आसूद गावची पुरातन पाणी वाटप व्यवस्था

2
1049

आसूद हे गाव डोंगरउतारावर आहे. त्या गावच्या भगिरथ-पुत्रांनी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा उपयोग करून ‘गंगा अंगणी’ आणली ! त्यामुळे गावात अष्टौप्रहर पाणीच पाणी झाले. ती अनोखी पाणी वाटप योजना तीनशे वर्षे चालू आहे. त्या पुरातन पाणी वाटप व्यवस्थेत फारसा बदल झालेला नाही. पाण्यावरून कोणी वाद करत नाहीत. कारण ती गोष्ट न्याय्य पद्धतीने चालवली जाते…

आसूद हे गाव डोंगरउतारावर आहे. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात येते. दापोलीपासून ते सात किलोमीटर अंतरावर आहे. गावाने स्वत:चे बस्तान बनवले आहे. अर्थात तेथे फार सोयी-सुविधा मात्र नाहीत. ग्रामस्थांचे रोजचे जीवन म्हणजे सकाळपासून शेती-बागायतीची कामे करावीत, दिवेलागणीला गोठ्यात जाऊन धार काढावी आणि जेवणखाण करून खुशाल रात्रीच्या कुशीत गाढ निद्रा घ्यावी ! त्यांना फारशा अपेक्षा नाहीत. त्यांच्या गरजा जास्त नाहीत. मात्र मुख्य विवंचना आहे ती पाण्याची ! पाऊस गावावर चार-साडेचार महिने वस्ती करून असतो. आसव नदी त्या काळात भरभरून वाहते ! पण पुढे कार्तिक महिन्यात मात्र तीच आसव नदी गावकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी काढते ! मग ज्येष्ठ महिन्यापर्यंत तशीच पाठ फिरवून बसते.

गावकऱ्यांनी शेवटी, कंटाळून नदीचे पाणी अडवायचे आणि वळवायचे असे ठरवले. गावच्या भगिरथ-पुत्रांनी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा उपयोग करून गंगा अंगणी आणली ! अष्टौप्रहर पाणीच पाणी झाले. गेली तीनशे वर्षे ते अव्याहत सुरूच आहे.

फूटभर खोलीचा उंच-रुंद पाट सिद्ध झाला. बांधकामांत सिमेंट नाही की चुना नाही ! कपरं, वाळू-मातीची लिंपणे झाली. पाटातून पाणी वाहू लागले. पण किरवी-खेकडे त्रास देऊ लागले. मोठी भोके पडून पाणी वाया जाऊ लागले. मग पेंढ्याचा वापर करून बांध-बंदिस्ती झाली आणि उपद्रव शांत झाला. भाताच्या पेंढ्याला किरवी-खेकडे येत नाहीत.

पाणी वाटपाचा प्रश्न कळीचा ठरला. त्यावर बागेच्या क्षेत्रफळानुसार पाणी वाटायचे असा तोडगा निघाला. तरीही कधी आणि किती वेळ हा प्रश्न होताच. तीनशे वर्षांपूर्वी घड्याळे नव्हती. वेळेसाठी घटिका विचारात घेण्यात आल्या. चारशेवीस घटिकांच्या हिशोबात एका आठवड्याचे पाणी वाटप ठरले. पण बागेला पाणी देण्याची वेळ कोणावर रात्री, कोणावर मध्यरात्री तर कोणावर पहाटेची सुद्धा येणार हे कसे काय जमेल?

पाटाच्या डागडुजीसाठी आकार ठरवण्यात आला. दरवर्षी एका ग्रामस्थाकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्याने वर्षभर पाटाची देखभाल-दुरूस्ती करवून घ्यायची ! त्या व्यक्तीला ‘सालदार’ म्हणतात.

पाटाचे पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरले जाते. पावसात मात्र ते गढूळ होते. पण ‘उंपीळी’चे पाणी पाटात येते. उंपीळीचे म्हणजे जमिनीतून आपोआप वर येत राहणारे पाणी. ते पिण्यासाठी वापरतात. पाटाची खालची बाजू जांभ्या दगडाची असल्याने पाणी स्वच्छ राहते.

या पुरातन पाणी वाटप व्यवस्थेत फारसा बदल झालेला नाही. आठवड्याचे वेळापत्रक तसेच सोमवार ते रविवार आहे. येथील बागायतदार रात्री, मध्यरात्री, पहाटे पाणी ‘मोडून’ आणतो. म्हणजे त्याची स्वत:ची वेळ होताच दुसऱ्याचा प्रवाह बंद करून स्वत:च्या बागेकडे वळवतो. हे मोडणे मातीचाच बांध घालून केले जाते.

कोणाला किती पाणी मिळते हे पाहिले तर कमीत कमी ‘सहा’ मिनिटांचे पाणी एका बागायतदाराला जास्तीत जास्त बारा तासांचे पाणी दुसऱ्या एका बागायतदाराला उपलब्ध झाले आहे.

कालमानानुसार थोडे फार बदल झाले आहेत. सिंमेंटचा पाट बांधला आहे, हिशोब घटिकांऐवजी मिनिटा-सेकंदांवर केले जातात. शंभर वर्षांपूर्वीचे पाणीवाटपाचे कागद उपलब्ध आहेत.

येथील मुख्य पीक सुपारीचे. शेकडो पोती सुपारी पिकते. तिला दरही चांगला मिळतो. सुपारीचे वच्छरास, मोहरा, झिनी, खोका, फटोड असे काही प्रकार आहेत. झिनी म्हणजे लहान सुपारी. फटोड ही चांगली पण तडकलेली तर खोका म्हणजे कोवळी सुपारी. सुपारी हे पीक चांगला नफा कमावून देणारे पीक आहे. आंबा, फणस ,करवंद, कोकम ही अन्य पिकेसुद्धा उत्तम हात देतात.

या गावाचे केशवराज मंदिर प्रसिद्ध आहे. पाण्याचा उगम तेथेही एका झाडापाशी सापडला. काळवत्री दगडांचा पाट तयार करून आणि दगडी गोमुख बसवून गावकऱ्यांनी पाणी नियोजन केले आहे. शुभ्र चमकदार पाणी केशवराजाच्या पायथ्याशी येते. जणू चांदीचा एक पट्टाच केशवराजाला अर्पण केला आहे !

गावात भांडणतंटे फारच कमी आहेत. पाण्यावरून किंवा वर्गणीवरून कोणी वाद करत नाहीत. कारण दोन्ही गोष्टी अगदी न्याय्य पद्धतीने चालवल्या जातात. आसूद गावात अनोखी पाणी वाटप योजना तीनशे वर्षे चालू आहे.

– विनायक बाळ 9423296082 vinayak.bal62@gmail.com

———————————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. आसूद हे गाव निसर्गरम्य आहे.,गरंबी हे बापूचे गाव तिथेच आहे. केशवराज चढणे कठीण आहे.तेथील देवस्थान रानडे , वैशंपायन या कोकणस्थांचे कुलदैवत आहे.दोन तीन वेळा आसूद ला भेट दिली आहे.जुन्या व जाड पोफलीच्या झाडांनी सर्व केशवराज परिसर अती रम्य झाला आहे.
    लेखामधील पाणी व त्याचे वाटप खूप वेगळे आहे .सामंजस्याने किती छान मार्ग काढला आहे.

  2. छान लेख.
    एखाद्या फारसे माहित नसलेल्या ठिकाणाबद्दल लिहिताना नकाशावर ते ठिकाण कुठे आहे हे दाखवल्यास उपयुक्त होईल. आजकाल How to reach असेही दाखवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here