चौगाव गावी दिवाळीला कोणत्या हेल्यांची टक्कर लावायची हे आधीच ठरवलेले असायचे. ठरावीक लोकांकडेच टक्करीसाठी हेले तयार केलेले असायचे. सुरुवातीस, दोन्ही हेले एकमेकांचा अदमास घेत एकमेकांभोवती फिरायचे. शेवटी, एकमेकांचे डोके एकमेकांना भिडायचे. लोक हुर्यो करून ओरडायचे. हेल्यांना चेव चढायचा. कोणी डोक्याची ताकद वापरायचा तर कोणी शिंगांचा वापर करायचा …
हेल्यांची (रेडे) टक्कर दिवाळीच्या दिवशी लावण्याची परंपरा धुळे जिल्ह्यातील चौगाव गावात आहे. टक्कर साल्या माल्या डोंगर उतारावरील पायथ्याशी मोकळ्या माळरानावर होते. पूर्वी, हेल्यांजवळ जाण्यास लोक घाबरत. आता, लोकांच्या लाठ्याकाठ्यांना घाबरून हेले टक्कर खेळतात की काय असे वाटते. हेल्यांचे पालनपोषण करून त्यांना मोठे करणारी मोठ्या मनाची माणसे कमी झाली आहेत. हेल्यांना खुराक खाऊ घालून त्यांना मल्लासारखे ताकदवान बनवत. काळू फौजदार तर त्यांच्या हेल्याला सरकी आणि ढेप यांच्याबरोबर अंडी खाऊ घालत आणि कधी कधी, दारूही पाजत ! हेला टक्करीसाठी तयार करणे हा काही लोकांचा शौक असे. टक्कर इरास नदीच्या वाळूत होई. पण गावाला उपयोगी पडेल असे धरण इरास नदीवर वरच्या बाजूला, हिंगणे गावाजवळ झाले. नदीचे पात्र अतिक्रमणामुळे आक्रसलेही. तिच्या काठावरील वड-पिंपळ-आंब्याची झाडे नाहीशी झाली. तेथे झोपड्या आल्या. नदीत बेशरम गवत माजले. वाळुपात्रच दिसेनासे झाले !
हेल्यांच्या जीवनात त्यांच्या स्पर्धेच्या वेळी होणारा सन्मान वगळला तर त्यांच्या वाट्याला पहिल्यापासून अवहेलनाच आली आहे. त्यांचा उपयोग पखालीने पाणी वाहण्यासाठी होई. पखालीने पाणी भरण्याचे काम जवळ जवळ अखंड चाले. त्यामुळे सतत राबणाऱ्या माणसाला हिणवण्यासाठी ‘जन्माला आला हेला आणि पाणी वाहता मेला’ असे म्हणत. दिवाळीला गाईम्हशींना ओवाळताना गाईम्हशींच्या गाण्यामध्ये काही ओळी अशा होत्या… पखाल पखाल पाणी पेती रे, पखाल पखाल पाणी पेती…. हंडा नि गुंडा दूध देती रे हंडा नि गुंडा दूध देती…
बेलदार लोक भिंती आणि घरे बांधत. तेव्हा काही भागांत बैलांबरोबर हेल्यांनाही औताला जुंपत. हेल्यांची उपयुक्तता हळुहळू कमी होत गेली आहे.
‘हेलानं मरण दसराले चुकस नही’ अशीही म्हण होती. बाया ही म्हण एखादे नावडते काम कितीही नाही म्हटले तरी करावेच लागते हे सुचवण्यासाठी वापरत. सतत निरर्थकपणे राबणाऱ्या माणसाला हेला म्हणून हिणवत. वरील म्हणीचा अर्थ असाही निघतो, की गावाच्या वेशीजवळ दसऱ्याच्या दिवशी हेला मारण्याची पद्धत होती. काही ठिकाणी गावाच्या वेशीवर हेल्यांच्या मुंडक्यांच्या प्रतिमा मूर्तिरूपात पाहण्यास मिळतात. लोक हेल्याचे मांस खात असावेत. चौगावला दसऱ्याच्या दिवशी बोकड बळीचीही प्रथा होती.
लोकांचे करमणुकीचे ‘ट्रेंड’ बदलले आहेत. हेल्यांची टक्कर हा पूर्वी करमणुकीचा एक प्रकार होता. करमणुकीचे इतके प्रकार उपलब्ध झाले आहेत की हेल्यांची टक्कर इतिहासजमा झाली तरी आश्चर्य वाटण्यास नको. गजा गवळीचा (खंडू गवळीचा) जाण्या नावाचा हेला हत्तीसारखा झुलणारा चौगाव गावात फार ख्यातनाम होता. आर्वीला एका बाईकडे गोवर्धन्या हेला होता. काळू फौजदार आणि वसंत निर्वासित, रामा मास्तर, साखरलाल मोरे अशा काही मंडळींकडील हेले टक्करींसाठी प्रसिद्ध होते.
– गोविंद मोरे 9588431912 gm24507@gmail.com
————————————————————————————————————————————–
सुंदर माहिती व सादरीकरण…