मूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग

विजय तेंडुलकर
विजय तेंडुलकर

     विजय तेंडुलकरसमाज मानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत ‘तहेलका’ या साप्ताहिकात मध्यंतरी प्रसिद्ध झाली. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग कसा कारणीभूत आहे यावर २००४ साली वादग्रस्त लेख लिहिला होता. त्यानंतर त्यांच्या अनेक लेखांतून आणि मुलाखतींतून चंगळवादी बनलेल्या, जुनी मूल्ये हरवलेल्या मध्यमवर्गाचे विश्लेषण हे सूत्र सतत दिसून येत होते. भारताच्या आर्थिक प्रगतीचे खरे पेव ज्या वर्गामुळे फुटले तो हा ‘द ग्रेट इंडियन मिडलक्लास’! नंदी मात्र या मध्यमवर्गाला आर्थिक प्रगतीचे व्हॅनगार्डस न मानता – फक्त वस्तूंचा वापर, विक्रय आणि त्यावर उधळपट्टी करणारा, मूल्यांची चाड नसणारा हुकुमशाहीशरण मध्यमवर्ग आहे असे मानतात आणि त्यांवर टीका करतात. 

     आपण सगळे मध्यमवर्गाचा भाग आहोत. म्हणून ही ‘नव्या-मध्यमवर्गा’वर होणारी टीका समजावून घेणे, तिचा विचार करणे आणि औचित्याने त्यातला कंद मुद्दा जाणून घेणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते. अनेक वादग्रस्त वैचारिक भूमिका घेतलेल्या आशीष नंदींच्या लेखनाशी माझा परिचय झाला तो त्यांच्या ‘इंटिमेट एनिमी’ या पुस्तकातून. नंदींची वैचारिक भूमिका पठडीप्रमाण डाव्यांपेक्षा अधिक खुली, काहीशी तिरसट आणि अधिक धारदार असल्यामुळे त्यांच्या लेखनातून विचारांना नवी ऊर्जा मिळते. शिवाय, नंदी डाव्यांना, सबार्ल्टन स्टडिजसारखा इतिहासाच्या शाखेत लिहिणा-यांना धक्का देतात, म्हणून ते उजव्यांच्या विचारव्युहात अजिबात अडकत नाहीत. नंदी हे भारतात उपलब्ध अशा ज्ञानक्षेत्रातल्या क्वचित आढळणा-या साक्षेपी आवाजाचे प्रतिनिधी आहेत. 

     जुना मध्यमवर्ग म्हणताक्षणी आपल्या नजरेसमोर त्या मध्यमवर्गाच्या मूल्यांचा एक समुदाय उभा ठाकतो. नेकीने नोकरी करणे, कामात सचोटी बाळगणे, शिक्षणाला -डिग्रीला प्रचंड महत्त्व देणे, न्याय्य भूमिकेसाठी आग्रह धरणे, चौकटीतले जगणे जगत असताना त्या चौकटीबाहेरच्या, त्यात सामावल्या न जाणा-या व्यक्ती अगर समूहांबाबत चॅरिटेबल विचार करणे, हिंसेची भयास्तव का होईना नालस्ती करणे, उधळपट्टी न करणे, बचत हे मूल्य मानणे, कर्जाला घाबरून असणे, कोर्ट-कज्ज्यांना शक्यतो नाकारणे; तरीही नेहरूप्रणित समाजवादी, लोकशाही मूल्यांच्या चौकटीत सर्व विसंगतींसकट बसणे अशी मूल्ये ‘जुन्या मध्यमवर्गा’चा विचार करताना दिसून येतात. मराठी मध्यमवर्गाने ही सरमिसळ, नेमस्त मूल्ये कित्येक काळ उराशी बाळगली. 

     जगभरातच मध्यमवर्गाची निर्मिती ही औद्योगिकीकरणानंतर झाली. फ्रेंच भाषेत औद्योगिकीकरणानंतर जन्माला आलेल्या या वर्गाला ‘पेटी बूर्ज्वा’ असे नावही मिळाले. शहरीकरणाच्या प्रक्रियेत, रॅशनल आर्थिक गणितात शेतीपासून क्रमश: तुटत गेलेला हा ‘व्हाईट कॉलर’ समाज निर्माण झाला. आधुनिक शासनाने निर्माण केलेल्या नोकरशाहीने या मध्यमवर्गाला पगार दिले आणि त्यातूनच ज्ञान श्रमातून, व्यवस्थापन श्रमातून, सल्लागार श्रमातून वाढणारी मध्यवर्गीय मूल्ये निर्माण झाली. भारतात या मध्यमवर्गाच्या उगमाकडे जाताना इंग्रजांच्या राज्यातल्या ‘बाबू’ लोकांकडे प्रथम जावे लागते. शिक्षक, कारकून, साहेब ते सैन्यातले छोटे अधिकारी या सर्व, शासनाने पोसलेल्या पगारी नोकरदारांमधून भारतीय मध्यमवर्गाची निर्मिती झाली. कित्येक दशके, मध्यमवर्ग हा ब्राह्मणी होता. 

     भारतातल्या या पहिल्या फळीतल्या मध्यमवर्गाने, ज्यात कायस्थ, सारस्वत, ब्राह्मण या तथाकथित उच्च जातींचा समावेश होता त्यांनी, परंपरागत उच्चवर्णीय मूल्ये आणि इंग्रजी सत्तेला आवश्यक ती पाश्चात्य मूल्ये यांच्या संकरातून आपले पर्याय निवडले. ‘वर्क इज वर्शिप’, ‘ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी’ ही काही ब्राह्मणी मूल्ये नव्हती तर ती प्रोटेस्टंट मूल्ये होती. अशा भारतीय उच्चवर्णीय आणि पाश्चात्य मूल्यांच्या संकरातून जुन्या मध्यवर्गीय जाणिवा निर्माण झाल्या. 

     असे सगळे लिहिताना मला मराठी वाड्मयीन परंपरेतले काही प्रातिनिधीक मध्यमवर्गीय आवाज आठवतात – केतकर, श्री.म.माटे ते अगदी तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’पर्यंत, या मध्यमवर्गाची वेगवेगळी रूपे समोर येतात. या सगळ्यांच्या जोडीने शाहुमहाराजांमुळे पश्चिम महाराष्ट्रात थोडा निराळा मध्यमवर्ग निर्माण झाला. राजारामशास्त्री भागवत, कर्मवीर ते किर्लोस्करवाडी असे त्या मध्यमवर्गाचे कॉम्बो आपल्या नजरेसमोर येऊ शकते. 

     या जुन्या मध्यमवर्गाच्या मूल्यांचे रेषेरेषेच्या फरकाने प्रतिनिधीत्व मटा, लोकसत्ता ही माध्यम परंपरा मराठीत करताना दिसते. जुना मटा बदलला, तशी जुनी मटाप्रणित मूल्ये बदलली आहेत. आता ‘शॉपर्स स्टॉप’ आणि ‘मॉल्स’मध्ये जाणारा, मोदींना श्रेष्ठ समजणारा, क्रेडिट कार्ड, बीपीओ, आयटी, फाडफाड इंग्लिश, मॅकडीचे बर्गर- संस्कृतीतल्या मध्यमवर्गाकडे, बाय द वे ज्याला एकीकडून गणपती उत्सव, संदीप खरे आवडतात त्या मध्यमवर्गाची मूल्ये कोणती आहेत? हा नवा मध्यमवर्ग ‘मूल्ये’ हरवलेलाआहे की त्याने त्याची नवी मूल्यव्यवस्था बनवली आहे? आणि ती जुन्या विश्लेषक मध्यमवर्गाला पटत नाही?

संदीप खरे     अमेरिकन हावरटपणा, भारतीय दुटप्पीपणा यांच्या उथळ मिश्रणातून या नव्या मध्यमवर्गाची मूल्ये उलगडताना मला दिसताहेत. त्याचबरोबर एक भाबडा, सुलभ नॉस्टॅल्जियादेखील जाणवतो. या हपापलेपणाकडेही आपल्याला सांभाळून बघावे लागेल. स्थलांतराने, आपल्या मूळांपासून पूर्ण फारकत झालेल्या या नव्या मध्यमवर्गाने आपले सारे काही सुबत्तेसाठी पणाला लावले आहे. आपली, ‘बिलाँगिंग’ची भूक हा मध्यमवर्ग वस्तूंनी भरून काढतोय! त्याला सगळे हवे आहे, आत्ताच्या आत्ता! त्याला याच आयुष्यात सारी सुखे उपभोगायची आहेत. हे करताना, अमेरिकन मध्यमवर्गाला लपेटून बसलेला ‘येशू’ या भारतीय मध्यमवर्गाला डसलेला नाही. त्यामुळे धार्मिक नजरेने भारतीय नवा मध्यमवर्ग हा अधिक खुला, अधिक कर्मकांडग्रस्त, अधिक हिंसक, अधिक बॅंडएड उत्तरे शोधणारा आहे. युरोपीयन मध्यमवर्गाला असलेले विवेकवादाचे झाकण किंवा अमेरिकन मध्यमवर्गाला बूच मारणारी ख्रिश्चन पापकल्पना भारतात नाही. म्हणून भारतीय नव्या मध्यमवर्गाची हिंसा आणि हावरटपणा दिवसेंदिवस कॅलिग्युला वेगाने वाढत जाणार हे उघड आहे. 

     मग या नव्या मध्यमवर्गासाठी नवी मूल्ये येणार तरी कुठून? मला या प्रश्नाचे उत्तर दोन बाजूंनी सापडण्याची शक्यता दिसते. त्यासाठी एक म्हणजे इंग्रजपूर्व काळात आपली मूल्ये कुठून आली याचा विचार आपण करायला हवा. क्षत्रिय समाजरचनेला आवश्यक ‘स्वामिनिष्ठा’ हे प्रधानमूल्य त्या काळात होते आणि त्याचबरोबर भागवतधर्माने त्यांच्या दर्शनातून माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी कसे वागावे? याची मांडणी केलेली होती. या जुन्या मूल्यसमूहाकडे अधिक उघड्या आणि खुल्या पद्धतीने आपल्याला बघावे लागेल. ते करण्यासाठी जे. कृष्णमूर्ती, ओशो यांच्यासारखे आधुनिक ऋषी, साठच्या दशकातल्या दक्षिण कॅलिफोर्नियातली नवी आध्यात्मिकता कदाचित कामी येईल. सध्याच्या ‘ग्रीन’-पर्यावरणा प्रेमी कडूनही काही स्वागतार्ह मूल्ये स्वीकारता येतील. 

     दुसरीकडे मला ख्रिश्चन विचारसरणीचे विविध परिपाक-पर्याय डोळ्यांसमोर येतात. याशिवाय मानसोपचार तज्ज्ञ डॉ. फिल यांच्यासारखे ‘सेल्फ हेल्प’ची पुस्तके लिहिणारे लेखक, ऑप्रा विन्फ्रेसारख्या माध्यम-व्यक्ती यांचा सहभाग नव्या मूल्यांच्या निर्मितीत होऊ शकतो. 

     नव्या कॉर्पोरेट्समधून निर्माण होणा-या, HR ट्रेनिंगनं वाढणा-या या नव्या वर्किंग क्लासला ही दुसरी पर्यायी मूल्ये उपलब्ध होतील. ही सारी समकालीन अमेरिकन आणि अमेरिकनाईझ्ड वर्गाची मूल्ये आहेत. 

     या नव्या मूल्यांची वाहणी फेसबुक, ट्विटर यांच्यासोबत नवनव्या कॉर्पोरेट व्हिजन-मिशनच्या मूल्यव्यवस्थेतूनही होईल. बाबू क्लासच्या पलीकडचा हा ‘प्रायव्हेट सेक्टर क्लास’ मध्यमवर्गाची मूल्ये ठरवेल. 

     या नव्या मध्यमवर्गापुढे कर्मफल सिद्धांताला पूर्ण बकवास समजून, हिंसेने सारे प्रश्न सोडवण्याचा पर्यायही उभा असणारच आहे. यातले निवडीचे पोस्टमॉडर्न कंपल्शन मध्यमवर्गाला नकोसे वाटते. त्यांना आदेशांची भूक नव्याने लागत आहे. नव्वदच्या दशकात ठाकरे, एकविसाव्या शतकात मोदी, सत्य साईबाबा किंवा कोणीही तत्सम बाबा आदेश ब्रॉडकास्ट करू शकतात. मध्यमवर्ग त्या आदेशांसाठी भुकेला आहे. 

     नंदींचे मत मला पूर्णत: पटत नाही. या नव्या मध्यमवर्गाला ‘मूल्ये’ नाहीत असे मोडीत काढण्यापेक्षा कोणत्या मार्गाने आपण त्या कंझंप्शन क्लासपर्यंत पोचणार आहोत याचा विचार आमच्या माध्यमांनी, लेखकांनी, विचारवंतांनी करायला हवा. या नव्या मध्यमवर्गीय नितिशास्त्राची मांडणीच श्याम मनोहरांनी ‘खेकसून म्हणे आय लव्ह यू’ या कादंबरीत केली आहे. मराठी मध्यमवर्गाचा घेट्टो म्हणज पुणेरी जाणिवा – त्यांना सोलून त्यांचा मूलगामी क्रिटिक मनोहरांनी मांडला आहे. हे असे जोपर्यंत लिहिले-वाचले जाणार तोपर्यंन्त पर्याय उपलब्ध होत राहणार. नंदींच्या मूल्ये हरवलेल्या मध्यमवर्गापलीकडे असलेला मूल्यांच्या शोधातला हा मध्यमवर्ग मला अधिक महत्त्वाचा वाटतो आणि भावी काळासाठी अधिक लक्ष देण्यायोग्य !

– ज्ञानदा देशपांडे
dnyanad_d@yahoo.com
भ्रमणध्वनी : 9930360550

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.