कै. सौ. वासंती लक्ष्मण काळे ह्या जरी इंग्रजी विषयातील पदवीधर असल्या तरी चित्रकला, पेंटिंग, भरतकाम, विणकाम, हस्तकला ह्या कलांमध्ये पारंगत होत्या. त्यांनी स्वत:च्या हातांनी असंख्य कलावस्तू बनवल्या होत्या. त्यांनी 1945 साली अंडयांच्या कवचावर केलेली ऑईल पेंटिंग अजून उत्तम स्थितीत आहेत.
त्यांच्या 19 ऑगस्ट 1985 रोजी निधनानंतर त्यांचे पती कै. लक्ष्मण गोविंद काळे व कुटुंबीयांनी पुणे येथे कै. सौ. वासंती काळे स्मृती फाउंडेशनची स्थापना केली. ह्या ट्रस्टच्या वतीने हौशी कलावंतांची म्हणजेच घराघरांतील गृहिणी, मुले वा इतर सदस्यांची कला लोकांसमोर यावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून त्यांच्या कलावस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येत असे व त्यांतील उत्कृष्ट कलावस्तूंना पारितोषिके देण्यात येत. सध्या प्रदर्शन न भरवता हौशी कलावंतांना पारितोषिके देण्यात येतात.
चित्रकला, पेंटिंग ह्यात खास रस असल्याने कै.सौ. वासंती काळे ह्यांनी 1950-1960 ह्या दशकामध्ये मराठी मासिकांच्या दिवाळी अंकांमध्ये छापून आलेल्या कै. रघुवीर मुळगावकर, कै. दीनानाथ दलाल ह्यांच्या मनमोहक चित्रांचा संग्रह केला होता. देवाला चेहरा देणारा रंगकर्मी असा त्या कै. रघुवीर मुळगावकरांचा गौरव केला जात असे. पन्नास वर्षे जुन्या असलेल्या ह्या छापील चित्रांतील आशय, गोडवा व जिवंतपणा अजूनही मनाला मोहून टाकतो.
आईने जमवलेला हा अनमोल ठेवा आता त्यांचे पुत्र विनय ल. काळे ह्यांनी आवडीने जपून ठेवला आहे. मूळ प्रती फारशा उपलब्ध नसल्याने कै. मुळगावकरांच्या प्रतिभेचा आविष्कार दर्शवणाऱ्या या छापील कृतींना वेगळे स्थान प्राप्त होते.
मुळगावकरांनी जवळपास तीन हजारांच्यावर चित्रे रंगवली. मुळगावकरांवर जणू दैवी वरदहस्त होता. पुराण वाङ्मयातून आपल्या मनात निर्माण झालेल्या देवदेवतांच्या प्रतिमा मुळगावकरांच्या कुंचल्याद्वारे कागदांवर उमटल्या व त्या अजूनही अनेक अध्यात्मिक पुस्तके, ग्रंथ, स्तोत्रांच्या मुखपृष्ठांवर झळकत आहेत. दुर्दैवाने, त्यांनी काढलेल्या असंख्य चित्रांपैकी थोडीच चित्रे मुळात उपलब्ध आहेत.
1950 ते 1960 च्या दरम्यान, मुळगावकरांनी काढलेली अनेक चित्रे त्यावेळच्या मराठी दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवर तसेच आतील पानांवर छापून येत असत.
श्रीकृष्ण-गौळण
गोकुळच्या गौळणी मथुरेच्या बाजारात डोक्यावर दही-दुधाचे हंडे घेऊन जात असत. गोकुळातील बाळगोपाळांच्या मुखीचा घास कंसाकडे जायचा. हा अन्याय भगवान श्रीकृष्णाला मान्य नव्हता. अन्यायाचा बिमोड करण्यासाठी देवाचा जन्म झाला होता. बाळगोपाळांच्या संगतीने कृष्ण दही-दूध चोरायचा. बाजाराला जाणाऱ्या गौळणींच्या डोक्यावरील हंडा दगड भिरकावून फोडायचा. ह्या प्रसंगाचे उत्तम चित्रण मुळगावकरांच्या ह्या चित्रात आहे. ह्या सर्व गौळणींचे श्रीकृष्णावर नितांत प्रेम होते. जो कोणी परमेश्वरावर श्रध्दायुक्त प्रेम करतो, त्यावेळी आपोआप त्याच्या अहंकाराचा घडा फुटतो व सत्त्वसार अंगावर सांडून सात्त्वि वृत्तीचा विकास होतो. चित्रातील श्रीकृष्ण अस्पष्ट आहे, हा कृष्ण लपूनछपून खडे मारतो; त्याचप्रमाणे स्वत:ला दूर ठेवून हाच परमेश्वर खऱ्या श्रध्दावानाची सात्त्विता सतत वाढवत असतो.
पादुका पूजन – भरत
मानवयोनीत जन्म घेतल्यानंतर साक्षात परमेश्वरालासुध्दा प्रारब्धाचे भोग चुकले नाहीत. श्रीरामचंद्रांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. गुरू व मोठा बंधू असलेला श्रीराम याच्यावर भरताचे अत्यंत प्रेम होते. ह्या बंधूपुढे त्याला मिळालेले अयोध्येचे राज्य फिके होते. वनवासात जाऊन त्याने रामाची परत येण्यासाठी विनवणी केली. परंतु ह्या मर्यादा पुरुषोत्तमाने मातेला दिलेल्या वचनाची मर्यादा राखली व परत येण्यास नकार दिला. तेव्हा भरताने रामाच्या पादुका मागितल्या व त्या सिंहासनावर ठेवून राज्य चालवण्याची विनंती श्रीरामाला केली. श्रीरामाच्या परवानगीने भरताने रामाच्या पादुकांचे पूजन करून राज्य सांभाळले. पृथ्वीतलावरील हे प्रथम पादुकापूजन. इथपासूनच पादुकापूजनाची सुरुवात झाली. भरताने भक्तिभावाने श्रीराम-सीतेचे स्मरण करून श्रीरामपादुका मस्तकी लावल्या आहेत. त्यावेळचा भरताच्या चेहऱ्यावरील कृतार्थतेचा, भक्तिभावाचा, आदरयुक्त भाव व तसेच श्रीरामाच्या व सीतेच्या चेहऱ्यावरील कौतुकयुक्त प्रेमळ भाव मुळगावकरांनी रेखाटले आहेत. भरताच्या गळयातील रूद्राक्षांची माळ वैराग्याचा भाव प्रगट करते.
माझे जीवन, माझे कार्य, हे सर्व तुझेच आहे व मी ह्या सर्वांचा केवळ केअरटेकर आहे हा भाव भरताच्या ह्या कृतीतून प्रगट होतो.
कालियामर्दन
प्रत्येकाच्या मनात कालियारूपी विकार दडलेले आहेत. ह्या विकाररूपी कालियाचे मर्दन करण्यासाठी डोहामध्ये भगवतांचे अवतरण होणे जरूरीचे आहे. कालिंदीच्या डोहामध्ये भगवान श्रीकृष्णाने कालियाचे मर्दन केले. कालिंदी म्हणजे काळरूपी जीवन. ह्या जीवनप्रवाहात आत्मविश्वासाने, धाडसाने जी कृती केली जाते त्याचीच नौका पार होते. बालकृष्णाने कालियामर्दन केले. आत्मविश्वासाने धरलेली शेपटी चित्रात दाखवली आहे. सापाची शेपटी सतत वळवळत राहते. अगदी त्याला मारल्यावरसुध्दा. म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी विकाररूपी कालिया वळवळत राहतो. आपले अस्तित्व दाखवत राहतो, पण इथेतर शेपटाला वळवळण्याचीसुध्दा परवानगी नाही. कालियाचा संपूर्ण नाश. भगवंताच्या नामस्मरणाने विकाररूपी कालियाचे आत्मविश्वासाने मर्दन करून अंधाराच्या ऐलतीरावरून प्रकाशाच्या पैलतीराकडे वाटचाल करता येते!
अहिल्या उध्दार
पतिव्रता पंचकन्यांत समावेश झालेली माता- अहिल्या. गौतमऋषींनी तिच्या चारित्र्याबद्दलच्या संशयाने तिला शाप दिला. त्या शापाने अहिल्या शीळा झाली. रागाच्या भरात दिलेल्या शापाचे परिमार्जन करण्यासाठी गौतमाने श्रीरामाच्या पदस्पर्शाने तिचा उध्दार होईल, असा उ:शाप दिला. शापग्रस्त अहिल्या संयमाने श्रीरामाची वाट पाहत राहिली. वनवासी राम फिरत फिरत त्या शिळेजवळ आला. साहजिकच, श्रीरामांना ह्या सर्व गोष्टींची माहिती होतीच व म्हणून त्यांनी त्या शिळेला पदस्पर्श करून अहिल्येचा उध्दार केला व अहिल्या पुन्हा मानवी रूपात प्रकटली. परमेश्वराची त्याच्या सर्व बालकांवर सतत नजर असते. प्रत्येकाचे सुखदु:ख त्याला पूर्णपणे ठाऊक असते. भक्तिमार्गातील अत्यंत महत्त्वाच्या अशा श्रध्दा व सबुरी ह्यांची प्रचीती आपल्याला येथे येते. संपूर्ण श्रध्देने श्रीरामाच्या नामस्मरणात मग्न असलेली शीळारूपी अहिल्या सबुरीने श्रीरामाच्या आगमनाची वाट पाहत असते. कारण तिला ठाम विश्वास असतो, की श्रीरामचंद्र कधी ना कधी तरी तिथे येतील व तिचा उध्दार करतील. प्रत्येक मानवानेसुध्दा परमेश्वराच्या अफाट कारूण्यावर विश्वास ठेवून अत्यंत श्रध्देने व सबुरीने आपले कार्य करत राहावे, सबुरीने स्वत:च्या उध्दाराची प्रतीक्षा करत रहावी.
विश्वामित्र तपस्या भंग
देवत्व प्राप्त होण्यासाठी विश्वामित्रांनी तपस्या आरंभली. विश्वामित्रांचे तपोबल जसजसे वाढू लागले तसतशी देवांच्या मनात भीती निर्माण होऊ लागली. विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करण्यासाठी विविध मार्ग योजण्यात आले. परंतु तपश्चर्या भंग होण्याची चिन्हे दिसेना. माणसाचा सर्वात मोठा शत्रू असणाऱ्या मानवी मनाच्या दौर्बल्याचा फायदा घेण्याचा निर्णय झाला. रूपवान, मादक अशा मेनकेचा जन्म झाला. मदनमस्त मेनका विश्वामित्रांच्या सभोवर नृत्य करू लागली. विश्वामित्रांचे बुध्दीच्या संपूर्णपणे ताब्यात असलेले मन डळमळू लागले व एका बेसावध क्षणी न राहवून विश्वामित्रांनी डोळे उडघले व कैक वर्षांची तपश्चर्या व त्याचे फळ ह्यांस मुकले.
mind is a creator or a destroyer. जोपर्यंत मन बुध्दीच्या ताब्यात असते तोपर्यंत माणसाची प्रगती होत राहते. कारण मन फक्त भावना जाणते. राग, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ह्या षड्रिपुंच्या भोवऱ्यात असलेले मन माणसाला घडवू शकते किंवा त्याचा सर्वनाशही करू शकते. बुध्दी मात्र अनुभव, माहिती, ज्ञान ह्या सर्वांचा सांगोपांग अभ्यास करून उचित निर्णय घेत असते. विविध प्रकारची सकारात्मक व नकारात्मक अशी प्रलोभने सदैव येत असतात. परंतु स्वत:च्या उन्नतीसाठी उचित मार्ग ठरवण्यासाठी मन नेहमी बुध्दीच्या ताब्यात असणे जरूरीचे असते व हे फार कठीण काम आहे. परंतु ठाम निश्चय, निर्णय घेतला तर हे कदाचित शक्य आहे. आपल्या जीवनात आपल्याला आपले जीवन परिपूर्ण करायचे असल्याने मनावर विजय मिळवणे जरूरीचे आहे. हेच ह्या चित्राद्वारे प्रतीत होते.
– विनय काळे
vinaykale7@gmail.com