शस्त्रास्त्रांचे पुलगाव

    पुलगाव हे महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीकाठी वसलेले आहे. त्या गावाला लागून वर्धा नदी वाहते. वर्धा नदीच्या अलीकडे वर्धा जिल्ह्याची सीमा तर पलीकडे अमरावती जिल्ह्याची सीमा आहे. नदीचे पात्र विस्तृत असल्याने दोन्ही बाजूला जोडणारा एक रेल्वे पूल आहे. त्या पुलावरून मुंबई-नागपूर तसेच नागपुरवरून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्या आणि औरंगाबाद-वर्धा, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली अशा मार्गे रेल्वे गाड्या धावतात. पुलगावला रेल्वे पुलाच्या जवळ असल्याने त्याला पुलगाव अर्थात पुलावर वसलेले गाव हे नाव पडले.

    त्या रेल्वेमार्गाला लागून गावातील गावकऱ्यांना जाण्यासाठी, बैलगाड्या, मोटारी, मालट्रक यांच्या वाहतुकीसाठी दुसरा मार्ग आहे. वर्धा हे लोहमार्ग प्रस्थानक वर्ध्याच्या पश्चिमेस सुमारे तीस किलोमीटरवर आहे. तेथून आर्वीकडे लोहमार्गाचा फाटा जातो. कापूस उत्पादक परिसर, मुंबई-नागपूर रस्त्याचे सान्निध्य, लोहमार्गाची व दूरध्वनीची सोय या कारणांनी पुलगाव हे कापसाची मोठी बाजारपेठ बनले आहे. तेथे नगरपालिका (1901) असून, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाच्या सोयी आहेत. शहरात हातमाग कापडउद्योगाचा विकास होत आहे. तेथे कापड, सरकी काढण्याच्या व कापसाच्या गाठी बांधण्याच्या गिरण्या आहेत. तेथे भारत सरकारचे दारूगोळ्याचे कोठार असल्याने त्यास सैनिकी दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. तेथे बौद्ध, बालाजी, मारूती व विठ्ठल यांची मंदिरे आहेत.

    वर्धा नदीच्या अलिकडे रेल्वे स्टेशन आणि त्याच्या बाजूला एक कॉटन कॅम्प मिल आहे. त्या कॉटन मिलमध्ये गावातील बरेच लोक मजूर म्हणून कामाला जातात. शिवाय पुलगावच्या दुसऱ्या टोकाला एक टेकडी असून त्या टेकडीजवळ केंद्र शासनाच्या मिलिट्रीचा युद्धसामग्री तयार करण्यासाठीचा डेपोही आहे. तो डेपो जवळपास वीस किलोमीटर परिसरात पसरला आहे. त्या डेपोमध्ये युद्धासाठी लागणारा दारूगोळा बनवण्यात येत असे. तो बॉम्बसाठा म्हणजे दारुगोळा, डेपोपासून मुख्य रेल्वे स्थानक खुजगाव स्टेशनवर नेण्यासाठी डेपोपासून ते पुलगाव रेल्वे स्टेशनपर्यंत एक स्वतंत्र रेल्वे रुळाची व्यवस्था करण्यात आली होती. पुलगावातील बरेच लोक मिलिट्री डेपो आणि कॉटन मिलमध्ये रोजगाराचे साधन म्हणून कामाला जात असत. गावातील बहुतांशी लोकांना स्वतःची शेती होती, तर काहीजण दुसऱ्यांच्या शेतात मजुरीसाठी जात असत.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक जाहीर सभा त्याकाळी पुलगावात होत. त्या जाहीर सभांमधून सामाजिक सुधारणा, तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि धार्मिक बदलाचे विचार मंथन पेरले जात होते. तेव्हाचा थोडाफार शिकलेला युवा वर्ग आणि वयस्कर मंडळी राजकीय, धार्मिक आणि सामाजिक विचारांतून स्वतःला बदलू पाहत होते. त्याचा परिणाम म्हणजे गावातील अनेक मुले-मुली शाळेत जात होती. काही युवक शिक्षण घेऊन प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक या पदावर रुजू झाले होते. पुलगावच्या वेशीवर त्या काळच्या सामाजिक परिस्थितीनुसार आणि धार्मिक पगडा यानुसार खाऱ्या आणि गोड्या पाण्याच्या दोन विहीरी होत्‍या. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवल्यास घरगुती वापरासाठी म्हणून खाऱ्या विहिरीचे पाणी आणावे लागे. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटल्यावर मात्र वर्धा रेल्वे स्थानकात पिण्याचे पाणी भरण्यासाठी जावे लागे. पावसाळा सुरू झाला, की पाणीटंचाई दूर होत होती. मुसळधार पाऊस पडत असे, तेव्हा वर्धा नदीला पूर येई. गावात प्रामुख्याने सवर्ण समाजाची वस्ती वेगळी होती. त्याला जोडून कुणबी महारांची वस्ती होती. पूर्वी गावात जातीयता पाळली जात होती. गावात युगयात्रा नाटकाचे सादरीकरण होई. गावात बुद्ध विहार बांधले होते. तसेच, सिद्धार्थ वाचनालयही होते. तेथे अनेक प्रकारची वाचनीय पुस्तके होती. त्या वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी वाद विवाद स्पर्धा आयोजित करण्यात येत असत.

    वर्ध्यातील पुलगाव हे देशातील सर्वात मोठे तर आशियातील दुसऱ्या क्रमाकाचे शस्त्र भांडार आहे. पुलगावात दारुगोळा बनवला जातोच, शिवाय मोठा शस्त्रसाठाही ठेवला जातो. तेथे बॉम्ब, दारुगोळा अशी मोठी युद्ध सामुग्री साठवली जाते. देशाच्या विविध ठिकाणी तयार झालेली स्फोटके पुलगाव लष्करी तळावर साठवली जातात. पुलगावात जवळपास दोनशे अधिकारी आणि पाच हजार स्थानिक कामगार काम करतात.

    अनुपमा अर्जुन बोरकर 8484034121
    (लेखिकेच्या ‘अनुपमा’ या आत्मकथनातून उद्धृत, संपादित-संस्कारित)
    ———————————————————————————————-

    About Post Author

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here