हेमाडपंती मंदिरे : महाराष्ट्राची स्थापत्यकला (Maharashtra’s Architecture Hemadpanti Temples)

1
192

 

महाराष्ट्रातील हेमाडपंतीमंदिरे म्हणजे मध्ययुगीन भारताचे सांस्कृतिक संचित आहे. ती राज्यात विविध ठिकाणी आढळतात. इंग्रजी लेखक आल्डस हक्सले यांनी म्हटले आहे, की त्या भव्य मंदिरांच्या पुढे जगातील महदाश्चर्य म्हणून गाजलेला ताजमहालही कलेच्या दृष्टीने सर्वसामान्य ठरेल!एकूणच, भारतीय शिल्पशास्त्र आणि स्थापत्यकला फुलली, बहरली आणि तारलीसुद्धा गेली ती प्रामुख्याने मंदिरांच्या निर्माणातून आणि राजाश्रयाने! अनेक मंदिरशिल्पे मंदिरांवरील पाषाणावरच कोरली गेली आहेत. काही भारतीय भाषांच्या उगमाचा शोध मंदिरांतील शिलालेखांच्या आधारे घेता आला. भारतीय महाकाव्य, पुराणग्रंथ यांतील घटना, प्रसंग आणि कामशिल्पेही मंदिरांच्या भिंतींवर, खांबांवर कोरण्यात आली आहेत. तेवढा मोकळेपणा समाजात होता व कलाकारांना तसे स्वातंत्र्य होते. त्याची साक्ष खजुराहो, कोणार्क, भुवनेश्वर येथील शिल्पे आणि पुरी येथील जगन्नाथ, मदुराई येथील मीनाक्षी व रामेश्वर, हंपी येथील मंदिरे या साऱ्या पुरातन वास्तू देतात. मंदिरांच्या निर्माणाची रीती(शैली) ही हिंदू (वैदिक), जैन आणि बौद्ध या, भारतीय भूमीतील तिन्ही धर्मांच्या आश्रयाने निर्माण झाली. त्या धर्मांतील सांप्रदायिक स्पर्धासुद्धा स्थापत्यकलेच्या निर्माणास आणि भव्यतेस कारणीभूत ठरली. मात्र ती स्पर्धा सात्त्विक व निकोप स्वरूपाची आणि निर्मितीशील होती; त्यात मोडतोड अथवा विद्ध्वंस नव्हते. त्या लोकांनी मंदिरशिल्पे एकमेकांच्या धर्मांचा आदर राखत, एकाच ठिकाणी भव्य स्वरूपात उभारण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, तिन्ही धर्मांतील शिल्पे वेरूळच्या कैलास लेण्यात आहेत. त्यांत वैदिक धर्माचे मंदिर सर्वात उत्तुंग आहे. कैलास लेणेहे आधी कळस मग पाया या पद्धतीने उभे राहिले यासाठीही प्रसिद्ध आहेच.
घृष्णेश्वर मंदिर
महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी हेमाडपंती मंदिरे घृष्णेश्वर, वेरूळ, गोंदेश्वर, सिन्नर, अमृतेश्वर, रतनगड, अकोले, औंढा नागनाथ, त्रिंबकेश्वर, विदर्भात जयपूर-कोटली, अमदापूर, शिरपूर, मेहेकर, धोत्रा, सातगाव, लोणार या ठिकाणी आहेत. नासिक जिल्ह्यातील सिन्नर हे गाव यादवांच्या राजधानीचे शहर होते. त्या गावाच्या जवळपास हेमाडपंती मंदिरे पाच आहेत.  

मंदिररचनेच्या तीन पद्धती सुप्रभेदागमावलोकमधील श्लोकात सांगितल्या आहेत. त्यामध्ये नागर, द्राविड आणि वेसर या

अमृतेश्वर मंदिराची भिंत व अलंकृत खांब

शैलींचा समावेश होतो. मंदिरांच्या रचना नागर पद्धतीत चौकोनी, द्राविडमध्ये अष्टकोनी आणि वेसर पद्धतीमध्ये वर्तुळाकृती अशा दिसतात. मंदिराची रचनाशैली मंदिराच्या आकारावरून कळते. रचनापद्धतीतही अभिसरण व शैल्यंतर होऊन नवी संमिश्र पद्धत कालचक्रामध्ये उदयास आली. हंपीयेथील मंदिरे द्राविड आणि होयसळ या दोन पद्धतींच्या अभिसरणातून निर्माण झाली आहेत. मंदिरबांधणीचा तो विकास आणि विस्तार चंदेल, कलिंग, चालुक्य, सोळंकी, पल्लव, चोल, पांड्य, होयसळ, नायक आणि यादव या राजवंशांच्या राजवटींत घडून आला. हेमाडपंतीमंदिरांची उभारणी महाराष्ट्रात देवगिरीचे यादव या राजांच्या राजवटीत, तेराव्या-चौदाव्या शतकात झाली. त्या शैलीची मंदिरे यादव राजवटीनंतरही सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत बांधली गेली. ती मंदिरे बांधण्याच्या व एकूण भारतीय कलेच्या निर्मितीमागे धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोन ही महत्त्वाची प्रेरणा होती.

हेमाद्रीपंडित हे यादव राजा महादेवराय यांचे प्रधान होते. हेमाडपंती मंदिरांची रचना काळ्या पाषाणात करण्यात आली आहे. त्यांतील बहुसंख्य मंदिरे शिवमंदिरे आहेत. ती मंदिरे जास्त करून पूर्वाभिमुख आहेत. तसेच, त्या मंदिरांची उभारणी नदी, विहीर, तलाव, नैसर्गिकरीत्या निर्माण झालेले पाणवठे, तळे इत्यादी जलस्थानी करण्यात आली आहे. मंदिरे दगडांची रचना चुन्याशिवाय एकावर एक करून बांधण्यात आली आहेत. त्या कामासाठी त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, काटकोनी, अर्धवर्तुळ, वर्तुळ अशा विविध आकारांतील दगड वापरले गेले. ते दगड कापून, घडवून, एका दगडाच्या खाचेतच दुसरा दगड बसवला गेला आहे. ते दगडातील खोबणीमुळे (खाच) एकमेकांस घट्ट चिकटून राहतात. इतर बांधकाम चुना किंवा माती अथवा तत्सम पदार्थ वापरून होत असे. प्रत्येक मंदिराचे स्वरूप गाभारा, चौकोन, सभामंडप, प्रवेशद्वार असे आहे. मंदिराचे खांब अलंकृत आहेत. मंदिरातील खांबांवर नक्षी, पौराणिक प्रसंग कोरलेले असतात. तसेच, गाभारा चौकोनी आणि सभामंडपाला अनेक खांब असलेले दिसून येतात. त्या मंडपाला आधार कमानी काढून दिलेला दिसतो. त्या मंदिराच्या भिंती कोणयुक्त असतात. मंदिरे कलाकुसरीने नटलेली, सुंदर, भव्य आणि स्थापत्यकलेतील कौशल्याचे दर्शन घडवणारी आहेत. त्यांना त्यांच्या सौंदर्यामुळे ऐतिहासिक कलाकृतींचा दर्जा लाभला. त्या देखण्या वास्तू यंत्रसामग्री उपलब्ध नसताना निर्माण झाल्या. ती शिल्पे घडवणाऱ्या  शिल्पकारांची कुशलता आणि कसब ही स्थापत्यकलेतील प्रमाणबद्धता, अचूकता, नूतनता आणि टिकाऊपणा इत्यादी गुणांमुळे दिसून येते.
         

यादव राजे हे हिंदू (वैदिक) धर्माचे कट्टर समर्थक आणि पुरस्कर्ते होते. वैदिक धर्मातील कर्मकांड, यज्ञयाग आणि त्यातून होणारे धार्मिक शोषण यादव राजांच्या काळात शिगेला पोचले. तो मध्यकाळ धार्मिक अभिसरणाचा आणि कर्मकांडाचा म्हणून ओळखला जातोकर्मकांडाचे अवडंबर मोठ्या प्रमाणात वाढले. महानुभाव आणि वारकरी या पंथांचा उदय ही त्या धार्मिक शोषणाविरुद्धची प्रतिक्रिया होती. ती कर्मकांडास पर्याय म्हणून तयार झाली. शैव आणि वैष्णव यांच्यांत सांप्रदायिक संघर्ष आधीपासून झडत होतेच. म्हणून महानुभाव पंथाचा बोलबाला वाढू लागला. भागवत पंथ प्रशस्त होत गेला. भक्तीची शिकवण पुढील

अमृतेश्वर मंदिर

कालावधीत वारकरी पंथाच्या रूपाने पुढे आली. सर्वसामान्य माणसे त्या पंथाकडे आकर्षित होऊ लागली. हिंदू राजे आणि धर्ममार्तंड यांच्यासमोर सनातन धर्म टिकवणे हे आव्हान उभे राहिले. त्या प्रकारची मंदिरे वैदिक धर्माचा प्रसार, प्रचार, विस्तार आणि विकास या प्रेरणेतून मोठ्या प्रमाणात उभी राहिली. धार्मिक विलगीकरण आणि अभिसरण यांचा प्रश्न त्या काळातील राजेशाहीसमोर मोठा होता. यादव राजवटीत हेमाडपंतीमंदिरांची रचना वैदिक धर्माच्या ध्रुवीकरणासाठी आणि धर्मप्रसाराच्या उद्देशाने अत्यंत दुर्गम भागात जाऊन झाली आहे. प्रवरा नदीचे उगमस्थान असलेल्या रतनवाडी येथील अमृतेश्वरमंदिर हे त्याचे उत्तम उदाहरण होय. ते अतिदुर्गम भागात आहे.

          हेमाद्री यांनीच चतुर्वर्गचिंतामणीनावाचा व्रतवैकल्यांचा महिमा सांगणारा ग्रंथ लिहिला. हेमाडपंती मंदिरे उभी राहून जवळपास सातशे-आठशे वर्षें झाली; तरी ती टिकून आहेत. काही मंदिरांचे चिरे ढासळू लागले आहेत. सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे महत्त्वाचे हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराचा एकेक चिरा ढासळणे म्हणजे त्या चिरेबंदी संस्कृतीचा युगांत होय. तो पाहणे हा सुसंस्कृत माणसास क्लेशदायक भाग आहे.

– अशोक लिंबेकर 9326891567
ashlimbekar
99@gmail.com

अशोक लिंबेकर हे वीस वर्षांपासून संगमनेर महाविद्यालयामध्ये आहेत. ते मराठी विभागाचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेला
दीप चैतन्याचाहा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच, लिंबेकर यांनी मुक्तसवांदया  साहित्यासंबंधी संस्थेची स्थापना केली आहे. ते विविध नियतकालिकांत लेखन करतात. ते संगमनेर येथे राहतात.
———————————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here