हायकूकार मनोहर तोडणकर

0
96

दाभोळचे कवी मनोहर रामचंद्र तोडणकर हे आयुष्याच्या शेवटपर्यंत रसिकांच्या शोधात असत. मी भेटलो तेव्हाही ते उतारवयात पोचलेले होते. उमेद संपली होती. एक खंत, निराशा, संसारात खस्ता खाताना आलेले खचलेपण असे सर्व त्या ‘हायकू’काराच्या चेहऱ्यावर व बोलण्यात जाणवत असे. मनोहर हे तरुण वयात मुंबईत खाजगी कंपनीत काम करताना ठाणेकर बनले होते. त्यांच्यापाशी वर्तकनगरातील आठवणी, दादरला भेटणारे नामवंत साहित्यिक, बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराशी जुन्या काळात जुळलेला स्नेहबंध, साने गुरुजींपासून ते माधव गडकरी यांच्यापर्यंत अनेकांशी दाभोळमध्ये त्यांचे झालेले सुसंवाद, ‘हायकूवाला’ म्हणून समवयस्क कवींनी केलेली थट्टा आणि कौतुक असे दोन्ही, ‘धाडसी अभय’ (कथा), ‘चांदोबाची गाडी’ (कविता), ‘म्हातारीचा बूट’ (कविता) अशी बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित झाल्यामुळे त्यांना आलेला उत्साह, ‘आकाशवाणी’च्या ‘कामगार सभे’त झालेले काव्यवाचनाचे त्यांचे कार्यक्रम असा स्मरणरंजनाचा छानसा सुगंध होता, पण गरिबी ही गोष्ट अशी आहे, की तिच्या सहवासात आनंदाचे अत्तरही उडून जाते !

शिरीष पै यांनी ‘हायकू’ या जपानी कवितेचा फॉर्म मराठीत आणला; तोडणकर शिरीष पै यांना गुरुभगिनी मानत. तोडणकर यांनी ‘हायकू’ या जपानी काव्यप्रकारावर नंतरच्या आयुष्यात बराच भर दिला. तोडणकर यांच्या नावावर ‘हायकूंची हाक’ आणि ‘समाधीचे क्षण’ हे दोन हायकूसंग्रह आहेत. त्यांपैकी ‘समाधीचे क्षण’ हा संग्रह त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी आमच्यापर्यंत आला ! तोडणकर यांच्या अंगणात हायकू जणू फुलांसारखे आपले आपण उमलत गेले.

तोडणकर मुंबई-ठाण्याकडे असताना ‘फुलझगरे’ नावाचा वेगळे नाव धारण करणारा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्या प्रेमकविता सौंदर्यवादाकडे झुकलेल्या आहेत. फुलझगरे म्हणजे दिवाळीतील फुलबाज्यांच्या रंगीत रंगीत ठिणग्या- ‘चटका’ देऊ शकणाऱ्या, तरीही सुंदर ! तोडणकर हे आत्ममग्न, आत्मप्रसन्न कवी होते.

पुढे ते ‘हायकू’कार झाल्यावर त्यांचा एकादा ‘हायकू’ मला सर्वसामान्य वाटला आणि मी तसे त्यांना म्हटले, तर ते नाराज होत. ‘हे तुमचे मत आहे, सर’ असे बोलून दाखवत. मात्र त्यांचे काही हायकू अर्थवाही होते. ते म्हणत, “‘हायकू’ स्त्रीलिंगी नाही. ‘तो’ हायकू असे म्हणावे.” त्यांचे अनेक हायकू अप्रसिद्धच राहिले आहेत. तोडणकर अशा उपेक्षेमुळे नाराज असत. मी म्हणत असे, “तोडणकर, तुमची फॅमिली आहे. मुलगे-मुलगी-जावई-नातवंडे यांचा आधार आहे. माझे तर आख्ख्या जगात सख्खे कोणी शिल्लक नाही. मग मी काय करावे !”

तोडणकर यांच्या तरुण वयात एक दुखरे हळवे प्रेमभंग प्रकरण होते. ते त्यांनी मला हसत हसत सांगितले. विभा वहिनीही ते हसण्यावारी नेत असत; त्यामुळे तोडणकर यांच्या हायकूंमध्ये ‘ती’ डोकावते का? अर्थात ती थेट येत नाही, आभासी, स्वप्नाळू पातळीवर वावरते.

‘कशाला ही उशी
फुलांनी विणलीस?
स्वप्नांना जाग आणलीस’

किंवा

‘अचानक येणार
असे कळले
दारी प्राजक्ताचे झाड फुलले’

ही दोन नाजूक उदाहरणे.

दाभोळच्या परिसरातील निसर्गसृष्टी तोडणकर यांना प्रिय होती. तो निसर्ग त्याच्या निसर्गरूपापेक्षा अधिक काही सूचित करतो आणि मनुष्याच्या भाववृत्तीशी जोडला जातो असे त्यांच्या कविता-हायकूंमधून जाणवते.

‘आता झाडाला राहिले नाही भान
गवताच्या इवल्या पात्यांनी
हिरवे केले रान’

किंवा

‘खूप खूप दमलो चालता चालता
जिथं थांबलो तिथं
झरा होता खळखळता’

अथवा

‘जरा इथे जरा तिथे
संध्याकाळी टिटवी
ओरडतेय पश्चिमेला’

तोडणकर झाडामाडांत पाखरा-लेकरांत, झरा अन् नदीमध्ये अशा पद्धतीने रमले.

‘माणसांची गर्दी
रेल्वे फलाटावर
गाडी निघून गेल्यावर’

यांसारखे त्यांचे ‘हायकू’ जीवनातील सत्यावर, वास्तवावर अगदी मोजक्या शब्दांत भाष्य करणारे आहेत. त्यांचा ध्वनिमुद्रित स्वर आहे-नाही ते माहीत नाही. मात्र, महेश केळुसकर आकाशवाणीवर सादरकर्ते होते, तेव्हा तोडणकर दाभोळवरून मुंबईकडे ‘आकाशवाणी’च्या ध्वनिमुद्रणात जात असत व ललित लेखाच्या अंगाने जाणारा ‘टॉक’ देत असत ! त्यात दाभोळचे त्यांच्या प्रिय गावाचे संदर्भ असत. दाभोळला तोडणकर यांचे घर आहे. मात्र तेथे कोणी राहत नाही. तोडणकर यांना तीन अपत्ये. मुलगी आरती व दोन मुलगे अभय व संजय. ते सर्व ठाणे परिसरात राहतात.

तोडणकर यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1933 चा आणि मृत्यू 13 फेब्रुवारी 2009 चा.

माधव गवाणकर 9765336408

———————————————————————————————————

मनोहर तोडणकर यांच्यावरील माधव गवाणकर यांचा हा स्फुट लेख वाचल्यावर माझ्याही मनात तोडणकर यांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. शिरीष पै यांची अस्सल हायकूंची परंपरा चालवणारे महाराष्ट्रात दोनच हायकूकार मी ओळखतो- मनोहर तोडणकर आणि वसईच्या पूजा मलुष्टे. हायकूंविषयी समग्र विवेचन करणारे मलुष्टे यांचे मराठीतील पहिले पुस्तक, ‘साकुरा’ हे ‘ग्रंथाली’ने जानेवारी 2014 मध्ये प्रकाशित केले (पण आजतागायत त्यावर एकही ‘रिव्ह्यू’ कोठे छापून आला नाही की ना कोणी त्याची एखाद्या पुरस्कारासाठी दखल घेतली).

त्या पुस्तकात ‘मनोहर तोडणकर: एक उत्तम, यशस्वी हायकूकार’ हा पूजा मलुष्टे यांचा लेख आहे. पण बाकी तोडणकर यांची तशी उपेक्षाच झाली.

मी आणि तोडणकर अशी आमची दोस्ती होती. एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. अधुनमधून मी त्यांना ‘आकाशवाणीच्या मुंबई केंद्रा’वर रेकॉर्ड करत असे. आयुष्याच्या अखेरीस ते ठाणे सोडून दाभोळला त्यांच्या मूळ घरी पत्नीसह राहण्यास गेले. मी ‘आकाशवाणी रत्नागिरी केंद्रा’वर एक महिन्यासाठी केंद्र प्रमुख म्हणून गेलो होतो. माझे सहकारी हाशम मसुरकर यांना घेऊन जेव्हा मी अकस्मात त्यांच्या दाभोळच्या घरी पोचलो तेव्हा त्यांची झालेली सुखद आश्चर्य धावपळ पाहून गंमत वाटली. दुपारी वहिनींनी मटन-वड्यांचा बेत केला आणि आम्हाला जेवण्यास बसवले. मग जेवून झाल्यावर दुपारी घरासमोरच्या झाडांच्या सावलीत मी तोडणकर यांची मुलाखत घेतली. हाशमने रेकॉर्ड केली. ती प्रसारित झाली तेव्हा तोडणकर यांचा सद्गदित आवाजात फोन आला. ‘समग्र मनोहर तोडणकर’ असा एक ग्रंथ कोणीतरी काढला पाहिजे.

महेश केळुसकर 7066274203

———————————————————————————————————

About Post Author