मतिमंदांसाठी आपापल्या परीने कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या ‘खोणी’ या गावातील ‘अमेय पालक संघटने’ने उभे केलेले ‘घरकुल’.
स्वत:च्या मतिमंद मुला-मुलींसाठी काही पालक मंडळी एकत्र आली. त्या सर्वांनी अमुक एका रकमेचे बंधन न घालता, सुरुवातीस दर महिन्याला जितकी जमेल तितकी रक्कम शिल्लक टाकण्याचे सुरू केले आणि ‘अमेय पालक संघटना’ 1991 मध्ये स्थापन झाली. त्यातून ‘घरकुल’ची इमारत 1995 मध्ये नांदती झाली. आता, 2010 सालच्या आरंभी ‘घरकुल’च्या नवीन छान वास्तूचे उद्धाटन झाले आहे.
‘घरकुला’चा पाया रचला गेला तो मूळ डोंबिवलीतील ‘अस्तित्व’ या संस्थेमधून आणि प्रामुख्याने सुधाताई काळे व त्यांचे पती कै. मेजर ग.कृ. काळे या सेवाभावी दांपत्याकडून. तसेच, बापू शेणोलीकर आणि ‘घरकुला’त सातत्याने बारा वर्षे कार्यरत
असणा-या कै. उषाताई जोशी यांचा सहभागदेखील महत्त्वाचा.
या सर्वांच्या सहकार्याने व प्रेरणेने ह्या कार्यात शिक्षक दांपत्य असलेल्या नंदिनी व अविनाश बर्वे यांनी, त्यांच्या कौस्तुभ या मतिमंद मुलाच्या माध्यमातून या कार्यात पुढाकार घेतला. दुर्दैवाने, कौस्तुभचा अलिकडेच मृत्यू झाला. इतकी वर्षे कार्यात सातत्य राखल्यानंतर बर्वे यांनी ‘घरकुल’ची जबाबदारी डोंबिवलीमधील डॉक्टर सुनील शहाणे यांच्या शिरावर सोपवली आहे.
हवेशीर व प्रशस्त विश्रामधाम, जेवणाची घरगुती चव, व्यायामाची शिस्त, बागकाम इत्यादी विरंगुळ्याची माध्यमे व ज्यांची इच्छा आहे अशा परीचितांपैकी विवाहाचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस, तसेच काही शाळा व इतर संस्थांमधील व्यक्तींनी-मुलांनी सामाजिक दृष्टिकोन जोपासावा म्हणून ‘घरकुल’ला प्रत्यक्ष दिलेल्या व देत असलेल्या भेटी, यांद्वारे ‘घरकुल’ मोकळा श्वास घेत असते.
”पावती पुस्तक घेऊन कोणाकडेही मदतीची याचना करायची नाही आणि सरकारी मदत घ्यायची नाही” हा बर्वे यांचा तत्त्वाग्रह; तरीदेखील ‘घरकुल’साठी गेल्या आठ वर्षांत एक कोटी रुपये जमा झाले, संस्थेविषयीचा सदभाव एवढा वाढला आहे की फेब्रुवारी 2010 मध्ये साज-या झालेल्या ‘कृतज्ञता दिवसा’च्या वेळी काही तासांतच येणा-या मंडळींकडून जी रक्कम जमा झाली, ती होती एक लाख रुपये!
मदतीची याचना पावती पुस्तकांद्वारे करायची नाही हा बर्वे यांचा अभिमान जरी ताठपणाचा द्योतक असला, तरी त्यांनीच विद्यार्थिजीवनापासून सामाजिक कृतज्ञतेची ओढ निर्माण झाली पाहिजे, ह्या उद्देशाने अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांद्वारे घरोघरी जाऊन ‘घरकुल’साठी मदत मागण्याचे व्रत दरवर्षी न चुकता सांभाळले आहे! अर्थात यामागचा सामाजिक उद्देश निराळा!
शिवाय, संस्थेसाठी उपयुक्त ठरावे म्हणून दरवर्षी नाटय व वाङ्मय क्षेत्रामधील तसेच न्यायाधीश, ख्यातनाम डॉक्टर व समाजधुरीण इत्यादी सेलिब्राटिजंना मुद्दामहून आमंत्रित केले जाते. याचा फायदा देणग्या मिळण्यासाठी होतोच!
”स्वत:च्या मतिमंद मुलांसाठी पण इतरांचा विश्वास संपादन करुन ‘घरकुल’चे कार्य सुरळीत सुरू आहे, ते आम्ही पेशानं शिक्षक असल्यामुळे.” निवृत्त झालेले शिक्षक दांपत्य श्री. व सौ. बर्वे याबाबत अभिमान बाळगतात. पण ‘घरकुल’ची टीम केवळ या अशा अभिमानावर संतुष्ट नाही, याचे प्रत्यंतर ‘घरकुल’च्या प्रवेशद्वाराजवळ पोचल्याक्षणी प्रत्ययास येते. ‘घरकुल’च्या कमानीतून प्रवेश करताच घुम्या, अबोल व्यक्तीचेही मन क्षणात प्रसन्न होईल असा तिथला झाडे-पाने-फुलांचा निसर्ग जोपासण्यात व अधिक घडवण्यात कार्यकर्ते मग्न असतात. मतिमंदांची मानसिकता फुलवणे हा महत्त्वाचा पायाभूत गाभा ‘खोणी’त असा विविध त-हांनी जोपासला जातो.
‘घरकुला’त प्रवेश करताना, तेथे वावरताना भेटकर्त्याच्या मनातली जळमटेही निघून जातात!
तेथील प्रत्येक खोलीत डोकावून पाहावे, भिंतींची रंगसंगती पाहवी. स्वच्छता हा कुठेही अडसर नाही. अशा रम्य वातावरणात आपणही राहावे असे भेटकर्त्या प्रत्येकास वाटणे हेच मुळात ‘अमेय पालक संघटने’च्या ‘घरकुल’चे यश आहे.
मग मतिमंदांसाठी काही खेळ, कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता म्हणून दरवर्षीचा कौतुक सोहळा इत्यादी बाबी ह्या-त्या अनुषंगाने येतातच. पण आपण मात्र खोणीला जाऊन, मतिमंदांसाठी किंबहुना वृध्दाश्रमासाठी देखील कार्य उभारताना वैचारिकता व प्रत्यक्ष फिल्डवर्कसाठी मार्गदर्शन घ्यावे असा खोणीमधील ‘घरकुल’चा लौकिक!
अविनाश बर्वे हा ठाण्यातील धडपडया माणूस. ते व नंदिनी, दोघांनी मिळून अनेक विविध गुणसंपन्न विद्यार्थी तयार केले आहेत. ह्या दांपत्याचा स्निग्ध जिव्हाळा व उत्कट सेवाभाव ही त्यांची ताकद आहे. त्यामधून ‘घरकुल’ला, तेथील कार्यपध्दतीला सद्भभाव लाभला आहे. बर्वे ह्यांनी मतिमंदांच्या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला आहे. ते स्वत: कार्यकर्ते असल्याने त्यानी देशभरातील असे प्रयत्न पाहिले आहेत. ते म्हणतात ”मतिमंदांसाठी खरी गरज आहे ती निवासी व्यवस्थेची. उलट, सरकारी मदत मिळत असल्याने ठिकठिकाणी मतिमंदांसाठी दिवसा चार तास वर्ग चालवले जातात. मतिमंद मुलांची अडचण अशी असते की ह्या वर्गांतून ती फार काही शिकू शकत नाहीत. मतिमंदत्व आणि अन्य त-हेचं शारीरिक अपंगत्व यांतील फरक जाणला पाहिजे.”
संपर्क – अविनाश बर्वे
(25337250/9869227250)
– प्रदिप गुजर