हिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत

0
43
_HindustaniMansane_LihilelePahileEnglishPustak_2.jpg

ब्रिटिशांचे राज्य हिंदुस्तानात पेशवाईच्या अस्तानंतर सुरू झाले. ईस्ट इंडिया कंपनीने हातपाय पसरण्यास प्रारंभ केला तेव्हा त्या राज्य स्थापनेला सुरुवात झाली. कंपनीने व्यापारासाठी पेशव्यांकडे सवलती मागितल्या; व्यापाराच्या संरक्षणासाठी सैन्य ठेवले. हिंदुस्तानातील संस्थानिक, जमीनदार, प्रांतिक सुभेदार यांनी त्यांची स्वतःची सत्ता राखणे, आजुबाजूच्या लोकांशी लढणे यासाठी कंपनीच्या फौजांची मदत घेण्यास सुरूवात केली. तरीही हिंदुस्तानातील लोकांना इंग्रजी शिकण्याची गरज पहिली पन्नास वर्षे वाटत नव्हती. कंपनीच्या संचालकांनाही स्थानिक लोकांना इंग्रजी शिकवण्याची गरज वाटली नाही. कंपनीचे राज्य स्थिर झाल्यावर त्यांना राज्यशकट चालवण्यासाठी इंग्रजी जाणणारा स्थानिक माणूस नोकर म्हणून हवा होता. त्यासाठी इंग्रजी शिक्षणाची सोय करण्यात व मराठीत चांगले (राज्यकर्त्यांना चांगले वाटेल असे) ज्ञान देणाऱ्या पुस्तकांची निर्मिती करण्याचे काम हाती घेतले गेले. त्या धोरणाला अनुसरून पाठ्यपुस्तकांची / सर्वसामान्य ज्ञान देणारी पुस्तके मराठीत छापली व प्रकाशित होऊ लागली. दत्तो वामन पोतदार यांनी त्याविषयीचा विस्तृत आढावा ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’ (1922) या पुस्तकात घेतला आहे. पोतदार यांनी त्या पुस्तकाच्या उपोद्घातात रा. भि. जोशी यांच्या ‘मराठी भाषेची घटना व मराठी वाङ्मय विवेचन’ या पुस्तकांचा उल्लेख केला आहे. जोशी यांनी तत्कालीन मराठीची पुणे वळण आणि मुंबई वळण अशी दोन वळणे सांगून मुंबई वळण सोपे-साधे, संस्कृत शब्दांचा भरणा नसलेले होते असे म्हटले आहे. जोशी यांनी मुंबई वळणाचे उत्कृष्ट लेखक म्हणून विनायक कोंडाजी ओक यांचा उल्लेख केला आहे.

ओक यांनी ‘हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास’ आणि ‘मधुमक्षिका’ या नावाचे एक पुस्तक 1867 साली प्रकाशित केले. मधुमक्षिका या पुस्तकाची सातवी आवृत्ती 1915 साली प्रकाशित झाली. ती उस्मानिया विद्यापीठाच्या डिजिटल लायब्ररीवर वाचता येते. त्या मोहनलाल नावाच्या काश्मिरी माणसाची तीन छोटी प्रवासवृत्ते त्या पुस्तकात आहेत. मोहनलालने पंजाब, अफ़गाणिस्तान, तुर्कस्थान आणि त्यानंतर इंग्लंड व जर्मनी या देशांचा प्रवास 1831 साली केला. त्याने तो प्रवास सर अलेक्झांडर बर्न्स या लष्करी अधिकाऱ्याबरोबर पर्शियन असिस्टंट या नात्याने केला. Memoir of Mohanlal या शीर्षकाखाली C E Trevylyn यांनी मोहनलाल याच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यावरून असे समजते, की मोहनलाल, त्याचे वडील व आजोबा हे अस्सल काश्मीरी होते. त्याचे आजोबा राजा मणिराम यांची मोठी मालमत्ता होती व त्यांना दिल्ली दरबारात मोठा मान होता. वडील रायबुध सिंग हे दिल्लीचे रहिवासी. ते सर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या पेशावरच्या भेटीत त्यांचे पर्शियन सहायक म्हणून गेले होते. मोहनलालचे पर्शियन भाषेचे शिक्षण घरीच झाले. पुढे, वडिलांनी त्याला इंग्रजी शिकण्यासाठी दिल्लीतील पर्शियन कॉलेजमध्ये दाखल केले. तेथे इंग्रजीचा वर्ग सुरू झाला तेव्हा वर्गात सहा मुले होती. ती संख्या तीनशेच्यावर पाच वर्षांत गेली. मोहनलाल पहिल्या सहा मुलांपैकी एक होता. मोहनलालने त्याच्या प्रवासाचे जर्नल 1834 मध्ये प्रकाशित केले. त्याची सुधारित आवृत्ती 1844 मध्ये प्रकाशित झाली. ते पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध आहे. मोहनलालचे 1834 साली प्रकाशित झालेले जर्नल हे हिंदुस्थानी माणसाने इंग्रजीत लिहिलेले पहिले प्रवासलेखन असावे असा माझा कयास होता. परंतु त्या दृष्टीने इंटरनेटवर शोध घेतल्यावर लक्षात आले, की पहिलेपणाचा तो मान साके दीन महोमेत या पाटणा येथील मुस्लिम युवकाकडे जातो.

साके दीन महोमेत याचे “Travels of dean mahomet A Native of Patna in Bengal through several parts of India while in the service of the Honorable East India Company written by himself in a series of letters to a friend in two volumes” या लांबलचक शीर्षकाचे पुस्तक 1794 साली आयर्लंडमध्ये प्रकाशित झाले. साकेचे आयुष्य आश्चर्यजनक आहे. साके दीन महोमेत याचा जन्म 1759 साली, तत्कालीन बंगाल प्रांताचा भाग असलेल्या बिहारमधील बक्सर येथे झाला. त्याचे वडील न्हावी जातीचे होते असा उल्लेख त्याची जी माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहे त्यात येतो. मात्र साके याने त्याबद्दल स्पष्ट सांगितलेले नाही. उलट, तो त्याचा संबंध पाटण्याच्या नबाबाच्या कुळाशी होता असे सांगतो. त्याचे वडील ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत होते. ते साके अवघा दहा वर्षांचा असताना एका लढाईत मृत्यू पावले. कंपनीने त्यांच्या जागी साके याचा मोठा भाऊ (साकेहून पाच वर्षांनी मोठा) याला नोकरीत ठेवले. साकेला लष्करी पेशाचे आकर्षण वाटे. तो कंपनीच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या भोवती सतत असे. अखेर, तो गॉडफ्रे इवान बेकर या अँग्लो आयरिश अधिकाऱ्याचा कॅम्प फॉलोअर म्हणून कंपनी सेवेत रुजू झाला. त्याचे वय लष्करी शिक्षण मिळण्याइतके नव्हते. त्यासाठी पाच-सहा वर्षे जावी लागली. बेकर आणि साके यांनी एकमेकांच्या साथीने दहा वर्षे कंपनीत काढली. बेकर हा क्वार्टर मास्टर होता. त्याच्याकडे प्रत्यक्ष लढाईत भाग घेण्याचे काम नव्हते. बेकर याला कॅप्टन म्हणून बढती दहा वर्षांनी मिळाली. त्याने त्याचा इतक्या वर्षांचा सहायक साके यालाही बढती दिली. मात्र ती बढती कंपनीच्या नियमात बसत नव्हती. साके यास त्याची बढती ‘नियमित’ करून घेण्यासाठी अर्ध्या महिन्याचा पगार कमांडर रॉबर्ट्स यांच्याकडे जमा करावा लागला!

बेकर यास आणखी एका मानहानीला सामोरे जावे लागले. वॉरन हेस्टिंग्ज याने बेकर यास एका कामगिरीवर पाठवले. धर्मा दुबे नावाच्या ब्राम्हणाचा खून तीन इसमांनी केला होता. त्यांना शोधून काढण्याची ती कामगिरी होती. बेकरने त्यासाठी सर्व गावाला वेठीस धरले. ती तक्रार वॉरन हेस्टिंग्ज यांच्याकडे गेल्यावर त्यांनी बेकर यास परत धाडावे असा हुकूम दिला (recall). बेकर याने युरोपीय देश बघायचे या सबबीखाली कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला. साके यानेही त्याच्या पाठोपाठ राजीनामा दिला. दोघे नोटिशीचा एक वर्षाचा काळ कोलकाता येथे घालवून आयर्लंडमध्ये गेले.  

साके याने त्याचे स्वतःचे इंग्रजीचे ज्ञान मर्यादित आहे हे ओळखून इंग्रजीच्या वर्गात नाव घातले. तो एका आयरिश मुलीच्या प्रेमात पडला. दोघांनी पळून जाऊन लग्न केले. साके याचा बाप्तिस्मा फेब्रुवारी 1791 मध्ये झाला. साके याला आयर्लंडमधील ख्रिस्ती लोकांनी स्वीकारले, परंतु तो त्यांच्यात पूर्ण मिसळला नाही. तो मूळ मुस्लिम समाजातील बांधवांपासूनही अलगच राहिला. त्याचे ‘ट्रॅव्हल्स’ 1794 मध्ये प्रसिद्ध झाले. त्याने ते पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी वृत्तपत्रांत जाहिराती दिल्या होत्या. शिवाय, त्याने स्वतः अनेक व्यक्तींना भेटून पुस्तक निर्मितीसाठी साहाय्य करावे यासाठी विनंती केली होती. त्याचे ते प्रयत्न यशस्वी झाले. तीनशेवीस लोकांनी त्याला मदत केली.

साके याने बेकर यांच्या कुटुंबाचा हाऊसकीपर म्हणून काम बराच काळ केले. तो 1807 मध्ये इंग्लंडमध्ये आला. त्याने लंडनच्या पोर्टमन स्क्वेअर या भागात हिंदुस्तानी कॉफी हाऊस नावाचे रेस्टॉरण्ट 1810 मध्ये सुरू केले. हिंदुस्तानातून परतलेले इंग्लिश लोक आणि इतर उच्च वर्गीय हा त्या कॉफी हाऊसचा अपेक्षित ग्राहकवर्ग होता. त्याने उपहारगृहाची जाहिरात अशी केली होती- “मी मोहम्मद-इस्ट इंडियन – सभ्य व खानदानी गृहस्थांना सांगू इच्छितो, की हे कॉफी हाऊस उत्तम रीत्या सजवलेले आहे. हिंदुस्थानी सद्गृहस्थांस येथे हुक्का मिळू शकेल. उत्तम रीतीने बनवलेले, अपूर्व अशा चवीचे हिंदुस्थानी खाद्यपदार्थसुद्धा उपलब्ध असतील. निवडक वाइनही मिळतील. खानदानी गृहस्थ व उच्चवर्गीय यांनी मला पूर्वी आश्रय दिला आहे. मी त्यांचा त्याबद्दल कृतज्ञ आहे. तसाच आश्रय ते कॉफी हाऊसलाही देतील अशी मला आशा आहे.”

परंतु तो धंदा नुकसानीत गेला. नादारीची वेळ आली. जुलै 1813 मध्ये सामानाचा लिलाव झाला. तेव्हा त्याला नोकरी मिळाली ती एका ‘व्हेपर बाथ हाऊस’मध्ये. ‘व्हेपर बाथ हाऊस‘ हा त्यावेळी ब्रायटन समुद्र किनाऱ्यावर सुरू झालेला व झपाट्याने विस्तारत असलेला उपक्रम होता. ‘समुद्राकाठी सुटी’ घालवण्याची फॅशन त्या वेळी आली होती. मात्र ‘समुद्राकाठी सुटी’ घालवू इच्छिणाऱ्यांपैकी थोड्या लोकांना पोहता येत असे. बहुतेकांना ‘उघड्याने’ समुद्रस्नान करणे ‘प्रशस्त’ वाटत नसे. तशांची सोय घोड्याने ओढलेली बादिंग मशिन्स अस्तित्वात आल्याने झाली होती. घोडे तशा इच्छुकांना उथळ समुद्रात ओढून घेऊन जात. त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ‘उपचारी’ स्नानाचा व्यवसायही फोफावू लागला. वाफारे, मसाज व औषधीयुक्त पाण्याने स्नान यांचा त्यात समावेश असे.  ब्रिटनचा तत्कालीन युवराज आणि भावी राजा जॉर्ज (चवथा) हा तशा स्नानांचा आश्रयदाता होता. त्याच्यामुळे त्या व्यवसायाला प्रतिष्ठा व बरकत आली.

साके तशा एका स्नानगृहात नोकरीला राहिला. त्याने त्या कामाबरोबर केस रंगवण्याचे कलप आणि हिंदुस्थानी दंतमंजन विकण्यासदेखील सुरुवात केली. साके याने तो ज्या बेसिल कोक्रेन यांच्या स्नानगृहात काम करत होता त्यांनी तयार केलेल्या व्हेपर बाथ उपकरणात काही गुणात्मक बदल केले. त्याने भारतीय तेले आणि अर्क यांचा वापर सुरू केला. त्याने त्याची मालिश करण्याची पद्धत एकमेव आहे अशी जाहिरात सुरू केली. त्याने स्वतःचे बाथ हाऊस 1820 मध्ये बॅटरी हाउस या इमारतीत सुरू केले. त्याने स्वतःला शाम्पूइंग सर्जन अशी उपाधी लावून घेतली होती. त्याचा व्यवसाय पुढील दहा-बारा वर्षे जोरात चालला. त्याने शाम्पूइंग या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1822 मध्ये प्रकाशित केली, चार वर्षांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. शाम्पू याला जो अर्थ रूढ झाला आहे तसा तो त्यावेळी नव्हता. मालिश-चंपी-चंपू-शाम्पू असा त्याचा उगम आहे. शाम्पू बाथ म्हणजे मालिश/मर्दन यांच्यानंतरचे स्नान. साके याने राजे जॉर्ज (चौथे) आणि त्यानंतरचे राजे विलियम (चौथे) या दोघांनाही शाम्पू व व्हेपर बाथ ट्रीटमेंट दिल्या. दोघांनी त्याला Royal Shampooing Surgeon अशी नेमणूक दिली. साके याला मिळालेला राजाश्रय 1840 पासून ओसरू लागला. त्याने व्यवसाय बंद केला. त्याने वयाच्या ब्याण्णव्या वर्षी, 1851 मध्ये इहलोक सोडला.

साके याच्या ‘ट्रॅव्हल्स’ची एक आवृत्ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. तिच्यात जुन्या वळणाचे मुद्रण आहे – जिथे s असायला पाहिजे तेथे F सारखा दिसणारा f. त्यामुळे वाचकाला अनेकदा गोंधळायला होते. तो दोष काढून टाकून आणि ‘ट्रॅव्हल्स’ची पार्श्वभूमी, साकेचे थोडक्यात चरित्र व ‘ट्रॅव्हल्स वाङ्मय’ म्हणून कसे आहे असे विवेचन करणारी आवृत्ती कॅलिफोर्निया विद्यापीठाने तयार केली आहे. त्याशिवाय मायकेल फिशर यांनी 1996 मध्ये एक आवृत्ती संपादित केली आहे. साके याने लिहिलेली पत्रे पुस्तकात आहेत. त्यांची संख्या अडतीस आहे. साके याचा कंपनीच्या सेवेत रुजू होण्यापूर्वीचा 1759 ते 1769 हा काळ सोडला तर 1769-1782 एवढा काळ त्या पत्रांतून उलगडतो. त्या पत्रांना महोदय सोडून कोठलाही मायना नाही, अथवा ती पत्रे कोणाला लिहिली आहेत त्याचे नाव नाही. दुसरे, त्यांपैकी कोठल्याच पत्रावर तारीख नाही.

– मुकुंद वझे

vazemukund@yahoo.com

About Post Author

Previous articleमुंबईत पहिली आगगाडी
Next articleसमर्पित शिक्षक व ध्येयाने झपाटलेले विद्यार्थी…
मुकुंद वझे हे निवृत्तह बँक अधिकारी आहेत. त्यांाना प्रवासवर्णनांचा अभ्यारस करत असताना काही जुनी पुस्त के सापडली. त्यांतनी तशा पुस्तहकांचा परिचय लिहिण्यायस सुरुवात केली. तोच त्यांचा निवृत्तीकाळचा छंद झाला. वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्लो ज्ड सर्किट’ वगैरे चौदा पुस्त के प्रकाशित आहेत. त्यां नी लिहिलेल्या‘ कथा हंस, स्त्रीि, अनुष्टुाभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्याि आहेत. त्यां चे अन्य लेखन- परीक्षणे वगैरे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत.