अडतिसावे साहित्य संमेलन

0
110

अडतिसावे साहित्य संमेलन पंढरपूरला 1955 साली झाले. ती संतांची भूमी, महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठोबा यांचे गाव म्हणजे तीर्थक्षेत्र. ते प्रा. शंकर दामोदर पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. पेंडसे संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, तत्त्वज्ञानाचे चिंतनशील पंडित, संतसाहित्याचे निर्माते लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी संतसाहित्याला, भागवतधर्माच्या-वैदिक धर्माच्या अभ्यासाला वाहून घेतले होते. तो एक अपूर्व योगायोग होय. शं.दा. पेंडसे हे मराठी भाषेचे, परंपरेचे, संतसाहित्याचे आणि महाराष्ट्र संस्कृतीचे अभिमानी तर होतेच; पण त्यांनी एक प्रभावी वक्ता म्हणूनही कीर्ती मिळवली होती.

ते वेदांततीर्थ म्हणून ख्यातकीर्त होते. त्यांनी ‘वेदांततीर्थ’ परीक्षेचा अभ्यास करताना श्रीशंकराचार्यांचे गीताभाष्य आणि लोकमान्य टिळक यांचे ‘गीतारहस्य’ यांचा तुलनात्मक अभ्यास करून ‘कर्मयोग की कर्मसंन्यास’ हा विस्तृत निबंध 1919 साली लिहिला व लोकमान्य टिळक यांना तो वाचण्यास दिला. तेव्हा त्यांचे वय अवघे एकवीस वर्षांचे होते. टिळक यांनी तो लेख वाचला. आवश्यक तेथे स्वतःच्या हस्ताक्षरात सुधारणा केल्या आणि ‘लेख प्रसिद्ध करण्यासारखा’ असे त्यावर मोडीत लिहून ‘टिळक’ अशी स्वाक्षरी केली. तो लेख टिळक यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या आसपास ‘केसरी’त 1921 साली चार भागांत प्रसिद्ध झाला.

शं.दा. पेंडसे यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1897 रोजी रत्नागिरीजवळील खेड येथे झाला. पण त्यांचे प्राथमिक शिक्षण वऱ्हाडातील वाशिम गावी झाले. ते शाळेत असताना, 1908 साली टिळक यांना शिक्षा झाली. म्हणून पेंडसे यांनी जळजळीत भाषण केले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. तेथून ते जे पळाले, ते थेट काशीला पोचले. मग त्यांनी उत्तर हिंदुस्थानात भटकंती केली. संस्कृतचे शिक्षण घेतले. त्यांनी कॉलेजचे शिक्षणही दिल्ली, लाहोर, कोलकाता अशा विविध ठिकाणी घेतले. आश्चर्य म्हणजे त्यांनी लाहोर येथील पंजाब विश्वविद्यालयातून ‘शास्त्री’ ही पदवी मिळवली, तर कोलकात्यामधून ‘वेदांततीर्थ’ ही पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी एम ए मराठी करून, ‘ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान’ ह्या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली.

पेंडसे ह्यांचा विवाह लोकमान्य टिळक यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस ह्यांच्या कन्या चंद्रा ह्यांच्याशी 1925 साली झाला होता. ते 1927 ते 1967 या चाळीस वर्षांच्या काळात नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर अध्यापन केले. ते काही काळ मिशनरी कॉलेजचे प्रिन्सिपॉलही होते. ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान, हिंदू विविध ग्रंथ आणि अनेक लेखमाला त्यांच्या नावावर आहेत. नेमकी, वैचारिक पाया असलेली ओघवती शैली आणि विषयाचे निरूपण करताना आध्यात्मिक चिंतनाची जोड देत केलेले भाष्य ही त्यांची वैशिष्ट्ये होती. धार्मिक इतिहासाचे सामान्य निरीक्षण, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास (1931), ज्ञानेश्वरीचा अभ्यास (1954), वैदिक वाङ्मयातील भागवत धर्माचा विकास (1965), पौराणिक भागवत धर्म (1967), ज्ञानदेव आणि नामदेव (1969), भागवतोत्तम संत एकनाथ (1971), साक्षात्कारी संत तुकाराम (1972), राजगुरू समर्थ रामदास (1974) अशी त्यांची ग्रंथसंपदा होती. ते मोझरी येथे 1963 साली भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

“संतवाङ्मय हे संतांनी साध्याभोळ्या, बहुजन समाजाकरता निर्माण केलेले आहे. म्हणून त्यांनी बहुजन समाजाला संदेश देताना त्याचे वाहन म्हणून बुद्धीचा उपयोग न करता भावनेचा उपयोग केला आणि भावना हा तर साहित्याचा प्राण आहे.” असे उद्गार त्यांनी संतवाङ्मयाबद्दल त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काढले.

ते 23 ऑगस्ट 1974 रोजी निधन पावले.

– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488
—————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here