संवेदनेतून समाजाकडे…

0
234

   आपल्‍या घराशेजारी निराधार कुटुंबातील लहानग्‍यासोबत घडलेल्‍या एका घटनेचे टिपण पराग पोतदार यांनी ‘फेसबुक’वर प्रसिद्ध केले आणि त्‍यांला बराच प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद केवळ प्रतिक्रियेच्‍या पातळीपुरता मर्यादित राहिलेला नसून तो समाजाभिमुख काम करणा-या समविचारी गटाचे रूप घेऊ पाहत आहे. वाचून गप्‍प बसण्‍यापेक्षा काही कृती करणे नेहमीच श्रेयस्‍कर. हा गटही तेच करू पाहत आहे. पोतदार यांच्‍या टिपणासह त्‍यांचा गट तयार होण्‍याची ही छोटीशी कहाणी…


     पुण्‍याच्‍या धनकवडी भागात रस्‍त्‍याच्‍या कडेला राहणा-या निराधार कुटुंबातील एका लहानग्यासोबत घडलेली ही घटना. घटना घडली पराग पोतदार यांच्‍या घराशेजारी. त्‍यांनी ती संवेदनशीलतेने टिपून त्‍यावर छोटेसे टिपण लिहिले आणि ते ब्‍लॉग/फेसबुकवर प्रसिद्ध केले. अनेक व्‍यक्‍तींनी आपापली मते त्‍यावर कळवली. चांगली बाब अशी, की एक वाचक अश्विनी कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना, त्या मुलाला सायकल भेट देण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली आणि त्यासाठी पैसे पाठवण्‍याची तयारी दर्शवली. व्‍यंकटेश उत्‍तमराव कल्‍याणकर यांनी प्रतिसाद देताना, ‘येथे कॉमेण्ट करणार्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीने पन्नास रुपये देऊन सर्वांनी मिळून त्या मुलाला सायकल भेट द्यावी’ असा विचार मांडला. मात्र पराग पोतदार यांनी तत्‍पूर्वीच त्‍या मुलाला सायकल घेऊन दिली होती! त्‍यांनी ही बाब अनेकांकडून सायकल देण्‍याची कल्‍पना पुढे आल्‍यानंतर उघड केली.

     त्या सर्व मंडळींमध्‍ये प्रदीप निफाडकर आणखी पुढे गेले. त्यांनी म्हटले, की ‘आपण नुसते लिहितो, करत काही नाही. जर करायचे असेल तर दरमहा शंभर रुपये काढून अशा मुलांना आणि वृद्धांना मदत करावी. पहिले शंभर रूपये माझे!’ सर्वांकडून निफाडकर यांची ही कल्‍पना उचलून धरण्‍यात आली. त्‍यानंतर पराग पोतदार व इतर इच्‍छुक मंडळींनी एकत्र येऊन पैसे जमा करण्‍यास सुरूवात केली. यातून त्‍यांचा हळुहळू समविचारी गट तयार होऊ लागला आहे.

     ऑगस्‍ट महिन्‍यात सर्वत्र साज-या करण्‍यात येणा-या Friendship Day ला ‘कामायनी’ संस्‍थेमध्‍ये जाऊन तेथील मतिमंद मुलांसोबत दिवस घालवण्‍याची कल्‍पना पुढे आली आणि त्‍यानुसार त्‍या संस्‍थेतील मुलांना भेट देण्‍यात आली. त्‍या मुलांचे मैत्रीचे निरागस हात हाती घेतल्‍यानंतर आता ‘थांबणे अशक्‍य असल्‍याचे’ सा-यांना वाटू लागले. हा ग्रूप आपली दिशा नक्‍की करण्‍यासाठी विचारमंथन करत असून एक ‘कॉमन बँक अकाउंट’ सुरू करून त्‍यात जमा केलेल्‍या पैशांतून काही विधायक कामे हाती घेण्‍याचा ग्रूपचा मानस आहे.

     पोतदार, कुलकर्णी, कल्‍याणकर, निफाडकर अशा व्‍यक्‍ती या घटनेच्‍या निमित्‍ताने फेसबुक माध्‍यमातून एकत्र आल्‍या आणि आता ते चांगले काम करू पाहत आहेत. याला आपण ‘सोशल नेटवर्किंग’ म्‍हणू शकतो. या प्रकारे समाजाभिमुखता वाढावी हा ‘थिंक महाराष्ट्र’चा हेतू आहे. समाजातील चांगुलपणा एकत्र यावा, त्‍यांचे परस्‍परांशी बंध जुळून त्‍यांची ताकद संघटित व्‍हावी, आणि या एकत्रित शक्‍तीचा वापर विधायक कामांसाठी केला जावा, हाच ‘थिंक महाराष्‍ट्र’चा उद्देश आहे.

एवढंसं आभाळ…!

पराग पोतदार

     घराशेजारी उभं राहत असलेलं एक घर… त्या घराच्या भिंती उभ्या राहताना त्याची देखभाल करण्यासाठी पत्र्याची झोपडी उभारून अनेक महिन्यांपासून आमचे शेजारी बनून  राहिलेलं एक कुटुंब! आई, वडील आणि दोन चिमुकली भावंडं. जेमतेम आठ बाय दहा मध्ये उभारलेला संसार.. घरभर… रस्त्यावर दिवसभर फिरणारी त्यांची चिमुकली पावलं.. पायरीपाशी  पसरलेल्या  रेतीमध्ये दिवसभर मनसोक्त खेळणं… आसपासच्या बंगल्यातली  पोरं खेळण्यांशी कशी खेळतात हे गेटवर उभं राहून पाहत राहणं… रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यामागे उगीचच पळत राहणं.. काळ्या पडून स्वतःचा रंग हरवून बसलेल्या बशीत काहीतरी खाणं… लाकडं तोडणा-या बापाच्या मागेपुढे उगीच घोटाळत राहणं…. हातगाडीवर विकायला येणा-या वस्तूंकडे आशाळभूतपणे पाहत राहणं…. आणि चुकून आई किंवा बाप मेहेरबान झालाच तर स्वर्गीय आनंद देणारी कुल्फी अगर गार गार बर्फाचा गोळा अंगभर पसरेपर्यंत खात राहणं… दिवसभर  हुंदडून दमल्यावर जमिनीवरच पसरलेल्या टोचणा-या चादरीवर शांत झोपूनही जाणं!

      या सगळ्या बालविश्वामध्ये सर्वात जिवाभावाची आणि नेहमी सोबत असणारी एक पाय मोडलेली खेळण्यातली सायकल. झोपतानाही शेजारी पहुडलेली असायची… मित्र नव्हतेच  पण त्या सायकलबरोबर काही वेगळं नातं जुळलेलं असावं…

      परवा सोसायटीमध्ये भंगारवाला आला… नेहमी येतो तोच… रोज दिसणा-या या छोट्याकडे पाहत तो गमतीनं म्हणाला, “काय रे, नेऊ का तुझी ही सायकल..??”

     एकदम, कुणीतरी गळा पकडावा तसं अस्वस्थ होत त्यानं सायकल मागे घेतली आणि काही झालं तरी सायकल मिळणार नाही हा निर्धार कृतीतूनच सांगितला..  भंगारवाला नजरेआड होईपर्यंत मुलानं त्याच्यावरून नजर हलू दिली नाही आणि सायकलवरची पकडही घट्ट ठेवली होती… पुढच्या वळणावर जाऊन भंगारवाला परत आला… भंगारवाल्याचा आवाज ऐकून झोपडीतून मुलाची आई बाहेर आली… मुलाचं लक्ष नाही हे पाहून ती सायकल एका हातात उचलून धरत म्हणाली, ” किती देणार याचे?” पंधरा की वीस रुपये यांवर थोडीशी घासाघीसही झाली.. अखेर वीस रुपये नक्की ठरले आणि ती सायकल भंगाराच्या गाडीवर ठेवली गेली…

      तो छोटा मुलगा मात्र कोप-यात उभं राहून हे सारं पाहत होता.. डोळ्यांमध्ये प्रचंड काकुळता आणि कारुण्य दाटलं होतं.. आईसमोर जाऊन भांडून, रडून का होईना सायकल परत मिळवावी असं वाटत होतं पण यातलं त्यानं काहीच केलं नाही.. आश्चर्य वाटलं आणि वाईटही… मगाशी गमतीनं भंगारवाला जे म्हणत होता ते आता खरंच घडत होतं.

    या सगळ्याचा किती गोंधळ त्या कोवळ्या मनात उठला असेल हे समजायला मार्ग नाही… आईच्या हातावर वीस रुपयांची नोट टेकवून  भंगारवाल्यानं गाडी पुढे घेतली… दारामागे लपून पाहणारी चिमुकली पावलं मला उगीचच थरथरल्यासारखी भासली… आईचा धाक होता की काय ते माहीत नाही, पण आई फिरून झोपडीत शिरेपर्यंत ते पोरगं काही बाहेर आलं नाही. आईची पाठ फिरल्यावर मात्र गाडीवरची नजर हलू ना देता वेगात बाहेर आलं… आणि भंगाराची गाडी पुढे जात असताना हताशपणे पाहत उभं राहिलं होतं.. भंगारवाला निघून गेला..

     छोट्याशा तळहातांनी स्वतःचेच डोळे पुसले गेले असल्याचा भास मला लांबून झाला…

     जमिनीवर अंथरलेल्या त्या चादरीवर त्या चिमुकल्याला त्या रात्री झोप लागली असेल का हा प्रश्न माझ्या मनाला सतावत राहिला….

पराग पोतदार, वरिष्‍ठ पत्रकार-उपसंपादक, ‘लोकमत’, भ्रमणध्वनी – 9850304154, इमेल – sweetparag@gmail.com

‘जगण्‍यातील काही’ विभागातील इतर लेख

निराधार कोरडी ‘वाट’

अस्वस्थ मी…

काळी-गोरी, सुंदर-कुरूप…

मला तुझ्याशी मैत्री करायचीय!!!

धुआँ उडाताही चला……….

{jcomments on}

About Post Author

Previous articleपर्स आणि सुटकेस
Next articleशाळाबाह्य मुले- यशोगाथा आणि आव्हाने
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.