पैशाला प्राप्त झालेले अवाजवी महत्त्व, ‘स्व’केंद्रित विचार आणि भौतिक गोष्टींमध्येच सुख मानण्याची मनोवृत्ती या आणि अशा इतर कारणांमुळे महाराष्ट्राला अनेक सामाजिक समस्यांनी घेरले आहे. पूर्वीच्या काळातील काही सामाजिक प्रश्नांची तीव्रता थोडयाफार प्रमाणात कमी झाली आहे, तर काही प्रश्नांची तीव्रता इतकी वाढली आहे, की एकूण विकासावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे.
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी व्यसनाधीन व्यक्तीकडे संपूर्ण समाज काहीशा वेगळया दृष्टीने बघत असे. आता व्यसनांना प्राप्त झालेल्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे त्यातून निर्माण होणारे अनेक प्रश्न व्यक्ती, कुटुंब आणि समाज अशा सगळयाच घटकांना पोखरत चालले आहेत. व्यसनाधीनतेच्या प्रश्नाचा विचार केला तर गेल्या काही वर्षांत यामधील स्त्रियांचे वाढत गेलेले प्रमाण आणि व्यसनाधीन मुलांचा कमी होत चाललेला वयोगट समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. तंबाखू, सिगारेट, दारू या जुन्या व्यसनांबरोबर अनेक नवीन प्रकारची व्यसने सामाजिक स्वास्थ्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
व्यसनांप्रमाणे आरोग्य हादेखील एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे. कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू यांच्यापासून तर एचआयव्ही, साथीचे आजार, अतिखाण्यामुळे होणारे आजार अशा एक ना अनेक आजारांच्या यादीने महाराष्ट्राचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
एवढेच नाही तर बदललेल्या जीवनशैलीने अनेक नवीन सामाजिक प्रश्न निर्माण केले आहेत. चंगळवादी वृत्तीमुळे गुन्हेगारी, असुरक्षितता, ताणतणाव, प्रदूषण, लैंगिक अत्याचार अशा अनेक सामाजिक प्रश्नांचे जाळे आपल्या भोवती निर्माण झाले आहे. या सगळयांचा विचार केला, की मन सुन्न होते. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राचे हे सामाजिक चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित होते.
या सगळयांकडे पाहताना काही प्रमुख मुद्यांचा विचार जाणीवपूर्वक करायला हवा. आपल्याकडील समाजव्यवस्थेतील सगळयांत महत्त्वाचा घटक म्हणजे कुटुंब. गेल्या काही वर्षांत आपल्याकडील कुटुंबव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. एकत्र कुटुंबपध्दत बाद होऊन विभक्त कुटुंबपध्दत निर्माण झाली, इतका हा बदल सूक्ष्म नाही. तर कुटुंबाच्या आकाराबरोबर त्यातील संस्कार, संवाद, जबाबदारी, प्राधान्यक्रम, कुटुंबातील सदस्यांबद्दल वाटणारा भीतीयुक्त आदर या सगळयांमध्ये झालेला बदल नव्या पिढीला चुकीचे संदेश देत आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण विभक्त कुटुंबपध्दतीचा स्वीकार केला पण त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडायला आपण साफ विसरलो आहोत.
पैशांना महत्त्व देणारे, ताणतणाव कमी करण्यासाठी व्यसनांच्या आहारी जाणारे, भौतिक सुख म्हणजे खरे सुख हे आपल्या कृतीतून दाखवणारे आणि मुख्य म्हणजे मुलांशी यांत्रिक संवाद साधणारे पालक भविष्यातील नवीन सामाजिक प्रश्नांना खतपाणी घालत आहेत. पालकांच्या प्रत्यक्ष कृतीतून नवीन पिढीपर्यंत पोचणारे हे चुकीचे संदेश घातक आहेत. यासाठी प्रथम पालकांनी आपल्या केवळ विचारांमध्ये नाही तर कृतीतही बदल करण्याची गरज आहे. स्वत: चुकीचे वागून मुलांना आदर्श वागणुकीची सक्ती करणारे पालक नक्की काय साध्य करू पाहात आहेत? सुखाच्या चंगळवादी चौकटीतून थोडे बाहेर बघितले तर अनेक छोटया गोष्टींमध्येही आपल्याला आनंद मिळतो, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे.
सगळयात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबामधला संवाद वाढण्याची गरज आहे. पैसा आणि करिअरबरोबर आपले कुटुंब आणि आपले पालकत्व तितकेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्यायला हवे. नोकरी-व्यवसायातल्या जबाबदाऱ्यांमुळे मुलांना फारसा वेळ देता येत नाही, अशी तक्रार आजचे अनेक पालक करतात. यामुळे पालकांमध्ये अपराधाची भावना निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून सुट्टीच्या दिवशी मुलांबरोबर मोठमोठया मॉलमध्ये जाऊन खरेदी करणे, महागडया हॉटेलांत नेणे, त्यांचे वाढदिवस जंगी थाटात साजरे करणे अशा मार्गांचा अवलंब अनेक पालक करताना दिसतात. खरे तर, हे सगळे करत असताना आपली मुले केवळ भौतिक सुखाचा आनंद घेत आहेत, आपल्या सहवासाचा नाही हे पालकांच्या मुळी लक्षातच येत नाही. लहानपणापासूनच्या या सवयींमुळे नवीन पिढीतदेखील चंगळवादाची लागण व्हायला वेळ लागत नाही. पुस्तके वाचणे, संगीत ऐकणे, एखादा छंद जोपासणे, घरातल्यांशी शेअर करणे यांतूनही खूप आनंद मिळतो हे आजच्या मुलांच्या तर सोडाच पण पालकांच्याही गावी नसते. यातूनच कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे स्वास्थ्य बिघडत जाते.
सुरूवातीला स्पष्ट केलेल्या सामाजिक प्रश्नांच्या साखळीची पहिली कडी आपल्या कुटुंबातच निर्माण होत आहे, हे विसरून चालणार नाही. चंगळवादातून निर्माण झालेला ‘स्व’चा अतिरेक बाजूला सारून नवीन पिढीमध्ये सामाजिक भान निर्माण केलं तरच काही प्रमाणात सुदृढ समाजव्यवस्था निर्माण व्हायला हातभार लागू शकतो. आमच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या उध्दाटनप्रसंगी ‘हे केंद्र लवकर बंद होवो’, अशा शुभेच्छा महाराष्ट्रभूषण पु.ल. देशपांडे यांनी दिल्या होत्या. मात्र दुर्दैर्वाने तसे न होता या केंद्राचा विस्तार अधिक करण्याची गरज निर्माण झाली. हे वास्तव बदलण्यासाठी वेळीच उपाय करण्याचा निश्चय या महाराष्ट्रदिनानिमित्त आपण सगळयांनी करायला हवा.
शब्दांकन : ममता क्षेमकल्याणी
vidisha_mn@yahoo.co.in
9881736078