दिनेश वैद्य – जुन्‍या पोथ्‍यांच्‍या जतनासाठी कार्यरत

1
57
दिनेश वैद्य
दिनेश वैद्य

दिनेश वैद्य धर्मक्षेत्र असणा-या नाशिक शहरात याज्ञिकी करणारा दिनेश वैद्य पोथ्यांच्या डिजिटायझेशनचे काम झपाटल्यासारखा करत असून, त्याने आठ हजार तीनशे पोथ्यांमधील सात लाख अठ्ठावन्‍न हजार फोलिओंचे (दोन पाने मिळून एक फोलिओ) डिजिटायझेशन केले आहे. तेही सर्व साधनसामग्री स्वखर्चाने खरेदी करून! दिनेश वैद्य याचे नाव DIGITIZATION OF MANUSCREEPTS अर्थात जुन्‍या पोथ्‍यांच्‍या छायांकनासाठी ‘लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’मध्‍ये सलग नऊ वर्षे नोंदवले गेले आहे.

नाशकात आणि महाराष्‍ट्रात गावोगावी जुन्‍या पोथ्‍या आढळतात. त्‍या जिर्ण झाल्‍या की त्‍यांना नदीपात्रात सोडून दिले जाते. दिनेश गंगेकाठी याज्ञिकी करत असताना त्‍यांला तशा पोथ्‍या पाण्‍यात सोडून देणारी माणसे आढळली. त्‍या पोथ्‍यांमध्‍ये न जाणे कोणकोणते ज्ञान दडलेले असेल या विचाराने त्‍याने त्‍या पोथ्‍या त्‍यांच्‍याकडून मागून घेतल्‍या. मात्र त्‍यांचे करायचे काय ते त्‍याला ठाऊक नव्‍हते. मग त्‍याने त्‍या पोथ्‍यांची पाने स्‍कॅन करण्‍यास सुरूवात केली. दिनेशच्‍या सातत्‍यपूर्ण कामामुळे त्‍याच्‍या परिसरातील व्‍यक्‍ती जुन्‍या पोथ्‍या फेकून देण्‍यापूर्वी त्‍याच्‍याकडे आणून देऊ लागली. दिनेशला अवचितपणे जडलेल्‍या त्‍या छंदातून विविध त-हेच्‍या ज्ञानाचा वारसा जतन केला जाऊ लागला. दिनेश १९९७ सालापासून ते काम करत आहे.

दिनेशला नाशकात सर्वात पहिली निकड जाणवली ती या ज्ञानभांडाराची जपणूक करण्याची. स्थापत्यशास्त्रापासून धर्मशास्त्रापर्यंत आणि वैद्यकशास्त्रापासून उच्चारशास्त्रापर्यंत अनेक ज्ञानशाखांची मांडणी, टिप्पणी ह्या पोथ्यांमध्ये आढळते. अशा पोथ्या संगतवार लावून त्यांच्या देखभालीचे काम दिनेश वैद्य, अनिता जोशी आणि त्यांच्या मित्रांनी हाती घेतले आहे. त्यांची वये आहेत तीस ते पस्‍तीस या टप्प्यातील…! सोबत दिनेश वैद्य यांची मुलगी गार्गी हीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हजारो पानांचे डिजिटायझेशन करत सांस्कृतिक ठेवा जपण्यास हातभार लावला आहे.

दिनेश डोळसपणे, अभ्यासपूर्ण रीतीने शब्दोच्चारांकडे बारकाईने लक्ष देणारा असा व्यावसायिक आहे. त्याचा कटाक्ष पूजेतील साधनसामग्रीच्या आटोपशीर वापरापासून ते पूजेच्या सुबक-देखण्या मांडणीपर्यंत असतो. चार पीठांच्या शंकराचार्यांनी ज्यांचा ‘वैदिक सम्राट’ म्हणून गौरव केला त्या श्रीकृष्णशास्त्री गोडसे यांच्याकडून त्याने याज्ञिकीचे शिक्षण घेतले. त्यामुळे धर्मशास्त्रातील विविध पूजा, त्यांचे औचित्य या वाटेने तो या पोथ्यांकडे कुतूलहाने वळला.

ज्ञानभांडाराची जपणूक करणारे दिनेश वैद्य व सहकारी अनिता जोशीनाशिकमध्ये किमान एक लाख पोथ्या उपलब्ध आहेत. सावाना, सुभाष वाचनालय अशा संस्थांकडे तीस-पस्तीस हजार पोथ्या आहेत. बाकी पोथ्या या घरा-घरांमधील वैयक्तिक संग्रहात आहेत. सर्वात मोठा संग्रह आहे बावीसशे पोथ्यांचा, तात्याशास्त्री गर्गे यांचा. तात्याशास्त्रींच्या घरातील पोथ्या दुर्मीळ ऐवजाप्रमाणे सांभाळल्या जातात. त्यांची वर्षातून एकदा पूजा होऊन गुंडाळलेली कापडे बदलली जातात. पण त्यांना बाकी घरांमधून पोथ्या कशाबशा बासनात बांधून ठेवलेल्या आढळल्या. दिनेशच्या टीमने त्या उघडून, विशेष ब्रशने साफ करून त्यांची पाने संगतवार लावणे आणि गहाळ पानांची नोंद करणे असे काम आधी केले. सर्व पोथ्यांची नोंदणी एका विशिष्ट पध्दतीच्या DATASHEET मध्ये केली. त्यात पोथ्यांचा काळ-शक, संवत, पोथीचा विषय, पोथ्यांची पाने किती ती संख्या, गहाळ पानांची संख्या आणि पोथी ज्याच्याकडे आहे त्याचा नाव-पत्त्यासह  तपशील याची नोंद असते.

कापडात गुंडाळून ठेवलेल्‍या पोथ्‍यापोथ्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्या देवनागरी व मोडी लिप्यांमध्ये आहेत. त्या संस्कृत, प्राकृत व मराठी भाषांत आहेत. त्या बोरूने लिहिल्या आहेत, त्यासाठी वापरली गेलेली शाई बाजरीचे कणीस अथवा बिब्बा जाळून त्यात तिळाचे तेल किंवा डिंक घालून केलेली असल्याने पोथी पाण्यात बुडवली तरी ती शाई ओघळत, पसरत नाही. पोथ्या लिहिण्यासाठी वापरला गेलेला कागद कापसाचा लगदा किंवा भूर्जपत्राचा भुगा यांत तुरटीचे पाणी घालून, मग लादून केलेला असल्याने दीडशे वर्षे उलटून गेली तरी तो फाटलेला नाही आणि या पोथ्यांमधील अक्षर! सुबक, नेटके, जराही खाडाखोड नाही की अक्षरांचा आकार बदललेला नाही! रेखीव दंड आणि मोत्यांची माळ गुंफावी तशा सरळ लिहिलेल्या ओळी. दोन्हींकडील समास मोजून-मापून सोडावे तसे. कधी, संपूर्ण पोथीला सुंदर किनार रेखलेली किंवा कधी, तेवढीच रेखीव चित्रे, आकृती जागोजागी पेरलेल्या. एखाद्या पोथीला अस्सल सोन्याचा तलम मुलामा दिलेला (मध सोन्यात खलून!). प्रत्येक पान टापटिपीने रेखलेले, वाचताना मन प्रसन्न व्हावे असे.

पोथ्यांच्या या बाह्यरूपाएवढेच, किंबहुना त्यापेक्षाही कितीतरी पटींनी अधिक लखलखीत त्यांतील ज्ञानसौंदर्य. ते ओळखू शकणा-या मूठभर शहाण्या माणसांमध्ये दिनेशची गणना करावी लागेल. म्हणून त्याने सुरूवातीला स्वतःच्या खिशातून जवळजवळ दीड लाख रुपयांची गुंतवणूक करून डिजिटायझेशनचे काम हाती घेतले. डाटा सिक्युरिटीसाठी हार्ड ड्राईव्‍हमध्‍ये तो सगळा संग्रह ठेवण्यात येत आहे. अभ्यासकांची गरज लक्षात घेऊन एक फोलिओ किमान वीस पट मोठा, एनलार्ज करून वाचता येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

प्रत्येक पोथी आणि त्यातील प्रत्येक ओळ ही सांभाळून ठेवलीच पाहिजे असा आग्रह धरणे कितपत योग्य? अशा खोचक प्रश्नाचे उत्तर देताना, दिनेश थेट आपल्या डोळ्यांत बघत उलट विचारतो, हे ठरवण्यासाठी का होईना या पोथ्या वाचायला, बघायला हव्यात ना? नाशिकमधील अनेक कुटुंबांनी आपल्याकडील ‘पोथ्यांचे बाड’ गोदावरीच्या पात्रात सोडून दिले आहे. त्यांच्याबरोबर काय ज्ञानसंशोधन वाहून गेले हे कसे सांगता येईल? आणि मग तो त्याच्या हाती लागलेल्या पोथ्यांमधून दिसलेले संशोधनाचे फक्त कवडसे किती चकित करणारे आहेत याचे अनुभव सांगू लागतो.

दिनेशकडे भास्कराचार्यांनी सातव्या शतकात लिहिलेल्या ‘लीलावती’ या गणिताच्या ग्रंथावर टिप्पणी करणारी सोळाव्या शतकातील एक पोथी आहे. व्यास मोजण्याच्या पध्दती, त्रिज्येवरून त्रिज्या मोजणे, वर्तुळ, काटकोन-त्रिकोण या ‘लीलावती’मध्ये मांडल्या गेलेल्या संकल्पनांची उकल पोथीत मांडली गेली आहे. गणिताचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक उल्लेख झाला, ‘शूल्बसूत्र’ म्हणजे दोरीच्या अंगाने येणा-या भूमितिसू्त्रांचा. यज्ञकुंड बांधण्यासाठी या सू्त्रांचा वापर करण्यात यावा असे पोथीत म्हटले आहे. एखादा यज्ञ यजमानांना फलदायी व्हावा म्हणून यज्ञकुंड बांधताना ते कसे बांधावे? तर यजमानाने पायाचे अंगठे टेकून, हात वर करून उभे राहायचे. त्यांच्या उंचीवरून त्यांचे हस्तप्रमाण काढायचे, हस्तप्रमाणाचे पाच भाग करून त्यांचे अंगुलप्रमाण काढायचे; असे मोजमाप अधिकाधिक सूक्ष्म होत, थेट रेणूपर्यंत गेलेले या पोथीत वाचायला मिळते. (दिनेश वैद्य यांनी ‘शुल्‍बसूत्रे’ या विषयावर ‘थिंक महाराष्‍ट्र’वर लेख लिहिला आहे.)

भास्कराचार्यांनी सातव्या शतकात लिहिलेला 'लीलावती' हा गणितावरील ग्रंथमान्सार ग्रंथामध्ये स्थापत्यशास्त्राची चर्चा विस्ताराने आहे, ती इतकी बारकाईने, की बल्ल्यांना टेकू देताना मेढी कशी दिली म्हणजे वरचे, दुस-या मजल्यावरचे बांधकाम टिकेल असा विचार त्यात आहे. होयसर, बुंदेलखंडी, मान्सार, हेमाडपंथी अशा विविध स्थापत्यशैलींची चर्चा या पोथीत आहे, तर अग्निपुराणात आकाशगंगा किती आहेत, किती अंतरावर आहेत, सूर्य किती आहेत याची चर्चा आहे आणि ‘ग्रहलाघव’ पोथीत ग्रहांमधील अंतरे, धूमकेतू किती आहेत. किती अंतराने ते पृथ्वीवरून दिसतात हे मांडले आहे.

दिनेशच्‍या संग्रहात असलेल्‍या पोथ्‍या कमीत कमी दोनशे ते जास्‍तीत जास्‍त हजार वर्षे जुन्‍या आहेत. त्‍यांमध्‍ये बिजगणित, धातूशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, आयुर्वेद आणि त्‍यातील मंत्रचिकित्‍सा, साऊंड थेरेपी अशा विविध विषयांचा उहापोह करण्‍यात आला आहे. दिनेश पोथ्‍यांच्‍या डिजिटायझेशनचे काम स्‍वबळावर करतो. तो आजही नाशिक आणि त्‍या परिसरातील गावागावांमधून भटकंती करत पोथ्‍या गोळा करतो. त्‍याला जळगाव, बडोदा, रावेर, हिमाचल प्रदेश अशा प्रदेशांमधूनही पोथ्‍या उपलब्‍ध झाल्‍या आहेत.

दिनेश वैद्यच्‍या नावाचा समावेश ‘लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’मध्‍ये एक लाख साठ हजार पानांचे डिजिटायजेशन केल्‍याबद्दल २०१० साली प्रथम करण्‍यात आला. त्यानंतरच्या वर्षी दिनेशच्‍या पानांचा आकडा दोन लाख एकोणीस हजारांवर पोहोचला आणि ‘लिम्‍का’ने पुन्‍हा त्‍याची नोंद घेतली. दिनेशचे नाव २०१२ साली दोन लाख नव्‍वद हजार पानांसह ‘लिम्‍का बुक’मध्‍ये पुन्‍हा झळकले आणि २०१३ साली दिनेशने तीन लाख साठ हजार पानांचे डिजिटायजेशन पूर्ण करून स्‍वतःच स्‍वतःचा विक्रम मोडीत काढला. गंमत म्‍हणजे, ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत दिनेश पोथ्‍यांच्‍या चार लाख पानांचे स्‍कॅनिंग करून मोकळाही झाला होता! आता दिनेशने सलग नवव्‍यांदा ‘लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्’मध्‍ये स्‍थान मिळवण्‍याचा विक्रम केला आहे.

दिनेश ‘यज्ञसंस्था आणि व्यवस्थापन’ या विषयाच्या डॉक्टरेटसाठी अभ्यास करत आहे. दिनेशला या पोथ्यांमधील विविध विषयांनी एवढे झपाटले आहे, की एखाद्या याज्ञिकी कामासाठी जरी त्याला फोन केला तरी संभाषणाची गाडी तिस-या मिनिटाला ‘पोथी’ या विषयाकडे सहजपणे वळते आणि त्याच्याबरोबरच्या पिशवीत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने हे ‘दुर्मीळ धन’ असतेच! सध्‍या तो ‘साऊंड थेरेपी’च्‍या माध्‍यमातून रुग्‍णांवर उपचार’ या विषयावर संशोधन करत आहे. त्याने त्‍याच्या काही मेडिकल ट्रायलही घेतल्‍या आहेत. त्‍याकामी त्‍याला काही एम.डी. डॉक्‍टर आणि दोन न्‍यूरोलॉजीस्‍ट सहाय्य करत आहेत.

दिनेश वैद्य – 9822029198

– वंदना अत्रे – 9960800258

दिनेश वैद्य यांच्या या कामगिरीबाबत ‘थिंक महाराष्ट्र डॉट क़ॉम’ या वेबसाइटवर लेख येताच सर्वत्र औत्सुक्य निर्माण झाले. वैद्य यांस आर्थिक सहाय्य करावे या हेतूने काही लोक नाशिकला जाऊन त्यांना भेटले. तेव्हा वैद्य सहज बोलून गेले, की हे काम अफाट आहे. एकट्या नाशकात सुमारे एक कोटी पोथीपाने डिजिटाइज करावी लागतील. पैठण, सातारा, वाई अशा ठिकाणी तर हस्तलिखित पोथ्यांचा मोठाच खजिना मिळेल.

महाराष्ट्रातील हा पुरातन वारसा राखावा कसा? वाचकांनी प्रतिक्रिया कळवाव्या.

Last Updated On – 13th Dec 2016

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.