Home लक्षणीय ज्ञानदीप लावू जगी

ज्ञानदीप लावू जगी

_DnyandipLavu_Jagi_1.jpg

‘एम.डी. केणी विद्यालय हे मुंबईत भांडूपला आहे. तळागाळातील व झोपडवस्तीतील मुले तेथे शिकत असतात. परमेश्वर पांडुरंग शिंदे यांनी शाळेच्या रुपात एक छोटे रोपटे भवानीनगर या ठिकाणी लावले. त्याचे रूपांतर वृक्षात झाले आहे. शाळा ‘श्री गुरूजन शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालवली जाते. ज्या ठिकाणी शाळेची गरज होती, त्या ठिकाणी शाळेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे शाळेच्या परिसरातील श्यामनगर, चामुंडानगर, टाटानगर, भवानीनगर येथील गरीब लोकवस्तीतील मुले शाळेत येऊ लागली. शाळेमुळे विद्यार्थ्यांनाच नव्हे तर परिसरातील नागरिकांनाही शिक्षणाचे महत्त्व कळले.

मी त्या शाळेत 1998 ला साहाय्यक शिक्षक म्हणून आठवी/नववी/दहावी या वर्गांना मराठी विषय शिकवू लागले. त्यानंतर परमेश्वर शिंदेसरांनी माझी मुख्याध्यापक म्हणून तेथे नियुक्ती केली. शाळेला अनुदान नव्हते. संस्थाच आम्हा शिक्षकांना वेतन देत होती. आम्हाला घरापासून प्रवासखर्च भागेल एवढाच पगार मिळत होता. आमचे ध्येय एसएससीचा निकाल उत्कृष्ट लावणे हे होते. म्हणून आम्ही सर्व शिक्षक कोणतीही सुट्टी न घेता व रविवारीसुद्धा दहावीचे एक्स्ट्रा क्लास घ्यायचो; दहा दिवसांचे एक अभ्यास शिबिर आयोजित करायचो. ते शिबिर शाळेत चालवले जाते. विद्यार्थी सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत शाळेत असतात. शाळेचा निकाल वाढतच गेला आहे.

शाळेला 2004 साली अनुदान मिळाले व आम्हा शिक्षकांना शासनाकडून वेतन मिळू लागले. आमच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते. शाळेचे मुख्य कार्य म्हणजे परिसरात असलेल्या तळागाळातील, झोपडवस्ती विभागातील मुलांना ज्ञानार्जन देणे हे आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक स्वत: झोपडवस्तीत जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतात. तेच काम मी मुख्याध्यापक म्हणून अग्रेसर राहून करत असते.

ते काम चालू असताना शाळेचा उत्कर्ष आपोआप घडत होता. शिक्षणाचा प्रसार करताना असे दिसून आले, की परिसरात काही हुशार, चाणाक्ष मुले बिकट परिस्थिती, आर्थिक चणचण इत्यादी कारणांमुळे मागे राहत आहेत. मुलांना शिकण्याची इच्छा असते. पण घरातील वातावरण, परिस्थिती यांमुळे त्यांच्यावर अकाली प्रौढत्व येऊन ते शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांच्या आई-वडिलांचा आधार बनण्यासाठी मोलमजुरी करतात. अशा मुलांना भेटून, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. आता पन्नास टक्के मुलांनी शिक्षण घेण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

माझ्या वर्गात ओंकार कदम नावाचा मुलगा काही वर्षांपूर्वी शिकत होता. मुलाची परिस्थिती गरिबीची होती. त्याचे वडील रेल्वे अपघातात गेले होते. त्यामुळे घरातील कमावती व्यक्ती एकटी आई होती. ती एका छोट्याशा कंपनीत काम करून तिच्या दोन मुलांचे शिक्षण पूर्ण करत होती. ओंकार हुशार होता. त्याला भाषाविषयाची आवड होती हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी त्याला निरनिराळ्या विषयांचे वाचन करण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागले. तो शाळेच्या लायब्ररीतून पुस्तके घेऊन वाचायचा. त्यामुळे तो वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ लागला. शाळेमध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या दिवशी येणारे पाहुणे त्याच्यावर खुश होऊन त्याला बक्षीस द्यायचे. मला असे वाटले, की मराठी या विषयात त्याची चांगली तयारी करून घ्यायला हवी. त्यामुळे मी विशेष मेहनत त्याच्यावर घेऊ लागले. मी मराठीची शिक्षिका असल्याने याबाबतीत मी ओंकारला मदत व मार्गदर्शन करू शकले. त्यामुळे त्याचे वक्तृत्व अधिकाअधिक चांगले होत गेले. त्याच दरम्यान, गोदरेज कंपनीने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत ओंकारने संपूर्ण ‘एस वार्ड’मधून प्रथम क्रमांक मिळवला. सर्वसामान्य परिस्थितीतून आलेल्या, त्याच्या वस्तीबाहेरील जगदेखील न बघितलेल्या त्या मुलाचे वक्तृत्व बघून गोदरेज कंपनीतील अधिकारी सावंत यांनी ओंकारचा दहावीचा संपूर्ण खर्च केला.

आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनीदेखील त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव होऊ दिली नाही. दरवर्षी मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला नवीन कपडे द्यायचे. तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकायचे. पुढे ओंकार दहावीला सत्त्याहत्तर टक्क्यांनी पास झाला.

अनेक विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिकून चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहेत. ‘एस वार्ड’मध्ये विज्ञान प्रदर्शनात तीन वेळा आमच्या शाळेला पारितोषिक मिळाले. लेखिका विजया वाड यांच्या ‘बालकोष’ या पुस्तकात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांना स्थान मिळाले आहे.

मोबाईल आल्यापासून एका गोष्टीत फार बदल झाला आहे. ते म्हणजे मुले मित्र-मैत्रिणींना, आजी-आजोबांना, नातेवाईकांना पत्र लिहीत नाहीत; फोनवर बोलतात किंवा एसएमएस केला जातो. पण त्यांचे हस्ताक्षर पत्रलेखनामुळे चांगले तर होतेच, शिवाय त्यांना एखादा विषय लिहिण्यातून कसा समजून घ्यायचा, व्यक्त करायचा याचा सराव आपोआप होत असतो. तसेच, इतर कोणाचे आलेले पत्र वाचण्याची गंमत पण निराळी असते. ती गंमत आमच्या पिढीने अनुभवली आहे. पण आताच्या मुलांना त्याविषयी माहिती नाही. त्यासाठी आमच्या शाळेत आम्ही जेव्हा पत्रलेखन विषय शिकवतो, तेव्हा प्रत्येक मुलाला सोबत पोस्टकार्ड आणण्यास सांगतो व त्याला जे काही पत्र त्याच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना लिहायचे आहे ते लिहून पोस्ट करण्यास सांगतो. त्यामुळे खरेखुरे पत्र लिहिण्याचा आनंद मुलांना मिळतो. मुलांनी जेव्हा एकमेकांना पत्रे लिहिली, तेव्हा त्यांना  पत्रे मिळाल्यावर वेगळाच आनंद झाला असे सांगितले.

मुलांना रोजच्या प्रार्थनेच्या वेळी बोधपर कथा कथन करण्यास सांगतो. त्यांनी कथेतील बोध इतर मुलांना सांगायचा असतो. कथा प्रत्येक मुलाला क्रमाने सांगावी लागते. वर्गशिक्षक त्यासाठी मुलांची तयारी करून घेतात. त्यामुळे मुलांना वाचन व त्यावर मनन करण्याची सवय लागते. तसेच, सर्वांसमोर बोलण्याचा सभाधीटपणा आपोआप त्यांच्यामध्ये येतो.

आमच्या शाळेच्या परिसरात श्यामनगर झोपडवस्ती आहे. शासनाच्या उपक्रमानुसार जेव्हा त्या झोपडवस्तीतील शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी आमचे शिक्षक गेले, तेव्हा त्यांना आढळून आले, की एका कुटुंबातील पालकांना चार मुले होती. पण त्यातील एकही शाळेत जात नाही. त्यांची मोठी मुलगी लिली दहा-अकरा वर्षांची होती. आम्हाला तिला पाचवीच्या वर्गात त्यांनी घालावे असे वाटत होते, पण तिचे पालक त्यासाठी तयार नव्हते. ती मुलगी एकही दिवस शाळेत गेलेली नव्हती. आमचे शिक्षक तीन-चार वेळा त्या पालकांना भेटण्यास गेले. मुलीची शाळेत येण्याची इच्छा होती. पालक म्हणत, की “ती शाळेत गेली तर तिच्या पाठच्या तीन भावंडांना कोण बघणार? आम्ही नवरा-बायको मोलमजुरीसाठी बाहेर जातो.” तेव्हा मी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांनी लिलीला शाळेत पाठवण्याची अनुमती दिली! लिलीला अभ्यासात रुची वाटू लागली आहे. यावरून मीही निश्चय केला, की या सभोवती बरेच गरजू विद्यार्थी आहेत त्यातील  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा ज्ञानदीप मला पोचवता यावा.

– सावित्री काटकर

About Post Author

3 COMMENTS

  1. I M proud to be a part of M…
    I M proud to be a part of M.D.Keni Vidyalaya.
    Thank you Principal mam & all my teachers.

  2. I M proud to be a part of M…
    I M proud to be a part of M.D.Keni Vidyalaya.
    Thank you Principal mam & all my teachers.

  3. Khup chann.. Mala Abhiman…
    Khup chann.. Mala Abhiman ahe me M.D. Keni Vidyalaycha student hoto… Ani mala tumchyasarkhe teacher shikvayla hote he maje nasheeb ch hote.. me kharach Khup lucky samjto swatala.. Katkar Mada, Bhosale (Tambe)madam, Suralkar Sir, Atpadkar Sir, Jadhav Madam, Mane Madam, Jadhav Sir… sarvanich khup mehnat ghetli amchya sarv student sathi… Ani Ata jee mohim chalu keli khup ch chann.. tumchyasarkhe teachers sarv student’s na labhave.. kharach me garvane sangto ki me M.D. Keni vidyalayacha student hoto ani amhala tumchyasarkhe teachers ahet..
    Yours student
    Prashant Salve

Comments are closed.

Exit mobile version