नरसिंग महाराजांच्या नाना लीला

अकोला जिल्ह्यातील आकोटजवळच्या जळगाव (नाहाटे) गावात एक ब्राह्मण वतनदार पाटील होता. ही 1720 पूर्वीची गोष्ट. गावात गवळी लोकांची वस्ती जास्त होती. वतनदार पाटलांच्या पूर्वजांनी तेथे एक गढी बांधली होती. त्या गढीच्या उत्तर बाजूला एक दरवाजा होता. गढीत असलेल्या पाटलाच्या वाड्याला ‘चंदनाचा वाडा’ असे म्हणत. त्यापैकी वाडा वगळता गाव, कोट, बुरूज, विहीर व दरवाज्यांचे अवशेष कायम आहेत.

जळगाव (नाहाटे) या गावाच्या नावाची हकिगत आहे. रावरंभा निंबाळकर, चंद्रसेन जाधव हे सरदार निजाम उल्मुकाकडून लढले (1720). ती लढाई बाळापूर येथे झाली. त्या तुकडीपैकी एक तुकडी गावी- लगडकडे जाण्यास निघाली असताना त्यांची मोगलांकडील सैय्यद यांच्या तुकडीशी गाठ पडली. त्यांची लढाई जळगावजवळच पूर्व बाजूला झाली. जाधव, निंबाळकर यांच्या फौजेच्या तुकडीचा प्रमुख नाठे नावाचा मराठा होता. नाठे हे पंढरपूरजवळील बाभुळगाव येथील मूळ राहणारे होते. त्यांनी त्या गावाचा ताबा घेतला. नाठे हे तेथील वतनदार म्हणून राहू लागले. नाठेचे नाहाटे झाले. त्यामुळे त्या गावाला जळगाव (नाहाटे) असे नाव पडले.

त्याच नाहाटे वंशात पुंजाजी पाटील नामक गृहस्थ होते. त्यांना दोन पत्नी होत्या. ज्येष्ठ पत्नी यमाबाई व कनिष्ठ पत्नी राजुबाई. राजुबार्इंचे माहेर जळगाव(नाहाटे)पासून तीन मैलांवरील शिरसोली ग्राम हे होते. राजुबाईंच्या उदरी नरसिंग महाराजांचा जन्म शके 1727 मध्ये (इसवी सन 1805) झाला. राजुबाईस तीन अपत्ये झाली- परशुराम, नरसिंग व मुलगी मंजाई. नरसिंग यांना लहानपणापासून ईश्वराच्या भक्तीची ओढ होती. त्यांच्या पत्नीचे नाव मोहनाबाई. मोहनाबाईंच्या घरी वतनदार पाटीलकी व शेतीही होती. महाराजांना तीन मुले झाली. भिकाराम, रामकृष्ण व मुक्ताबाई.

जळगावपासून चार मैलांवर उंभरा नावाचे गाव आहे. तेथे लोण्याचा बाजार भरतो. उंभरा गावात अवलिया साधू राहत असत. त्यांचे नाव कुवतशावली मियांसाहेब असे होते. त्यांच्याबद्दल अनेक कहाण्या प्रसृत आहेत. ते संत व सिद्धपुरुष होते. ते अजानुबाहू होते. त्यांना मुसलमान असूनही भजनाचा नाद होता. ते भजन करत असत. ते कोठून आले हे कोणासच सांगत नसत. त्यांना कोणी विचारले तर ते सांगत, “जग हे आमचे घर. ईश्वराकडून आलो. त्याच्याकडे एक दिवस परत जाणार.” मियासाहेबांना वेद पाठ होते असे सांगतात. नरसिंग महाराज लोणी विकण्यास उंभरा गावी जात असत. तेथे त्यांची भेट कुवतशावली मियांसाहेबांशी झाली. त्यांची भक्ती मियांसाहेबांवर जडली. महाराजांचे स्वत:च्या शेतीवाडीवरील लक्ष उडाले. नरसिंग महाराज उंभरा गावी जाऊन ध्यानस्थ राहत. कधी कधी, रात्रीच्या रात्री निघून जात. पुढे, महाराज उंभरा गावात मियांसाहेबांजवळच राहू लागले. त्यावेळी लोकांत अनेक चर्चा चालत. काही लोक ‘नरसिंग वेडा झाला- एका फकिराच्या नादी लागला’ असे म्हणत.

नरसिंग महाराज एकवीस दिवस एका पायावर उभे राहिले होते. मियांसाहेबांनी एकवीस दिवसांनंतर नरसिंग महाराज यांना गुरूपदेश केला. नरसिंग महाराजांनी मियांसाहेब यांना विचारले, की हिंदू व मुसलमान या दोन्ही जातींमधील फरक सांगा. त्यावर कुवतशावली मियांसाहेब म्हणाले, “हिंदू आणि मुसलमान यांना जन्म देणारा ईश्वर एक आहे. तोच सर्वांच्या ठायी आहे. तो अभंग आहे. तो जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी असून त्यास कोणी ॐ, कोणी ईश्वर, तर कोणी अल्ला अगर रहीम असे म्हणतात. त्याला नावे अनंत आहेत. पण तो एक आहे. त्याच्यापाशी हिंदू, मुसलमान असा कोणताही भेद नाही.”

नरसिंग महाराजांच्या नावे काही चमत्कार आहेत. त्यांना त्यांची आई शिरसोली गावी मृत झाल्याची बातमी उंभरा गावी समजली. महाराजांना वाईट वाटले. ते गुरूची आज्ञा घेऊन शिरसोलीस आले. आईचा देह तिरडीवर ठेवला होता. महाराज तिरडीजवळ गेले. त्यांनी आईला तिरडीवरून मोकळे केले व ओरडले, “हे माझे मायबाई, मला सोडून तू कशी गेलीस? तूच माझे तीर्थ. तूच माझा परमेश्वर, मला लहानाचे मोठे केलेस, दूध पाजलेस, अंगाखांद्यावर खेळवलेस, मग आताच का रागावलीस? मायबाई, मला भूक लागली आहे, लवकर उठ. मला जेवू घाल. माझा हट्ट पुरवण्यास जागी हो.” त्यांनी असे म्हणून आईला अंगारा लावला. महाराजांच्या तोंडचे उद्गार ऐकून राजुबार्इंनी डोळे की उघडले ! त्या उठून बसल्या. लोकांनी महाराजांचा जयजयकार केला. महाराज आईचे बोलणे ऐकून, आईस हात जोडून बोलू लागले, की “कोणी कोणाचे नाही. हे शरीर नाशवंत आहे. सर्व ठिकाणी ईश्वर भरला आहे.” असे सांगून महाराज उंभरा गावास गुरूजवळ निघून गेले.

आणखीही काही चमत्कार महाराजांच्या नावावर आकोटात सांगितले जातात. पुढे, महाराज आकोट ग्रामी परत येऊन राहिले. आकोट येथील गणोबा नाईक यांची महाराजांवर भक्ती जडली. महाराज रोज सकाळी रानात जात व तेथेच ईश्वराधना करत. सायंकाळी घरी परत येत. महाराज रानात देवाबरोबर नवऱ्या-दुवब्याचा खेळ खेळत असे सांगतात. तेथील विठोबा देशमुख यांची ओढाळ गाय गरीब झाली व अखेरपर्यंत महाराजांजवळ राहिली. ती मरण पावल्यावर महाराजांनी तिची समाधी बांधली. ती कायम आहे.

महाराजांनी कुवतशावली मियांसाहेब यांच्या समाधीची वेळ आली हे ओळखले. ते उंभऱ्याला गुरूजवळ गेले. त्यांनी गुरूस नमस्कार केला. श्री गुरूने प्रेमाने आलिंगन देऊन महाराजांस म्हटले, “मी आता माझे गावी जातो. तू भक्तिमार्ग दाखवून लोकांचा उद्धार करावास. ईश्वरास विसरू नकोस.” मियांसाहेबांनी असे ज्ञान सांगून, परमेश्वराचे नाव उच्चारून समाधी घेतली. मग महाराजांनी गुरूचा प्रसाद समजून त्यांचे कपडे स्वत: अंगावर घातले. समाधीवर मोठे देऊळ बांधले. तेव्हापासून महाराज गुरूची पुण्यतिथी दरवर्षी करू लागले. ती तारीख 19 मे होती (जिल्हेन महिना).

मात्र त्यांच्या नावाची यात्रा चालू आहे. महाराजांनी गुरूंच्या नावाने यात्रा सुरू केली. यात्रा कार्तिक वद्य पंचमीला होऊन कार्तिक वद्य षष्ठीला गोपालकाला असतो व भंडारा होतो. अन्नदान होते. बारूदगोळा उडत असतो. देवळासमोर पाच हप्ते दुकाने राहतात. यात्रेचा एकूण कार्यक्रम कार्तिक वद्य 1 पासून कार्तिक वद्य 13 पर्यंत चालू असतो. यात्रेचे प्रमुख दिवस दोन – पंचमी व षष्ठी. कार्तिक वद्य प्रतिपदा- तीर्थ स्थापना, तीर्थस्थानी गुरूचे पागोटे असते. द्वितिया-तृतीया – गुरूच्या पादुकांची तक्तावर स्थापना. चतुर्थी –महाराजांचे गुरू कुवतशावली साहेब उंभरा येथे संदळ पालखीत जातात. रात्री पालखी आकोटला परत येते व महाराजांच्या देवळात आरती होऊन सुक्या मेव्याचा प्रसाद वाटला जातो. पंचमीला यात्रा भरते. रात्रभर भजनगंमती वगैरे कार्यक्रम होतात. रात्री सात ते दहापर्यंत अन्नदान होते. षष्ठी – सकाळी नरसिंग महाराजांची पालखी भजन करत गावातून फिरून दुपारी तीन वाजता येऊन गोपाळकाला होतो. सोबत श्री झांजी महाराजांची पालखी असते. काला झाल्यावर अन्नदान होते. भंडाऱ्यात हजारो लोक प्रसाद घेतात. सप्तमी ते एकादशीपर्यंत देवळांत भजन, किर्तन व सांस्कृतिक समाधीवर अपोष्णी – पाण्याचा अभिषेक- असा कार्यक्रम होतो. ब्राह्मण भोजन सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत होते व रात्री किर्तन होते. त्रयोदशीला कुवतशावली यांच्या तक्तासमोर गोपाळकाला होतो. रात्री भजन होऊन यात्रेचा कार्यक्रम पूर्ण होतो. यात्रेतील व्यवस्थेकरता शासकीय आरक्षित विभाग दक्ष असतो. त्यांचे एक कार्यालय यात्रेत असते. नगरपालिकाही यात्रेची व्यवस्था चोख राहवी, लोकांच्या तक्रारी दूर व्हाव्या म्हणून यात्रेतच स्वतंत्र कार्यालय ठेवते.

नरसिंग महाराजांचे त्रोटक चरित्र प्रसिद्ध आहे.

नरसिंग महाराज गुरूस समाधी देऊन आकोटास आले. त्यांचे शिष्य गणोबा नाईक यांची पत्नी महासती सारजाबाई रोजच्याप्रमाणे महाराजांच्या दर्शनास गेली असताना तिला महाराज म्हणाले, “सारजाबाई, माझ्या मते तू आता हा संसार सोडून वैकुंठास जावे. तुला मुलं-नातू सर्व असून तू सर्व सुख उपभोगले आहेस. आता काही राहिले नाही. आता आनंदाने वैकुंठास जावे. ही गोष्ट सारजाबाईंनी त्यांच्या पतीस सांगितली. मुले, नातू यांना परगावाहून बोलावून घेतले. सर्वांच्या भेटीगाठी घेऊन सारजाबाईंनी चैत्र वद्य चतुर्थीस इहलोकातून परलोकात गमन केले. महाराज म्हणाले, “सारजा गेली. तिने जिवाचे सोने केले. जन्ममरणातून मुक्त झाली, त्यानंतर काही दिवसांनी गणोबा नाईकही स्वर्गवासी झाले. महाराजांना दु:ख झाले. त्यांनी जेवण घेतले नाही. महाराज म्हणाले, “ईश्वर आपल्या सावकारास आपल्याजवळ जागा देईल.”

खीदाबोवा नावाचे नरसिंग महाराजांचे शिष्य होते. त्यांची वृत्ती लहानपणापासून वेड्यासारखी होती. वडिलांनी त्यांना नरसिंग महाराजांपाशी आणून ठेवले. त्यांचे डोकेही फार मोठे होते. खीदाबोवा महाराजांकडे आल्यापासून ते कोणालाही त्रास देत नसत. महाराजांच्या अनुपस्थितीत खीदाबोवांनी देह ठेवला. नरसिंग महाराज जंगलातून आल्यावर खीदाबोवांचे डोळे उघडे होते, ते बंद करून महाराजांनी खीदाबोवाला समाधी दिली. खीदाबोवाची पुण्यतिथी फाल्गुन शुद्ध 15 ला होत असते. त्यांची समाधी नरसिंग महाराजांच्या समाधीजवळ आहे. त्यांची शिष्यमंडळी उत्सव करत असतात.

महाराज नेहमीप्रमाणे माघ महिन्यात सकाळी उठून गावाबाहेर त्यांच्या झोपडीवर जाण्यास निघाले. जाता जाता, देवळाचे काम चालू होते तेथे आले. देवळाच्या मधोमध एक भलामोठा खड्डा पडला होता. महाराज म्हणाले, ‘तो मातीने बुजवू नका. आपण तेथे आठ दिवसांनी अशोक वृक्ष लावू.’ आठ दिवसांनी झोपडीवर किसन न्हावी हा महाराजांचा भक्त जवळ बसला होता. त्यास ते सांगू लागले, की आम्हास वैकुंठास जावे असे वाटते. आम्हास निरोप आला आहे. तू गावात जा. आपले सावकार मारोती नाईक, वासुदेव नाईक आणि इतर भक्त मंडळी यांना बोलावून आण. त्याप्रमाणे गणपतराव ठोंबरे, विनायकराव फडके, गिरधारी सिंग, जमादार व मारोती नाईक-आसरकर ही सर्व मंडळी आली. महाराज मारोती नाईक-आसरकर यांना उद्देशून म्हणाले, “मी वैकुंठास जाणार. आम्हास निरोप आला आहे.” तेव्हा गिरधारी सिंग म्हणाले, “तुम्ही काही दिवस राहवे. काळही तुमच्या म्हणण्याचे बाहेर जाणार नाही.” त्यावर महाराज सांगू लागले, की “मी चांगदेवाप्रमाणे चौदाशे वर्षे राहण्यात काही फायदा नाही. कारण ईश्वराच्या घरी चोर होऊन कोणी राहवे? मी आज सकाळी जाणार. तुम्ही सर्वजण मजजवळ असावे. मी गेलो असे समजू नका. मी तुमच्याजवळ आहे. मी आकोटातच आहे.” असे म्हणून ते जवळच गादीवर बसले व म्हणाले, “हे माझे सांगणे नसून ईश्वरी इच्छा तशी आहे ! माझा सर्व भार तुझ्यावर आहे. तूच या गादीचा वारस आहेस. यात कोणी गडबड केली तर चांगले होणार नाही. ही गादी आसरकर वंशातच राहील.” मग महाराजांनी मारोती नाईक यांना उपदेश केला- सन्मार्गाने वागावे. अभिमान धरू नये. सर्व प्राणिमात्रांमध्ये ईश्वर आहे असे मानून राहवे आणि त्याप्रमाणे वागावे.

रात्र संपून सकाळ होत आली. महाराज पद्मासन घालून बसले. तिथी होती माघ शुद्ध पौर्णिमा, पुनर्वसू नक्षत्र, शके 1809, 28 जानेवारी 1888. महाराजांनी सर्वांस भजन म्हणण्यास सांगितले आणि स्वत: समाधी लावली. मग झोपडीवरून महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. वाजत-गाजत, गुलाल उधळत असंख्य जमाव मिरवणुकीत सामील झाला होता.

मिरवणूक गावातून देवळात समाधी देण्याच्या ठिकाणी आली. फुले, गुलाल उधळण्यात आले. तयार केलेल्या समाधीत महाराजांचा देह ठेवून त्यात मीठ व गुलाल टाकला. नंतर बंद करून समाधी बांधण्यात आली. त्यांच्या बाजूस त्यांच्या आईची, पत्नीची व खीदाबोवांची अशा समाधी आहेत. त्या महाराजांनी स्वत: बांधल्या आहेत. देवळाचे कामही महाराजांच्या हाताने सुरू झाले होते. देवळांचे काम महाराजांनंतर मारोती नाईक आसरकर यांनी पूर्ण केले. महाराजांची पुण्यतिथी माघ शुद्ध पौर्णिमेला येते. माघ शुद्ध 13 ला तीर्थ बसते. पौर्णिमेस अभिषेक, रात्री भजन होते व प्रतिपदेला पालखी निघते. दुपारी काला व अन्नदान होते. हा उत्सव दरवर्षी साजरा होतो. लोकमान्य टिळक यांनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते.

नरसिंग महाराज यांचे आईवडील शिवभक्त होते. नरसिंग लहानपणापासून कुटुंबास मदत म्हणून भल्या पहाटे उठून रानातून लाकडाच्या मोळ्या बांधून आणत व आकोट येथे विकत. नंतर दुपारी आकोटजवळील जंगलात एका वृक्षाखाली बसून शिवनामाची साधना करत. त्यांनी रानातील एका गुहेजवळ लहानशी मठी बांधली. नरसिंग महाराज गुहेत बसून ध्यानधारणा, योगसाधना करत. त्यावेळी गजानन महाराज बाहेर एका दगडावर बसून ‘गण-गण-गणात बोते’ आणि ‘येष्मि स्तंब वैदूही’ या दोन मंत्रांचा जप उच्च स्वरात अव्याहत करत. हातात चिपळ्या म्हणून दोन गोलाकार दगड घेतलेले असत. काही वेळा बोटावर बोटे आपटून त्या तालावर भजन करत. ते भजनानंदात इतके तल्लीन होऊन जात की तेव्हा एका हाताची बोटे दुसऱ्या हाताच्या बोटांवर सतत जोरदारपणे आपटल्याने व नखे लागून बोटातून रक्ताच्या धारा निघत. परंतु त्या रक्तधारांकडे गजानन महाराजांचे लक्ष नसे.

नरसिंग महाराजांनी समाधी घेण्याच्या वेळी गजानन महाराज आकोट येथे होते. नरसिंग महाराज अष्टसिद्धी प्राप्त उच्चकोटीचे योगी होते. त्यांच्या दोन वर्षांच्या आध्यात्मिक सहवासात गजाजन महाराजांनी योगातील प्रगत क्रियांचा अभ्यास केला, योगसिद्धी आत्मसात केल्या. त्या अशा – जसे, की निर्विकल्प समाधी लावणे, श्वासोच्छवासाशिवाय अनेक दिवस राहणे, देहाचे अवयव वेगळे करणे, आतडी बाहेर काढून स्वच्छ धुणे व पुन्हा त्याच जागी ठेवणे इत्यादी. नरसिंग महाराजांनी गजानन महाराज यांना अष्टमहासिद्धी हस्तांतरित केल्या. त्या अशा – अदृश्य होणे, वायूगतीने चालणे, दुसऱ्याच्या मनातील विचार जाणून घेणे, हस्तस्पर्शाने व्यक्ती वा वस्तू यांतील अशुद्धी दूर करणे, पंचमहाभूतांवर स्वामित्व ठेवणे, देह वज्रासम कठीण करणे… त्रिकाल ज्ञान.

नरसिंग महाराजांनी समाधीदिनी तेथे जमलेल्या त्यांच्या गणोबा नाईक प्रभृती शिष्यांस बजावले, की “या गजाननास वंदित जावे. माझ्यात आणि गजाननात अंतर मानू नये. कार्तिकी उत्सव करत जावे.” एवढे बोलून, वायव्य दिशेस तोंड करून महाराज घोंगडी पांघरून बसले व त्यांनी समाधी घेतली. महाराजांची प्रचंड अशी संगमरवरी मूर्ती समाधीस्थानी स्थापन करण्यात आली आहे. यात्रेची व इतर सर्व व्यवस्था संस्थानचे वहिवाटदार मालक व मॅनेजिंग ट्रस्टी माधवराव मारोती नाईक-आसरकर हे ठेवत. त्यांनी यात्रेत अनेक सोयी केल्या आहेत. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व मंदिरात वीजेची व्यवस्था केली आहे. पाकशाळा स्वतंत्र आहे. माधवराव मारोती नाईक-आसरकर यांच्या कारकिर्दीत मंदिराची भरभराट झाली. त्यानंतर त्यांचे वडील पुत्र श्रीकृष्ण काम पाहत असत. उत्तरोत्तर संस्थान वाढत गेले. त्यांच्या घराण्यात अनेकांना महाराजांनी दृष्टांताचे दाखले दिले आहेत. मारोती नाईक यांना यमुनेत अंगठी दडवण्याच्या निमित्ताने यमुनेचे दर्शन घडवले, त्यांच्या पत्नीला श्री दत्त स्वरूपात दर्शन दिले. 

नरसिंग महाराजांचे एक कण्याव्रत आहे. व्रतात फक्त ज्वारीच्या लाह्या खायच्या असतात. मीठपण खात नाहीत. कण्या व्रत हे पौष वद्य 11 ते माघ शुक्ल 11 पर्यत असे व माघ शुक्ल 12 ला सत्यनारायणाची पूजा त्यांच्या झोपडीवर होते.

– मधुकर धोटे

मधुकर धोटे यांच्या  पुस्तिकेवर आधारित हा लेख तयार केला आहे. धोटे यांचा पत्ता पुस्तिकेत नमूद आहे तो असा – 504 बालाजी अपार्टमेंट, कृष्णवाटिका, सी.एस. रोड नं. 4, दहिसर (पूर्व), मुंबई 400 068 – मात्र तिथे त्यांचा शोध लागला नाही. मात्र हे लेखन नरसिंग मंदिराचे प्रमुख विश्वस्त सतीश आसरकर यांनी तपासलेले आहे.

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here