एकविसाव्या शतकाच्या तिठ्यावर उभा राहून आज मी मागे-पुढे बघतो तेव्हा दुभंग दिसतो. माझ्यात आणि भवतालातही. नव्वदोत्तरी संवेदनशीलता नावाचा प्रकार साहित्यात जमेस धरला जाऊ लागला, तेव्हा त्या धुमाळीत लिहिणा-यांपैकी मी एक होतो. स्वतःचं असं काही गवसलंय, असं वाटावं अशी स्थिती नव्वदीच्या दशकातच प्राप्त झाली. त्याआधीच्या माझ्या नसणा-या अवकाशाबद्दल उसनं अवसान आणून लिहिताना येणारं रितेपण जाणवेनासं झालं. असं काय घडलं होतं आसपास, ज्याने ही ‘स्व’ची जाणीव घट्ट केली, असा मी विचार करतो तेव्हा माझ्या सांस्कृतिक भवतालावर होणारं आक्रमण दिसतं. नव्वदीच्या थोडा आधीचा काळ मुंबईतल्या गिरणगांवाच्या पडझडीचा. तिथली माणसं परागंदा होण्याचा वा दिशाहीन भरकटण्याचा. त्याच्या हक्काच्या जमिनीवरचं त्याचं स्वामित्व हिरावलं जाण्याचा. याच काळात राष्ट्रीय परिघावर बहुजनजाणीव उगवू लागली होती. तिचा बाह्यरंग राजकीय असला तरी त्याची पुटं सामाजिक धारणांमध्ये खोल झिरपत अनेकांच्या (सर्वांच्या नव्हे) नेणिवेपर्यंत गेली. हा नव्या अस्मितांचा आणि प्रतिअस्मितांचा उगवाईचा काळ होता. यात मला कसलं तरी भान आलं. ते नेमकं कसलं, हे सांगता येणार नाही, पण माझ्या पायाखालची माती कुठली आहे आणि तिच्याशी माझं काय नातं आहे, हे मला कळलं. साक्षात्कारासारखा तो उजेड होता. त्या उजेडात काही वाटा मला लख्ख दिसू लागल्या.
त्यानंतर आज वीस वर्षांनी ही जाणीव आज तशीच आहे का? या प्रश्नाचं थेट आणि स्पष्ट उत्तर मला देता येईलसं वाटत नाही. कारण नाटकातला नेपथ्याचा रंगवलेला पडदा झरकन वर जावा आणि दुसरा प्रसंग सुरू व्हावा, तोही पडदा वर जाऊन तिसराच देखावा पार्श्वभागी दिसू लागावा तसे भवतालाचे पडदे झरझर बदलत जाताहेत आणि पायाखालची माती वेगाने सरकतेय. तिच्यात पाय घट्ट रोवून उभा राहण्याचा मी प्रयत्न करतो आहे पण या प्रयत्नात मी कोसळू शकतो, हेही जाणवतं आहे.
नव्वदीच्या दशकात गॅट करार आला. खुली अर्थव्यवस्था, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांची चर्चा होऊ लागली तसा त्या संकल्पनांना प्रखर विरोधही होऊ लागला. तो विरोध करणा-यांच्या बाजूने मी होतो, कारण ह्या गोष्टींनी कामगारांचं काय केलं, हे मला दिसत होतं. तरीही जागतिकीकरण म्हणजे काय याची नेमकी कल्पना त्याला विरोध करणा-यांनाही तेव्हा नव्हती. अंधारात एखादा शत्रू कल्पून त्यावर भाले रोखावे तसं चाललं होतं. पुढच्या दहा वर्षांत तशी स्थिती राहिली नाही. एकविसावं शतक उजाडता उजाडता जागतिकीकरणाचे सार्वत्रिक परिणाम दिसू लागले आणि त्यानंतरच्या पुढच्या दशकभरात तर ते सर्वांना ग्रासून राहिलं. खूप पडझड झाली आणि खूपसं नवीन उगवलंही. केंद्र आणि परिघाच्या भाषेत बोलायचं तर बरेच वर्ग परिघावर फेकले गेले आणि मध्यमवर्ग केंद्रावर स्थिरावला. नव्या व्यवस्थेचा लाभ सर्वाधिक त्यालाच झाला आणि तो होता होता त्याच्यात एक जेनेटिक बदल झाला, तो म्हणजे कोणे एके काळी माणसाचं शेपूट जसं गळून गेलं तशी त्याची आता खालच्या वर्गाशी असलेली सहवेदना, सहानुभूती गळून गेली. त्याचा तो आणि त्याचं एक व्हर्च्युअल जग यात तो रममाण झाला. याचं बक्षीस नव्या व्यवस्थेने त्याला दिला. त्याचा उत्कर्ष केला आणि सेलिब्रेशनचा मंत्र त्याला दिला.
आजचा लेखक ह्याच व्यवस्थेत जगतो आहे. तिचा लाभार्थी ठरतो आहे. ह्या व्यवस्थेत लेखक म्हणून मीही आहे. व्यवस्थेत राहून तिच्या विरोधात लढण्याचं विपरीत भागधेय अनेकांप्रमाणे माझ्या वाट्याला आलं आहे. कालपर्यंत याला गनिमी युद्ध म्हणता आलं असतं, आज ही निकराची, एकाकी आणि एकतर्फी लढाई ठरते आहे. यात काळाने माझ्या ठिकèया उडवल्या आहेत. त्या गोळा करून माझं एकसंध व्यक्तिमत्त्व उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. तो जमेल तेव्हा एक सलग गोष्ट मला सांगता येईल, असं मला वाटतं. पण आज तरी ते जमत नाही. काहीही एकरेषीय दिसत नाही. अनेक रेषाच नव्हे तर असंख्य तुकडे. गोष्ट ह्या तुकड्यांमध्ये विखुरलेली आहे. सत्य संपलेलं आहे, असं मला वाटत नाही, पण ते सापडण्याचे मार्ग अत्यंत दुर्गम झाले आहेत. नव्या काळात नाटक लिहिण्याच्या वाटाही किचकट झाल्या आहेत. नव्वदीच्या दशकात मी अधांतर आणि ‘माझं घर’ या नाटकांतलं वास्तव ब-यापैकी सलगपणे बघू शकत होतो. पुढच्याच दशकात ही स्थिती बदलली. मीही पहिला राहिलो नाही. म्हणजे जगण्याच्या धारणा त्याच असल्या तरी वर्तमानाचे तुकडे कॅलिडोस्कोप प्रमाणे बदलत वेगवेगळी नक्षी धारण करत राहिले. त्यामुळे ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’ आणि ‘काय डेंजर वारा सुटलाय’ ही नाटकं लिहिताना त्यातलं वास्तव विखंडित झालं. अर्थात तरीही या विखंडिततेतूनही फुटलेल्या जत्रेतून आपला मार्ग शोधत बाहेर पडावं तसा मी मला एक सलग विधान करता येतं का याचा प्रयत्न करत राहिलो. मी ते करू शकलो असं मला वाटतं. इतरांना ते तसं वाटतं की नाही हे मला ठाऊक नाही.
यापुढे प्रत्येक जत्रेत मला बाहेर पडायची वाट सापडेल का? येत्या काळात माझ्या लेखकपणाचं काय होईल? ते टिकेल का ह्या अवकाशाच्या पोकळीत विरून जाईल? या प्रश्नांची उत्तरं मला बेचैन करतात. एक तर माणूस म्हणून मी जगण्याची चैन कधीचाच गमावून बसलो आहे. माझ्यातला लेखक हा त्यालाच त्वचेसारखा चिकटलेला आहे, किंबहुना तो म्हणजे त्याच्या धमन्या आहे. शहरातल्या बेधुंद गर्दीत वावरताना रस्त्यावर पावलापावलावर शोपीसमध्ये मांडून ठेवल्यासारखी म्हातारीकोतारी माणसं भीक मागताना आणि नाक्यानाक्यावर कामगार रोजगाराच्या शोधात उभे असताना दिसतात तेव्हा त्या धुंदीची नशा मला चढत नाही. रोज स्टेशनवर, डोक्यावर सामानाची पिशवी घेऊन जगणं शोधायला शहरात दाखल होणारी कळकटलेली कोवळी पोरं दिसतात तेव्हा माझे मातीवरचे पाय लटपटतात. व्हर्च्युअल रिअॅलिटीत आपली आयडेंटिटी लपवत नवी ओळख, नवा पासवर्ड घेऊन ब्राउज करत राहण्यात मला थ्रील वाटत नाही. या काळातली माणसाची महत्त्वाकांक्षा, त्याची यशाची कल्पना, त्यातून जन्म घेणारी हिंसा आणि वासना या सगळ्यातली विदारकता थेट माझ्या पायापर्यंत येऊन पोचते. त्यामुळे माझ्या पायाखालच्या सरकणा-या मातीशी माझं नेमकं कोणतं नातं असणार आहे आणि त्यात माझं असं काय टिकणार आहे, हा माझ्या समोरचा आताचा प्रश्न आहे.
अनेक पदरी प्रशस्त एक्स्प्रेस हायवे वरून सुसाट वेगाने पळणा-या वाहनांसारखं वास्तव पळतंय. त्याचा पाठलाग करून त्याला गाठणं ही गोष्ट केवळ हास्यास्पद ठरेल. त्यातून नामुष्कीच पदरी येईल. त्यापेक्षा हिंदी चित्रपटातला हिरो जसा आडवाटेने डोंगरांवरून उड्या मारत, घसरत घरंगळत जाऊन रस्त्यावर वाहनाला गाठतोच, तसं आडवाटेने, काट्याकुट्यांच्या जंगलांतून, दगडमातीच्या पायवाटांवरून उड्या मारत वाटेतल्या संकटांचा सामना करतच लेखकाला एक्स्प्रेस वेवर पोचावं लागेल. तरीही त्याला ईप्सित वाहन गाठता येईलच याची काहीच खात्री नाही. बहुतेकवेळा ते निसटूनच जाईल. तरीही आडवाटेने रानावनातून उंचसखल प्रदेशांतून पडत धडपडत केलेल्या प्रवासातून त्याचे कल्पिताचे प्रदेश उजळत जातील. जुन्या गोष्टी नव्याने मिळतील. नव्या वाटा गवसतील. कदाचित सत्य तिथेच गवसेल आणि एक्सप्रेस वे वरून गेला तो आभास असेल. उद्याची कथा किंवा नाटक मला लिहायचं असेल तर त्याला अशा अपरिचित मार्गाने भिडण्यावाचून गत्यंतर नाही. तो चकवा ठरण्याचा धोका पत्करूनही त्याच वाटेने जावं लागेल. अर्थात माझ्याच काळात माझ्या बरोबरीचे अनेक लेखक एकरेषीय आणि सलग गोष्ट सांगतही आहेत. अनेकदा ते ती परिणामकारकपणे सांगण्यातही कामयाब झालेले दिसतात. प्रयत्नांती मलाही ते जमू शकेल, पण आता ते पुरेसं वाटत नाही. गोष्टी सुट्या सुट्या सांगता येतात, पण त्याचा अर्थ असा नाही की त्या सुट्या असतात. त्यांच्यात अनेक गोष्टींची शरीरं अर्धीमुर्धी अडकलेली असतात. त्या समजून घेऊ म्हटलं की लक्षात येतं, काहीच सोपं आणि सरळ उरलेलं नाही.
उद्याचं नाटक मी कसं लिहीन हे माझ्यापुढे पुरेसं स्पष्ट नाही. ते कसं लिहिणार नाही, हे त्याहून अधिक स्पष्ट आहे. दर वेळी मी नवं लिहायला बसतो तेव्हा माझा आत्मविश्वास हरवलेला असतो. जेव्हा कधी पुरेपूर आत्मविश्वासाने लिहायला सुरुवात केली आहे तेव्हा त्या विषयानेच माझं गर्वहरण करून मला मूळपदावर आणून सोडलेलं आहे. अधिकाधिक डिजिटलाइज होत जाणारा काळ आणि दिवसेंदिवस आकुंचन पावणारा माणसांचा अवकाश इतक्या सीमित अवकाशात माझी जटिलता कोण समजून घेणार हा प्रश्न आहेत, पण तो तातडीचा नाही. तातडीचा प्रश्न या गुंत्यातून मला माझ्या असण्यापर्यंत पोचता येईल का हा आहे. बाजारीकरणाच्या काळात नाटकासारखी गरीब कला टिकेल का, असा एक मुदलातला प्रश्नही आहेच. पण ‘जोवर एकाला गोष्ट सांगावीशी वाटते आणि दुस-याला ती ऐकावीशी वाटते, तोवर नाटक जिवंत राहील’ असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा माझ्यातल्या लेखकाला आशा वाटते. पण मुळात मी निराशावादी लेखक आहे. माझ्या निराशावादानेच मला अनेकदा तारलंय. आशावादी असतो तर कधीच भुईसपाट झालो असतो. नव्या नव्या येत जाणा-या व्यवस्थांची तितकी भीती वाटत नाही, मात्र त्यातल्या माणसांच्या वर्तनाची वाटते. या भीतीची रूपं तरी नीट जाणून घ्यावीत आणि वारंवार झोपेतून दचकून जागं करणा-या दुःस्वप्नांची मांडणी करावी एवढ्या इच्छेच्या टीचभर भूमीवर जगण्याचं उरलंसुरलं अवसान घेऊन मी उभा आहे.
अधांतर : रु. ७५/-
काय डेंजर वारा सुटलाय : रु. ९५/-
-जयंत पवार, पत्रकार-नाट्लेखक, मोबाइल – ९७६९९८८९८४
इमेल – pawarjayant6001@gmail.com
{jcomments on}