‘‘पूर्वीच्या एकत्रपणे नांदत्या घरांप्रमाणे आपलं आजचंही आयुष्य नांदतं असायला हवं. त्यामध्ये मित्रपरिवार, दूर-जवळचे नातेवाईक, प्रतिभावंत, व्यावसायिक अशांची सतत ये-जा असली म्हणजे आपल्याला संपन्नता जाणवते. विकेंद्रित कुटुंबपद्धतीवर आपल्या आवडीची माणसं जोडत राहणं हा इलाज असू शकतो,’’ अशा आशयाचे उद्गार लेखिका-समीक्षक आणि प्रख्यात ‘वाइन लेडी’ अचला जोशी यांनी ‘कृतार्थ मुलाखतमाले’त काढले. संवादकाच्या भूमिकेत असलेल्या पत्रकार शुभदा पटवर्धन यांनी उपस्थितांसमोर अचला जोशी यांचे विविधांगी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवले. मुलाखतीचा कार्यक्रम मंगळवार 26 फेब्रुवारी 2013 रोजी दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे पार पडला.
अचला जोशी यांनी भरपूर वाचन, लेखन, सातही खंडात प्रवास केला आहे. वाईन-क्विल्ट-च्यवननप्राश यांच्या निर्मितीचा उद्योग करत असतानाच त्यांनी औद्योगिक, शैक्षणिक, आणि बाल व स्त्री कल्याण या क्षेत्रांत भरीव समाजसेवा असे विविधांगी पैलू जोपासले. ‘वयाच्या अमृतमहोत्सवातही ही सर्व कामे जोमाने सुरू आहेत. ती ऊर्जा तुम्ही कुठून आणता?’ असे शुभदा पटवर्धन यांनी विचारले, तेव्हा अचला जोशींनी त्याचे श्रेय त्यांच्या आई आणि वडिलांच्या सतत काम करत राहण्याच्या वृत्तीला दिले. ‘‘आवडीचं काम असलं म्हणजे त्याचा थकवा जाणवत नाही. हा मंत्र मी अंगीकारला आहे.’’ असे त्या म्हणाल्या.
‘गजबजलेल्या माहेरच्या घरातनं आता या उतारवयात तुम्ही एकट्या राहता त्याचा जाच कधी जाणवतो का?’ त्या प्रश्नावर अचला जोशी म्हणाल्या, की ‘माझे छंद-अभ्यास-व्यवसाय सतत चालू असतात. मी एकटी राहते हे खरं आहे पण माझ्या घरात सतत कामाच्या निमित्ताने ये-जा असते. त्यामुळे मला एकटेपणा जाणवण्याचा प्रश्नच आला नाही. त्या पुढे म्हणाल्या, की एकटेपणा ही वृत्ती असते. ती माझी नाही.’
अचला जोशी यांचा उद्योगक्षेत्रातील वावर मोठा असला तरी ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक बाजू आहे. शुभदा पटवर्धन यांनी त्यांना त्यांच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या घटना-बाबींविषयी बोलते केले. अचला जोशी यांनी मनमोकळेपणाने बोलत असताना लहानपणापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात आईवडिलांकडून मिळालेले संस्कार, आई आणि वडिलांचा काम करण्याचा झपाटा, घरी विविध साहित्यिक, कलावंत आणि खेळाडू यांच्या वर्दळीमुळे लाभलेले सांस्कृतिक वातावरण यांचा उल्लेख झाला. लहानपणापासून त्यांच्या मनात रूजलेली ‘श्रद्धानंद महिलाश्रम’ ही संस्था त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले, मात्र त्या काळातील अनेक आठवणी सांगत असताना अचला जोशी यांच्यात कार्यकर्तृत्वाची आणि उद्योजकतेची बीजे रूजत गेल्याचेही उलगडले. त्यांनी महिलाश्रमाच्या स्थापनेपासूनचा प्रवास आणि अनुभव सांगणारे ‘आश्रम नावाचं घर’ हे पुस्तक लिहिले आहे. तसेच अचला जोशी यांचे गुरू न. र. फाटक यांचे त्यांनी लिहिलेले जीवनचरित्र ‘ज्ञानतपस्वी रूद्र’ या नावाने अलिकडेच प्रसिद्ध झाले आहे. अचला जोशी यांनी ज्ञानकोशकार केतकर, वि. का. राजवाडे ते फाटक सर येथपर्यंतच्या महाराष्ट्रातील संशोधन परंपरेचा ह्द्य उल्लेख केला. जोशी यांनी ‘ज्ञानतपस्वी रूद्र’ पुस्तकाच्या लिखाणामागच्या कल्पना, त्याच्या निर्मितीचा प्रवास आणि त्यादरम्यान उजळून निघालेले त्यांचे विचारविश्व उपस्थितांना कथन केले. त्यांच्या बोलण्यातून लिखाणामागची त्यांची धारणा आणि आत्मियता प्रगट होत राहिली.
अचला जोशी यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असलेला प्रांत म्हणजेच वाईन उद्योगाविषयी बोलणे सुरू झाले. अचला जोशींनी उद्योगविश्वातील त्यांचा अनुभव सांगताना वाईननिर्मितीच्या काही विशेष आठवणी जागवल्या. तसेच त्या क्विल्टनिर्मिती आणि त्यातील आश्रमाचा सहभाग यांविषयी बोलत राहिल्या. अचला जोशी यांचा वयाची पंच्याहत्तरी गाठल्यानंतरही चौफेर कामाचा झपाटा जोमाने सुरू आहे, असे प्रगट होताच पटवर्धन यांनी मिश्किलपणे ‘त्या अथक उत्साहाचे रहस्य ‘वाईन’ तर नव्हे?’ असे विचारले आणि सभागृहात हास्याची लकेर उमटली. त्याला दाद देत जोशी यांनी आपला उत्साह आणि आरोग्य यांचे गुपित सांगितले. त्या म्हणाल्या, की ‘मी करते त्यापैकी कोणतंही काम माझ्यावर कुणी लादलेलं नाही. माझ्या आवडीनेच मी कामं करते आणि त्यांची प्रगती पाहताना मला अधिकच उत्साह येतो.’
अचला जोशी यांनी मुलाखतीअखेर कृतार्थतेचे विवरण केले. त्या ओघात कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी यांचे आईवडील मनोरमा फडके-डॉ. गं. मा. फडके आणि सासू-सासरे इंदुताई जोशी-प्राचार्य पां. ना. जोशी, तसेच भाऊ डॉ. अजित फडके यांसारख्या कर्तबगार माणसांचा सहवास आणि संस्कार मला लाभले, असे उद्गार काढले. पुढे त्या म्हणाल्या, की ‘माझ्या हातून त्यांच्या कीर्तीमध्ये भर पडली नाही तरी चालेल, पण त्यांच्या नावाला मी करत असलेल्या कामामुळे कधी कमीपणा येईल असं होऊ नये. हा निश्चय मी कायम मनात बाळगला. त्याप्रमाणे झालं हेच मला खूप मोठं श्रेय वाटतं.’ त्यांनी असे उद्गार काढताच श्रोत्यांमधून अस्फुट बोलले गेले, की ‘तुमचे सुद्धा कर्तृत्व मोठे आहे की!’ त्या अस्पष्ट ऐकू आलेल्या वाक्यावरदेखील श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अचला जोशी यांच्या मुलाखतीचे चित्रिकरण करण्यात आले असून इच्छुक व्यक्तींना ती मुलाखत सीडी स्वरूपात उपलब्ध करून देणे शक्य आहे. इच्छुकांनी ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’कडे संपर्क (9892611767) साधावा.
‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’, ‘वैद्य साने ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथाली’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृतार्थ मुलाखतमाला’ या उपक्रमाचे दुसरे पर्व जानेवारी 2013 पासून सुरू झाले आहे. त्या मुलाखतींमधून जे कर्तबगार जीवन जगले त्यांच्या आयुष्याचा प्रवास ‘कृत – अर्थ’ कसा झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. जानेवारी महिन्यात लागूबंधू पेढीचे प्रमुख श्रीकांत लागू यांची मुलाखत घेण्यात आली होती, तर मार्च महिन्यात छबिलदास नाट्य चळवळीचे प्रणेते अरूण काकडे यांची मुलाखत घेण्यात येणार असल्याचे संयोजक संध्या जोशींकडून जाहीर करण्यात आले.
आशुतोष गोडबोले
संपर्क – 9892611767
इमेल – info@thinkmaharashtra.com
Achala Joshi ,
Achala Joshi ,
Madam you are simply Great!
I met you in “Sharddhanand Mahlashram”
Comments are closed.