Home सामाजीक निसर्गसंवर्धन हॅपी सराउंडिंग्स्

हॅपी सराउंडिंग्स्

1
_Happy_Surrounding_1.jpg

स्वच्छता हा राष्ट्रीय मुद्दा आहे. भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्यापूर्वीच, ती मोहीम आमच्या कॉलेजने घेतली होती हे अभिमानाने नमूद करावे असे वाटते. मी आमच्या ‘आनंद विश्व गुरुकुल’च्या विद्यार्थ्यांसह ‘हॅपी सराउंडिंग्स’ या प्रकल्पाची सुरुवात केली.

प्रकल्पाचे नियोजन, रूपरेषा, जनसंपर्क व टीम या सर्व महत्त्वपूर्ण घटकांचे संयोजन करून मी मुलांना व शिक्षकांना त्यांच्या स्वेच्छेने या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन केले. आमचे महाविद्यालय व आमची शाळा येथील शिक्षकांनी व मुलांनी त्यांचे हात व त्यांची साथ या प्रकल्पास देण्याचे प्रयत्न उत्साहाने केले. जवळजवळ दीडशे मुले व दहा शिक्षक प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मागे हटले नाहीत. आम्ही ‘ग्रीन ब्रिगेड’ म्हणून प्रकल्पातील सहभागी झालेल्या सर्वांना संबोधले. प्रकल्पाचा उद्देश स्वतःच्या वास्तूचा परिसर स्वच्छ ठेवणे व त्याचबरोबर, महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या निवासी सोसायट्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता पसरवणे हा होता. तिसऱ्या वर्गापासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची साथ प्रकल्पास लाभली. जवळच्या आठ सोसायट्यांमध्ये प्रकल्प राबवण्यात आला. ‘रोटरी क्लब ऑफ यंग डोंबिवली अप टाऊन’ याचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. तिवारी यांचे सहकार्य आम्हाला लाभले. महाविद्यालयाचे प्रा. संजय चौधरी यांनी त्याकरता प्रयत्न केले. डॉ. तिवारी यांनी प्रकल्प राबवण्यास लागणारे साहित्य स्पॉन्सर केले. मुलांनी त्यांच्या स्वतःच्या महाविद्यालयाच्या जवळची ‘न्यू आनंद पार्क’ सोसायटी येथे 9 ऑगस्टला स्वच्छता मोहीम सुरू केली ती दोन आठवडे चालू होती. इतर सोसायट्यांमध्ये जेथे हा प्रकल्प राबवण्यात आला तो खालीलप्रमाणे आहे.

1. सत्यभामा को.ऑप. सोसा. लि., रघुनाथ नगर, ठाणे
2. गारोडीया को. ऑप. सोसा. लि., लुईसवाडी, ठाणे
3. ओम सत्यम को. ऑप. सोसा. लि., रघुनाथ नगर, ठाणे
4. मित्तल पार्क को. ऑप. सोसा. लि. रघुनाथ नगर, ठाणे
5. प्रकृती को. ऑप. सोसा. लि., रघुनाथ नगर, ठाणे
6. अर्जुनपार्क को. ऑप. सोसा. लि., रघुनाथ नगर, ठाणे
7. रेसिडेंसी सोसायटी, एल.बी.एस. मार्ग, टिपटॉप प्लाझाच्या मागे, ठाणे

प्रकल्पाचा सर्वात मोठा लाभ हा झाला, की किमान दीडशे मुलांना आमच्या महाविद्यालयाच्या परिसरात कोठेही कोणीही विद्यार्थी कचरा- अर्थात कागदाचे तुकडे, चॉकलेटचे रॅपर्स टाकताना आढळल्यास ते लगेच त्यांना स्वच्छतेची जाणीव करून देत, ते स्वतः कचरा उचलत. प्रकल्पाला तीन वर्षे झाली असूनही आमचा परिसर मुलांच्या जागरुकतेमुळे स्वच्छ राहतो. मुलांना जनसामान्यांप्रती आपलेही काही कर्तव्य आहे आणि त्या जागरुकतेसाठी केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाल्याचे समाधान आहे.

मुले स्वतः राष्ट्र सेवेचा उत्तम धडा ह्या प्रकल्पातून शिकली नाहीत, तर त्यांच्या हातून जनजागृतीचे अमूल्य कार्य घडले. तो खूप सुखावणारा अनुभव आहे. राष्ट्राचा विकास तेथील नागरिकांच्या सवयींवर निर्भर असतो. सच्चा देशसेवेचा भाव मनात असेल तर असली छोटी-छोटी उचललेली पावलेही मोठे परिवर्तन घडवून आणू शकतात. आम्हास आमच्या ‘हॅपी सराउंडिंग्स्’ ह्या प्रकल्पाद्वारे त्याचे प्रात्यक्षिक मिळाले. आम्ही आमच्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यावर आवासीय सोसायटीच्या पदाधिका-यांची भेट घेतली असता कळले, की लहान मुलांनी एक छान उदाहरण स्वतः काम करून घालून दिल्याने अनेक घरांमधून खिडक्यांतून फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे व रहिवासी परिसराची काळजी शिस्तीने योग्य रीत्या घेत आहेत. विद्यार्थ्यांना काही कटू अनुभवही आले. काही वयस्कांचा अहंकार दुखावला गेल्याचे आढळले. मुले लहान असून मोठ्यांना धडे शिकवत आहेत, असे काही प्रौढ बोलत होते. मात्र आमच्या ‘ग्रीन ब्रिगेड’ने असल्या नकारात्मक प्रत्युत्तरांना त्यांकडे दुर्लक्ष करून उत्तर दिले. प्रकल्प सुरू करतानाच सर्वांनी ‘मौन व्रताची’ प्रतिज्ञा घेतली होती. त्यामुळे कोणाशी वाद-विवाद होण्याची शक्यताच राहिली नाही. प्रकल्प सोसायटीमध्ये राबवत असताना तासाभरात आवश्यकता असल्यासच न बोलता खुणावूनच संवाद साधायचा हे चॅलेंज घेतले होते. ते ‘ग्रीन ब्रिगेड’ने तंतोतंत पाळले. मुलांना प्रकल्पामुळे सहनशीलता व कटू बोल पचवण्याचा पाठही मिळाला.

मी प्राचार्य म्हणून मला ‘ग्रीन ब्रिगेड’चा खूप अभिमान आहे. मुलांना आयुष्यभराचे अनेक उत्तम पाठ मिळाले. एक छान सवय लागली. मुले मिळून मिसळून टीम वर्क करण्याचा धडा शिकली. विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये घडलेला बदल देशाचा एक उत्तम नागरिक बनवेल याची मला खात्री वाटते.

विद्यार्थ्यांचे अभिप्राय

स्वच्छ परिसर, सुंदर परिसर

मी ‘हॅपी सराउंडिंग’ प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांपैकी एक होते. त्याचा आमच्यावर बराच प्रभाव पडला. आम्ही आमच्या परिसरात लहान पातळीवर त्याच प्रकल्पाची सुरुवात नंतर केली. आरंभी आमचे उद्दिष्ट्य लोकांना प्लॅस्टिकच्या पिशवीसकट निर्माल्य पाण्यात टाकण्यापासून रोखण्याचे होते. त्यामुळे होणारे जलप्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम यांबद्दल लोकांना पटवून द्यायचे असे ठरले होते. निर्माल्य काही काळानंतर पाण्यात विघटित होते. पण प्लॅस्टिक पिशवी तशीच राहते. तो आमचा मुख्य प्रकल्प होता. त्याद्वारे आम्ही आमच्या आसपासच्या लोकांना संभाषणात सहभागी करून घेऊन सर्वत्र तोंडी जागरुकता पसरवली. आम्हाला आमच्या शाळेने या प्रकल्पाचे कायमस्वरूपी ओळखपत्र दिले आहे.

प्रकल्पाबाबतचा आम्ही लोकांकडून प्रतिकूल उद्गार ऐकल्यानंतर काही वेळा नाउमेद झालो, परंतु आमचा आत्मविश्वास आमच्या प्राचार्य डॉ. सीमा हर्डीकर यांनी वाढवला व आम्ही पुन्हा या सामाजिक कार्याला सुरुवात केली. प्रकल्पामुळे आमचे संभाषण कौशल्यदेखील बळावले.

– कु. रेणुका प्रवीण भिरंगी, निर्मित सुहास मुळे

– सीमा हर्डीकर

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version