‘अमृतवेल’ बहरत आहे!

0
37

अनिल बळेल

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उच्च अभिरुचीच्या साहित्य -नाटक -भावसंगीतामध्ये रमणारा मराठी रसिक माणूस हा संस्कृतिकारणापासून दुरावल्यासारखा झाला आहे. अशा वेळी प्रेक्षकांना-वाचकांना साहित्यविश्वाची ओळख होणे, त्यांना वाचनाची गोडी लावण्याचे प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे, हे ओळखून रविराज गंधे यांनी ‘अमृतवेल’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. सुरूवातीपासूनच स्‍वतःचे वेगळेपण जपणा-या या कार्यक्रमाला ‘सह्याद्री माणिक सन्मान’ आणि ‘गदिमा चैत्रबन’ पुरस्काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

अनिल बळेल

नव्या शतकावर नव्या तंत्राची हुकूमत कशी चालणार आहे आणि त्यात जुने ते सारे कसे ‘जुनाट’ होणार आहे याबाबत चर्चा सतत चालू असते. त्यात ग्रंथव्यवहार तर जवळजवळ बंद पडणार असे सांगितले जाते. त्याच्या पाऊलखुणा जाणवूही लागल्या आहेत. अशा वेळी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीचे वेगळेपण नमूद केले पाहिजे. दर बुधवारी रात्री साडेआठ वाजता ‘सह्याद्री’ वाहिनीकडे वळले तर पाहायला मिळेल ‘अमृतवेल’ आणि अर्धा तास कसा गेला ते कळणार नाही – ही आहे मराठी साहित्यासाठीची ‘अमृतवेल’!

बाकी सारे ‘चॅनेल्स’ मनोरंजनाच्या नावाखाली वाट्टेल तसा वेळ घालवत असले आणि ‘रिअॅलिटी शो’च्या नावाखाली प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी ‘दूरदर्शन ’वर उदबोधक व उपक्रमशील काही कार्यक्रम होत असतात.

मराठी सारस्वतांनी निर्माण केलेल्या साहित्यकृतींचा अन लेखक-कवींचा एकेकाळी संस्कृतिविश्वात मोठा दबदबा होता. चिं.त्र्यं.खानोलकर , श्री.ना.पेंडसे, विजय तेंडुलकर , जी.ए.कुलकर्णी. विंदा करंदीकर अशा प्रतिभावंतांनी मराठी रसिकांच्या मनावर गारुड केले होते. ती झळाळी आजच्या साहित्यविश्वाला नाही. अभिजात-दर्जेदार साहित्यकृतींची निर्मिती होताना दिसत नाहीत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उच्च अभिरुचीच्या साहित्य-नाटक-भावसंगीतामध्ये रमणारा मराठी रसिक माणूस हा संस्कृतिकारणापासून दुरावल्यासारखा झाला आहे. अशा वेळी प्रेक्षकांना-वाचकांना साहित्यविश्वाची ओळख होणे, त्यांना वाचनाची गोडी लावण्याचे प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने कादंबर्‍या, कथा, चरित्रे-आत्मचरित्रे, पर्यटन, पर्यावरण, तंत्रज्ञान व संगणकशास्त्र आणि अन्य प्रकारांतील व विषयांतील लेखकांची ओळख़ करून देणारे अनेक कार्यक्रम ‘अमृतवेल’ने सादर केले. ते रसिकांना वेगळे वाटले-आवडले असे ‘अमृतवेल’चे निर्माते रविराज गंधे यांचा हा दावा आहे.
 

रविराज गंधे स्वत: लेखक आहेत. त्यांच्या कथा ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मनी साहित्याबद्दल ममत्व आहे. त्या भावनेनेच त्यांनी ‘अमृतवेल’ची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या तीन वर्षांत दर आठवड्याला न चुकता झालेल्या कार्यक्रमांतून त्याची प्रचीती चोखंदळ प्रेक्षकांना आलेली आहे. ‘अमृतवेल’ची सुरुवात त्यांनी समीक्षक गो.मा. पवार यांच्या मुलाखतीने केली होती. त्यांना त्यावेळी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. अशी प्रासंगिकता कार्यक्रमात नेहमी जपली जाते. गंधे साहित्यजगतावर नजर ठेवून असतात आणि ती नजर नेमके काय हवे ते हेरत असते.
 

संजय भुस्कुटे यांचे कार्यक्रमाला निवेदन असते. त्यांची गंधे यांना चांगली साथ मिळालेली आहे. त्यांनी आजवर आपल्या सहजसुंदर प्रसन्न शैलीत साहित्यविश्वातील अनेकांना ‘अमृतवेल’साठी बोलते केले आहे. इतरांना बोलायला लावायचे म्हणजे आधी स्वत: वाचलेले असले पाहिजे व एकूण घडामोडींची माहिती असायला हवी, तरच कार्यक्रम श्रवणीय होतो, बघितला जातो हे ‘गंधे-भुस्कुटे’ जोडीने ओळखले आहे. त्यामुळेच गतवर्षी ‘सह्याद्री’ माणिक सन्मान पुरस्कारासाठी ‘अमृतवेल’ कार्यक्रम निवडण्यात आला. इतर कार्यक्रमांच्या आतषबाजीत त्याक़डे दुर्लक्ष झाले नव्हते.

अशा कार्यक्रमाला ‘प्रायोजक’ मिळणे कठीण, परंतु गंधे त्यासाठीही काही मान्यवर-मातब्बर प्रकाशकांना राजी करू शकले आहेत. गंधे यांच्या अंगचे असे बहुकौशल्य त्यांच्या ‘पुस्तक परिचया’साठी जी पाच मिनिटे ‘अमृतवेल’मध्ये राखून ठेवलेली असतात, त्यावेळी श्रोते-प्रेक्षक थेटच अनुभवत असतात. कार्यक्रमाच्या अखेरीस गंधे स्वत: मराठीमधील निवडक पुस्तकांचा परिचय करून देत असतात. प्रत्येक पुस्तकाबद्दल नेमके व वैशिष्ट्यपूर्ण तेवढेच ते बोलत असतात. या पाच मिनिटांत गंधे शक्य तितकी जास्त पुस्तके प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यांच्यापर्यंत नवी पुस्तके पोचत नाहीत किंवा पोचूनही बघितली जात नाहेत त्यांना ही पर्वणीच!
 

रविराज गंधे- मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये साहित्य, चित्रपट, संगीत–लोककला, प्रासंगिक अशा अनेक कार्यक्रमांची यशस्वी निर्मिती. ‘अमृतवेल’ ह्या साहित्यविषयक कार्यक्रमासाठी ‘सह्याद्री माणिक सन्मान’ आणि ‘गदिमा चैत्रबन’ पुरस्कार. ‘संस्कृती-दर्पण’ ह्या लोककलाविषयक कार्यक्रमाच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी मुंबई विद्यापीठा च्या लोककला अकादमीचा सर्वोत्कृष्ट निर्माता म्हणून पुरस्कार.
 

‘सत्यकथा’ आणि अन्य मासिकांतून कथालेखन. ‘महाराष्ट्र टाइम्स ’, ‘लोकसत्ता ’मधून माध्यमविषयक लिखाण, रेडिओ, टेलिव्हिजन आणि वृत्तपत्रांतून विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन. ग्रंथाक्षर ह्या दिवाळी अंकाचे आणि ‘जागर पर्यावरणाचा’ या पर्यावरणतज्ञांच्या मुलाखतींच्या पुस्तकांचे संपादन-लेखन. ‘अमृतवेल’मधील पुस्तक–परिचय ह्या सदराचे संचालन, पुण्या–मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम’ ह्या विषयांवरील व्याख्याता म्हणून कार्यरत.
 

रविराज गंधे, 58/8 वसंत स्मृती, पांडुरंगवाडी, 2री गल्ली, गोरेगाव (पूर्व)– मुंबई 400063.

9820378448, 28745681 (R), 24949691(O) ravirajgandhe@gmail.com ,

संजय भुस्कुटे – 9920043004

 

About Post Author