हेलेन केलर हे नाव परिचयाचे आहे ते स्नेहभावाचे प्रतीक म्हणून. अंध, मूक-बहिऱ्या असलेल्या त्या मुलीने तिच्या जन्मजात अपूर्णत्वावर मात केली; ती सर्वसामान्य माणसांपेक्षाही अधिक शिकली. पुढे, तिने सर्व जगातील मूक, बधिर आणि अंध यांच्या विकासासाठी कार्य केले. माणसे तिचे आत्मचरित्र वाचतात, प्रभावित-प्रेरित होतात. अधिकतर तिच्यासंबंधी लोकांच्या मनामध्ये अपार आदर असतो. कारण अशी माणसे अलौकीक असतात. त्याच हेलेन केलरवर वाङ्मयचौर्याचा आरोप झाला होता व त्यामुळे ती काही काळ खूप व्यथित होती हे वाचून आश्चर्य वाटेल!
हेलेनने लिहिलेले ‘स्टोरी ऑफ माय लाईफ’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्याचा मराठीत अनुवाद (‘माझी कहाणी’) डॉ शरदचंद्र गोखले यांनी हेलेनच्या भारतभेटीच्या निमित्ताने (1955) केला (त्या अनुवादित पुस्तकाचा उल्लेख ‘कहाणी’ असा यापुढे करत आहे). दुसऱ्या एका Hellen Keller – Sketch For a Portrait ह्या शीर्षकाच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘हेलेन केलर – एक व्यक्तिरेखा’ या नावाने परचुरे प्रकाशन यांनी 1958 साली प्रसिद्ध केला आहे (त्या पुस्तकाचा उल्लेख यापुढे ‘व्यक्तिरेखा’ असे म्हणून करत आहे).
हेलेन केलर यांचा जन्म अमेरिकेतीलअलाबामा संस्थानातील टस्कबिया या गावात 27 जून 1880 रोजी झाला. तिचे वडील संपादक होते. तिच्या पूर्वजांनी अमेरिकन नागरी युद्धात दक्षिणेच्या बाजूने लढा दिला होता. तिचे एक स्वीस पूर्वज झुरिचमध्ये बहिऱ्यांना शिकवत असत. त्यांनी त्या विषयावर एक पुस्तकही लिहिले आहे. त्या संदर्भात हेलेनचे भाष्य – ”म्हणतात ना, की प्रत्येक राजाच्या पूर्वजांमध्ये कोणीतरी गुलाम असतोच आणि प्रत्येक गुलामाच्या वंशवेलीमध्ये एखादा तरी राजा होऊन गेलेला असतो. परंतु माझ्या बाबतीतील हा समसमासंयोग विलक्षणच म्हणायचा!” (कहाणी पृष्ठ 2).
हेलेन आणि तिची शिक्षिका अॅन सुलिव्हान |
हेलेन केवळ दीड वर्षांची असताना तिला मोठा आजार झाला. “मी बेशुद्धीच्या तापाने फणफणत पडले होते. मेंदू आणि पोट ह्यांमध्ये आकसण्याची तीव्र क्रिया झाल्यामुळे ते घडले असे म्हणतात. तो ताप मला जितक्या झटकन आणि अद्भुत रीतीने आला होता तितक्याच झटकन तो निघूनही गेला. सकाळी साऱ्या घरात आनंदीआनंद पसरला. परंतु कोणालाच – डॉक्टरांनासुद्धा – कल्पना आली नाही, की मी कायमची आंधळी, बहिरी आणि मुकी झालेली आहे!” (कहाणी, पृष्ठ 5). हेलेनला शिकवण्यासाठी बॉस्टनमधील पार्किन्स संस्थेची मदत घ्यावी असे डॉ. अलेक्झांडर बेल यांनी हेलेनच्या वडिलांना सुचवले. त्यावेळी डॉ. बेल वॉशिंग्टन येथे बहिऱ्यांच्या शिक्षणावर प्रयोग करत होते (व्यक्तिरेखा, पृष्ठ 5). यथावकाश, हेलेनसाठी अॅन सुलिव्हान (Ann Sullivan) नावाची शिक्षिका नेमली गेली. ती स्वतः काही प्रमाणात अंध व बहिरी होती आणि पार्किन्स शाळेत सहा वर्षे शिकली होती. ती शिक्षिका हेलेनच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती होय असे म्हणता येईल. हेलेनला तिच्या शिक्षणाला सुरुवात होणार हे समजले होते का? त्यावेळी तिची मानसिक स्थिती काय होती? तिच्याच शब्दांत – ”तुम्ही खूप धुके आलेल्या वेळी बोटीवर गेला होता का? त्यावेळी असे वाटते, की कसल्या तरी पांढऱ्या अंधारात तुम्हाला गुरफटून टाकले आहे आणि तुमचे व्याकुळ व उत्सुक जहाज आवाजाच्या अनुरोधाने चाचपडत आहे. काही तरी घडावे म्हणून तुम्ही वाट पाहत असता… शिक्षणापूर्वी, माझी अवस्था तशीच होती.” (कहाणी, पृष्ठ 19)
सुलिव्हान हिने हेलेनला स्पर्शखुणांच्या भाषेने शिकवले. ”माझ्या एका हातावरून पाण्याची धार वाहत होती आणि दुसऱ्या हातात बार्इंनी अक्षरे करून दाखवली : पा – णी. बार्इंची बोटे कोणत्या खुणा कोणत्या अक्षरांसाठी करताहेत यावर मी एकचित्त होऊन माझ्या जागी उभी होते. — आणि मला भाषेचे कोडे एकदा उलगडले! पाणी म्हणजे ज्याची शीतल, ओघवती आणि विस्मयजनक धारा माझ्या हातावरून वाहत होती ते!” (कहाणी, पृष्ठ 21)
हेलेन अशा रीतीने भगीरथ प्रयत्नांनी शिकू लागली. सारे प्रश्न आणि सारी उत्तरे स्पर्शखुणांनी होत होती. त्यानंतर ती वाचण्यास शिकली. ”बार्इंनी उठावाची अक्षरे काढलेले कार्डबोर्डचे तुकडे मला दिले. त्यातील शब्दाने मला एखाद्या वस्तूचा, गुणाचा किंवा घटनेचा बोध होतो हे मला कळले.” (कहाणी, प्रकरण 7).
अशा प्रकारे, ती वाचन शिकल्यावर लेखन शिकली आणि पुढे, खुणांच्या लिपीने लिहू लागली. पुढील सहा वर्षांत तिची प्रगती खूपच झाली. ती प्रगती दाखवावी म्हणून सुलिव्हान बाई तिला घेऊन बॉस्टनच्या शाळेत गेल्या. ते वर्ष होते 1892. हेलेनने शाळेचे प्रमुख आनाग्नोस ह्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक गोष्ट लिहून दिली – ‘सम्राट शिशिर‘ (The Frost King). ती त्यांना फार आवडली. त्यांनी ती शाळेच्या वार्षिक वृत्तांतात प्रसिद्ध केली. आणि तेथेच हेलेनच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. हेलेनने लिहून दिलेली The Frost King ही गोष्ट म्हणजे वांङ्मयचौर्य आहे असा आरोप तिच्यावर झाला. त्या गोष्टीत आणि हेलेनच्या जन्मापूर्वी प्रकाशित झालेल्या ‘शिशिरातील अप्सरा‘ या, कु कॅनबी हिने लिहिलेल्या गोष्टीत विलक्षण साम्य आहे असे ‘सिद्ध‘ झाले. “ती गोष्ट मला वाचून दाखवली गेली असावी आणि माझी गोष्ट म्हणजे वाङ्मयचौर्य आहे हे उघड दिसू लागले.” (कहाणी, पृष्ठ 63). “एका शिक्षिकेने मला ‘सम्राट शिशिर’संबंधी एका समारंभाआधी विचारले, मी म्हणाले, “सुलिव्हानबार्इंनी मला जॅक फ्रॉस्ट व त्याची कामगिरी याविषयी सांगितले होते. त्या बोलण्यावर मी कु कॅनबी हिची गोष्ट वाचली होती असा ‘कबुलीजबाब‘ देत आहे असा त्यांचा समज झाला व तसे त्यांनी आनाग्नोस यांना सांगितले.” त्यामुळे संस्थाप्रमुख रागावले. त्यांनी ‘वाङ्मयचौर्य‘ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. त्या समितीत शिक्षक आणि अन्य अधिकारी होते. त्यांनी हेलेनला बरेच प्रश्न विचारले. तिने त्या प्रश्नांना उत्तरादाखल फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढेच बोलायचे होते. हेलेन तशा प्रकारची ती उत्तरे देताना टेकीला आली.
दोन कथांमंध्ये हे साम्य कसे आले असावे? हेलेन सांगते – ”चार वर्षांपूर्वी बूस्टर येथे आलो असताना श्रीमती हॉपकिन्स यांच्याजवळ कु कॅनबी हिच्या पुस्तकाची प्रत होती. माझ्या मनोरंजनासाठी त्या निरनिराळ्या पुस्तकांतून गोष्टी मला वाचून दाखवत असत. त्या काळी त्या गोष्टींचा अर्थ मला फारसा कळत नसे. ती गोष्ट ऐकल्याचे मला पुसटसेदेखील आठवत नाही. परंतु मी ऐकलेले अवघड शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या भाषेचा खोल ठसा माझ्या मनावर उमटला होता. एक मात्र खरे, की मला माझी गोष्ट कित्येक दिवसांनी, इतक्या सहजपणे सुचली – स्फुरलीच म्हणा ना! की ती गोष्ट दुसऱ्या कोणाची असावी ह्याची तिळमात्र शंका माझ्या मनात आली नाही.” (कहाणी, पृष्ठ 65 ).
हे सहजगत्या कसे झाले असावे? हेलेन सांगते – ”जे जे मी ग्रहण करत असे त्यांपैकी मला आवडलेले सारे आपलेसे करणे आणि ते जणू काही माझे स्वतःचे आहे अशा रीतीने वापरणे ही माझ्या पत्रव्यवहारात आणि सुरुवातीच्या लेखनात आढळणारी सवय आहे. —— स्टीवनसन यांनी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक तरुण लेखक हा त्याला जे चांगले वाटेल त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला काय आवडते ते अतिशय विस्मयकारक रीतीने लवकर लवकर बदलत असते. थोर लेखकांनीदेखील अशा तऱ्हेने, कित्येक वर्षे सवय केल्यावरच शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळवले आहे. मला वाटते, मी त्या अवस्थेतून अजून बाहेर पडलेली नाही. हेही तितकेच खरे, की मी वाचलेले विचार आणि माझे स्वतःचे विचार ह्यांत मला नेहमीच फरक करता येत नाही, कारण मी जे जे वाचते, ते जणू माझ्या मनाचा एक भाग बनते. त्याचा परिणाम म्हणून माझ्या जवळ जवळ प्रत्येक लिखाणात असा काही भाग येतो, की तुकडे तुकडे जोडून केलेल्या दुपट्याची कळा त्याला येते.” (कहाणी, पृष्ठ 67).
हेलेन हिचे ‘माझी कहाणी’ 1903 साली प्रकाशित झाले तर The world I live in हे 1908 साली. कहाणीत तिने सांगितलेला ‘वाङ्मयचौर्य‘ हा प्रसंग घडला तेव्हा ती केवळ बारा वर्षांची होती आणि तिची साहित्यिक जाणीव प्रगल्भ असणे जवळ जवळ अशक्य असे म्हणता येईल. तरीही तिच्यावर वाङ्मयचौर्य असा आरोप होणे कोणत्याही प्रकारच्या परिपक्वतेचे द्योतक म्हणता येत नाही.
हेलेन केलर |
हेलेनला तिच्यावर झालेला वाङ्मयचौर्याचा आरोप खूपच लागला. इतका की तिचे आत्मचरित्र 1903 साली प्रकाशित होईपर्यंत, म्हणजे आरोप झाल्यानंतर अकरा वर्षांपर्यंत तिच्या मनातून तो गेला नाही. त्याचबरोबर झाला प्रकार हा रूढ अर्थाने वाङ्मयचौर्य नसून लेखनप्रक्रियेतील एक भाग आहे हे सर्वांनां समजावून सांगणे आवश्यक आहे असे तिला सतत वाटत होते. तिने आत्मचरित्रात केलेला खुलासा वाचताना ते प्रकर्षाने जाणवते.
त्याच प्रमाणे आपले शिक्षण रूढ पद्धतीपेक्षा किती वेगळ्या प्रकारे झाले हे जाणण्याची उत्सुकता तत्कालीन जनसामान्यांनाही होती याची जाणीव तिला सतत असावी. त्यातूनच तिचे दुसरे पुस्तक जन्मले The World I Live In –1908 साली. त्या पुस्तकाची एक आवृत्ती प्रोजेक्ट गटेनबर्ग (Project Gutenberg) मध्ये उपलब्ध आहे. त्याच्या प्रारंभी एक अभिप्राय Queen या नियतकालिकातील नोंदला आहे – ”हे पुस्तक म्हणजे एका चमत्कारपूर्ण जीवनाची नोंद आहे. एका अंध, अर्ध बहिऱ्या–मुक्या मुलीने ज्या सहनशीलतेने आणि चिकाटीने मानवी जीवनाच्या संपर्कात येण्याचा पराक्रम केला, तो वाचताना कोणाही वाचकाला अंतर्बाह्य हेलावून जायला होईल. त्याचबरोबर तिने ज्या प्रखर प्रज्ञेने बाह्य जगाशी संपर्क साधणे शक्य केले त्याबद्दल विस्मय वाटल्याशिवाय राहणार नाही.”
स्वतः हेलेनने जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात ती म्हणते – प्रत्येक पुस्तक हे एका अर्थाने आत्मचरित्रात्मक असते. परंतु इतर आत्म- नोंदी करणाऱ्यांना विषय बदलण्याचे स्वातंत्र्य असते, ते मला नाही. मी जागतिक शिक्षणपद्धती सुधारण्यासाठी काही प्रस्ताव दिला, तर माझे संपादक मित्र म्हणतील ”ते सारे ठीक आहे; पण तुमच्या वयाच्या सहाव्या वर्षी, चांगुलपणा आणि सौंदर्य म्हणजे तुम्हाला काय वाटत होतं ते आम्हाला सांगा नां!” हे पूर्ण माहीत असल्याने हेलेनने तिच्या जाणिवांचा परिचय काही निबंधांतून करून दिला आहे. त्यांपैकी काही निबंधांची शीर्षके – ‘बघणारा हात’, ‘इतरांचे हात’, ‘स्पर्शाचे सामर्थ्य’, ‘उच्चतर स्पंदने’ अशी आहेत. त्यातील पहिल्या निबंधात ती म्हणते – “माझ्या हाताला जरी चमकदार रंगजाणवत नसले तरी सौंदर्याच्या प्रदेशातून मी हद्दपार झालेली नाही. स्पर्शयोग्य वस्तू संपूर्णपणे माझ्या मेंदूत शिरते, त्या वस्तूचे सारे उबदार अस्तित्व माझ्या मेंदूत आलेले असते; बाह्य जगातील तिचे स्थान माझ्याही मेंदूत असते. मी कोठल्याही आत्मस्तुतीशिवाय सांगू शकते, की मन हे विश्वाइतकेच विशाल असते.” ‘इतरांचे हात’ या निबंधात ती म्हणते, “मी जे हाताचे वर्णन केले आहे, ते काही माझ्या स्नेह्यांच्या हातांचे खरे वर्णन करत नाहीत; त्यांचे जे गुण मला माहीत आहेत तेच मी सांगत आहे अशी टीका माझ्यावर झाली आहे. तुम्ही काही पाहिल्यावर ज्या शब्दांत वर्णन करता ते शब्द वापरण्याचा हक्क मला नाही असे टीकाकारांना वाटते का? हस्तस्पर्शांतून मला ज्या संवेदना होत असतात, त्याच मी माझ्या शब्दांत मांडत असते हे लक्षात घ्यावे.”
हेलेनने तिच्या उणिवांवर केलेली मात ही वाचकाला बरेच काही शिकवून जाते.
(फोटो इंटरनेटवरून साभार)
टेलिग्राम |
व्हॉट्सअॅप |
फेसबुक |
ट्विटर |
– रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com
रामचंद्र वझे हे निवृत्त बँक अधिकारी. त्यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्यांना प्रवासवर्णनांचा अभ्यास करत असताना काही जुनी पुस्तके सापडली. ती पुस्तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी तशा पुस्तकांचा परिचय लिहिण्यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्लोज्ड सर्किट’, ‘शब्दसुरांच्या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा हंस, स्त्री, अनुष्टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे ’महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांमधून लेख आणि पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
——————————————————————————————————————————————————————————————————————
लेख आवडला.