एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे त्या रोडवर वाटते. निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. त्याच्याशी होणाऱ्या हितगुजाने मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्नतेने भरून जाते. शिवतर नावाच्या गावी जाणारा तो रोड अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे…
मी आणि माझी धन्नो, निघतो सफरीला | रोड असतो सज्ज, निसर्ग घेऊन साथीला ||
रोड म्हणजे आमचा सायकल रोड! खेडपासून तीस किलोमीटर अंतरावर शिवतर नावाच्या गावी जाणारा! सर्वांच्या सोयीचा… सौम्य चढउतार… रोजच्या सायकल रपेटीसाठी अगदी योग्य… नवीन सुरुवात करणाऱ्यांना उत्तम! हळूहळू, आम्ही त्याला ‘सायकल रोड’ म्हणू लागलो, मग नुसते रोड! रोड म्हणजे सायकल रोडच…
मी जास्तीत जास्त सायकल रपेट गेली चार वर्षे रोडलाच केली आहे. बऱ्याच वेळा मी एकटी असते… त्यावेळी निसर्ग निरीक्षण आणि मनाचा मनाशी संवाद चालू असतो. नकळतच रोडशी एक नाते जोडले गेले- अगदी एखाद्या मित्रासारखे… मी त्याच्याशी हितगुज करते. त्याच्या सहवासात मन प्रसन्न, आल्हाददायक होते, मनातील विचारांना धुमारे फुटतात, लेखनाचे विषय मला तेथेच मिळतात, कविता मला तेथेच सुचतात! मन अगदी लहान मुलासारखे आनंदाने बागडू लागते. आनंदाने गाणी म्हणावीशी वाटतात. मन अतिशय उत्सुक होते, हा कोणता पक्षी, ते कोणते झाड. याचा शोध घ्यावासा वाटतो. मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ मोकळे होते. एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे रोडवर मला आश्वस्त वाटते.
रोड आहेच तसा सुरक्षित! दोन तासांत एखादी एस.टी., बाकी दुचाकी, रिक्षा आणि खासगी मोटारगाड्या यांचा वावर असतो. डांबरी गुळगुळीत रस्ता! रोडवर छोटी छोटी गावे आहेत, शाळा आहेत, विद्यार्थी चालत शाळेत जात असतात. तसेच, जंगलही आहे, मोकळे माळरान आहेत, डोंगर आहेत, नदीही आहे, निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. पावसाळ्यात नांगरणी, लावणीपासून कापणी, मळणीपर्यंत सर्व शेतीची कामे बघण्यास मिळतात. मयूरदर्शन तेथे अगदी नित्याचे आहे. त्याशिवाय हळद्या, कोतवाल, खंड्या, शिक्रा, होले, बुलबुल, वेडे राघू, पोपट, हुप्प्या असे अनेक पक्षी पाहण्यास मिळतात. गवतामध्ये मुनियांचा थवा दिसतो. मुंगुस, क्वचित सकाळी लवकर गेल्यास कोल्हा, हल्ली बिबट्याही दिसतो म्हणे, त्यामुळे लवकर जाण्यास थोडा धाक वाटतो. पावसाळ्यात साप, बेडूक वाहनांखाली चिरडून मरून पडलेले दिसतात.
तेथेच मला रस्त्यावर पडलेले साळिंदराचे काटेही मिळाले आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये भरपूर सुरवंट दिसतात. काही वेळा झाडावरून लोंबत असतात, सायकल चालवताना त्यांना चुकवावे लागते. नंतर रानफुले फुलतात व फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरे दिसतात. त्यामुळे रस्ता सुशोभित दिसतो. तर पावसाळ्यात हिरवा शालू पांघरल्याने नयनरम्य दिसतो.
आजपर्यंत कधीही न पाहिलेला शॅमेलिऑन मला रोडवरच दिसला. त्याच्या अतिमंद गतीने तो रस्ता पार करत होता, एखाद्या वाहनाखाली येईल अशी भीती मला वाटली, पण तो सुरक्षित गवतात पोचला. मी ते त्याला पहिल्यांदाच बघत असल्याने, साहजिकच पायउतार झाले व त्याचे अनेक फोटो काढले.
पाण्याचे प्रवाह ठिकठिकाणी आहेत, ते नदीला जाऊन मिळतात. छोटे धबधबे आणि ओढे… तेथे पावसाळ्यात डुंबण्याचा आनंद घेता येतो. झाडाखाली मांडलेले देव लोकांचे श्रद्धास्थान दर्शवतात.
खेडपासून दहा किलोमीटर अंतरावर जामगे नावाचे गाव आहे. तेथे श्रीकोटेश्वरी मानाईदेवीचे मंदिर आहे. तेथे शिवाजी महाराज, जिजाबाई व मावळे यांची शिल्पे साकारली आहेत. तेथे असलेल्या विहिरीला घटाचा किंवा मडक्याचा आकार दिलेला आहे. विहिरीवर रहाट आहे, त्यामुळे पाणीही सहज काढता येते. एक छोटेसे तळे व शंकराची एक भव्य मूर्ती तेथे विराजमान आहे. अनेक प्रकारच्या वृक्षराजींनी तो परिसर संपन्न आहे.
शिवतर गावात ‘सैनिक स्मारक’ नावाचे पवित्र ठिकाण आहे. पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या गावातील सैनिकांचे ते स्मारक आहे. सैनिकांचे ते स्मारक बघून मन भारावून जाते, अभिमानाने भरून येते.
सायकलपटूंनी जास्तीत जास्त सायकल चालवण्याचा असा कार्यक्रम आम्ही 15 ऑगस्टला रोडवर सकाळी सहा ते संध्याकाळी सव्वासहापर्यंत केला होता, पावसालाही आनंदाचे उधाण आले होते, आम्ही दमू नये म्हणून तो सहस्त्रधारांनी बरसत होता. ‘रोड’वरील ओढे दुथडी भरून वाहत होते. अनेकांनी दीडशे-दोनशे किलोमीटर सायकल चालवली. मी माझी पहिली शतकी रपेट त्याच दिवशी केली. सैनिक स्मारक व एक शाळा येथील झेंडावंदनाला उपस्थिती लावली.
रोडवरील आणखी एका जागेबद्दल लिहिले नाही, तर रोडची गोष्ट अपुरी राहील. ती जागा म्हणजे ‘चव्हाटा’! काहीही कार्यक्रम ठरवण्याचा असेल, कोणाचे कौतुक करण्याचे असेल तर भेटण्याची जागा…! सायकल रपेटीला गेलेले सारे तेथे भेटतात, फोटो अनिवार्य ठरतो. एखादी गोष्ट चव्हाट्यावर आणणे, म्हणजे सर्वांना माहीत करून देणे! तेथे कोणत्याही वाईट गोष्टींची चर्चा होत नाही. थोडक्यात गॉसिप नाही, तर आनंदाची देवाणघेवाण होते. पण चेष्टेत, गमतीत त्याला ‘चव्हाटा’ हे नाव पडले आहे. तो ‘चव्हाटा’ म्हणजे एका ओढ्यावर बांधलेली मोरी किंवा छोटा पूल आहे आणि चांगला रुंद असल्याने आम्ही एकत्र जमलो तरी वाहतुकीस अडथळा येत नाही.
या सर्व गोष्टी आम्हाला घरापासून केवळ पंचवीस-तीस किलोमीटरपर्यंत तेही सायकलने जाऊन मिळतात. रोड सायकल रपेटीदरम्यान केलेल्या अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आमची सायकल सफर आनंदाची करण्यामध्ये रोडचा वाटा आहे.
एक रास्ता है जिंदगी, जो थम गये तो कुछ नही!
रोड मला संदेश देतो… ‘चालवत राहा!’
– स्मिता विनायक वैद्य 9960052070 smitav1497@gmail.com
————————————————————————————————————————
खूप छान रपेट.
मीही सांगली परिसरात अशी रपेट करतो. रोज वेगळा मार्ग. कमी पंवीस तर जास्तीत जास्त नव्वद किलोमीटर अशा रपेटी वेगवेगळ्या मार्गावर केल्या आहेत. सांगलीत सायकलिंगचा खूप प्रसार झाला आहे.
कोरोनामुळे थोडा खंड पडला होता. आता पुन्हा सुरु करतोय. सायकल रपेटीवर शंभरावर लेख लिहिले आहेत.
सायकलिंग खूप छान व्यायाम प्रकार आहे. शुभेच्छा.