पंचेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-fifth Marathi Literary Meet 1964)

पंचेचाळिसावे मराठी साहित्य संमेलन गोव्यात मडगाव येथे 1964 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची लहान बहीण होती. कुसुम ही एकुलती एक बहीण असल्याने शिरवाडकर यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे टोपणनाव धारण केले.

पंचेचाळिसावे मराठी साहित्य संमेलन गोव्यात मडगाव येथे 1964 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज होते. त्यांचा जन्म पुणे येथे 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. ते लहानपणी दत्तक गेल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांची लाडकी होती. कुसुम ही एकुलती एक बहीण असल्याने शिरवाडकर यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे नाव धारण केले. तेव्हापासूनच त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता लिहिल्या.

कुसुमाग्रज यांची ‘खेळायला जाऊ चला…’ ही पहिली कविता सप्टेंबर 1929 च्या ‘बालबोधमेळ्या’त प्रसिद्ध झाली. त्याला आता त्र्याण्णव वर्षे होत आली. कुसुमाग्रज यांच्या समग्र कवितेचा आनंद तितकाच ताजा आणि अक्षयघटासारखा तुडुंब भरून वाहत आहे. सदाबहार, सदासतेज, आश्वासक कविता लिहिणारा हा कविश्रेष्ठ सृष्टीत भरून राहिलेले सौंदर्य त्यांच्या कवितेतून हलकेच उलगडतो. त्याहून अधिक त्यांचे चिंतनशील मन राजकीय आणि सामाजिक भान कवितांमधून समर्पकपणे प्रकट होते. त्यांच्या कवितेचे नाते मराठी मनाशी इतके जुळलेले आहे, की केवळ कुसुमाग्रज हे नाव उच्चारले तरी मराठी मन झंकारून उठते.

‘माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगे जागतील, मायदेशातील शिळा….

कुसुमाग्रज यांचा ‘जीवनलहरी’ हा कवितासंग्रह 1933 साली प्रसिद्ध झाला तेव्हा ते अवघे एकवीस वर्षांचे होते. ‘जीवनलहरी’ ते ‘पाथेय’ हा कुसुमाग्रज यांचा एकूण काव्यप्रवास आहे. त्यांनी त्या काव्यप्रवासात इतर वाङ्मयीन बंदरेसुद्धा घेतली. विशेषतः नाटककार वि.वा.शिरवाडकर हे मराठी नाट्यसृष्टीतील महत्त्वाचे बंदर आहे. केवळ ‘नटसम्राट’ हे एकमेव नाटक जरी कुसुमाग्रज यांनी लिहिले असते तरी त्यांना मराठी नाट्यसृष्टीने डोक्यावर घेतले असते. इतके ते अजोड आहे. कुसुमाग्रज यांनी वाङ्मयातील सर्व प्रकार समर्थपणे हाताळले, परंतु नाटककार वि.वा.शिरवाडकर आणि कवी कुसुमाग्रज ही त्यांची दोन रूपे सूर्यासारखी तळपत राहिली.

कुसुमाग्रज यांची वाङ्मयीन शैली हा मराठी साहित्यातील चमत्कार आहे. अभिजात रसिकता, मानवी भावभावनांचे नातेसंबंध, सृष्टीचे कौतुक, सामाजिक भान आणि देशप्रेमाने भारलेला तो मुक्त आत्मा असल्याचे सुरेख प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उतरलेले आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवाशी आणि आत्मप्रेरणेशी एक संयत इमान राखत काव्यलेखन केले आहे. कुसुमाग्रज यांनी त्यांची युगमुद्रा मराठी कवितेवर उमटवली. त्यांचे ते समृद्ध साहित्य विसरता येणार नाही.

कुसुमाग्रज यांच्या साहित्याला राजमान्यता, लोकमान्यता, रसिकमान्यता भरभरून मिळाली आणि त्या प्रतिभावंत कवीच्या प्रत्येक सामाजिक चिंतनाला अधिष्ठान प्राप्त झाले. तो कवी सर्व मानसन्मान मिळूनही एखाद्या ऋषीसारखा निर्लेप, सर्व मोहांपासून दूर आणि व्रतस्थपणे साहित्य निर्माण करत राहिला. त्यांनी सत्य, सुंदर, मांगल्याचा ध्यास त्यांच्या ओळीओळींतून प्रकट केला. त्यांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे की – ‘माझ्या प्रज्ञेतून उदे, भागीरथी प्रकाशाची…’ ते सत्य आहे.

कुसुमाग्रज यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील पिंपळगावया तालुक्यात झाले. त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि मुंबईतून पूर्ण केले. त्यांनी मराठी आणि इंग्रजी या विषयांत बी ए पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ‘गोदावरी सिनेटोन’मध्ये प्रवेश केला. त्यांनी ‘सती सुलोचना’चे कथालेखन करून त्यात लक्ष्मणाची भूमिका केली. तेथे ते 1936-38 अशी दोन वर्षे होते. त्यानंतर ते वृत्तपत्र व्यवसायात शिरले. त्यांनी साप्ताहिक ‘प्रभा’, दैनिक ‘प्रभात’, ‘सारथी’, ‘धनुर्धारी’, ‘नवयुग’ या नियतकालिकांतून संपादकीय विभागात काम केले. ते साप्ताहिक ‘स्वदेश’चे संपादक 1946 मध्ये झाले, तसेच ते ‘कुमार’ मासिकाचे काही काळ संचालकसुद्धा होते.

‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 1933 साली तर त्यांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह 1942 साली प्रसिद्ध झाला. आणि कवी कुसुमाग्रज हे सर्वमान्य झाले. त्यांचे ‘जीवनलहरी’ ते ‘पाथेय’ पर्यंत सतरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या ‘वैष्णव’(1946), ‘जान्हवी’ (1952) आणि ‘कल्पनेच्या तीरावर’ (1956) अशा तीन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचे ‘दूरचे दिवे’ हे 1946 साली लिहिलेले पहिले नाटक. त्यानंतर जवळजवळ वीस नाटके, तसेच ‘देवाचे घर’सारख्या सहा एकांकिका, ‘फुलवाली’सारखे आठ कथासंग्रह, ‘आहे आणि नाही’सारखे आठ-नऊ ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याच प्रमाणे कुसुमाग्रज यांनी बालकवी यांच्या निवडक कवितांचा ‘फुलराणी’ हा स्वतः संपादित केलेला संग्रह तर गोविंदाग्रज यांच्या निवडक कवितांचा ‘पिंपळपान’ हा इतरांच्या सहकार्याने संपादित केलेला संग्रह प्रसिद्ध आहेत.

ते वयाच्या विसाव्या वर्षी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनात सहभागी झाले होते. त्याशिवाय त्यांनी त्यांच्या जीवन काळात अनेक सामाजिक आंदोलनांत सक्रिय सहभागही घेतला.

ते त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते, की “साहित्य संमेलनात प्रामुख्याने विचार व्हायला हवा तो साहित्याचा आणि भाषेचा, परंतु सर्व सामाजिक जीवनावर बरे-वाईट परिणाम करणारे प्रश्न जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा हे राजकारण आहे असे म्हणून दूर जाणे योग्य होणार नाही. व्यापक राजकीय प्रश्न हेही अखेरतः सांस्कृतिक प्रश्न असतात.”

त्यांनी मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वार्षिकोत्सवाचे अध्यक्षपद अनुक्रमे 1956 व 1960 साली भूषवले होते. त्यांच्या ‘मराठी माती’ (1960), ‘स्वगत’(1962), ‘हिमरेषा’(1964) या तीन कवितासंग्रहांना; तसेच, ‘ययाति आणि देवयानी’(1966), ‘वीज म्हणाली धरतीला’ (1967) व ‘नटसम्राट’(1972) या नाटकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. ‘नटसम्राट’ नाटकाला 1974 चा साहित्य अकादमी पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार 1985 साली मिळाले आहेत. त्यांना पुणे विद्यापीठाची ‘डी. लिट्’ पदवी 1986 मध्ये मिळाली. त्यांना 1988 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच, ‘ज्ञानपीठ’ हा साहित्यातील सर्वोच्च सन्मानही मिळाला.

शिरवाडकर यांनी नाशिकमध्ये ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था 1990 साली सुरू केली. त्या संस्थेचे कार्य हे विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे आणि गरीब व दलित लोकांना मदत करणे हे आहे. कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेतील कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दरवर्षी जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी नाशिक येथे झाला.

– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

—————————————————————————————————————————————

About Post Author

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here