कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती आणि कवी बोरकर

2
457

कुसुमाग्रज यांच्या रसिकमान्य, वाचकप्रिय कवितांपैकी ‘स्वप्नाची समाप्ती’ ही एक कविता आहे. त्या कवितेच्या ओळी जाणत्या मंडळींच्या ओठांवर ऐकण्यास मिळतात. अनेकांनी या कवितेविषयी सांगितले तरी ती कविता वाचण्यास सुरूवात केली तरीदेखील या क्षणाला नवा आनंद देते. ‘स्वप्नाची समाप्ती’ या कवितेविषयीची एक छान आठवण कवी बा.भ. बोरकर यांनी ‘कौतुक तू पाहे संचिताचे’ या त्यांच्या आत्मकथेत कथन केली आहे.

गोवा सरकारच्या कला संस्कृती संचालनालयाने बा.भ. बोरकर यांची जन्मशताब्दी त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करून साजरी केली. त्यामध्ये त्यांच्या आत्मचरित्राचाही समावेश आहे. आत्मचरित्र अपुरे असले तरी ते एका विशिष्ट टप्प्यावर थांबले असल्याने ते वाचत असताना अपुरेपण जाणवत नाही. त्या आत्मचरित्राचे संपादन अरूणा गानू आणि श्रीराम पांडुरंग कामत (विश्व चरित्रकोशाचे निर्माते आणि प्रमुख संपादक) यांनी केले आहे. बोरकर लिहितात, ‘संमेलनाला निघण्याच्या चारच दिवस आधी हातात आलेल्या ‘ज्योत्स्ने’च्या ताज्या अंकात कुसुमाग्रजांची ‘स्वप्नाची समाप्ती’ ही कविता आलेली होती. वि.स. खांडेकर कोकणात शिरोड्याला असताना त्यांनी शाळेच्या संमेलनासाठी बा. भ. बोरकर यांना पाहुणे म्हणून बोलावले होते. बोरकर यांनी आमंत्रण स्वीकारले. बोरकर यांनी त्याच काळात ‘मावळतीचा चंद्र’ नावाची कादंबरी लिहिली होती. वि.स. खांडेकर यांनी बोरकर यांना संमेलनाला कादंबरीचे हस्तलिखित घेऊन येण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे बोरकरांनी ते हस्तलिखित बरोबर नेले. खांडेकरांनी ते हस्तलिखित वाचून बोरकरांना सांगितले, की “ही कादंबरी माझ्याकडे राहू द्या. तिच्यासाठी योग्य प्रकाशक मी गाठीन.” बोरकर ही आठवण सांगताना लिहितात, ‘स्वप्नाची समाप्ती’ ही कविता मी वाचली तेव्हा मी स्वतःतच मावेनासा झालो. माझ्या एकाकी प्रवासात तोलामोलाचा सोबती लाभला असे मला वाटले. मला ती लगेच मुखोद्गत झाली. ती गुणगुणतच मी शिरोड्याला जाण्यास निघालो. साताडर्याला पोचतो तर बस सुटलेली. भाऊंनी ‘माझे बरेच साहित्यिक स्नेही संमेलनाला येतील, तुम्ही चुकता कामा नये.’ असे बजावून ठेवले होते. मी पायीच पुढे निघालो. पायात बूट आणि हातात बॅग अशा स्थितीत शिरोड्यापर्यंतची पंधरा मैलांची पायपीट आटोपताना, खरे तर; ब्रह्मांड आठवले ! माथ्यावर रणरणते ऊन, पोटात भुकेचा डोंब आणि पायांना फोड अशी अवस्था झाली होती. शरीर अक्षरश: मोडकळीस आले होते. तरीदेखील मी तो सारा शीण त्या कवितेने सोबत केल्यामुळे सहज पेलू शकलो. भाऊंकडे पोचलो तेव्हा यशवंत, गिरीश, वि. ह. कुलकर्णी, दौंडकर, प्रभाकर पाध्ये असे त्यांचे स्नेही तेथे बसले होते. ते माझी वाट पाहात होते. मी चूळ भरून चार घास खाल्ले. मला केव्हा लेटेन (झोपेन) असे झाले होते. पण सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलेले. त्यांनी मला त्यांच्याबरोबर समुद्रकाठच्या सुरूच्या बनात नेले आणि कविता गाण्यास लावले.

दुसऱ्या दिवशीच्या संमेलनात मला जेव्हा कविता म्हणण्याचा आग्रह पुन्हा झाला तेव्हा मी माझी कविता म्हणण्याऐवजी कुसुमाग्रजांची ‘स्वप्नाची समाप्ती’ गायलो. आवाज छान लागला होता. सभा चित्रवत होऊन ऐकत होती. मी कविता म्हणून झाल्यावर कवीचे नाव जाहीर केले. सगळ्यांचेच मत झाले, की मराठी काव्यक्षितिजावर नवा देदिप्यमान तारा उगवला आहे!

रसिक वाचकांसाठी सोबत तीच ‘स्वप्नाची समाप्ती’ ही कविता.

स्वप्नाची समाप्तीकुसुमाग्रज

स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा…
स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशात
फिरे रात्र कणकण
प्रकाशाच्या सागरात
काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्यांचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत
रानपाखरांचा आर्त
नाद नच कानी पडे.
संपवुनी भावगीत
झोपलेले रातकिडे
पहाटेचे गार वारे
चोरट्याने जगावर
येती पाय वाजतात
वाळलेल्या पानावर
शान्ति आणि विषण्णता
दाटलेली दिशांतुन
गजबज गर्जवील
जग घटकेने दोन!
जमू लागलेले दव
गवताच्या पातीवर
भासते भू तारकांच्या
आसवांनी ओलसर
काढ सखे गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत
प्राजक्ताच्या पावलाशी
पडे दूर पुष्परास
वाऱ्यावर वाहती हे
त्याचे दाटलेले श्वास
ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजतो या
आम्ही भंगणाऱ्या मूर्ती
खळ्यांमध्ये बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यातील घुंगुरांचा
नाद कानी येऊ लागे
आकृताना दूरच्या त्या
येऊ लागले रूप – रंग
हालचाल कुजबूज
होऊ लागे जागोजाग
काढ सखे गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत
होते म्हणू स्वप्न एक
एक रात्र पाहिलेले
होत म्हणू वेड एक
एक रात्र राहिलेले
प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्यांचे कनकाचे
लागतील गडावर
ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडात दिसू वेडे
आणि ठरू अपराधी

नाशिक : 1936

———————————————————————————————————— 

काळ झरझर पुढे सरकत होता. दोघांचेही कवितालेखन चालू होते आणि एके दिवशी कुसुमाग्रजांची ‘स्मरण‘ ही कविता वाचली. त्यांनी त्यांच्या तीन स्नेहयांचे (वा.रा. ढवळे, प्रभाकर पाध्ये, बा.भ.बोरकर) स्मरण त्या कवितेत मोजक्या शब्दांत यथार्थ केले आहे.  कुसुमाग्रज त्या कवितेत बा.भ. बोरकर यांच्या विषयी म्हणतात –

आणि आता बाकीबाबही,
आमच्या काव्याकाशातील पुनवेचा चंद्र
चांदणं जगणारा, चांदणं उधळणारा,
केवळ मातीतच नव्हे, तर रेताडातही
चांदण्याची रोपं पेरणारा.
बाकीबाब, आठवतंय ?
ती तुम्हाला चेष्टेनं ‘महर्षी’ म्हणायची,
पण काव्याच्या प्रांतातील तुमचं महर्षीपण
हे एक वास्तवच होतं.
अशेष जीवनाची कविता करण्याची
तुमची ती साधना सायुज्जभक्ती
साधारणांना अप्राप्यच.
तशा आपल्या पायवाटा वेगळ्याच
पण माझ्या खांद्यावरील तुमचा हात
कधीच सैल झाला नाही.
बाकीबाब, तुम्ही नाशिकला आला होता
माझ्या शब्दांसाठी
तेव्हाच्या भाषणात तुम्ही म्हणालात:
“मी या माणसासाठी इथे आलोय,
आता माझं मागणं एकच आहे
मी बोलावीन तेव्हा माझ्यासाठी
त्यानं यायला हवं- कुठेही, केव्हाही”
बाकीबाब
आता तुमचं बोलावणं
आणि माझं येणं
सारंच परस्वाधीन

(कुसुमाग्रजांची’ स्मरण’ ही कविता ‘थांब सहेली’ या कवितासंग्रहात आहे. तो संग्रह वसंत सं. पाटील, श्री.शं. सराफ, रेखा भंडारे यांनी संपादित केला आहे. तो कुसुमाग्रजांच्या निधनानंतर 1 फेब्रुवारी 2001 रोजी पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केला.)

————————————————————————————————————-

… ती पहिली भेट

कुसुमाग्रज यांची पहिली भेट झाली ती मडगाव (गोवा) येथील साहित्य संमेलनात. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुढाकाराने आयोजित केलेले ते अखेरचे संमेलन. त्यानंतरची सारी साहित्य संमेलने साहित्य महामंडळाच्या पुढाकारातून त्या त्या गावात आयोजित केली गेली. पुढे संमेलनांचे स्वरूप उत्सवी, भव्य दिव्य झाले. असे असूनही मडगावचे ते साहित्य संमेलन मात्र साधेपणाने साजरे झाले.

गोवा नुकताच स्वतंत्र झाला होता. संमेलनाच्या दृष्टीने साऱ्या सोयी त्यावेळी उपलब्ध होणे शक्य नव्हते. काही प्रतिनिधींची निवासव्यवस्था मडगावच्या शाळांमधून केली होती. मडगाव गाव तसे छान, टुमदार, निसर्गसौंदर्याने नटलेले. तेथील वाचनालय सुरेख होते. अनेक मासिके तेथे यायची आणि रंगनाथ बापू कामत यांच्यासारखी रसिक मंडळी त्या काळात ही वाचन संस्कृती जपण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करत होती. कुसुमाग्रज हे जरी संमेलनाचे अध्यक्ष होते तरी ते संमेलनाच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहायचे, कधीकधी चर्चेत भाग घ्यायचे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संमेलनात अध्यक्षांच्या भाषणावरही साधकबाधक चर्चा व्हायची आणि स्वतः अध्यक्ष त्यात सहभागी व्हायचे.

मी माझ्या संग्रहातील निवडक साहित्यिकांच्या हस्ताक्षरांचे प्रदर्शन वाचनालयात भरवले होते. त्या प्रदर्शनात ‘मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले’ ही कुसुमाग्रजांची कविता त्यांच्या हस्ताक्षरात होती. कुसुमाग्रजांनी प्रदर्शनास भेट दिली. कुसुमाग्रजांची आणि माझी ती पहिली भेट. त्यांनी माझी, माझ्या संग्रहाची आस्थेने चौकशी केलीच, पण “कोठे राहिला आहात? काही गैरसोय नाही ना?” याचीही आपुलकीने चौकशी केली. त्यांच्यासोबत न. पु. सुकेरकर आणि दामू केंकरे या दोघांचे वडील होते.

कुसुमाग्रजांच्या तीन-चार भेटी संमेलनकाळात झाल्या. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. पण माझ्या स्मरणात जे कुसुमाग्रज कायमचे मनात घर करून राहिले ते त्यांच्या अध्यक्षीय भाषणांमुळे. त्यांचे भाषण सुरेख, व्यवस्थित, मुद्देसूद होते. पुढे वर्षभर त्या भाषणावर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर चर्चा होत असल्याचे मला जाणवले. ते म्हणाले, “या पुढच्या काळात साहित्याने राजकारणापासून वेगळे राहून चालणार नाही तर साहित्य आणि राजकारणातील सर्वांनीच हातात हात घालून पुढची वाटचाल करायची आहे. राजकारणी व्यक्तींनी साहित्यिकांपासून फटकून वागू नये आणि साहित्यिकांनीही राजकारणी मंडळींशी अबोला धरू नये. मात्र या दोन्ही क्षेत्रांतील व्यक्तींनी त्यांचे म्हणून जे ‘स्व’त्व आहे ते टाकण्याचे काहीच कारण नाही”.

– राम देशपांडे 8600145353
“अक्षर” आशियाना कॉलनी, जरगनगर 2 , कोल्हापूर 416007

About Post Author

2 COMMENTS

  1. कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर यांच्या आठवणी खूप सुंदर, उत्कट. मडगावच्या साहित्यसंमेलनाला मी गेले होते. महाविद्यालयीन वयात सगळंच कळत नाही. पण कुसुमाग्रजांचं अप्रतिम भाषण, त्याचा जनसमुदायावर पडलेला प्रभाव लक्षात आहे. संमेलनात प्रचंड उत्साह, आनंद होता. गोवेकरांचं विलक्षण आतिथ्य होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here