पवनामाईची जलदिंडी

5
74

पवना नदीपुण्यातल्या पवना नदीच्या पुलावरून मोटारसायकल खडखडत चालली होती. पुलावर डंपर उभा असल्याने मोटारसायकलस्वाराने गाडी थांबवली. त्याने पाहिले, की डंपर पूलावरून नदीत रिकामा केला जात आहे. स्वा‍राने डंपरचालकाला हटकले. तसे चालक म्हणाला, ‘‘अहो, गावातल्या पोल्ट्री फार्ममध्य मेलेली पिल्लं, वगैरे जो कचरा तयार होतो ना, मी तो नदीत टाकतोय.’’ स्वाराने त्याला तसे न करण्याविषयी सांगितले, त्यावर तो चालक म्हणाला, ‘‘अहो साहेब, आज मला उशीर झाला म्हणून मी तुम्हाला दिसलो. आम्ही तर दररोज पहाटे येऊन हा कचरा नदीत सोडतो.’’ पवना नदीत रोजच्या रोज टाकला जाणारा तो जैव कचरा आणि त्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण याचे भयावह चित्र त्या मोटारसायकलस्वाराच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. त्या मोटारसायकलस्वाराचे नाव होते व्यंकट भताने.

व्‍यंकट भतानेव्यंकट भताने हे मावळ भागातील साळुंब्रे गावच्या ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष. त्यांच्यासमोर घडलेल्या त्या घटनेने त्यांना त्यांच्या परिसरात सुरू असलेल्या नदीच्या प्रदूषणाची जाणीव झाली. पवना परिसरात कुक्कूटपालन, पेपरमिल आणि इतर काही व्यवसाय चालवले जातात. त्या कारखान्यांतून संस्करण न केलेले दूषित पाणी पवनेत सोडून दिले जात होते. त्यामुळे पवनेकाठच्या गावांमध्ये रोगराई पसरू लागली. त्यास निर्बंध घालणे भताने यांना आवश्य्क वाटले आणि त्यांनी पवना नदीच्या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी पवना नदीचा ‘पवनामाई उत्सव’ साजरा करण्याची कल्पना पुढे आणली आणि श्रद्धा व प्रबोधन अशा दोन गोष्टी एकाच व्यासपीठावर मांडल्या. लोकांची नदीबद्दलची श्रद्धा जागी झाली तर प्रदूषणास आपोआप आळा बसेल असा भताने यांचा विचार होता. त्यांनी नदीस ‘पवनामाई’ असे संबोधन दिले. त्या उच्चारणाने नदी आणि माणूस यात असलेले अंतर कमी होते अशी त्यामागची भावना! ‘पवनामाई माझी माता, मीच तिचा रक्षणकर्ता’ ही उत्सवाची घोषणा आहे. भताने यांनी पवना नदीवर आरती आणि प्रार्थना रचली. संत गाडगेबाबा यांच्या स्‍मृतिदिनाचे निमित्त साधून १९९३ सालापासून उत्सव साळुंब्रे गावात साजरा केला जाऊ लागला. त्यामध्ये साळुंब्रे गावातील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ सामिल झाले.

पवना नदी हातगावात उगम पावते. ते ठिकाण पवना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. पवना नदी तिथून वाहत पवनानगर, शिवली, थुगांव, शिवणे, बेबडओहळ, सोमाटणे, शिरगाव, गोडुंब्रे, साळुंब्रे, रावेत अशा गावांचा प्रवास करत चिंचवड येथे मुळा नदीस जाऊन मिळते. या नदीच्या पाण्याचा पुरवठा पिंपरी-चिंचवड भागाला केला जातो.

डॉ. विश्‍वास येवले. जलदिंडीचे प्रवर्तकत्या उत्सवास वेगळे वळण लाभले ते २०१० साली. त्यावर्षी, व्यंकट भताने यांची डॉ. विश्वास येवले यांच्याशी भेट झाली. डॉ. विश्वास येवले हे ‘जलदिंडी’चे प्रवर्तक. ते नदी आणि पाणी याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. ते आणि त्यांचे सहकारी दरवर्षी इंद्रायणी नदीतून जलदिंडी घेऊन आळंदी ते पंढरपूर हे सुमारे साडेचारशे किलोमीटरचे अंतर कापतात. तो प्रवास पंधरा दिवसांचा असतो. त्यांचा तो उपक्रम २००२ सालापासून सुरू आहे. त्यात दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती सहभागी होतात. त्या प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. ते कार्यक्रम जलदिंडीत सामील होणा-या व्यक्तींकडूनच योजलेले असतात. कार्यक्रमांचे स्वरूप पाण्याशी निगडित असते.

व्यंकट भताने यांनी विश्वास येवले यांच्यासमोर पवनामाई उत्सव आणि जलदिंडी एकत्रितपणे राबवण्याची कल्पना मांडली. ती कल्पना उचलून धरण्या‍त आली. त्यानंतर, २०१० सालापासून पवनामाई उत्सवासोबत जलदिंडीचे आयोजन केले जाऊ लागले. जलदिंडी पवना नदीच्या उगमापासून चिंचवडमधील मोरया गोसावी समाधीपर्यंत नेली जाते. जलदिंडी निघाल्यापासून वाटेत लागणा-या गावागावातील विद्यार्थी जलदिंडीत सामील होतात. जिल्हा परिषदेच्या सत्तावीस शाळा आणि अठरा माध्यमिक शाळांचा त्यात समावेश असतो. पवना ज्या-ज्या गावांमधून वाहत पुढे जाते, त्या गावांमध्ये घाट वा तत्सम ठिकाणी जाऊन उत्सव साजरा केला जातो.

जलदिंडीजलदिंडीत पवनेच्या उगमानंतर नदीत नाव सोडली जाते. त्यात नदीच्‍या उगमाकडील स्वच्छ‍ पाण्याने भरलेला कलश छोट्या पालखीत ठेवला जातो. ती नाव पवनाकाठच्या गावातून पुढे जात राहते. वाटेतील गावांत नदीकाठी उपस्थित असलेले विद्यार्थी, शिक्षक, भताने आणि त्यांचे सहाय्यक असे सारेजण नदीची आरती म्हणतात. सारेजण पवना नदीला प्रदूषित न करण्याची आणि तिचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतात. सोबत विद्यार्थ्यांकडून पाण्याचे प्रदूषण आणि संवर्धन या विषयांवर आधारित पथनाट्य सादर केले जाते. उपस्थित गावक-यांना धुण्या-भांड्यातून, जनावरे धुण्यातून होणा-या नदीच्या प्रदूषणाबद्दल आणि त्यातील धोक्याबद्दल माहिती दिली जाते. क्वचितप्रसंगी उत्सव साजरा होत असताना गावातील काही बायका-मुली नदीवर धुणी-भांडी करत असतात. मग त्यांनाच नदीची पूजा करण्यास बोलावले जाते. उपस्थित शिक्षक त्यांना नदीचे प्रदूषण न करण्याची विनंती करतात.

पूजेनंतर नदीत द्रोणांतून दिवे सोडले जातात. ते दिवे पर्यावरणास हानी होणार नाही अशा साहित्यातून तयार केलेले असतात. दिवे सोडल्यानंतर जलदिंडी पुन्हा चालू लागते. नदीच्या प्रवाहात पूल अथवा तत्सम अडथळे आल्यास नाव पाण्याबाहेर काढून ट्रकमध्ये ठेवली जाते. काही अंतर पुढे गेल्यानंतर नाव पुन्हा नदीत सोडली जाते. लोक आळीपाळीने नावेत बसतात. जलदिंडीतील इतर सहभागी वाहनांनी प्रवास करत जलदिंडीस सोबत करतात. साळुंब्‍य्राच्या शाळेपुरता मर्यादित असलेला पवनामाई उत्सव जलदिंडीच्या माध्यमातून आसपासच्या गावांपर्यंत पोचला आहे.

पवनेपासून निघालेली जलदिंडी सायंकाळी साळुंब्रे येथे मुक्काम करते. तिथून दुस-या दिवशी सकाळी ती चिंचवडच्या वाटेने चालू लागते. ती वाटेतील गावांना भेट देत सायंकाळी चारच्या सुमारास चिंचवड येथे पोचते. चिंचवडला जलदिंडीची समाप्ती होते. तेथे जलदिंडीतर्फे दरवर्षी पाण्याविषयी कार्य करणा-या व्यक्तीस ‘जलमित्र पुरस्कार’ दिला जातो. २०१३ सालचा पुरस्कार अंबेगाव येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि पाण्याविषयी प्रबोधन करणारे बाबासाहेब काळे, तसेच इंद्रायणी बचाव कृती समितीचे अध्यक्ष विकास पाटील आणि ‘प्लास्टिक हटाव’ व पाणी संदर्भात कार्य करणारे धनंजय शेटबळे या दोघांना देण्यात आला.

पवना नदीकिनारी विद्यार्थ्‍यांसमवेत पवनामाई उत्‍सव साजरा केला जात आहे.

पवना नदीवरील जलदिंडीचे हे चौथे वर्ष. अद्याप हा उपक्रम या भागात नवखा आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीपणे पोचवला तर तो त्यांच्या पालकांपर्यंत नक्की पोचेल, असे भताने यांचे उपक्रमातील सहकारी शिरीष पांडव यांनी सांगितले. अधिक माहिती देताना भताने म्हणाले, की ग्रामस्थांनी उत्सव आणि उपक्रम यामध्ये सामील व्हावे यासाठी पत्रके काढली जातात, गावक-यांच्या सभा घेतल्या जातात. त्यातून त्यांना पाण्याचे महत्‍त्व आणि प्रदूषणाचा धोका समजावून सांगितला जातो. व्यं‍कट भताने यांच्या सांगण्याप्रमाणे, प्रदूषणाची गंभीरता गावक-यांना पटू लागली आहे. गावक-यांनी एकत्रितपणे त्या पोल्ट्री फार्मला तेथील कचरा नदीत न टाकण्याविषयी ठणकावून सांगितले. परिणामी आज पवनापरिसरातील कोणत्याही पोल्ट्री फार्मकडून नदीत कचरा टाकला जात नाही. पोल्ट्री फार्मच्या परिसरातच त्या कच-यावर प्रक्रिया करून त्‍याची विल्हेवाट लावली जाते.

पवना परिसरात चालवल्या जाणा-या कारखान्यांचे दूषित पाणी पवना नदीत सोडले जाते. त्यामुळे उगमाजवळ पवनेचे स्वच्छ‍ आणि नितळ दिसणारे पाणी पुढील गावांमध्ये प्रदूषित झालेले दिसते. व्यंकट भताने आणि गावकरी यांनी त्‍या कारखान्यांना वेळोवेळी समज दिली, प्रसंगी पोलिस ठाण्यात तक्रारीही नोंदवल्या. त्यानंतर कारखान्यांनी पाणी नदीत सोडण्याचे थांबवले. मात्र काही दिवसांनी तो प्रकार पुन्हा सुरू झाला. नदीच्या पाण्यात फरक जाणवला, की भताने गावक-यांसह कारखान्यांकडे पुन्हा तक्रार करतात. मात्र या प्रकारास कायमचा आळा घालणे त्यांना शक्य होत नाही. सरकारची गचाळ यंत्रणा, भ्रष्टाचार अशा अडथळ्यांमुळे या कामात यश येत नसल्याचे भताने सांगतात.

(डावीकडून) जलदिंडी उपक्रमाचे विश्‍वस्‍त अजित मालुंजकर, शिरीष पांडव आणि राजीव भावसारव्यंकट भताने यांना प्रस्तुत उपक्रमात अनेक चांगल्या व्यक्तींची साथ लाभली आहे. पुणे नगरपालिकेच्या वॉटर ट्रिटमेण्ट प्लांटवर कार्यकारी अभियंता म्हणून काम करणारे प्रवीण लडकत, राजीव भावसार, टाटा मोटर्सचे डिझाइन इंजिनीयर शिरीष पांडव, धनंजय शेटबळे, जलदिंडीचे प्रवर्तक विश्वास येवले आणि त्यांचे कार्यकर्ते अशा अनेक व्यक्ती त्यांच्यासोबत या उपक्रमात सहभागी असतात.

शिरीष पांडव म्हणाले, की प्रत्यक्षात नदीचे प्रदूषण गावक-यांकडून कमी आणि गावाबाहेरून आलेल्या व्यावसायिकांमुळे जास्त प्रमाणात होत आहे. राजीव भावसार यांनी गावात धोबीघाट तयार करण्याची कल्पना मांडली आहे. त्यातून निघणारे पाणी वाळू-कोळसा वापरून गाळून स्वच्छ‍ करावे आणि ते झाडांसाठी वापरावे अशी कल्पना असल्याचे ते म्हणाले.

भताने यांनी पवना नदीबद्दल गावक-यांमध्ये जागृती निर्माण करण्या‍सोबत गावातील स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी साळुंब्रे गावात ‘जानकीदेवी बजाज ट्रस्ट’च्या साह्याने शौचालये बांधून ते गाव हागणदारीमुक्त केले. ते गाव तालुक्यातील पहिले ‘निर्मलग्राम’ ठरले. साळुंब्रे गावास २००६ साली राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांच्या हस्ते पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. स्वच्छता अभियानात पाच जिल्ह्यांत साळुंब्रे गावाचा दुसरा क्रमांक आला. भताने यांनी स्वच्छता अभियान आसपासच्या गावात नेत पंचक्रोशीतील सहा गावे निर्मलग्राम केली. सहापैकी चारगावे तंटामुक्तही झाली असल्याचे ते म्हणाले.

भताने म्हणतात, की माणसे बदलतात. पण त्यासाठी त्यांच्यासमोर आदर्श आणि आव्हान ठेवले पाहिजे. भताने आणि त्यांचे सहकारी यांच्या  प्रयत्नांतून लोकांसमोर तसा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न जाणवतो.

– किरण क्षीरसागर

About Post Author

5 COMMENTS

  1. Thanks you for your moral
    Thanks you for your moral support to our Jaldindi Team – Pawanamai Team.
    This is social work our team does without thinking for appriciation and profit for society. All are requested to join our team to keep our Pawanamai clean and Neat. due to this we and our family can dring better and hygienic water. Contact no. – + 91 9922968119 ( Wilo Mather and Platt Pumps Ltd., – Centrifugal Pump Mfg. )

  2. THANK YOU FOR YOUR SUPPORT
    THANK YOU FOR YOUR SUPPORT TO OUR JALDINDI…LET IT CONTINUE.MANY MORE ARE REQUESTED TO JOIN THIS SOCIAL WORK.THANKS AGAIN.
    KISHORE PANCHAL(9011022864)-WILO MATHER AND PLATT PUMPS LTD.

  3. Very well written.

    Very well written.
    It is very difficult to understand the (polluted) condition of river unless you visit it. Now days since the water is available at the turn of the tap no body turns up to the river. Mainly in cities those are like drainage lines.Seeing is believing. Pavanamai Jalmaitri Abhiyan tries to bring the people to the river, feel the river and request them to act upon. It is each one’s responsibility to convert least water to sewage. I will request people to maintain 1 or 2 litre water bottle (filled) in flush tank so that at each flush we can save that much quantity.

  4. Good. To the point coverage
    Good. To the point coverage of the event. Thanks to Mr. Kiran Kshirsagar and think maharashtra team. Pavana river is polluted to its extremes in Urban area. Unless of waiting for who and when will act on, please stop river pollution on individual front. Don’t throw waste in river bed. Consume just required water. Recycle the Kitchen water. Reduce the capacity of flush tank by maintaining water bottle in the tank.Flush water increases the load on sewage water treatment plants.

Comments are closed.