‘अनुपमा’ हे अनागारिका माताजी अनुत्तरा म्हणजे पूर्वाश्रमीच्या अनुपमा अर्जुन बोरकर लिखित आत्मकथन आहे. ते आंबेडकरी चळवळीतील स्त्री आत्मभान जपणारे पुस्तक आहे. पुस्तकाला पर्यावरण तज्ज्ञ क्षमा खोब्रागडे यांनी समर्पक अशी प्रस्तावना दिलेली आहे. हे आत्मकथन म्हणजे अनुपमा बोरकर यांचा व्यक्तिगत जीवनप्रवास असला व तो तपशीलवार वर्णन करून सांगितला असला तरी त्यात आंबेडकरी चळवळ, शैक्षणिक परिवर्तन, सामाजिक-धार्मिक परिवर्तन यांचा ऐतिहासिक संदर्भ येतो आणि त्यामुळे ते महत्त्वाचे ठरते.
लेखिकेला वयाच्या सात-आठव्या वर्षात बाबासाहेबांचे दर्शन घडले. बाबासाहेबांची जाहीर सभा पुलगाव येथे 1954 साली झाली होती. बाबासाहेबांनी त्या सभेनंतर पुलगावमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, पण त्यांनी त्याआधी पहिल्या बुद्ध विहाराचे भूमिपूजन केले होते. लेखिका त्या ऐतिहासिक घटनेच्या साक्षीदार आहेत. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण धम्म दीक्षा घेतल्यानंतर झाले. त्या घटनेने पुलगावमध्ये शोककळा पसरली. त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम लेखिकेच्या मनावर झाला. लेखिकेच्या मनात बाबसाहेबांप्रती जी निस्सीम भक्ती तेव्हापासून निर्माण झाली ती अद्यापही तशीच आहे. अनुपमा स्वतःच्या आयुष्यात बाबासाहेबांनी बहुजन समाजाला दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र घेऊन संघर्षात स्वाभिमानाने ताठ उभ्या राहिल्या. लेखिकेने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग कोणताही आडपडदा न ठेवता वाचकांसमोर मांडले आहेत. त्यांनी त्यांच्या वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी हे आत्मकथन लिहिले आहे.
पुस्तक तीन भागांत आहे. पहिल्या भागात लेखिकेच्या जन्मापासून ते शिक्षण पूर्ण करेपर्यंतचे कथन आले आहे. लेखिकेने ह्या भागात त्या वेळची सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक परिस्थिती लिहिली आहे. दुसऱ्या भागात नोकरी, लग्न, पती-पत्नीचे नातेसंबंध, मुलांचे संगोपन, बौद्ध धम्माची ओळख आणि लेखिकेची बौद्ध धम्म त्यांच्या कुटुंबात रुजवण्यासाठी असलेली तळमळ, मुलगी म्हणून लग्नानंतर त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी निभावत असताना सासू व नवऱ्याकडून होणारा विरोध, कौटुंबिक मतभेद आणि त्या नंतर लेखिकेच्या आयुष्यात घडलेली हृदय विदारक घटना म्हणजे त्यांच्या पतीचे अपघातात झालेले निधन… एक स्त्री म्हणून संकटात खंबीरपणे उभी राहिलेली लेखिका वाचकांना स्त्रीत्वाचा धडा शिकवते.
तिसऱ्या भागात सुरू होतो त्यांच्या एकटीच्या प्रपंचाचा संघर्ष. त्या त्यांच्या मुलांचे शिक्षण- त्यांचे आंतरजातीय विवाह हे महत्त्वाचे टप्पे जाणीवपूर्वक मांडतात. त्या लग्नाआधी त्यांच्या दोन्ही सुनांना बौद्ध धम्माची ओळख करून देतात. त्या सुनेला ‘बावीस प्रतिज्ञा’ ग्रहण करूनच मग लग्न पार पाडतात. लेखिकेची प्रबळ इच्छा बौद्ध धम्माचे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावेत आणि जीवनकल्याणाचा तथागतांनी सांगितलेला कल्याणकारी मार्ग त्यांच्या मुलांनी-सुनांनी, नातवंडांनी अंगिकारावा ही आहे.
आत्मकथनाच्या शेवटाला लेखिका एका वेगळ्या टप्प्यावर आढळते. हिंदू धर्म लेखिकेच्या घरात चोरपावलांनी प्रवेश करतो तेव्हा लेखिका तिच्या कुटुंबात केवळ बौद्ध धम्माचे पालन व्हावे या एका तत्त्वासाठी अगदी टोकाचा निर्णय घेते. त्या त्यांचे राहते घर वयाची सत्तरी ओलांडलेली असताना सोडून निघून जातात; त्यांच्या कुटुंबापासून दूर जाऊन राहतात. श्रामणेर ही बौद्ध धर्मातील एक दीक्षा आहे तशीच अनागारीका हीसुद्धा बौद्ध धम्मातील दीक्षा आहे. ती भिक्षू होण्याच्या टप्प्यातील पहिली पायरी आहे. श्रामणेर व अनागारीका यामधील फरक म्हणजे श्रामणेर झालेली व्यक्ती घरामध्ये राहू शकत नाही तर अनागारीका झालेली व्यक्ती ही संन्यासी असते मात्र ती घरामध्ये राहू शकते. त्या दोघांचाही जीवनक्रम धम्माला अनुसरून असतो. तो प्रसंग स्वतःला बौद्ध म्हणवून घेणाऱ्या आणि अजूनही जुन्या रूढी पाळणाऱ्या बांधवांसाठी हेलावून सोडणारा ठरतो. लेखिका त्या मागील वैयक्तिक, कौटुंबिक, धार्मिक मतभेद निःपक्षपातीपणे पुस्तकात मांडतात; वाचताना अंतर्मुख व्हायला होते. लेखिका जीवनात कोणती वाट निवडावी, प्रगतीची की अधोगतीची? आंबेडकरी विचारांशी किती प्रामाणिक आहोत? बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यात कौटुंबिक स्तरावर कसे अपयशी ठरत आहोत? ह्या सगळ्या मुद्यांवर प्रकट चिंतन करते. त्यांनी विशेष म्हणजे त्यांच्या संघर्षमयी आयुष्यात वाटचाल करताना साथ दिलेल्या प्रत्येक नात्याचे ऋण व्यक्त करत हे आत्मकथन पूर्ण केले आहे.
प्रत्येक विचारी व भावनाशील आईला, सासूला आणि सुनेला हे आत्मकथन तिच्या जवळचे वाटेल. लेखिकेची मराठी भाषा साधी आणि रसाळ आहे. आत्मकथनाच्या मधल्या टप्प्यात काही प्रवासवर्णने येतात. लेखिकेने बौद्ध धम्मीक स्थळांना दिलेल्या भेटी आणि त्यांची मनोरम नैसर्गिक वर्णने वाचकांना खिळवून ठेवतात. जवळपास एकशेपाचच्या वर घटना-प्रसंगांचे कथन; छायाचित्रांसहित चारशेअठ्ठेचाळीस पाने… सुबक पद्धतीने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. विशेष म्हणजे ह्या पुस्तक विक्रीतून मिळणारे उत्पन्न गोरगरीब, होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणले जाणार आहे.
– गाथा वाघमारे, 98230 72680 gathawaghmare@gmail.com