म्यांमारमधील विरोधी पक्षनेत्या, शांतताप्रेमी सु की यांना आपले परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा तेथील दौर्यांत भेटले नाहीत ही बाब गंभीरपणे घेतली पाहिजे. त्यामधून भारत सरकार परराष्ट्रधोरणाकडे हव्या तेवढ्या गांभीर्याने पाहत नाही हे स्पष्ट होते. एका अर्थाने, पं. नेहरू यांनी आखून दिलेल्या धोरणाची ही वंचना आहे. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे भारत जगाकडे खुल्या दृष्टीने पाहत नाही व स्थानिक सत्ताधार्यांची मनधरणी करतो असे दिसून येते. भारताला महासत्ता व्हायचे असेल तर प्रथम स्वत:चे धोरण स्वत: ठरवणे शिकायला हवे…..
म्यांमारमध्ये (ब्रह्मदेश) म्हटले तर लोकशाही आहे; परंतु ती तेथील लष्करी राजवटीच्या हातामधील आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी अलिकडेच त्या देशाला भेट दिली; परंतु त्यांनी नोबेल व नेहरू पुरस्काराने सन्मानित सु की या तेथील शांतताप्रेमी विचारवंत महिलेला भेटण्याचे मात्र टाळले. या गोष्टीकडे करण थापर या भारतीय पत्रकाराने त्याच्या साप्ताहिक टिकाटिप्पणीत लक्ष वेधले आहे. सु की यांचे आरंभीचे आयुष्य भारतात गेले. त्या भारतप्रेमी व्यक्ती आहेत. त्यांना गांधींबद्दल आदर आहे व आपण त्यांचेच तत्त्वज्ञान अनुसरतो असे त्या नमूद करतात.
सु की यांना जगामध्येदेखील मान आहे आणि नेल्सन मंडेला या दक्षिण आफ्रिकेतील नेत्याला जगात जे स्थान आहे तेच सु की यांना आहे. थापर लिहितात, की त्या दोघांचा आजच्या काळातील धीरोदात्त जागतिक व्यक्तींमध्ये समावेश होतो.
मग कृष्णा सु की यांना का भेटले नाहीत? तर म्यांमारमधील लष्करी राजवटीला ते सोयीचे वाटत नव्हते आणि कृष्णा तेथील सत्ताधार्यांना दुखावू इच्छीत नाहीत. थापर यांना नवल असे वाटते, की कृष्णा यांचे हे म्हणणे वृत्रपत्रादी माध्यमांनादेखील पटले व म्हणून त्यांनी कृष्णा यांच्या या अयोग्य राजनैतिक वर्तनाकडे दुर्लक्ष केले!
सू की या ऑग सान यांच्या कन्या. ऑग सान यांना म्यांमारमध्ये पितृस्थान दिले जाते इतकी मोठी त्यांची कर्तबगारी त्या देशाच्या राष्ट्रकारणात आहे. थापर यांनी सु की यांची ‘रिथ व्याख्यानमाला’ ब्रिटनमध्ये सध्या कशी गाजत व सर्वत्र ऐकली जात आहे हेदेखील नमूद केले आहे. त्यामध्ये सु की यांनी लोकशाही मूल्यांचीच उदोउदो केली आहे व त्यामुळे ती रंगूनमधून गुपचूपपणे, सत्ताधार्यांच्या नजरेस पडू न देता लंडनला पोचवण्यात आली. त्या व्याख्यानांमध्ये सु की गांधींचा आदराने उल्लेख करतात. सु की गेल्या वीस-बावीस वर्षांपैकी पंधरा वर्षे तुरुंगात अथवा स्थानबध्दतेत आहेत. त्या नोव्हेंबर 2010 पासून मुक्त आहेत, परंतु त्याच्यावर अनेक बंधने आहेत.
पं. नेहरूनी भारताच्या परराष्ट्रधोरणात फार चांगले पायंडे पाडले होते. त्यांनी तिसर्या जगातील गरीब देशांमधील शांतताप्रेमी पुढार्यांना एकत्र करण्याचा, त्यांना जगापुढे आणण्याचा प्रयत्न सतत केला. त्यांच्यानंतर तशी वेगळी दृष्टी थोड्या प्रमाणात अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवली, एरवी जगाकडे पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन उदास राहिलेला आहे. जो देश (वा व्यक्ती) विशाल जगाकडे कुतूहलाने पाहात नाही तो देश (वा व्यक्ती) डबक्यात लडबडत राहतो.
(संकलित)
{jcomments on}