दिलीप उतेकर – साखर गावचा भगिरथ

carasole

दिलीप उतेकरदिलीप उतेकर हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातले. खेड तालुक्यापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेले साखर हे त्यांचे गाव. उतेकरांचा जन्म तिथला. त्यांनी गावात सातवीपर्यंत शिक्षण घेतले आणि दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी जवळचे धामणंद गाव गाठले. मग बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी चिपळूण, तर त्यापुढील शिक्षणासाठी मुंबई असा त्यांचा प्रवास त्यांना गावापासून दूर घेऊन गेला. उतेकर वीस वर्षांचे असताना मुंबईत आले. त्यांनी मुंबईत शिपाई, लोडर अशी कष्टाची कामे करत काही वर्षांत स्वतःचा शिपिंगचा छोटा व्यवसाय थाटला.

उतेकर पंचावन्न वर्षांचे आहेत. ते तीस वर्षे गावापासून दूर राहिले. मात्र तरीही त्यांचे चित्त त्यांच्या गावातच होते. त्याचे कारण तर विशेष आहेच, त्यातून जे घडले ते त्याहून आश्चर्य वाटण्याजोगे आहे.

साखरगाव आणि परिसराला ‘पंधरागाव परिसर’ असे म्हटले जाते. तो प्रदेश खडकाळ आहे. गावात पाऊस भरपूर, मात्र पाणी अडवण्याची-जिरवण्याची कोणतीच योजना नव्हती. त्यामुळे गावाला पाण्याच्या  टंचाईचा सामना करावा लागे. गावातील स्त्रियांना पाण्यासाठी गावापासून आठ-दहा किलोमीटर चालत जावे लागे. डोंगरातून फुटणा-या पाझरातून पाण्याचे हंडे भरण्यास दोन-दोन तास लागत. त्या स्त्रियांना अनेकदा गावाजवळच्या लहानमोठ्या पाणवठ्यांवर खोदलेल्या खड्ड्यांच्या शेजारी कंदिलाच्या उजेडात रात्रभर वाट पाहवी लागे. पाण्याची टंचाई एवढी होती, की मी जनावरेही पाण्यावाचून मरताना पाहिली, असे उतेकर सांगतात.

बोअरवेलमधून गावात नेले जाणारे पाणीदिलीप उतेकरांनी स्वतः पाण्याचे हाल भोगले, अनुभवले होते. मुंबईत मोठा काळ वास्तव्य केल्यानंतरही ते गावाच्या संपर्कात राहिले. त्यांच्या मनातील पाण्याबाबतचे कार्य करण्याच्या इच्छेचा दीप तेवत राहिला. अखेर त्यांनी 2012 च्या डिसेंबर महिन्यात साखर गावातील बामणवाडीत कामास आरंभ केला. उतेकर यांनी गावाजवळ सात बोअरवेल खोदल्या. त्या बोअरवेलचे पाणी पाईपलाइन टाकून गावात आणले. गावाच्या मध्यवर्ती भागात चौथरे बांधून त्यावर पाण्याच्या टाक्या बसवल्या. त्यांना नळ लावले. उतेकर नावाच्या भगीरथाने लुप्त झालेली गंगा गावात आणली. गावातील सुकलेल्या चेह-यांवर आशेची पालवी फुटली. त्यासाठी त्यांनी स्वतःजवळचा बॅंक बॅलन्स वापरला.

उतेकरांनी सुरूवातीला केवळ बामणवाडीत पाणी पुरवण्या-चे काम केले. पण त्या‍चा परिणाम असा झाला, की इतर गावांतील लोक त्यांच्या गावात पाण्याबाबत काम करण्याची मागणी करू लागले. आपल्या कामातून इतरांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान निर्माण होत आहे हे पाहून दिलीप उतेकरांना हुरूप आला. त्यांनी काही समविचारी गावक-यांना एकत्र करून ‘मानव विकास आणि सशक्तीकरण प्रतिष्ठान’ची स्थापना केली. उतेकर यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंधरागाव परिसरातील विहिरींची दुरूस्ती करणे, त्यांना आतून प्लास्टर करणे, नव्या विहिरी-शेततळी बांधणे, नवे बोअरवेल खोदणे, जमिनीखाली मिळालेले पाणी पाईपलाइनद्वारे गावांपर्यंत पोचवणे अशा कामांचा सपाटा सुरू केला.

उतेकरांनी गावात बांधलेली विहिरया कामांसाठी लागणारा निधी कुठून जमा होईल असा प्रश्न निर्माण झालेला असताना दिलीप उतेकर यांनी त्यांची प्रॉपर्टी विकली. तरी कामांसाठी निधी कमी पडू लागला तेव्हा त्यांनी कर्ज काढले. त्यांनी पंधरागावातील चौदा वाड्यांमध्ये चोवीस ठिकाणी पाईपलाइनसह पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत, अठ्ठेचाळीस बोअरवेल खोदल्या आहेत, वीस विहिरी दुरूस्त  केल्या असून दहा नव्या विहिरी खोदल्या आहेत. उतेकरांनी सर्व कामांसाठी मिळून एक कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च केले आहेत. पण उतेकर खर्च झालेल्या पैशांपेक्षा, त्यामुळे गावात आलेल्या समाधानाच्या भावनेबाबत जास्त बोलतात. पंधरागाव परिसराची फक्त पन्नास टक्के पाण्याची तहान भागली आहे. ज्या बामणवाडीत झाड पाहायलाही मिळत नसे तिथे दहा-दहा मळे झाल्याचे उतेकर सांगतात. त्यातून लोकांना उत्पन्नाचे साधनही मिळाले असल्याचे ते म्हणाले.

उतेकर आणि त्यांनच्या प्रतिष्ठानचे सदस्य यांचे लक्ष आता जलसंवर्धनाकडे लागले आहे. एवढ्या मोठ्या पाण्याचा उपसा सुरू झाल्यावर जमिनीखालची पाण्‍याची पातळी कायम राखणेही आवश्‍यक आहे. त्यासाठी दरवर्षी पावसाचे पाणी अडवून, ते जमिनीत जिरवून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दिलीप उतेकर
३११, लोहा भवन, पी. डी. मेल्‍लो रोड,
मस्जिद बंदर पूर्व, मुंबई – ४००००९
९८२०७२२८४०
hde.foundation@gmail.com

– किरण क्षीरसागर

Last Updated On – 10th March 2016

About Post Author

Previous articleसोनुर्लीतील लोटांगणाची जत्रा
Next articleसूर्यकुंभ
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767

5 COMMENTS

  1. श्री. दिलीप उतेकरांनी
    श्री. दिलीप उतेकरांनी निस्वार्थीपणाने आपले संचित धनच नव्हे तर त्यांची प्रॉपर्टीसुद्धा विकली , कर्जही काढून गावात पाणी आणले , गावातील लोकांना प्रचंड लाभ झाला परंतु लाभार्थींनी पैसे किंवा श्रम असा कोठलाही वाटा उचललेला ( बातमीवरून तरी )दिसत नाही. अशी वस्तुस्थिती असेल तर ती लाजिरवाणी बाबच होय.

  2. आपल्या शौर्याची गाथा ऐकून
    आपल्या शौर्याची गाथा ऐकून आपल्याबद्दल अभिमान वाटतो. आम्ही आपल्याबरोबर आहोत. पांरगाव जनता सेवा संघ मुंबई यांनी दिलीप उत्तेकर यांना जलरत्न पुरस्कार देऊन सन्मान करावा.

  3. चांगला उपक्रम!!! उतेकरांचे
    चांगला उपक्रम! उतेकरांचे अभिनंदन करावे तितके थोडे. मला प्रत्यक्ष पहावयास आवडेल.

  4. दिलीप दादा लाख मोलाचा काम आहे
    दिलीप दादा लाख मोलाचा काम आहे तुमचं. लोकांना पाण्‍याचा खूप त्रास आहे आणि ते पाणी मिळवून देण्‍याचं काम तुम्‍ही केलं आहे. त्‍यासाठी मी आपला आभारी आहे.

  5. sir aapan 2012 la padleli…
    sir aapan 2012 la padleli Bowell aaj amhi gavatil tarun mandalini pump takun chalu keli aahe. mu post posre bu sadewadi

Comments are closed.