विजेची निर्मिती महाराष्ट्रात बाल्यावस्थेत होती तेव्हा एक मोठा आधार होता तो म्हणजे कंदिलाचा. त्याचा प्रभाकर ब्रँड ही जणू महाराष्ट्रीयत्वाची निशाणी ठरली ! अनेक जणांच्या परीक्षा त्या कंदिलांनी यशस्वीपणे पार पाडल्या. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये, वाड्यांमध्ये पेटलेल्या कंदिलानी घरांतील, दुकानांतील व्यवहार उजळून काढले. त्या प्रभाकर कंदिलाचे निर्माते होते गुरुनाथ प्रभाकर ओगले…
गुरुनाथ हे कोल्हापूर बावडा येथे जन्माला आले, कोल्हापुरात मॅट्रिक झाले. त्यांनी मुंबईच्या व्ही.जे.टी.आय.मधील अभ्यासक्रम पहिला क्रमांक मिळवत पूर्ण केला. ते साल होते 1908.
त्यांनी थेट बार्शीच्या ‘लक्ष्मी टेक्निकल इन्स्टिट्यूट’मध्ये शिकवण्यास सुरुवात केली खरी, पण त्यांचे मन नोकरीत नव्हते. ते काहीतरी निर्माण करावे, उद्योग करावा या प्रेरणेने पछाडले होते. त्यांनी छोटेमोठे व्यवसाय केले. त्यांतील एक म्हणजे कंदिलाची काच. त्यांनी दहा पौंड काच एका माळरानात वितळवली. ते साल होते 1913. त्यांना साथ होती ती बंधू श्रीपाद यांची. त्यातून एका नव्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला. लोकमान्य मंडालेमधून सुटून आले होते. ओगले यांच्या उद्योगाला लोकमान्य यांचे ‘स्वदेशी’ आशीर्वाद लाभले.
त्यांनी किर्लोस्कर यांच्या कारखान्यात काही काळ काम केले. ते भावाच्या ओगलेवाडीच्या काच कारखान्यात रूजू झाले. त्यांनी काच हा एकमात्र ध्यास घेऊन काम केले. त्यांचा अभ्यास आणि भरारी पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना थेट अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी पाठवले. प्रभाकर काचनिर्मिती तंत्र शिकून भारतात परतले. त्यांनी अल्पावधीत प्रभाकर कंदिलाचे उत्पादन सुरू केले. साल होते 1925-26. पंधरा वर्षांचे कष्ट आणि जनतेपर्यंत उत्पादन नेण्याची धडपड. त्यांनी 1942 साली कारखाना सुरू केला. ती भारतीय उद्योजकतेची चुणूक ठरली.
त्यांनी ‘चले जाव’ या (1942 साली) घोषणेला एक प्रकारे मूर्त स्वरूपच दिले. त्यांनी कंदिलाच्या जाहिरातीतून ‘खरे देशभक्त असाल तर प्रभाकर कंदील वापरा’ असा संदेश दिला. स्वत:चे स्वप्न देशप्रेमाशी जोडून लाखो ग्राहकांना आपलेसे करण्यातील कौशल्य त्यांची व्यावसायिकतेची जाणकारी दर्शवते. त्यांनी त्यांच्या कंपनीचे शेअर्सही विक्रीला काढले होते. माझ्या आजोबांनी त्यांचे काही शेअर्स घेतले होते. त्यांनी विजेच्या मोटारी, पंप, एनॅमल वेअर अशी उत्पादने सुरू करून पश्चिम महाराष्ट्रात हजारो हातांना आधार दिला. त्यांनी पुण्याजवळील पिंपरी येथे त्या कारखान्याची शाखा सुरू करून व्यवसाय विस्तारित केला.
जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या कारखान्यास भेट दिली होती. ते या मराठी तरुणाच्या कर्तृत्वाने भारावल्यासारखे झाले होते. भारत-चीन युद्धात रात्रीच्या अंधारात सैनिकांना 1962 साली एकच आधार होता, तो म्हणजे प्रभाकर कंदिलाचा. कंदिलाला वडिलांचे नाव देऊन त्यांचे नाव कायमस्वरूपी, प्रकाशमान करणाऱ्या गुरुनाथ प्रभाकर ओगले यांच्या स्मृती सतत प्रकाशमान असतील ! त्यांचा मृत्यू 16 ऑक्टोबर 1944 रोजी झाला.
– केशव साठये 9822108314 keshavsathaye@gmail.com
———————————————————————————————————————————-