‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण अगदी सार्थ आहे! काळानुसार सांगायचं तर पाताळेश्वर, कसबा गणपती, जोगेश्वरी, पर्वती, शनिवारवाडा असे जुनेपणाचे टप्पे सांगता येतील. पण पुणेकर मंडईला कधीच विसरू शकणार नाहीत. का तर ती त्यांची अन्नदाता आहे. 5 ऑक्टोबर 2011 रोजी मंडई सव्वाशे वर्षांची झाली! मंडई होण्यापूर्वी बाजारहाट वगैरे शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरत असे.
मंडई नव्हती तेव्हा तिच्या जागी खाजगीवाले यांची चारएक एकर जागा मोकळी पडून होती. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि गरजा ध्यानी घेऊन नगरपालिकेने 1882 साली मंडई उभारण्याचा ठराव केला. त्याला महात्मा फुले, हरि रावजी चिपळूणकर अशा काही सभासदांनी विरोध केला. मंडई उभारणीला अडीच-तीन लाखांचा जो खर्च येईल तो शिक्षणकार्यासाठी खर्च करावा अशी त्यांची भूमिका होती. पण ठराव मंडईच्या बाजूने बहुमताने संमत झाला आणि बांधकामाला सुरुवात झाली. वासुदेव बापूजी कानिटकर या कंत्राटदारांकडे काम सोपवण्यात आले. कानिटकर हे अनुभवी कंत्राटदार होते. त्यांनी पुणे नगर वाचन मंदिर , आनंदाश्रम, फर्ग्युसन कॉलेज अशी ‘भव्य’ कामे त्याआधी केलेली होती. कानिटकर कॉंण्ट्रॅक्ट मिळताच कामाला लागले. ते त्यांनी अडीच-तीन वर्षांत पूर्ण केले. उंच टॉवर असणारी अष्टकोनी मंडई उभारण्यास तीन लाख रुपये खर्च झाला.
मंडईचे काम पूर्ण होताच तिचे उदघाटन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 1886 रोजी थाटामाटात झाले. तेव्हा साहजिकच मंडईला ‘रे मार्केट’ असे नाव देण्यात आले. पण पुढे काळ बदलला, तशी 1940 साली आचार्य अत्रे यांनी ठराव मांडून लॉर्ड रे यांच्या ऐवजी ‘महात्मा फुले मंडई’ असे उचित नाव ठेवायला लावले. आचार्य अत्रे त्यावेळी नगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. मंडईच्या वरच्या बाजूला ‘लॉर्ड रे इंडस्ट्रियल म्युझियम’ होते. नगरपालिकेची कार्यालयेही तिथेच होती. तत्पूर्वी नगरपालिका रास्ता पेठेत एका जुन्या वाड्यात दोन खोल्यामध्ये होती!
मंडईविषयी आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगायला हव्यात. स्वातंत्र्यकाळापूर्वी मंडईच्या तळमजल्यावर मधोमध निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा अर्धपुतळा महात्मा गांधी यांच्या हस्ते बसवण्यात आला होता. पण अठ्ठेचाळीस साली गांधीजींच्या हत्येनंतर पुण्यात तीन दिवस जे तंग वातावरण निर्माण झाले, त्यात तो पुतळा काही मंडईकरांनीच काढून टाकला. पुढे, स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते तो टिळक रोडवर न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारी बसवण्यात आला. काही वर्षांनी, सुरक्षिततेसाठी म्हणून तो हायस्कूलच्या आवारात नेण्यात आला.
मंडईनजीकच्या दुस-या पुतळ्याची हकिकत अशीच काहीशी कटू आहे. ही दुर्देवी घटना 1924 सालाची आहे. टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. पण ते निर्विघ्नपणे पार पडले नाही. वास्तविक, पुतळा नगर- पालिकेने पंधरा हजार रुपये खर्च करून उभारला होता. पण त्यालाही काही मोजक्या मंडळींचा विरोध होता. या विरोधकांत रॅग्लर र.पु.परांजपे, कविवर्य माधव जुलियन यांच्या- सारखे मातब्बर असामी असावेत हे मोठे आश्चर्य होते. कारण काय तर त्यांना लोकमान्यांची सामाजिक बाबतींतील मते मान्य नव्हती. या पुतळ्याचे शिल्पकार वाघ नावाचे कलाकार होते. स्वातंत्र्योत्तर काळात तिथीनुसार टिळकजयंतीला काही संस्था त्या पुतळ्याला आवर्जून हार घालत असतात. शिवाय, पुतळ्यासमोर काही राजकीय सभा भरू लागल्या होत्या. जेधे, गाडगीळ, आचार्य अत्रे यांच्या सभांना गर्दी खूप व्हायची. स्वस्ताईच्या काळात हातात पिशव्या घेऊन अनेक नागरिक भाज्या, फळे, फुटाणे इत्यादी जिन्नस खरीदण्यासाथी मंडईत जात असत.
काळ खूप बदलला आहे. पुणे सांप्रत चाळीस लाख लोकवस्तीचे शहर चारी दिशांना पसरले आहे. याचा साहजिकच परिणाम असा, की पुण्यात अनेक ठिकाणी भाज्यांची, फळांची दुकाने थाटलेली दिसतात. डेक्कन जिमखान्यांवर इंटरनॅशनल बुक सर्व्हिस ते चितळे मिठाईवाले हा फूटपाथ भाज्या, फळांच्या विढ्या दुकानांनी इतका भरलेला असतो. की नागरिकांना अंग चोरून वाट काढावी लागते. अर्थात हे साहजिकही आहे. पण मंडई ती मंडई! तिथली गिर्हाईकांची गर्दी कायम आहे. मंडई म्हणजे पुण्याचे भूषण आहे.
– म.श्री.दीक्षित,
847 सदाशिव पेठ,
राजवाडे रस्ता,
पुणे- 4110308,
94477837
Atishay sundar mahiti, maze
Atishay sundar mahiti, maze chitrarup Pune darshan he punyatil aitihasik vastunchi water colour madhil paintings aani sankshipta mahiti ASE pustake aahe tya nimitta thoda far vachan kele hote. – dhanyavad
Chitrakar Mohan Jadhav. 9822252336
Atishay sundar mahiti, maze
Atishay sundar mahiti, maze chitrarup Pune darshan he punyatil aitihasik vastunchi water colour madhil paintings aani sankshipta mahiti ASE pustake aahe tya nimitta thoda far vachan kele hote. – dhanyavad
Chitrakar Mohan Jadhav. 9822252336
Changli mahiti aahe
Changli mahiti aahe
Durmila mahitibaddle
Durmila mahitibaddle dhanyawad
मंडई, आमचे अंगण !
मंडई, आमचे अंगण !
Atishay sundar mahiti milali
Atishay sundar mahiti milali
खूप छान माहिती. तेव्हाचे
खूप छान माहिती. तेव्हाचे बांधकाम खूप देखणे आणि मजबूत आहे. मी जन्मापासून पुण्यात असूनही मला ही माहिती नव्हती. माहितीबद्दल धन्यवाद.
पुण्याचे भूषण अशी ही मंडई. धन्यवाद
माहिती खरोखरीच सुंदर आहे.
माहिती खरोखरीच सुंदर आहे.
Comments are closed.