महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्यासाठी, आपण पहिली पंचवीस वर्षे आणि त्यापुढील पंचवीस वर्षे, असे दोन भाग करू. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, सांस्कृतिक जडणघडणीत अनेक स्थित्यंतरे आली. पहिल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्र समृध्द, संपन्न झाला. कला, संस्कृती बहरली. राजकारणात बदलाचे वारे वाहू लागले. समाजकारणाची बैठक व्यापक झाली. विचारवंत, सुधारक आणि पत्रकार यांनी केलेल्या चळवळींनी महाराष्ट्र जागृत झाला, पेटून उठला, शिक्षणाचा प्रसार झाला. समाज सुशिक्षित झाला. महाराष्ट्राची धारणाशक्ती विस्तृत झाली. लेखक-साहित्यिकांनी महाराष्ट्रशारदेला अन् रसिकांना संपन्न केले. औद्योगिकीकरणाचा जोर वाढला. महाराष्ट्र प्रगतिपथावर होता.
परंतु पुढील पंचवीस वर्षे म्हणजे 1985 नंतरचा काळ महाराष्ट्रासाठी यशदायी ठरले नाही. 1985 नंतर बदलाचे वारे वाहू लागले आणि हे बदल इतके परिणामकारक होते, की त्यामुळे अवघा महाराष्ट्र पाश्चात्य संस्कृतीच्या स्वाधीन झाला. राजकारणात गटबाजी, भ्रष्टाचार बोकाळला. राजकारण्यांनी केलेल्या चळवळी या जनतेच्या भावनांचा, प्रादेशिक अस्मितेचा वापर करून भावनिक स्तरावर घडवून आणल्या. या चळवळींना व्यापक वैचारिक अधिष्ठान नव्हते. म्हणूनच त्यातून झालेले निर्णय हे अन्याय्य ठरले.) राजकारण्यांच्या दबावाखाली पत्रकार, विचारवंत दबले. वैचारिक चळवळी मंदावल्या. समाजाचा वैचारिकतेवरचा विश्वास उडाला. कृतिशून्य अन् उदासीन असा हा समाज भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अधीन झाला अन् परिणामी मूल्यांचा -हास सुरू झाला. नैतिकता ढासळली आणि या सा-याचा मोठा परिणाम म्हणजे व्यक्ती आत्मकेंद्री होऊन समाजापासून दूर गेली!
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याच्या बेतात राज्य शासन व शिवसेना-मनसे आहेत. अनेकविध कार्यक्रमांची योजना आखली गेली आहे. परंतु मला पडलेला प्रश्न हा आहे की खरंच संपूर्ण महाराष्ट्र इतक्या उत्साहात आहे का? महाराष्ट्राच्या खेडयांत चौदा-सोळा तास भारनियमन आहे. वीज आणि पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. विदर्भ-मराठवाडयात तर समस्या अतिशय भयावह आहेत. शेतक-याच्या आत्महत्या, त्यांचे प्रश्न इतकेच काय तर आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणदेखील वाढत चाललेय. नवनव्या शैक्षणिक धोरणांमुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला अडकलाय. बेळगाववासीयांचा सीमाप्रश्न वादात आहे. राजकारण दुभंगलंय. घोटाळे, गटबाजी यांमुळे पूर्वग्रहदूषित झालंय. भाषेचे प्रश्न अनुत्तरीत आहेत. समाजमन विस्कळीत झालंय. वैचारिक उदासीनता आणि आत्मकेंद्री वृत्ती समाजव्यवस्था नष्ट करू पाहतेय. एका बाजूला अगदी लखलखाट आहे तर दुस-या बाजूला अंधकार. आजच्या महाराष्ट्रातील विदारक स्थितीचे वास्तववादी चित्रण आहे.
सुवर्ण महोत्सव साजरा करताना, गेल्या पन्नास वर्षांतील महाराष्ट्राच्या विकासाच्या रूपरेषेची (आर्थिक, सामाजिक, राजकीय) आकडेवारी सांगताना सत्ताधारी राज्य शासन खुशालमस्त आहे. विकासयोजनांचे कागदोपत्री पुरावे दाखवत, महाराष्ट्र राज्य कशा प्रकारे प्रगतिपथावर आहे हे सांगताना येत्या वर्षात मंत्री महोदयांची भाषणे रंगणार आहेत. परंतु माझा या आकडेवारीवर विश्वास नाही. ''लोकांचे समाधान हेच लोकशाही कारभाराचे लक्ष्य असायला हवे'' आणि माझ्या मते, जोपर्यंत समाजातील तळागाळातील सामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र राज्य प्रगती करू शकणार नाही.
राज्याला पन्नास वर्षं होऊनदेखील सामाजिक असुरक्षितता, राजकीय अनवस्था, तौलनिक सर्वंकष विकास साधण्यात अपयश, वैचारिक औदासीन्य या पार्श्चभूमीवर आपण सुवर्ण महोत्सवाचे बेत आखतोय. महाराष्ट्राच्या राजकारणाने आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. ज्याच्या हाती पैसा त्याच्याच हाती सत्ता आणि सत्तेत घराणेशाहीची परंपरा राजकारणात सामान्यांचे अस्तित्वच नष्ट करू पाहतेय. स्वार्थी आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांमुळे सामान्यांचे प्रश्न अनुत्तरीत आहेत. स्वत:ला सहकारमहर्षी, शिक्षणसम्राट आणि साखरसम्राट समजणारे सत्ताधारी राज्यकर्ते राजकारणात राहून समाजकारणाचे भविष्य ठरवतायत. 'राजकीय सेन्सॉरशिप' हा प्रकार नव्याने समाजमन विस्कळीत करतोय.
महाराष्ट्रात एक पक्ष चाळीस वर्षे केवळ मराठी भाषा आणि अस्मिता या भावनिक विचारधारेमुळे टिकून आहे. नव्याने उदयाला आलेली अ'राज'क सत्ता मराठी भाषेला राजकारणाच्या आखाडयात उतरवू पाहतेय. भाषिक अस्मितेच्या बळावर राजकारणाचे आखाडे रंगवले जात आहेत.
या गदारोळात एक गोष्ट मात्र सशक्त झालीय ती म्हणजे पत्रकारिता! महाराष्ट्रभर वैचारिक आंदोलनं करण्याचे काम प्रसारमाध्यमे करत आहेत, परंतु इतके असूनही भाषेचे प्रश्न कागदोपत्री अडकून पडले आहेत. 1 मे 1960 रोजी केलेल्या भाषणात यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, की ''हे राज्य मी एका जातीचे होऊ देणार नाही. मराठा हा शब्द जातिवाचक नाही आणि हे मराठा राज्य मुळीच होऊ देणार नाही.'' परंतु आज काहीशा संकुचित विचारसरणीच्या पक्षांनी मराठा राज्याची मागणी केलीय. यशवंतरावांचे शब्द महाराष्ट्र विसरत चाललाय.
आपली शिक्षणपध्दत ही MASS EDUCATION या प्रकारातील आहे. विद्यार्थ्यांचे वाढते प्रश्न लक्षात घेता या क्षेत्रात प्रत्येक वर्षी नवनवीन क्रांतिकारी बदल होत आहेत. परीक्षा पध्दत संपूर्णत: MARKS ORIENTED झालीय. शिक्षकी पेशाचा तोल ढासळलाय. मोठमोठया शिक्षणसंस्थांचे बुरुज कोसळले आहेत. विद्यापीठांमध्ये अनागोंदी व्यवहार चालू आहेत. आणि त्यातच भर म्हणून कुलगुरूपदासाठी आखाडयात सामना रंगलाय. एकंदरीत काय शिक्षणाचा दर्जा खालावतोय.
यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या द्रष्टया आणि प्रगल्भ राजकीय नेत्यापासून महाराष्ट्राची राजकीय अस्मिता उदयाला आली. महाराष्ट्राचा मंगलकलश स्वीकारणाऱ्या या नेत्याच्या दृष्टीतला महाराष्ट्र आपण साकारू शकलो नाही. महाराष्ट्रात कित्येक खेडयांत ज्ञानगंगा पोचली नाही. तरुण बेरोजगार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकच तीव्र होत चालले आहेत. शेतीचा विकास मंदावलाय. गरिबी, दारिद्रय यांमुळे ग्रामीण आणि शहरी भागांतील आर्थिक दरी वाढत चालली आहे. विदर्भ-मराठवाडा भागांचे प्रश्न कागदोपत्रीच आहेत. बेळगाव सीमाप्रश्नासारखे प्रश्न इतके ताणले गेले आहेत की पुढल्या दहा वर्षांत तरी हे प्रश्न सुटतील असं वाटत नाही. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत आणि महाराष्ट्राचे राजशकट हाकणारे मंत्रिमहोदय मात्र खुशालमस्त आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शासनातर्फे प्रत्येक स्तरावरून प्रयत्न करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर यासाठी महाराष्ट्राचे सामाजिक मन एकजिनसी होणे आवश्यक आहे. विदर्भ-मराठवाडा-बेळगाव यांच्याशी किंवा नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर इथल्या आपल्याच जनतेशी महाराष्ट्राचे सामाजिक मन एकरूप होणे आवश्यक आहे.
सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण विचारप्रवृत्त होण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व समस्यांचा शास्त्रशुध्द आणि न्याय्य मार्गाने तौलनिक अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. समाजव्यवस्थेच्या जुन्या परंपरावादी सिध्दांतांना बाजूला सारून नवीन वैश्विक मूल्यात्मक समाजाची रचना करणे गरजेचे आहे. बदल हा घडलाच पाहिजे. महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेत, सार्वभौम अस्तित्वात! हा बदल मराठी माणसाच्या किंबहुना महाराष्ट्रशारदेचा भाग असणा-या प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये अपेक्षित आहे. महाराष्ट्राची वैचारिक शक्ती आणि त्यावर आधारित सुधारणाप्रणित क्रियाशक्ती सुदृढ झाली पाहिजे, पण हा बदल वरून घडणार नाही हे देखील लक्षात घेतले पाहिजे. हा बदल तळागाळातून घडवायला पाहिजे. सामान्यांच्या वैचारिक धारणेतून हा बदल घडू शकेल.
फक्त लेख लिहून आणि चर्चासत्र करून समाज बदलणार नाही किंवा उद्याचा महाराष्ट्र घडणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. तरुणांचा सक्रिय सहभाग या कार्यात अपेक्षित आहे. प्रत्यक्ष राजकारणात आणि प्रशासकीय सेवेत नवोदित तरुण सक्रिय झाल्यास उद्याचा महाराष्ट्र नक्कीच विकसित राज्य असेल.
आजच्या या नैराश्यपूर्ण समाजजीवनात, मी अजूनही आशावादी आहे आणि बदल (change) या गोष्टीवर आजही माझा दृढ विश्वास आहे. because I think I am here to change the system, not to be the part of the system.
– उन्मेश शंकर झगडे
9967433149
uszagade@gmail.com
Last Updated On – 1 May 2016