कॉ.हरिभाऊ निंबाळकर हे फलटण नगरपालिकेपासून राज्याच्या विधानसभेपर्यंत, कामगारांच्या विविध प्रश्नांपासून अनेक क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी लढणारे झुंजार व्यक्तिमत्त्व होते. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा आमदार होते.
हरिभाऊ निंबाळकर यांना या जगातून जाऊन वीस वर्षे लोटली आहेत, तरी आजही फलटणच्या जनतेच्या मनात त्यांच्याविषयी अपार प्रेम व श्रद्धा आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला. फलटणच्या सामाजिक व राजकीय चळवळीचा इतिहास हरिभाऊ यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ते झंझावाती, वादळी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील, कॉ.शेखकाका, कॉ.शांताराम गरुड, आचार्य अत्रे यांच्याबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.
संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढवण्यासाठी एक आघाडी 1957 मध्ये स्थापन झाली होती. त्यात कम्युनिस्ट, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शेतकरी कामगार, लाल निशाण, जनसंघ या पक्षांचा समावेश होता. त्यात प्रामुख्याने हरिभाऊ निंबाळकर (फलटण), दत्ता देशमुख, यशवंतराव मोहिते (कराड दक्षिण), उत्तर सातारा लोकसभा मतदार संघातून नाना पाटील, परुळेकर पतीपत्नी, बॅ.नाथ पै, उत्तमराव पाटील, नौशेर भरूचा, केशवराव पवार (कराड उत्तर), एस.एम.जोशी, जयवंतराव टिळक, नानासाहेब गोरे, माधवराव गायकवाड, भाऊराव गायकवाड, डॉ.मंडलिक, आठल्ये गुरुजी, मुकुंदराव आंबेडकर, नाना पुरोहित, माधवराव गोडबोले, ल.मा.पाटील अशी मंडळी निवडणुकीच्या रणांगणात उतरली होती. हरिभाऊ यांचा सामना फलटण संस्थानाचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्याशी होता. त्या ऐतिहासिक निवडणुकीत मालोजीराजे यांचा पराभव होऊन हरिभाऊ विजयी झाले होते. ती निवडणूक हरिभाऊ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रभावामुळे जिंकले होते आणि तो विजय जनसामान्यांचा होता. मात्र, पुढे त्यांचा मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून 1962 च्या निवडणुकीत पराभव झाला. त्या निवडणुकीत त्यांना नऊ हजार दोनशेनऊ मते मिळाली, तर मालोजीराजे तेहत्तीस हजार सातशेएकेचाळीस मतांनी विजयी झाले.
हरिभाऊ हे सत्तेसाठी कधी लाचार झाले नाहीत. त्यांनी दैनिक ‘शिवसंदेश’ वृत्तपत्र 1983 साली सुरू केले. त्याचा अनेक आंदोलनांसाठी हत्यारासारखा वापर केला. त्यांनी त्या वृत्तपत्रातून सामान्य, शोषित, उपेक्षित अशा माणसांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडली. त्यांनी त्यांच्या संपादकीयांमधून भ्रष्ट व सत्तापिपासू प्रवृत्तींवर हल्ला चढवला. त्यांनी म्युनिसिपल कामगार संघटनांच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय्य हक्कांची लढाई चालवली, गोवा मुक्ती संग्राम असो किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, खंडवाढ लढा असो, की शेतकर्यांची आंदोलने असो, त्यांनी त्या लढ्यात हिरीरिने सहभाग घेतला. ते नेहमी त्या लढ्यांत सक्रिय सहभागी होत. त्यांना सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा यांचा मोह नव्हता. हरिभाऊ यांची पत्रकारिता निष्पक्षपाती होती. त्यांनी त्यांच्या कृतीतून सामाजिक परिवर्तनासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या त्या कार्याची दखल फलटण तालुक्यातील प्रस्थापित राजकारणी आणि मुख्य धारेतील पत्रकारितेने घेतली नाही असे खेदाने म्हणावे लागते.
त्यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून केलेले काम आदर्शवत आणि प्रेरणादायी असे आहे. शेतकरी, कामगार आणि शोषित पीडित मजूर त्यांच्या पत्रकारितेच्या केंद्रस्थानी होते.
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शेती महामंडळाची स्थापना केली. तो समाजवादाचाच भाग होता. काही वर्षे शेती महामंडळाचे काम व्यवस्थितपणे सुरू होते. मात्र त्या शेती महामंडळाला 1971 सालानंतर उतरती कळा लागली. शेती महामंडळाच्या जमिनी मूळ शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी हरिभाऊ निंबाळकर, किसन वीर, कॉ.बाजीराव जगताप यांच्यासह अनेक नेते मंडळींनी लढा दिला. त्यांच्या त्या लढयास यश मिळाले आणि खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी त्यांना पुन्हा प्राप्त झाल्या.
हरिभाऊ निंबाळकर यांनी लायन्स इंटरनॅशनल क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवले. त्यांनी राज्यातील जकात कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस पाटील वगैरे क्षेत्रांतील कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. त्यांनी वेळोवेळी प्रशासकीय यंत्रणा व राज्यकर्ते यांच्याशी संघर्ष केला. कोणी सोबत येवो अथवा ना येवो त्यांनी कोणाचीही त्यासाठी वाट पाहिली नाही. त्यांनी मिळेल त्या मार्गाने त्यांचा लढा अखंडपणे चालू ठेवला. त्यांना त्यांच्या त्या कार्यात कुटुंबीयांनी कधी अडथळा आणला नाही.
हरिभाऊ यांचे फलटणच्या ऐतिहासिक ‘छत्रपती शिवाजी वाचनालया’च्या जडणघडणीत आणि पुढे ते वाचवण्यासाठी विशेष योगदान आहे. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष अॅड.स.रा.भोसले, अॅड.जी.बी.माने, बबनराव क्षीरसागर, मस्जिदभाई शेख, आशालता चमचे, जी.टी. इनामदार सामील होते.
मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते हरिभाऊ निंबाळकर यांना दर्पण पुरस्काराने 25 जून 1995 रोजी सन्मानित केले गेले. हरिभाऊंचे त्यांच्या अशा सर्व सामाजिक कार्यांमुळे त्यांच्या पत्नी शकुंतला, मुलगा पुरुषोत्तम (राजाभाऊ) व हेमंत यांच्याकडे दुर्लक्षच झाले. कुटुंबीयांनी त्यांच्या परीने हरिभाऊंच्या पश्चात दैनिक ‘शिवसंदेश’ चालवले. ते पुन्हा सुरू व्हावे अशी हरिभाऊंच्या नातवंडांची इच्छा आहे.
हरिभाऊ यांची शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य माणसांशी असणारी नाळ तुटली नाही. हरिभाऊ यांच्याबद्दल पुरेसे साहित्य उपलब्ध नाही ही खेदाची गोष्ट आहे. नव्या पिढीला त्यांचे कार्य माहीत नाही. फलटणच्या मातीमध्ये अशी खूप माणसे काळाच्या ओघात विस्मृतीत गेली.
– सोमिनाथ घोरपडे 7387145407 sominathghorpade10@gmail.com
—————————————————————————————————————————————-
लेख अतिशय चांगला असून कायम दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तिमत्वाचा हा सन्मान आहे.