सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे निंबाळकर घराण्याच्या जहागिरीचे गाव! रंभाजीराव (रावरंभा) निंबाळकर हा शिवाजीमहाराजांच्या जावयाच्या पुढील वंशजांपैकी होता. तो 1705 मध्ये मराठ्यांकडून मोगलांशी लढला. पण नंतर शाहू व ताराबाई यांच्या कलहात 1710 मध्ये मोगलांकडे गेला व त्याला पुण्याची सुभेदारी मिळाली. पण पुण्यात पेशव्यांचा उदय झाल्यानंतर मोगलांनी त्याला करमाळा, माढे व परांडे या परगण्याची जहागिरी दिली.
रंभाजीराव तुळजापूरच्या तुकाईचा परमभक्त असल्याने त्याने करमाळ्याला तिचे कमलादेवी या रूपाने मंदिर बांधले. त्या शिल्प मंदिरात हिंदू संस्कृती व मोगल संस्कृती यांची मनोरम मिश्र शैली आढळते. रंभाजीरावाने ते मंदिर हेमाडपंथी वास्तुशैली पद्धतीने मंदिर बांधले. त्याने तेथे श्री कमलादेवीची प्रतिष्ठापना केली. नंतर त्याचा पुत्र जानोजी निंबाळकर याने मंदिराभोवती तटबंदी बांधली. त्याला गोपुरेयुक्त चार दरवाजे बांधले. तो 1740 ते 1743 मध्ये रघुजी भोसले यांच्याबरोबर दक्षिणेतील त्रिचनापल्लीच्या स्वारीवर गेला होता. त्याने तेथील गोपुरे व भव्य मंदिरे पाहून, तेथील कलाकार आणून करमाळ्याच्या कमलादेवी मंदिरात दाक्षिणात्य पद्धतीने गोपुरे व शिल्पकला घडवली. मंदिराच्या दुहेरी तटबंदीच्या आतील बाजूस भाविकांसाठी शहाण्णव ओव-या आणि तीन सभागृहे आहेत. पहिल्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर कीर्तिमुख आहे. तेथून आत प्रवेश केल्यावर समोर मोठे पितळी कासव दृष्टीस पडते. आतील सभागृहात डावीकडे कमलादेवीचा पलंग व सुबक पितळी उत्सवमूर्तींचे छोटे दालन आहे. ती मोठी मूर्ती उत्सवात यात्रेसाठी व छबिन्यासाठी उपयोगात येते.
होमहवनातील अभिषेकासाठी, पूजेसाठी एक छोटी मूर्ती वापरत असत. ती चोरीस गेली आहे. पुढे मुख्य गाभारा आहे. त्यात कमलादेवीची पूर्णाकृती, पाच फूट उंचीची व आठ हात असलेली काळ्या गंडकी शिळेत कोरलेली अप्रतिम मूर्ती आहे. ती अष्टभुजादेवी सिंहावर आरूढ असून महिषासुराचे मर्दन करत आहे. मूर्तीवर पाषाणात देवीची आयुधे व अलंकार कोरलेले आहेत, पण रावरंभाने व जानोजीनेही; तसेच, पुढील वंशजांनीही देवीसाठी सोन्यामोत्याचे दागिने अर्पिले आहेत. गाभा-यावरील शिखर सहा स्तरांचे असून प्रत्येक स्तरावर दाक्षिणात्य पद्धतीची देवदेवतांची सुरेख शिल्पे कोरलेली आहेत. शिल्पचित्रे शहाण्णव आहेत. वरच्या स्तरावर सोन्याचा कळस आहे. तो मोगलांचा सुभेदार असल्याने कळस हा मात्र इस्लामी संस्कृतीच्या पद्धतीचा म्हणजे मध्यभागी घुमट व चार बाजूस चारमिनार असा आहे, पण कळसाखाली हिंदू पद्धतीचे सुंदर कमळ कोरलेले आहे. अनेक कोनाडे, जाळ्या, वेलबुट्ट्या, फळे, फुले, कळ्या यांचे सुरेख शिल्पकाम केलेले आहे. मंदिरात देवीचे पंचायतन आहे. प्रदक्षिणा मार्गावर शिवमंदिर, गणेश, सप्तमुखी अश्वरथातील सूर्य-नारायण व गरूडावर स्वार विष्णू अशी मंदिरे आहेत. आवारात होमासाठी कट्टा व सौंदर्याने नटलेल्या उंचच उंच अशा तीन दीपमाळा आहेत. पूर्व दरवाज्यावर नगारखाना व बाहेर निंबाळकर वंशजांच्या, अप्रतिम शिल्पे असलेल्या छत्र्या आहेत. त्याबाहेर शिवलिंगाच्या आकाराची अष्टकोनी प्रचंड विहीर आहे. शहाण्णव पाय-या असलेली विहीर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना मानला जातो. त्याला पूर्वी हत्तीची मोट होती. कमलादेवीच्या मंदिराला शहाण्णव खांब, शहाण्णव ओव-या, शहाण्णव शिल्प असे ते अद्भुत, सुंदर देवालय म्हणजे करमाळ्याची शानच आहे.
– प्रमोद शेंडे
(अधिक आधार – ‘अमृत’ मासिकातील लेख.)
Very good
Very good
माहिती बऱ्याचपैकी चुकीची आहे
माहिती बऱ्याचपैकी चुकीची आहे या इतिहासाच्या संदर्भासाठी सोलापूरचा इतिहास हे पुस्तक वाचावे
Comments are closed.