स्वागत थोरात – अंधांच्या आयुष्यातील प्रकाश (Eye Opener Swagat Thorat)

0
136

स्वागत थोरात अंधांचे जगणे सुकर व्हावे, त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी द्यावी यासाठी जेथे गरज असेल, तेथे समुपदेशनासाठी जातात. अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून त्यांच्याकडून प्रत्यक्ष सराव करून घेतात. स्वागत यांनी त्या अंध बांधवांच्या मनात शिरून त्यांची प्रतिभा, बुद्धीची क्षमता ओळखून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची तिरीप दाखवली आहे…

स्वागत थोरात याची ओळख बहुपेडी आहे. तो चित्रकार, वन्यजीव छायाचित्रकार, संपादक, नाट्य दिग्दर्शक असा बराच काही आहे. तो मूळचा अहमदनगरचा. तो 1991 मध्ये नगर सोडून पुण्याला आला. त्याला अचानक एक संधी आली आणि त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडला. ‘नाटक’ हे स्वागतचे प्रेम आहे. पुण्यातील बालचित्रवाणीने स्वागतला ‘अंध विद्यार्थ्यांची शि‍क्षणपद्धत’ या विषयावरील माहितीपटाची संहिता लिहिण्याची जबाबदारी 1993 मध्ये दिली. त्याला अंध लोकांबद्दल माहिती काही नव्हती, पण त्याचा निग्रह अनोख्या वाटेने जाण्याचा असे; तसेच, त्याची प्रेरणा अनभिज्ञ क्षेत्रात उतरण्याची असे. ते गुण तेथे त्याच्या कामी आले. तेच तर त्याचे वेगळेपण आहे.

स्वागतने पुण्यातील अंध शाळांना भेटी दिल्या; त्यांचा अभ्यास करणे सुरू झाले. तो अंध मुलांचे, त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या शिकवण्याचे निरीक्षण करू लागला. काही प्रश्न त्याच्या मनात घोंगावू लागले. उदाहरणार्थ, घरातील वीज गेल्यावर डोळस माणूस काही पर्याय शोधतो – कंदील, मेणबत्ती अथवा तत्सम काही. ज्या मुलांना दृष्टी नसेल, त्यांच्यासाठी काय काय पर्याय असू शकतात? त्यांची मानसिकता कशी असते? असे काही प्रश्न त्याने टिपून काढले. त्याने त्याची उत्तरे स्वतः मिळवावी असे ठरवले. त्याने स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी अंधांची मानसिकता समजून घेण्यासाठी बांधली आणि दिनक्रमाला सुरुवात केली. स्वतःचाच अभ्यासक्रम, स्वतःचे शिक्षण, स्वतःच शिक्षक! त्याला ते करताना, डोळस लोक त्यांच्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमता किती कमी वापरतात याचा प्रत्यय आला. त्याने डोळ्यांवर पट्टी बांधून धातू-लाकूड-कापड-कागद यांचे स्पर्श, ते जमिनीवर पडल्यास त्यांचा येणारा आवाज, कोऱ्या कागदांचा आवाज, नव्या वृत्तपत्राचा वास, जुन्या वृत्तपत्राचा स्पर्श आणि वास, थंडाव्याचा-कोमटपणाचा स्पर्श… एक ना अनेक अशा गोष्टी समजून घेतल्या. त्याने ज्ञान डोळ्यांखेरीज कसे मिळू शकते याच्या नोंदी काढल्या आणि थोड्याच काळात, तो अंध व्यक्तींच्या आयुष्यातील प्रकाश बनला!

त्याने अंधांना त्यांच्या नाटकाची शक्यता दाखवली, त्यांच्यात नाटकाची आवड निर्माण केली; त्याने महापौर करंडक स्पर्धेच्या निमित्ताने अंध मुलांचे नाटक बसवले. त्यासाठी अठ्ठ्याऐंशी अंधांनी नाटकात सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्वागतने त्यांपैकी कोणाला नाकारायचे नाही असे ठरवून संहिता लिहिली. दिग्दर्शकही तोच झाला. त्याने स्वातंत्र्यदिनाच्या पन्नासाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ हे नाटक अवघ्या बारा दिवसांत बसवले. अठ्ठ्याऐंशी अंध विद्यार्थी आणि स्वागत अशी टीम! सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम नाटक, सर्वोत्तम संहिता अशी बक्षिसे त्या नाटकाला मिळाली. ‘अंध’ असा वेगळा विभाग स्पर्धेमध्ये नसताना, अचाट पद्धतीने, अफाट मेहनतीने सादर केलेले ते नाटक, नंतर ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदले गेले!

स्वागतने ‘स्पर्शगंध’ नावाचा ब्रेल लिपीतील पहिला दिवाळी अंक 1998 मध्ये प्रकाशित केला. स्वागत पटवून देतो, की “त्यांना दृष्टी आहे, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत; केवळ नेत्र नाहीत. ती ‘माणसे’ आहेत. त्यांनाही सगळे अनुभव घेण्यास आवडतात !” स्वागतने ‘स्पर्शज्ञान’ नावाचे ब्रेल लिपीतील पहिले नोंदणीकृत मराठी पाक्षिक 15 फेब्रुवारी 2008 पासून सुरू केले. वाचनाची आवड असलेल्या हजारो अंध बांधवांच्या बोटांनी स्पर्शलेला तो खजिना त्यांच्याकरता अद्भुत आनंदाचा ठेवा ठरला! त्याने स्वतःचे चार/साडेचार लाख रुपये प्रकल्पासाठी ब्रेल मशीन आणण्याकरता जमवले आणि ते मशीन आयात करून पाक्षिक सुरू केलेस्वागतने त्या अंकांमधून क्रिकेट व गुन्हेगारी वगळून सामाजिक प्रश्न, आंतरराष्ट्रीय विषय, शिक्षण आणि शिक्षणातील संधी, आरोग्य, संगीत, पाककृती आणि इतर कितीतरी गोष्टींचा धांडोळा घेतला. अंध हिंदी भाषिकांनाही मासिकामुळे वाचण्याची ऊर्मी दाटून आली. काय करावे? त्याने हिंदीतील ब्रेल पाक्षिक मार्च 2012 मध्ये सुरू केले. त्याचे नाव आहे ‘रिलायन्स दृष्टी’. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी हिंदी ब्रेल पाक्षिकासाठी त्याला सहाय्य देऊ केले. स्वागत त्याचा मुख्य संपादक आहे. जगातील सर्वात जास्त छापले जाणारे आणि वाचले जाणारे ते ब्रेल पाक्षिक आहे असे स्वागत अभिमानाने सांगतो. बावीस महाविद्यालयांच्या ग्रंथालयात ब्रेल विभाग सुरू झाला आहे आणि त्यासाठी स्वागतचे कष्ट आणि आकांक्षा कारणीभूत आहेत. त्याच्या संकल्पनेतून 2013 सालापासून अंधांसाठी ब्रेल आणि डोळसांसाठी इंग्रजी एकत्र असलेले टेबल-कॅलेंडर आणि स्वयंपाकघरात उपयोगी पडतील अशा ब्रेल व मराठी ‘चिट्ट्या’ (स्टिकर्स) तयार झाल्या आहेत. तो ‘ब्रेलमन ऑफ इंडिया’ म्हणूनच ओळखला जातो!

त्याने ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘संगीत समिती स्वयंवर एकांकिका’, ‘अपूर्व मेघदूत’ अशी नाटके अंध विद्यार्थ्यांना घेऊन दिग्दर्शित केली आहेत. त्या नाटकांचे प्रयोग बघताना ते कलाकार अंध आहेत असे मुळी वाटतच नाही ! ‘तुमचं काम खूप मोठं आहे हो. अंध मुलांना घेऊन तुम्ही इतकी छान नाटकं बसवता, पण वाईट वाटतं हो, त्यांना ते बघायलाच मिळत नाही याचं…’ अशा प्रकारची करुणेने माखलेली प्रतिक्रिया एका श्रोत्याने स्वागत थोरात यांच्या समोर त्यांच्या एका मुलाखतीमध्ये मांडली. त्यावर शांत, संयमित स्वरांत स्वागत म्हणाला, “त्यांच्यासाठी, नाटक स्वतः बघण्यापेक्षा, ज्या आत्मीयतेने ते हे नाटक साकार करत असतात, नाटकाशी अंतर्मनाने एकरूप झालेले असतात, त्या सादरीकरणाचा आनंद ‘प्रत्यक्ष बघण्या’पेक्षा जास्त मोठा असतो!” त्याच्या त्या उत्तराने डोळस व्यक्तींनासुद्धा नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते! त्याने पुलंचे ‘तीन पैशांचा तमाशा’ हे नाटक चव्वेचाळीस अंध कलाकारांना घेऊन सादर केले. त्यासाठी तो सुनीताबाईंना भेटण्यास आणि नाटकाला त्यांना बोलावण्याकरता गेला असतानाची गोष्ट. सुनीताबाईंनी नाटकाबद्दल जाणून घेतले. मात्र, त्या म्हणाल्या, “भाई जे बघू शकत नाही, ते मला बघावेसे वाटत नाही. मात्र, प्रत्येक वेळी या नाटकाच्या सादरीकरणाआधी आणि नंतर मला भेटण्यास येत जा आणि कसं झालं नाटक ते सांगत जा.” त्यावेळी त्या पुलंचे अप्रकाशित साहित्य वाचत होत्या, गोळा करत होत्या. त्यांच्या डोळ्यांवर खूप ताण आला होता. डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘इतका ताण देऊ नका, डोळ्यांना अंधत्व येईल.’ त्यावर सुनीताबाई म्हणाल्या, “स्वागतच्या या नाटकामुळे मला अंध होण्याची भीतीच मुळी वाटेनाशी झाली!”

स्वागत अंधांचे जगणे सोपे व्हावे, त्यांचे खचलेले मन उभे करावे यासाठी ठिकठिकाणी, गावोगावी, जेथे गरज असेल तेथे जातो. त्याच्या अंध आणि डोळस मित्रांच्या साहाय्याने त्यांचे समुपदेशन करतो. अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून त्यांच्याकडून प्रत्यक्ष सराव करून घेतो. या ‘स्वयंसिद्धता’ (मोबिलिटी) प्रशिक्षणाने कितीतरी अंध लोकांची मने आनंदाने उजळून गेली आहेत. स्वागतने डोळे नसलेल्या त्या बांधवांच्या मनात शिरून त्यांची प्रतिभा, त्यांच्या बुद्धीची क्षमता ओळखून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची तिरीप दाखवली आहे, त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला आहे. त्याने डोळे असून आंधळे असणाऱ्या समाजालासुद्धा दृष्टी दिली आहे. त्याला मिळालेले मोजके पुरस्कार म्हणजे सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे ‘रिअल हिरो’, लुई ब्रेल शिक्षण (परतूर)संस्थेतर्फे ‘लुई ब्रेल’, दीपस्तंभ (जळगाव)तर्फे ‘विवेकानंद’, स्नेहालय-अनाम प्रेम (अहमदनगर)तर्फे ‘लुई ब्रेल’, वुई नीड यू (ठाणे)तर्फे ‘सेवाव्रती’, ‘इन मुंबई चॅनेल’चा ‘सॅल्यूट मुंबई’, नॅब (चिपळूण)तर्फे ‘बाई रतनबाई घरडा’.

त्याच्या मुलाखतीनंतर, प्रश्नोत्तरांच्या वेळी “आम्ही काय मदत करू शकतो?” हा प्रश्न त्याला विचारल्यावर तो सांगतो, “तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही देऊ शकता, पैसे असतील तर पैसे द्या, ज्ञान असेल तर ज्ञान द्या, कला द्या, प्रेम द्या…” हे उत्तर ऐकले आणि त्या उत्तराने सगळ्यांचे डोळे उघडले!

– अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com

——————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here