हिंगणगाव एकेकाळी सुजलाम सुफलाम होते. अग्रणी नदीला बाराही महिने पाणी असायचे. वाळूत हातभर उकरले, की झरा पडायचा. बायका नारळाच्या कवटीतून पाण्याने घागर भरायच्या. गावात मारुतीच्या देवळासमोर व बौद्ध वस्तीत असे दोन आड आहेत, पण त्यांचे पाणी सवाळ लागत असे. म्हणून ते वापरासाठी ठेवत. ज्वारी, बाजरी, भुईमूग, मटकी, तूर, तीळ शेतात तर ऊस, मका, हळद, मिरची, कापूस मळ्यात पिकायचे. गावात सुखसमृद्धी होती. लोक आनंदात राहायचे.
कोणे एकेकाळी गावात कोणी साधू पुरुष आला होता म्हणे; त्याने चार घरी जाऊन भिक्षा मागितली. कोणी भाकर दिली तर कोणी भाजी. तो पाटावर बसून जेवला. नंतर त्याने हातात कमंडलू घेऊन एका घरात पाणी प्यायला मागितले. घरातील पुरुष मग्रुरीने बोलला. ‘साधुबाबा, अग्रणी नदीला मायंदाळ पाणी हाय, तकडं जा की!’ त्याच्या त्या बोलण्यावर साधुबाबा संतापला आणि त्याने शाप दिला, की ‘तुम्हाला पाणी पाणी म्हणावं लागेल!’ अग्रणी नदीचे पाणी नंतरच्या काळात खरोखरीच आटले! नदीचे पाणी विहिरीइतके खोलवर गेले. पाण्याची टंचाई गावपरिसरात झाली. त्या दंतकथेचे तात्पर्य माणसाच्या मग्रुरीकडे बोट दाखवते. हे लक्षात घेतले पाहिजे.
दंतकथेमागील राजकारण नंतर उलगडत गेले. अग्रणी नदी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या डोंगरात उगम पावते. ती तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यांमधून वाहत येते. नदीला तासगाव तालुक्यामध्ये सिद्धेवाडी या गावी बंधारा बांधला. त्यामुळे कवठे महांकाळ तालुक्याचे पाणी आटले. नदीला पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या. शेतमळ्यांना पाणी नाही. मग शेतक-यांनी शेतातील, मळ्यातील आंबा, लिंबू, बाभूळ वगैरे झाडांची कत्तल केली. काहींनी घरे त्या लाकडापासून बांधली, तर काहींनी वखार जवळ केली. रानात झाडे शिल्लक राहिली नाहीत.
हिंगणगाव सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ या तालुक्यात मोडते. सांगली-मिरज या जोडगोळीतील मिरजेपासून ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या चार हजार सातशे पंच्याऐंशी आहे. हिंगणगावात एक नागशिळा आणि शिलालेख सापडला आहे, परंतु त्यावरील मजकूर पुसट असल्यामुळे अक्षरे वाचता येत नाहीत. त्याचा अर्थ, गाव प्राचीन असल्याचे कळते, एवढेच. माझे आजोबा सांगायचे, ‘पूर्वीच्या काळात शिदनाक, सोननाक, किसनाक, नागनाक, हिरनाक अशी आमच्या वंशावळीत नावे होती.’ म्हणजे ती द्रविड संस्कृतीची किंवा नाग संस्कृतीची पाळेमुळे. गावात वर्षातून एकदा ‘हेळवी’ उंटावर बसून यायचे. त्याला मराठी भाषेत ‘रायरंद’ म्हटले जाते. ते लोक महारांना वडीलबंधू म्हणायचे. ते घरोघरी फिरून पसाभर धान्य, पैसे मागायचे, त्या बदल्यात त्यांच्याजवळील तांब्याच्या पत्र्यावर कुळीनामे कोरली जायची. तो आमच्या मूळ घरातील माणसापासून वर्तमान पिढीपर्यंतची नावे वाचून दाखवायचा. त्याचे आम्हाला अप्रूप वाटे.
वस्ती वाढत होती. वाडवडिलांनी बांधलेले वाडे, माडी, सोपा अशी धाब्याची घरे होती. ती कोसळत होती. कुटुंबांचा वेलविस्तार वाढत होता. भावा-भावांत, जावा-जावांत भांडणे होत होती. अशी अवस्था पाहून हिंगणगावचे मुंबईत नोकरीला असलेले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, हिंगणगावच्या बौद्ध सेवा संघांच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष शिवाजीराव लोंढे व सेक्रेटरी रामचंद्र लोंढे यांनी हिंगणगावचे सरपंच विठ्ठल कोळेकर (बापू) यांना सांगितले, की ‘आम्हाला राहायला जागा नाही. ती समाजाची अडचण आहे. आम्हाला जागा द्या’. त्यांनी तसा प्रस्ताव संस्थेच्या लेटरहेडवर दिला.
सरपंचांनी अपूर्व तोडगा काढला – बौद्ध, हिंदू, जैन, मुस्लिम अशा सर्वधर्मीय बांधवांनी एकत्र राहवे! ते म्हणाले, “सामाजिक समतेचा नवा पायंडा पाडुया, जातीयता-अस्पृश्यतेचे निर्मूलन होऊद्या आणि परिवर्तनाचा, प्रबोधनाचा आदर्श विचार निर्माण करुया. जिल्ह्यात कोठे झाले नाही, ते म.फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्षात उतरून दाखवुया. मान्य आहे का? ‘होय, मान्य’!” सर्वजण एकमुखी बोलले आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, पंच, कर्मचारी यांनी कार्याला सुरुवात केली. विस्तीर्ण माळरानावर प्रत्येकी दोन गुंठ्यांचे प्लॉट पाडले गेले. ज्यांना जागा हवी होती, त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठरावीक रक्कम भरली. रीतसर पावत्या घेतल्या. त्यांच्या नावे रीतसर प्लॉट दिले गेले.
यल्लमादेवी हे हिंगणगावचे मूळ दैवत आहे. तिची यात्रा दरवर्षी भरत असते. त्या शिवाय पीराच्या मशिदीसमोर उरूस भरत असतो. गावात हनुमान, महादेव, विठोबा, मरीआई यांची मंदिरे तर जैनांची देरासरे; त्याचप्रमाणे बौद्धांचे बौद्धविहार उभारले गेले आहेत. जैन समाजाच्या वतीने दरवर्षी पंचकल्याण महोत्सव व बौद्ध जयंतीचा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विशेष म्हणजे आंबेडकर जयंती हिंगणगावच्या ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर साजरी केली जाते. गावात अस्पृश्यता, जातीयता यांचा मागमूस सापडत नाही.
हिंगणगावच्या जुन्या कथा रोमहर्षक आहेत. त्या प्रदेशात नाना पाटलांचे प्रतिसरकार होते. एके दिवशी हिंगणगाव मुक्कामी नाना पाटलांकड़ून चिठ्ठी आली, की ‘उद्या सरकारी खजिना लुटायला आमचे पत्री सरकारचे शिलेदार येत आहेत. त्यात अवहेलना होता कामा नये. अन्यथा गोळीने उत्तर देऊ.’ खलिता कुलकर्णीच्या हाती पडताच तो नखशिखांत हादरला. उद्या आपले काय होईल म्हणून घाबरला. त्याने चिठ्ठी गावच्या पाटलाला दाखवली. त्यांनी पोलिस पाटलाला दाखवली. आता काय करायचे यावर सल्लामसलत झाली आणि ‘गावात दवंडी द्या – सगळा गाव गोळा करा ’ असे ठरवण्यात आले. हिंगणगाव व आजुबाजूच्या तीन वाड्या यांचा तो खजिना होता. तो मिरजेच्या तहसिलात पोचवायचा होता. अचानक ही लूट म्हणजे दरोडा पडणार होता. त्या काळात गावात शंभर उंब-यांचा म्हारोडा (महारवाडा) होता. दवंडी म्हटल्यावर रात्रीची जेवणीखाणी झाली आणि गाव पटांगणात जमा झाला. पाटलांनी ‘उद्या गावावर पत्री सरकारचा हमला होणार आहे, गावक-यांनो, तुम्ही काय करणार?’ असा प्रश्न विचारला. गावकरी एकमुखी ‘होऊ देणार नाही’ असे बोलले. महारवाड्यातून आलेले तरुण उभे राहिले आणि म्हणाले, “आम्ही आमच्या तलवारी, भाले-बरच्या पुजायला ठेवल्या नाहीत. मुंडके देऊ पण गावात कोणाला पाय ठेवू देणार नाही.” अशी शंभर आश्वासने महारगड्यांकडून मिळाली. त्यावर पाटील म्हणाले, “उद्याची काळरात्र आहे; उद्या गावात येणारे रस्ते, बोळ बंद करा. जागरूक -हावा. चला, आता निवांत झोपा. वेळ झालेली आहे!”
दुस-या दिवसाची रात्र उगवली. काही तरुण हत्यारानिशी रस्त्यावर उभे ठाकले तर काही गावाच्या चारी बाजूंना दगडांचे ढीग लावून, हातात गोफणी घेऊन सज्ज झाले. मध्यरात्र झाली. घोड्यांच्या टापांचा आवाज गावाबाहेर ऐकू येऊ लागला. गोफणकरांचा मारा अचूक सुरू झाला. दगडांच्या वर्षावाने पत्री सरकारचे सैनिक जायबंदी होऊ लागले. पत्री सरकारला कोठल्याही गावात असे आव्हान मिळाले नव्हते. ते नाट्य हिंगणगावात घडत होते. बंडकरी माघार घेत निघाले आणि शांतता पसरली. “हे ऽऽ र पठ्ठ्यांनो, गावासाठी मदुमकी दाखवली शाब्बासऽ!” असे म्हणत पाटील यांनी डोईवरचा फेटा आभाळात फेकला.
तर हा इतिहास. गावासाठी, त्याच्या रक्षणासाठी लढून मरावे हा तर शुरांचा बाणा! गावाला स्वांतत्र्य हवे होते, पण त्यांना त्यांच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला करणे योग्य वाटत नव्हते. म्हणून तो ‘लढा’ झाला.
पूर्वी गावाला अन्नधान्यापासून जीवनावश्यक किराणा मालासाठी तालुक्याला जावे लागे. गाव पूर्वीचे राहिलेले नाही. गावाचा तोंडवळा शहरी बनत चालला आहे. गावात डॉक्टर, इंजिनीयर खूप झाले. ताकारी-म्हैशाळ पाणीपुरवठ्यासाठी योजनेचे पाट आले आहेत. विहिरींना पुन्हा बारमाही पाणी मिळाले. अधुनमधून अग्रणी नदी व डोंगरओढा यांतून पाणी सोडले जाते. त्यामुळे शेतकरी ऊस, मका, द्राक्षे, गहू, कपास अशी रग्गड पैसा देणारी पिके काढताहेत. डाळींब व सीडलेस द्राक्षे तर पाश्चात्य देशांत निर्यात होत आहेत. त्यामुळे गाव सधन होत आहे.
कवठे महांकाळ तालुक्यात महाकाली सहकारी साखर कारखाना आहे. हिंगणगावच्या तरुणांना तेथे रोजगार मिळाला आहे.
त्याच्याही पुढे जाऊन उद्योगपती देवानंद लोंढे यांच्या व गावाच्या सहकार्यामुळे ग्रामपंचायतीचा थोडा भाग देऊन ‘यशोदा वाचनालय, हिेगणगाव’ (रजि.) ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. तेथे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांतील ग्रंथ, मासिके, दिवाळी अंक, कृषी विभागासाठी मार्गदर्शनपर पुस्तके; त्याशिवाय रोजची सहा वर्तमानपत्रे एवढे साहित्य उपलब्ध असते.
भारत – पाकिस्तान १९६५ च्या युद्धात शहीद झालेले गावचे सुभेदार धोंडिराम श्रावण लोंढे यांच्या शौर्याच्या रोमांचक इतिहासाची आठवण कायम स्वरूपात राहील.
हिंगणगावात शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शाळा तर नारायण तातोबा सगरे विद्यालय आहे. त्यातून शिक्षित होणारी पिढी पुढे येत आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून नोकरीधंद्यासाठी अनेक कुटुंबे मुंबईत व पुण्यात स्थलांतरित झाली असली तरी दिवाळीच्या व मे महिन्याच्या सुट्टीत गावच्या देवीच्या यात्रेला, बाबासाहेबांच्या जयंती महोत्सवात ती कुटुंबे आवर्जून येतात.
हिंगणगाव सांगली जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.
– बबन लोंढे
Last Updated On – 14th July 2017