मंदार भारदे हा तरुण व्यवसायिक आहे. तो चित्रपटनिर्मिती संस्थांना हवाई चित्रिकरणासाठी चार्टर विमानसेवा देतो. ‘मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ 2012 साली रजिस्टर झाली. त्याने ‘एव्हिएशन वॉर रूम’ ही संकल्पना सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा, 2014 साली भारतात आणली. ती राष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली…
मंदारच्या विमानसेवा कंपनीच्या व्यवसायात शिरण्याची हकिगत रोमहर्षक आहे. त्याने थेट विमानच विकत घ्यावे असे मनाशी पक्के केले होते. विमान कोठे मिळणार, त्याची माहिती विमानतळावरच मिळणार म्हणून मंदार नाशिक येथून थेट जुहू (मुंबई)च्या विमानतळावर गेला. तेथील सुरक्षारक्षकांनी कोणाला भेटायचे-काय काम आहे असे प्रश्न विचारले. त्यांपैकी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. तब्बल आठ वेळा त्याला प्रवेश नाकारला गेला. मात्र, इंग्रजांना पळवून लावलेल्या स्वातंत्र्यसैनिकाचे (बाळासाहेब भारदे) अंगातील रक्त सहज हार कसे मानेल ! मंदारचे वडील – अनंत हे बाळासाहेब भारदे यांचे पुतणे होत !
मंदारने जुहूच्या त्या विमानतळावर निरीक्षण केले, की मंत्र्यांच्या ताफ्याला आत प्रवेश सहज मिळतो. तशाच एका ताफ्यावर लक्ष ठेवून त्याने त्याची कार ताफ्यात घुसवली आणि तो जुहू विमानतळावर पोचला. समोर विस्तीर्ण अशी कर्मभूमी दोन्ही हातांनी त्याचे स्वागत करण्यास जणू उभी होती. तेथे गेल्यावर त्याला उमजले, की तेथे फक्त उड्डाणाची कामे चालतात. मार्केटिंग वगैरे अन्यत्र होते. दरम्यान, मंदारला कोणीतरी उड्डाणाकरता गेलेल्या कॅप्टनला भेटण्यास सांगितले. सुमारे तासभर त्यांची वाट पाहिल्यानंतर कॅप्टन मंदारला भेटले. मंदारने त्यांना थेट, न डगमगता तो विमानसेवा कंपनी सुरू करू इच्छितो असे सांगितले. मंदारच्या डोळ्यांतील आत्मविश्वासाची चमक पाहून कॅप्टननीही त्याला सहकार्य देण्याचे निश्चित केले.
मंदारच्या खिशात त्यावेळी एक रुपयाचे भांडवल नव्हते, पण गगनाला गवसणी घालण्याची जिद्द होती. कॅप्टननी मंदारला व्यावसायिक मार्गदर्शन केले. त्याच वेळी नेमक्या निवडणुका सुरू झाल्या होत्या. मंदार मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटला. त्याने ‘मी विमानसेवा पुरवतो’ असे चव्हाण यांना सांगितले. मंदारचा आत्मविश्वास पाहून मुख्यमंत्र्यांनीही त्याला ‘ग्रीन सिग्नल’ दिला. त्यावेळच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्यांना विमानसेवा देण्याचे काम मंदारच्या ‘मॅब एव्हिएशन’ला मिळाले. मंदार दहा विविध राजकीय पक्षांसाठी विमानसेवा पुरवण्याचे काम करतो. अशा प्रकारे ‘मॅब एव्हिएशन’ सुरू 2009 मध्ये झाले.
मंदार चित्रपटनिर्मिती संस्थांना हवाई चित्रिकरणासाठी चार्टर विमानसेवा देतो. ‘मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ 2012 साली रजिस्टर झाली. मंदार याने ‘एव्हिएशन वॉर रूम’ ही संकल्पना सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा, 2014 साली भारतात आणली. ती राष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली. त्याने विमान उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या ‘नॉन शेड्युल ऑपरेट परमिट’साठी अर्ज 2013 मध्ये केला होता, त्याला परवानगी 2016 मध्ये मिळाली. त्यामुळे तो भारतातील विमानसेवा म्हणून जगभर उड्डाणे करू शकणार होता. त्याच दरम्यान ‘मॅब एव्हिएशन’च्या ताफ्यात पहिले स्वत:च्या मालकीचे विमान आले.
मंदार भारदे म्हणाला, की ‘मॅब एव्हिएशन’च्या ताफ्यात दोन विमाने आहेत. तो आकडा दहा विमानांपर्यंत नेण्याचा त्याचा मानस आहे. ‘मॅब’चा व्यवसाय भारतातील आठ राज्ये आणि जगातील सहा देशांत विस्तारलेला आहे. त्यामध्ये नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, इराण आणि कतार या देशांचा समावेश आहे. तो व्यवसाय अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथेसुद्धा विस्तारत आहे. ‘मॅब’ विशेष अतिथी हवाई सेवा, वैद्यकीय हवाई सेवा आणि भौगोलिक सर्वेक्षण या तीन पातळ्यांवर कार्यरत आहे. ‘मॅब’ रोजगार शंभराहून अधिक लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे देते.
– प्रमोद सावंत 8108105232 yuktimediaconsultancy@gmail.com
(मुंबई तरुण भारत, 30 एप्रिल 2020 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
—————————————————————————————————————————————————————