गाडगेबाबा – जिणे गंगौघाचे पाणी ! (Saint Gadgebaba’s Life of Service and Sacrifice)

गाडगेबाबा हे विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील शेणगावचे. त्यांचं घराणं परटाचं. विदर्भात या परटांना वठ्ठी म्हणतात. बाबांचं नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांचे वडील झिंगराजी आणि आई सखुबाई यांचं लग्न झालं, तेव्हा झिंगराजी आठ वर्षांचे होते. सखुबाईने गोऱ्यागोमट्या, देखण्या पहिल्या बाळाला 1876 साली महाशिवरात्रीच्या दिवशी जन्म दिला. तोच डेबूजी! झिंगराजी यांना दारूचं व्यसन लागलं. व्यसनापायी गुरंढोरं, शेती, दागदागिनं… सगळं विकावं लागलं. सखुबाई संसार चालवण्यासाठी मोलमजुरी करू लागली. पण मिळालेली मजुरीही दारूवर खर्च होऊ लागली. एक वेळ अशी आली, की झिंगराजीला त्यांनी सगळे गमावल्यामुळे त्यांच्या मावसभावांच्या घरी सखुबाई आणि डेबू यांच्यासह आसरा घ्यावा लागला. तोपर्यंत त्याचं शरीर अनेक विकारांनी पोखरलं गेलं होतं. त्यानं अखेरच्या क्षणी, पश्चात्तापदग्ध होऊन सखुबार्इंला जवळ बोलावलं. सांगितलं, “डेबू मोठा होईल तेव्हा काय करील हे मले मालूम न्हाई. मात्र येक कर – त्याले या देवदेवतांच्या नादी लागू देऊ नको, आन दारूकडे वळू देऊ नको.” बायकोवर ती जबाबदारी टाकून त्यानं डोळे मिटले.

झिंगराजींचा मृत्यू झाल्यानंतर डेबूचा मामा चंद्रभान त्याला आणि सखुबाईला घेऊन दापुरे येथे आला. त्यावेळी डेबूचं वय होतं सहा-सात वर्षं. सखुबाईच्या माहेरची परिस्थिती चांगली होती. जमीनजुमला, शेती होती. मात्र माहेरी आली तरी सखुबाईनं कष्ट करणं थांबवलं नाही. ती भल्या पहाटे उठून जात्यावर दळणकांडण करी. त्याशिवाय, तिने स्वतःला गोधड्या शिवणं, तुरी भिजवणं, वाळवणं, कापूस निवडणं, शिवणटिपण अशा हरतऱ्हेच्या कामांमध्ये बुडवून घेतलं. कोवळ्या वयाच्या डेबूवर तेच संस्कार झाले. त्याला आईच्या कृतीतून आयतं बसून खाऊ नये ही शिकवण मिळाली.

डेबूनं मामाला सांगून गुरे चारायला नेण्याचं काम स्वतःहून अंगावर घेतलं. त्याच्याबरोबर गावातील इतर गुराख्यांची मुलंही यायची. पण उंचापुरा बांधा, उजळ वर्ण, घारेपणाकडे झुकणारे डोळे, बोलण्यातील हिंमत आणि एकंदर छाप पाडणारं व्यक्तिमत्त्व यामुळे डेबू आपोआप त्या मुलांचा नेता बनला. तो गुरं राखण्याचं काम अगदी मनापासून, निष्ठेने करी. रोज त्यांना स्वच्छ घासून काढी. रोजच्या अंघोळीमुळे गुरं ताजीतवानी दिसत. त्याच गुरंचराईच्या रानात एका ठिकाणी महादेवाची पिंड होती. काहीशी दुर्लक्षित अशी. डेबूनं ती जागा स्वच्छ करून पिंडीला फुलं वाहण्यास सुरुवात केली. ती मुलं तिथं येईल तसं भजन करत. पत्र्याची डबडी, दगड अशी वाद्यं असत ! डेबू भजन चांगले म्हणतो ही गोष्ट हळूहळू गावकऱ्यांच्या कानावर गेली. त्याला जवळपासच्या गावांमध्ये भजनासाठी आमंत्रणं येऊ लागली. मग भजन आणि रोजची कामं असा दुहेरी उद्योग सुरू झाला.

डेबू बारा वर्षांचा झाला. मामानं त्याच्याबरोबर डेबूला शेतावर येऊन हळूहळू शेतीची कामं शिकावीत असं सुचवलं. तो तर त्यासाठी एका पायावर तयार होताच ! त्याला नवनवीन गोष्टी शिकण्याची हौस होतीच. मग तो मामाबरोबर वावरात (शेतात) जाऊ लागला. तो नांगरणी, कुळवणी, पेरणी, औत चालवणं या सगळ्यांत अल्पावधीत तरबेज झाला. त्याला शेतीतील कितीतरी रहस्यं प्रत्यक्ष कामातून आणि केलेल्या प्रयोगांमधून माहीत झाली. त्यानं राखलेलं वावर नीटनेटकं दिसे; कोठे कचरा नाही की काडी. डेबूच्या दक्षतेमुळे, पेरलेल्या बियांवर पीकही भरभरून येई. त्याचं लक्ष बैलांकडेही असे. त्यामुळे ते झटून औत ओढत.

डेबू पंधरा वर्षांचा झाला आणि आई सखुबाईला त्याच्या लग्नाचे वेध लागले. पण त्याचं स्वतःचं हक्काचं घर किंवा जमीन नव्हती. त्यामुळे त्याला मुलगी मिळेना. अखेर त्याची कमालपूर गावात राहणाऱ्या खल्लारकर घराण्याशी सोयरीक जुळली. धनाजी खल्लारकर या परटाची आठ वर्षांची मुलगी कुंताबाई डेबुजीशी लग्न करून सासरी नांदण्यास आली. डेबूजीने गृहस्थाश्रमात प्रवेश केला. तो घरची जबाबदारी जास्त कसोशीने पार पाडू लागला.

तिडके, नावाचं सावकार घराणं दापुऱ्याजवळच्या सांगवीदुर्गडे गावात होतं. त्या काळात चलन म्हणून सुरती रुपये वापरले जात. सावकार ते रुपये गरजूंना कर्जाऊ देऊन त्या बदल्यात कापूस, तूर, जवस, ज्वारी वर्षानुवर्षं वसूल करी. डेबूजीचा मामा चंद्रभान हाही त्या सावकाराच्या कचाट्यात सापडला. त्याने दापुऱ्याची सगळी जमीन तीन वर्षांच्या कराराने फेडगहाण लिहून दिली. मामाला कुटुंबाच्या हालअपेष्टा सहन होईनात. त्यानं जगाचा निरोप घेतला. ते डेबूच्या मनाला फार लागलं. त्यानं समोर एकच लक्ष्य ठेवलं- सावकाराचं देणं फेडणं आणि मामाची जमीन परत मिळवणं.

पीक आलं नि डेबूजीनं कर्ज फेडण्यास सुरुवात केली. त्यानं दिलेल्या धान्याच्या बदली पावती मागितली. सावकाराच्या लक्षात आलं, की डेबूजीला फसवणं सोपं नाही. त्यानं डाव टाकला. चंद्रभानचं पूर्णाकाठी शेत होतं. पण त्याची कागदपत्रं सावकाराकडेच होती. सावकारानं त्या शेताचा ताबा घेण्याची तयारी केली. डेबूजीला सुचेना. त्याने सावकाराच्या विनवण्या केल्या, पण व्यर्थ. तो अन्याय होता. डेबूजीकडे सत्ता नव्हती, पण त्याचा पक्ष सत्याचा होता. त्यानं ठरवलं – वहिवाटीच्या हक्कासाठी लढायचं. त्याप्रमाणे त्यानं लढा दिला. त्या वावराचं समरांगण झालं. त्याला जेरबंद करण्यास आलेल्या तिडके सावकाराला परत जावं लागलं. सावकाराच्या साथीदारांनाही त्यात मार बसला. प्रसंग ओळखून सगळ्यांनी माघार घेतली. सत्याचा विजय झाला ! त्या गोष्टीनंतर डेबूजीकडे बघण्याची गावाची नजर बदलली. जमीन परत मिळाली. परिस्थिती सुधारली. प्रपंच वाढू लागला. पहिल्या मुलीचा- आलोकाचा जन्म झाला. तिच्या बारशाच्या वेळी डेबूजींनी बकरं कापण्यास आणि दारू पिण्यास मनाई केली. रिवाज मोडला म्हणून लोकांची, घरच्यांची नाराजी पत्करली. डेबूजी रात्रंदिवस कामात व्यग्र असत. त्याच वेळी मन अनेक प्रश्नांचा ठाव घेई. देव आहे कोठे? कशासाठी? खरोखर कोंबडी किंवा बकरी यांच्या नैवेद्यानं तो प्रसन्न होतो का? आलोकानंतर कलावती आणि त्यानंतर मुलगा मुद्गल यांचे जन्म झाले. मुलांच्या निमित्तानं डेबूजी थोडे प्रपंचात रमू लागले. पण ते सुख अल्पकालिक होतं. मुद्गल अगदी लहानसं निमित्त होऊन देवाघरी गेला. मूल झाल्यावर देवीला बोकड न दिल्यानं देवी कोपली आणि ते संकट आलं असं लोक म्हणू लागले. पुत्रनिधनानं आलेल्या उदासीला विरक्तीची जोड मिळू लागली. त्याच दरम्यान त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ‘तो’ दिवस उगवला.

तो मार्गशीर्ष महिना होता. डेबूजी नेहमीप्रमाणे भल्या पहाटे उठले. बरोबर न्याहरी बांधून घेऊन खैरीच्या रानात आले. मनात अस्वस्थ हुरहूर होती. जणू काहीतरी अकल्पित घडायचं होतं! त्यांनी शेतातील माचावर उभं राहून हाकारे घातले आणि ते तेथेच बसले. दुपारी त्यांना एक तपस्वी रानाकडे येताना दिसला. तेज:पुंज कांती, दाढी राखलेला. ज्वारीची कणसं खात त्याच नादात मस्त होता. काय हवं विचारलं तर म्हणाला, ‘मेरे पास सबकुछ है |’ डेबूनं तोपर्यंत पाहिलेले फकीर नावाला फकिरी करणारे, आतून मात्र याचक – आटा हवा, डाळ हवी, रवा-तूप-साखर हवे असं काहीबाही मागत फिरणारे. तो महात्मा मात्र वेगळा होता ! डेबू कोठल्याशा अनामिक बंधनाने त्याच्याबरोबर अख्खा दिवस राहिले. एका दुपारपासून दुसऱ्या दुपारपर्यंत. त्या एका दिवसानं त्यांचं आयुष्य बदललं! दुसऱ्या दिवशी त्या गुरूंची आणि डेबूची थोडक्यात चुकामूक झाली. हळहळलेल्या अवस्थेत ते कीर्तन ऐकण्यास गावातील मंदिरात जाऊन बसले. कीर्तनकार बोलत होता- ‘मृत्यू लहानथोर जाणत नाही, कधी कोणत्या रूपात समोर येईल ते माहीत नाही. मिळालेला जन्म सार्थकी लावा…’ इकडे डेबूजीच्या मनोवस्थेत वेगळेच बदल होत होते. संसाराचे पाश गळून पडत होते. ती रात्र निर्णायक ठरली. डेबूजींनी भल्या पहाटे जुनेपुराणे कुडते, तसंच जुनेरं नेसून आणि हातात गाडगं व काठी घेऊन घर सोडलं. कायमचं. ते तपश्चर्येसाठी बाहेर पडले.

तपश्चर्येदरम्यान गावोगाव भटकंती सुरू झाली. फिरताना ज्ञानेश्वरीवरील प्रवचनं कानावर पडत. ज्ञात्या पुरुषाने त्याचा मोठेपणा उघड करू नये, मानापमान सोसण्याची तयारी ठेवावी या वचनांचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला. त्यांनी त्यांचा मार्ग त्यातूनच आखला. स्वतःला कष्टवायचं, शरीर झिजवायचं, मानापमान सोसण्यास मनाची तयारी करायची. त्याच वेळी एक मात्र डोक्यात पक्कं होतं- विनाश्रमाची भाकरी खायची नाही. कुठेही जावं, एखाद्या घरी भाकरी मागावी, बदल्यात त्याचं आवार झाडून द्यावं किंवा बाभळीच्या काट्या तोडून द्याव्यात किंवा गाढवं वळावी. मध्येच कधी वाकडं, जनरीतीला सोडून वागावं आणि लोकांच्या शिव्या खाव्यात. हेतू हा, की अवहेलनेची सवय व्हावी! एका गोष्टीचं मात्र लोकांना नवल वाटे, गबाळ्या वेषातील त्या माणसाचं काम इतकं नीटनेटकं कसं? देवळापुढे जमा झालेला कचरा ते साफ करून टाकत. देवळापुढचं अंगण आरशासारखं लख्ख होई. लोकांना थोडी सहानुभूती वाटे. पण म्हणून कुणी कितीही विनवलं तरी ते मुक्कामी गावात थांबत नसत. गावाबाहेर रानात राहत. दिवस उजाडला की चालू लागत. दुसऱ्या दिवशी नवीन गाव. त्यांनी अशी भटकंती तब्बल बारा वर्षं केली. त्या भटकंतीदरम्यान बाबांना जाणवलं, समाजात दु:ख-दैन्य फार. त्याच्या मुळाशी आहे अज्ञान, निरक्षरता आणि चालीरीतींचा पगडा. ते बदलायचं तर सर्वस्व पणास लावण्यास हवं. त्यासाठी त्यांनी त्यांच्या गावाजवळ असलेल्या ‘ऋणमोचन’ या तीर्थक्षेत्रापासून सुरुवात केली.

पूर्णा नदी ऋणमोचनला वाहते. तिचं पात्र चांगलं खोल आहे. त्यावेळी नदीला घाट नव्हते. नदीकाठच्या काळ्या मातीच्या कच्च्या डोंगरावरून लोक घसरून पडत. बाबांनी मनावर घेतलं, की तिथं घाट बांधायचा. ते पौष महिन्यातील पहिल्या रविवारी ऋणमोचनला पोचले. त्यांनी सगळं गाव झाडून साफ केलं. नदीकाठची दरड खणण्यास घेतली. दिवसभर काम चालू होतं. तेही न थकता. गावकऱ्यांना नवल वाटलं. इकडे घरच्यांना बाबा ऋणमोचनला आल्याची खबर मिळाली. कुटुंब त्यांच्या भेटीसाठी त्यांना शोधत ते होते तिथं येऊन ठेपलं. त्यांनी बाबांना घरी परतण्यासाठी पदोपदी विनवण्या केल्या, पण बाबा मानण्यास तयार नव्हते. ते संसारापासून कित्येक मैल दूर गेले होते ! गावकऱ्यांना मात्र त्यांच्या कामाची महती पटली. तेही पुढे झाले. फावडी, कुदळ घेऊन बाबांसह दरडी खणू लागले, माती उचलू लागले, पायऱ्या करू लागले, त्यांवर कोरडी माती आणून टाकू लागले. तो तसाच कार्यक्रम दरवर्षी पौष महिन्यात चाले. दिवसभर खपल्यावर रात्री भजन आणि कीर्तन. ती श्रमानं थकलेल्या शरिरासाठी आणि मनांसाठी एक संजीवनीच होती !

बाबांचं कीर्तन असं घडलं. त्यांचं कीर्तन तोपर्यंतच्या कीर्तनांपेक्षा नवीन जातीचं. भाषा अगदी साधीसोपी. दाखले रोजच्या व्यवहारातील. उपदेश अमलात आणण्याजोगा. कर्ज काढून देवाची यात्रा करू नये, मुक्या प्रार्तनण्यांविषयी दयाभाव असावा, मुलांना शिकवावं, आईबापाची सेवा करावी, भुकेल्याला अन्न द्यावं, दारू पिऊ नये असा अगदी साधासरळ उपदेश. ते सांगण्याची पद्धतही गमतीची. हसतखेळत, रोजच्या व्यवहारातील दाखले देत, समोर बसलेल्या श्रोत्यांशी संवाद साधत, बाबा लोकांना कीर्तनात सहभागी करून घेत. त्यामुळे त्यांचं कीर्तन म्हणजे केवळ उपदेश न राहता लोकांसाठी तो आनंदानुभव होई.

ऋणमोचनला घाट दरवर्षी बांधावे लागत. ते टिकत नसत. पूर्णेच्या पुरात सगळं काम वाहून जाई. पुढील वर्षी पुनश्च हरिओम! बाबांच्या ध्यानी आलं, की घाट दगडी हवेत. नेमकं त्याच्या पुढील वर्षी बाबा दरड खणत असताना तिथं तिडके सावकार आले. पूर्वीचं वैर जणू पूर्णेत वाहून गेलं होतं ! त्यांनी बाबांसमोर भक्तिभावानं हात जोडले. तिडके यांनी दगडी घाट बांधण्यासाठी पैसा देण्याची तयारी दर्शवली. बाबांनी पै न पै चा हिशेब ठेवला, मजुरांना योग्य मजुरी दिली. एक मोठं काम पार पडलं !

ऋणमोचनला एका वर्षी घाटाचं काम सुरू असताना गावचे काही परीट बाबांसमोर जाऊन उभे राहिले. त्यांना बाबांसाठी काही साजरं करावं असं वाटत होतं. स्वतः बाबा त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले, पण ते परटांना म्हणाले, ”अथी (इथे) इतले लोक येतां आन वेगळ्या चुली मांडता. थे येकत्र जेवावं. काय करता?” कल्पना परटांना आवडली. अवघे गरीब-श्रीमंत एक झाले. ते चारी रविवार एकत्र जेवणार होते. भराभर वर्गणी जमली. दर रविवारी हजारेक पानांची पंगत. डाळ, बाट्या, वांग्याची भाजी असा बेत. माणसं नीट ओळीनं बसत. वाढप झालं की ‘पुंडलिकवरदा’चा गजर होई. थाटामाटानं जेवण होई. लगेच, बाबा स्वतः पुढे होऊन पत्रावळी उचलत. कुणी उचलू लागे, त्याला ते काम नीट न जमल्यास नेटकेपणाचे धडे देत. संध्याकाळी तिथं भजनकीर्तन असे. त्याच वेळी बाबा जमातीतील झगड्यांचा चतुराईनं न्यायनिवाडा करत. लोकांना सबुरीचा सल्ला देत. त्याच्याच जोडीनं बाबांचं समाजकार्य जोर धरू लागलं.

पंढरपूर हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान. आषाढी-कार्तिकीला ते हजारो वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून जाई. पण त्यातूनच दुर्गंधीचं, मैल्याचं साम्राज्य निर्माण होई. त्यातही तथाकथित अस्पृश्य जमातींच्या भक्तांचे हाल जास्त. ना धड राहण्याची सोय ना खाण्यापिण्याची. खूप आबाळ व्हायची. बाबांनी त्यांचं दु:ख, हालअपेष्टा हेरल्या. त्यांनी त्यांच्यासाठी पंढरपुरात हक्काची सावली उभारण्याचं ठरवलं आणि त्यातून पंढरपूरची अस्पृश्यांसाठीची, गावाच्या पूर्वेला गोपाळपूर रस्त्यावर एका मोकळ्या बखरीवर बाबांच्या मनातील  ‘चोखामेळा  धर्मशाळा’ साकारली ! त्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत केली. बाबांची कीर्ती चारी दिशांना पसरली. लोक पैशांच्या राशी त्यांच्या चरणी अर्पण करत. त्यांनीही लोकांना धर्मशाळेचं महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. धन उभं राहू लागलं. त्यानंतर त्याच पंढरपूर क्षेत्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली परीट धर्मशाळा आणि मराठा धर्मशाळाही अस्तित्वात आल्या.

बाबा पंढरपूर इथं केवळ धर्मशाळा काढून थांबले नाहीत, तर त्यांनी अनाथ वृद्धांसाठी झोपड्या बांधल्या. घरच्यांनी त्यागलेली, जराजर्जर, अपंग अशी कित्येक म्हातारीकोतारी माणसं तिथं राहू लागली. दोन वेळा जेवू लागली. बाबांनी त्यांच्या शुश्रूषेचं जणू व्रतच घेतलं. त्यांच्यासाठी सदावर्ते चालवली. दान सत्पात्री जात आहे याकडेही बारकाईनं लक्ष पुरवलं. पंढरपूरच्या धर्तीवर नाशिक येथेही धर्मशाळा उभी राहिली. तीही लोकांच्या मागणीवरून. त्यासाठी बाबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडुंग माजलेलं केवढंतरी रान साफ केलं. त्यानंतर आखणी करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली. हजारो हात अहोरात्र श्रमत होते. बाजूला उभारलेल्या पत्र्याच्या सपरामध्ये जेवत होते. सर्व जातींची माणसं भेदाभेद विसरून एकत्र आली होती. त्या कामाची कीर्ती चहुकडे पसरली. एकदा तर प्रत्यक्ष नाशिकचे पेरी नावाचे कलेक्टर काम बघण्यास आले. ते तेथील कामातील शिस्त, एकजूट, संयोजन पाहून इतके प्रभावित झाले, की त्यांनी जातीनं लक्ष घालून त्या जागेचा शंभर रुपयांचा कर कायमस्वरूपी माफ करून टाकला ! गावोगावी धर्मशाळा बांधणं ही बाबांनी प्रवर्तित केलेली मोहीमच होऊन गेली !

पददलितांसाठी झटणाऱ्या त्या महात्म्याच्या हृदयात मुक्या गुराढोरांविषयीही माया होती. गुरं ही शेतकऱ्यांचे खरे सोबती. पण ती म्हातारी झाली, की गरीब शेतकरी त्यांना कसायाला विकत. त्यांना त्या जनावरांना पोसणं दारिद्र्यामुळे शक्य नसे. ती गोष्ट बाबांच्या मनात सलत होती. नानासाहेब जमादार नावाचे धनिक गृहस्थ बाबांना एकदा मूर्तिजापूर येथे भेटले. त्यांनी बाबांच्या कार्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली. बाबांनी त्यांची इच्छा मूर्तिजापूरला अनाथ गुरांसाठी संस्था काढण्याची आहे असे सांगितले. जमादार यांनी त्यांची छप्पन्न एकर जमीन देऊ केली. तिडके सावकारांच्या एका नातेवाईकांनी विहिरीचा खर्च दिला. अनेक हातांच्या मदतीतून मूर्तिजापूर येथे गोरक्षण संस्था उभी राहिली. गुरांसाठी गोठा, त्याला बंदिस्त आवार, पाणी पिण्यासाठी हौद, गोरक्षण सेवकांना राहण्यासाठी इमारती अशा सुविधा निर्माण झाल्या. शेतकरी त्यांची म्हातारी गुरं तिथं सोडू लागले. शेतकरी आणि जनावरं, दोघांचीही सोय झाली. मात्र गुरंचराईचं रान नसल्यानं गुरांना चारा बाहेरून आणून घालावा लागे. बाबा त्यासाठी योग्य जागेच्या शोधात होते. ती त्यांना सातपुड्याच्या कुशीत पहुडलेल्या नागरवाडी या गावात मिळाली. तिथला डोंगर, त्याच्या उतारावर असलेलं रान, जवळच असलेली विहीर हे सगळं पाहून ती जागा त्यांच्या मनात भरली. बाबांच्या अनुयायांनी नेहमीप्रमाणे नेटकं काम करत ‘गोरक्षण केंद्र’ प्रत्यक्षात आणलं. काम पूर्ण झाल्यावर मूर्तिजापूरच्या काही गुरांना तिथं आणून ठेवलं गेलं.

बाबांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे स्वच्छतेची शिकवण. त्याबद्दलही ते केवळ उपदेश करून थांबले नाहीत, तर काकणभर पुढे गेले. त्यांची कार्यपद्धत हाती खराटा घेऊन जिथं कचरा दिसेल, तिथं त्याची विल्हेवाट लगेच लावण्याची होती. ती लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यास पुरेशी ठरली. तेच अंधश्रद्धेचं व अहिंसेचंही. त्यांनी देवीदेवतांना बळी देण्याची, त्यासाठी मुक्या जनावरांचा जीव घेण्याची क्रूर प्रथा बंद व्हावी यासाठी कीर्तनातून अनेक दाखले दिले. त्यांनी त्या कार्याची सुरुवात स्वतःच्या मुलीच्या जन्मानंतर बोकड न कापून केली. त्यांच्या अनुयायांनी, लोकांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारावा, यासाठी प्रसंगी आमरण उपोषणाची वाट धरली. साथीचे रोग म्हणजे देवीचा कोप असं समजणारा समाज. बाबांनी त्यांच्या समजुतीत तथ्य नाही हे समाजाला पटवण्याचा प्रयत्न केला.

बाबांनी अजून एक मोठी गोष्ट केली, ती म्हणजे कुष्ठरोग्यांची सेवा. बाबांना त्या रोगानं गिळंकृत केलेली, नाक-हातापायाची बोटं झडून गेल्यानं विद्रूप दिसणारी, समाजानं वाळीत टाकलेली माणसं त्यांची वाटत. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांचं आयुष्य वेचणारे अमरावतीचे डॉ. शिवाजीराव पटवर्धन हे बाबांचे मित्र होते. बाबा त्यांच्या कुष्ठनिवासात वारंवार जात. तिथं कीर्तन करत. नगरचे मेहेरबाबा आणि गाडगेबाबा हे दोघं मिळून कुष्ठरोग्यांना अंघोळी घालत, जेवण्यास देत, कपडालत्ता पुरवत. त्यांनी आळंदीला कुष्ठाश्रमही सुरू केला होता.

बाबांनी त्यांच्या संस्थांमधून शिवाशीव, अस्पृश्यांना हीन दर्ज्याची वागणूक या गोष्टींना अजिबात थारा दिला नाही. सगळेजण शेजारी बसून एका पंगतीला जेवत. सदावर्तांमध्येही माणसांची सरमिसळ असे. भांडी, कपडे, छत्र्या, अंथरुण-पांघरुण वाटत असताना कुठलाही भेद नसे. बाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली.

गाडगेबाबांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. पण बाबा तिकडे दुर्लक्ष करत. शरीरात मधुमेहाचा शिरकाव झाला होता. त्यांचा आहारही खूप कमी झाला होता. त्यांना केवळ तुरीच्या वरणाचं पाणी आणि चतकोर भाकरी एवढंच लागे. त्यांना 1955 ची पंढरपूरची आषाढीची वारी करता आली नाही. त्यांना त्यांच्या अनुयायांनी हॉस्पिटलमध्ये ठेवलं, तेही त्यांना मानवेना. ते तिथून कुणाला न सांगता निघून गेले. फार पूर्वी घरातून निघून गेले होते, तसेच ! एकीकडे जमेल तशी कीर्तनं, लोकांना भेटणं सुरूच होतं. तेच जणू त्यांचं टॉनिक होतं. त्यांनी त्यांच्या प्रकृतीची साथ नसतानाही केवळ लोकाग्रहास्तव पंढरपूर येथे 1956 च्या कार्तिकी एकादशीला कीर्तन केलं. त्यांची तब्येत त्यानंतर खूप बिघडली. शेवटी, त्यांनी नागरवाडीला जाण्याचा आग्रह धरला. त्यांचा शब्द अमान्य करण्याची कुणाची प्राज्ञा नव्हती. अखेर, त्यांनी प्रकृतीत सतत चढउतार होत 2० डिसेंबर 1956 रोजी नागरवाडीच्या वाटेवर शेवटचा श्वास घेतला.

गाडगेबाबा या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाबाबत काही प्रवाद आहेत. त्यांनी त्यांच्या संसाराला समाजाचं उत्थान करण्यासाठी एका क्षणात तिलांजली दिली खरी, पण त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या नशिबी कायम हालअपेष्टा आल्या. बाबांना समाजात मानसन्मान मिळाला. त्यांच्या पत्नी असलेल्या कुंताबाई तर कायम वाटेवरचे काटेच वेचत राहिल्या. बाबांची थोरली मुलगी आलोका हीदेखील त्यांच्या परीने सामान्यच! निदान दोन वेळचं जेवण, ल्यायला चार बरी लुगडी असावीत, चारचौघांसारखं आयुष्य असावं, खाऊनपिऊन सुखी असावं अशा साध्यासाध्या अपेक्षाही त्या मायलेकींना करता आल्या नाहीत. बाबा मात्र निर्मोही होते. साधं चहाचंही व्यसन नसलेले, कढी-पिठलं-तेल घालून लसणाची चटणी इतपतच आवड असलेले, भोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिलेले बाबा, खरं तर, कुणालाच पूर्णपणे कळू शकले नाहीत, याला काय म्हणावं? त्यांचं अथांगपण?

– स्मिता जोगळेकर 98193 87244 emailtosmita@gmail.com

—————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here