वेंगुर्ले नगर वाचनालय – १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान

1
55
carasole1

वेंगुर्ले नगर वाचनालय ही संस्था 142 वर्षे ज्ञानदानाच्या तसेच, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांत मोलाचे कार्य करत आहे. वाचनालयाच्या ऐतिहासिक वास्तूला विवेकानंद, सावरकर, तुकडोजी महाराज, सानेगुरुजी, राजेंद्रप्रसाद, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, मामा वरेरकर यांसारख्या अनेक थोर व्यक्तींनी भेटी देऊन प्रशंसोद्गार काढले आहेत.

वेंगुर्ले नगर वाचनालयाची स्थापना 1871 मध्ये ‘धी नेटिव्ह जनरल लायब्ररी, वेंगुर्ले’ या नावाने झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1930 च्या सुमारास वेंगुर्ले वाचनालयाला भेट दिली. त्यांनी ‘धी नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या परकीय नावाबद्दल नापसंती व्यक्त केली आणि संस्थेस ‘नगर ग्रंथालय’ किंवा जे युक्त असेल ते स्वदेशी नाव द्यावे असे सुचवले. त्यानुसार संस्थेचे नाव 1934 मध्ये बदलून त्याऐवजी त्याचे ‘नगर वाचनालय, वेंगुर्ले’ असे नामकरण करण्यात आले. संस्थेला 1970-71साली राज्य सरकारकडून ‘अ’ वर्ग तालुका ग्रंथालयाचा दर्जा प्राप्त झाला.

ग्रंथालयाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाकडून वार्षिक परीक्षण अनुदान म्हणून 384000 रुपये मिळतात. संस्थेला शंभर वर्षे झाली तेव्हा, 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाच लाख रुपये एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. त्याशिवाय कोलकात्याच्या ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’कडून ग्रंथ, कपाटे, तसेच झेरॉक्स मशीन असे साहित्य प्राप्त झाले आहे. संस्थेत वीस दैनिके आणि सुमारे सत्तर साप्ताहिके, पाक्षिके व मासिके नियमित येत असतात. ग्रंथसंख्या चाळीस हजारांच्या वर असून त्यामध्ये दुर्मीळ ग्रंथ दोनशेसहासष्ट आहेत. संस्थेचा संदर्भ विभाग आणि स्पर्धा परीक्षा दालन तसेच बाल आणि महिला विभाग स्वतंत्र आहेत. त्यांचा लाभ अनेक वाचक घेतात.

संस्था दरवर्षी काही उपक्रम राबवते. त्यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धा व कार्यक्रम होतात. त्यात विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रे देण्यात येतात. त्यामध्ये इयत्ता पाचवी ते उच्चमाध्यमिक शाळेतील विद्यार्थी यांना सहभागी करून घेण्यात येते. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी तालुका आणि जिल्हा स्तरावर आयोजित केल्या जातात. त्या विवेकानंद आणि सावरकर यांच्या साहित्यावरच असतात.  सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, सुगम संगीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वाचक स्पर्धा घेण्यात येतात. वाचकांनी आवडीने विविध विषयांवरील पुस्तके वाचावीत आणि त्यांचे निरीक्षण करावे. त्या वाचकांमधून निवडलेल्या वाचकाला ‘व्यासंगी वाचक’ असा पुरस्कार देण्यात येतो. तसेच, पहिली ते पदवीपर्यंतच्या वेंगुर्ले तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या आणि विशेष गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येते. तालुक्यातील आदर्श शिक्षक आणि शिक्षिका; तसेच, आदर्श शाळा निवडून त्यांना 5 सप्टेंबर या शिक्षकदिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात येते.

नगर वाचनालय, वेंगुर्ले
बॅरिस्टर नाथ पै पथ, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग – ४१६ ५१६.
०२३६६ – २६२३९५
ग्रंथसंख्या : ३८२७४ / दुर्मीळ पुस्तिके : १६९ / वाचक : १२६८

(‘जडण-घडण’ मासिक, जानेवारी 2015 वरून उद्धृत)

About Post Author

1 COMMENT

  1. कल्याणचे सार्वजनिक
    कल्याणचे सार्वजनिक वाचनालयही ३ फेब्रु. १८६४ पासून सुरु आहे. १४२-१४३ वर्षे जुने हे वाचनालय अद्याप छान सुरु आहे. नवनवीन उपक्रमामुळे वाचकात ते आवडीचे ठिकाण झाले आहे. वेंगुर्ले, कल्याण किंवा अशा जुन्या वाचनालयांना उर्जा देत रहाणे आवश्यक.
    पु.भा. भावे व्याख्यानमाला, उत्तम वाचक, उत्तम कथा. कल्याण सार्वजनिक वाचनालयाची माहिती http://www.savak.in या वेबसाईटवर बघता येते.

Comments are closed.