रत्नागिरी हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान, सावरकर स्मारक, ऐतिहासिक पतितपावन मंदिर, विठ्ठल मंदिर, भाट्येचा समुद्र किनारा, नारळ संशोधन केंद्र, मत्स्यालय, मांडवी जेट्टी यांसह इतर काही ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांची वर्दळ रत्नागिरीला वर्षभर सुरू असते.
परंतु रत्नागिरीचे मुख्य आकर्षण म्हणजे रत्नदुर्ग किल्ला. रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर पश्चिमेस उभा आहे. रत्नदुर्ग किल्ल्याची रचना वेगळी आहे. शहराच्या पश्चिम अंगाला असलेल्या समुद्रामध्ये एक भूशीर शिरलेले आहे. भूशीराच्या तिन्ही बाजूंना समुद्राचे पाणी पसरलेले आहे. त्या भूशीरावर तीन टेकड्या आहेत. त्यांपैकी दोन टेकड्या पूर्वेकडे असून पश्चिमेकडे असलेली तिसरी टेकडी सागरालगत आहे. ती बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. रत्नदुर्गाच्या पूर्वेकडील दोन्ही टेकड्यांच्या माथ्यावर तटबंदी बांधलेली आहे. ती बुरुजांनी युक्त आहे. त्या दोन टेकड्यांमधील खिंडीसारख्या भागातील तटबंदी फोडून रस्ता आत गेला आहे. तो रस्ता डांबरी असून वाहने माथ्यापर्यंत नेता येतात. त्या रस्त्यानेच जाण्याची वहिवाट पडून गेली आहे. त्यामुळे गडाच्या मुख्य दरवाज्याची वाट मोडली गेली.
गाडीरस्त्याने लहानशी खिंड ओलांडली, की उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता टेकडीवर चढतो. त्या कच्च्या रस्त्याने पाचदहा मिनिटांत माथ्यावरच्या निमुळत्या भागात पोचता येते. तेथे मुख्य प्रवेशद्वाराची आतील बाजू आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरील भागही चांगल्या प्रकारे बंदिस्त केलेला आहे. तेथे लहान दरवाजाही ठेवलेला आहे. प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे लहानसे मंदिर आहे. मंदिराचा दरवाजा दक्षिणेकडे असून मूर्ती मात्र पश्चिमेकडे तोंड करून आहे. मंदिराच्या मागील बाजूने दरवाज्याच्याा वरील भागात जाण्यासाठी पाय-यांचा मार्ग आहे. दरवाज्यावर गेल्यानंतर मोठा आणि लहान असे दोन दरवाजे; तसेच त्याभोवतीची तटबंदी पाहण्यास मिळते.
किल्ल्यावर भटकंती करत असताना विविध बाजूंनी दिसणारे समुद्राचे सौंदर्य रत्नागिरीची भेट स्मरणीय करते. तटबंदीवरून किल्ल्याला पूर्ण फेरी मारता येते. तटबंदीवरील रुंद पायवाटेने उत्तरेकडे गेल्यास पूर्वेकडील रत्नागिरी शहराचे; तसेच, सागराचेही विहंगम दृश्य दिसते. तेथून बालेकिल्लाही उत्तम दिसतो. गडावरून दिसणारे भगवती बंदर आणि अथांग पसरलेल्या सागरात विहरत असलेल्या बोटींचे दर्शन मन मोहवून टाकते. तटबंदीच्या कडेने दीपगृहापर्यंत जाता येते. दीपगृह सायंकाळी ४.०० ते ५.०० या वेळेत पाहण्यासाठी खुले असते. तेथे पाच तोफा असून तेथील बुरुजाला सिद्ध बुरुज म्हणतात.
रत्नृदुर्ग किल्ला ‘भगवती किल्ला’ या नावानेही ओळखला जातो. भगवतीदेवीचे सुंदर मंदिर बालेकिल्ल्यात आहे. बालेकिल्ला लहान आकाराचा आहे. शिवकालीन असलेल्या भगवतीदेवीच्या मंदिराचा तीन वेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या दारात कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे.
समुद्रापर्यंत जाणाऱ्या तीन तोंडाच्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे रत्नदुर्गाचे आकर्षण वाढते. त्या भुयारास ‘भगवती भुयार’ असे नाव आहे. मंदिराच्या जवळ असलेले ते भुयार तीनशे फूट खोल आहे. भुयाराचा शेवट खाली समुद्रकिना-याजवळ होतो. तेथे मोठी गुहा आहे, ती बंद करण्यात आली आहे. भगवती भुयारासंबंधात आशय सहस्त्रवबुद्धे या विद्यार्थ्याने ‘अॅन अर्थड् हॉलो’ नावाचा वीस मिनीटांचा लघुपट तयार केला आहे. किल्ल्यात लहान तळे व खोल विहीर आहे. तीन तोंडांच्या भुयारी मार्गाजवळ बुरूज आहे. बुरुजाचे नाव ‘रेडे बुरूज’ असे आहे. त्यावर स्तंभही उभारण्यात आला आहे.
रत्नदुर्गाची बांधणी बहामनी काळात झाली. शिवाजी महाराजांनी किल्ला आदिलशहाकडून १६७० साली जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून त्याला लष्करी दृष्ट्या मजबुती आणली. छत्रपती संभाजीराज्यांनी रत्नदुर्गास भेट दिली होती. करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात असलेला रत्नदुर्ग पुढे आंग्रे घराण्याच्या ताब्यात होता. पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने रत्नदुर्गावर ताबा मिळवला. पुढे, तो किल्ला १८१८ मधे पंतप्रतिनिधींकडून इंग्रजांच्या ताब्यात गेला.
किल्ल्याच्या पायथ्याशी शंकराचे श्री भागेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या खांबांवर पशुपक्ष्यांची सुंदर चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडे यांनी बहरलेली बाग आहे.
किल्ल्याच्या दक्षिणेकडे दीपस्तंभ आहे. त्यावरून रत्नागिरी शहराचे दर्शन घडते. रत्नदुर्ग किल्ल्याचा आकार घोड्याच्या खुरासारखा दिसतो. किल्ला एक हजार दोनशेअकरा मीटर लांब आणि नऊशेसतरा मीटर रुंद असून संपूर्ण परिसर एकशेवीस एकरांचा आहे. किल्ल्याच्या तिन्ही बाजूंला समुद्र व एका बाजूला दीपगृह आहे. किल्ल्याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे. तिथे मिरकरवाडा हे बंदर आहे. बालेकिल्ल्याचा दरवाजा सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ या वेळेत पर्यटकांसाठी उघडला जातो. पेठकिल्ला भागातील पाउलवाटेने गेल्यास भगवती आणि मिरकारवाडा बंदराचे दृश्य सुंदर दिसते.
त्याच भागातून समुद्राच्या काळ्यापांढऱ्या किनाऱ्याचे गूढ निर्माण करणारे दृश्य दिसते. एका बाजूला काळा किनारा आणि दुसऱ्या बाजूस पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पांढऱ्या किनाऱ्याचे दर्शन घडते. मुख्य रस्त्याकडे परत आल्यावर डाव्या बाजूने दीपस्तंभाकडे रस्ता जातो. वाहन दीपस्तंभापर्यंत जाऊ शकते. परिसराचे सौंदर्य दीपस्तंभावर जाऊन सायंकाळी ४ ते ५ या वेळेत न्याहळता येते.
भागेश्वसर मंदिर कै.भागोजीशेठ कीर यांनी बांधले. मंदिरातील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. गाभाऱ्यात शंकराची पिंड असून मंदिराचा सभामंडप भव्य आहे. मंदिराचे बांधकाम हा स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. परिसरातील रम्य वातावरणामुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सुविधा आहे. खालच्या आळीत श्री कालभैरवाचे मंदिर आहे. मंदिर कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांच्या काळात बांधले गेल्याचे सांगितले जाते. मंदिराचा परिसर रम्य आहे. किल्ल्यावरून उतरल्यावर निवांतपणे काही क्षण तेथे घालवता येतात.
रत्नागिरीहून पोमेंडीमार्गे पानवलला जाता येते. पानवल गावाजवळ आशियातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. अंतर आहे अठरा किलामीटर. पुलाची उंची पासष्ट मीटर आहे. ती भव्य निर्मिती पाहिल्यावर त्या निर्मितीमागे असणाऱ्या हातांविषयी मनात अभिमानाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. पुलाच्या सभोवतालचा परिसरही सुंदर असून जंगलातील भटकंतीचा आनंद त्या भागात घेता येतो. रत्नागिरी शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर पानवल गावाकडे जाणारा रस्ता आहे. त्या कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यास तीन किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूस पानवलचा रेल्वे पूल आहे. परतीच्या प्रवासात सोमेश्वर खाडीजवळील सोमश्वर मंदिर आणि तेथूनच पाच किलोमीटर अंतरावरील चिंचखरी दत्तमंदिराला भेट देता येते.
चिंचखरी येथे निसर्गरम्य परिसरात उभारलेले दत्त मंदिर आहे. ते रत्नागिरी शहरापासून नाचणेमार्गे दहा किलोमीटर अंतरावर आहे. गजानन महाराज बोरकर यांचे चिंचखरी हे जन्मगाव. त्यांनी त्या ठिकाणी तपोवनाची निर्मिती करून दत्त मंदिर उभारले. मंदिराच्या बाजूचा निर्मळ पाण्याचा प्रवाह आणि परिसरातील दाट वनराई यांमुळे मंदिरात प्रवेश करताक्षणी प्रसन्न वाटते. श्री गुरू दत्ताची संगमरवरी मूर्ती तेवढीच देखणी आहे. राजीवाडा बंदरापासून बोटीनेदेखील चिंचखरी येथे जाण्याची सोय आहे.
चिंचखरीच्या अलिकडे डाव्या बाजूस दाट वनराईतून सोमेश्वरकडे रस्ता जातो. ते गाव बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. गावाच्या मध्यभागी सोमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. चार भागांत विभागलेल्या मंदिराची वास्तू स्थापत्यकलेचा सुंदर नमुना आहे. दगडी तटबंदीच्या मधोमध सुंदर कौलारू मंदिर उभारले गेले आहे.
काजळी नदीच्या तीरावर हातीस गावच्या बाबरशेख बाबांनी लोकांना भक्तिमार्ग दाखवला. ते गाव रत्नागिरीपासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या महानिर्वाणानंतर गावातील जनता हिंदू असल्याने ग्रामस्थांनी इब्राहिमपट्टण येथील मुस्लिम बांधवांच्या मदतीने दफनविधी पार पाडला. तेव्हापासून दोन्ही गावांतील मंडळी माघ पौर्णिमेला बाबांचा ऊरुस साजरा करतात. सोहळा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. ऊरुसामधील शस्त्रास्त्रांचे खेळ आणि गावातील ढोलपथकाचे खेळ डोळ्यांचे पारणे फेडतात.
रत्नागिरी परिसरातील सफरीत सुंदर किनारा सोबतीला असतो. नारळाची उंच झाडे, दाट सुरुबन यांमुळे त्या सौंदर्यात अधिक भर पडते. तेथील शुद्ध हवा आणि खास कोकणी पद्धतीच्या भोजनाची चव यांमुळे येणारा पर्यटक तेथे रमतो आणि सफरीचा मनमुराद आनंद घेतो.
किरण मोघे
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
(‘महान्यूज’वरून साभार)
छायाचित्रे – ओंकार ओक
* मूळ लेखात अधिकची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
Ati Sunder ahe He network …
Ati Sunder ahe He network ….
Good information. Very…
Good information. Very useful, for travellers.
Comments are closed.