ होतात, तेव्हाच संवादसुखाचे विचारतरंग उठून एकमेकांत मिसळणे होते. इतके चपखल शीर्षक निशिकांत ठकार यांनी काढून दिल्याबद्दल एक वाचक म्हणून त्यांचे किती आभार मानावेत? आणि सरदेशमुख यांचे हे ज्ञानसंचित सूत्रबद्धपणे मांडून वाचकांना त्या संवादसुखाचा लाभ घडवल्याबद्दल नीतिन वैद्य यांचेही आभार ! त्यांच्या कष्टाला, मेहनतीला, पायपिटीला तोड नाही. मराठी वाङ्मयात एक नवा प्रकार (विचारकोश) रुजवल्याबद्दल नीतिन वैद्य यांचे कार्य ऐतिहासिक ठरेल.
संदर्भ : 1. वैद्य, नीतिन. जवळिकीची सरोवरे प्रज्ञावंत सखेसांगाती. वसई रोड, डिंपल पब्लिकेशन, 2022. पृ.302 2. वैद्य, नीतिन. त्र्यं. वि. सरदेशमुख साहित्य, संदर्भसाहित्य : सूची आणि चरित्रपट. सोलापूर, सुविद्या प्रकाशन, 2019 पृ. 148. 3. खाखरे, नानामहाराज. सार्थ ज्ञानेश्वरी. संपा.दत्तराज देशपांडे. पुणे, सारथी प्रकाशन, 2004. पृ. 405-1168 4. दांडेकर, शं. वा. श्रीज्ञानेश्वरी 3री आ. पुणे, प्रसाद प्रकाशन, 1962. पृ.8-9063-109 देशमुख, केशवराव. ज्ञानेश्वरीचे सुलभ गद्य रूपांतर. संपा.श्री. द. (मामासाहेब) देशपांडे, पुणे, श्री वामनराज, 2000 पृ.600.
– प्रदीप कर्णिक 9821299736 karnikpl@gmail.com
कमाल आहे.हा लेख खूप माहिती करून देणारा आहे.बखर एका राजाची हे पुस्तक खूप वर्षापूर्वी वाचले होते पण अजूनही त्या वाचनाने दिलेला आनंद आठवतो.लेख प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद.
खूप सुंदर लेख