हस्ता गाव – सांघिक इच्छाशक्तीचे प्रतीक!

3
33

गणेश नीळ हर्षोल्हासित होऊन सांगत होता, “माझी दुग्धव्यवसाय करण्याची फार इच्छा होती, माझ्याकडे गायी पण होत्या. परंतु ते राहून जात होते. ती आठ वर्षांची इच्छा ‘ल्युपिन’मुळे एका वर्षात साध्य झाली. आता, गावातील एकशेअठ्ठ्याऐंशी लोक त्या व्यवसायात जोडले गेले आहेत.”

समाजसेवेला व्यावसायिकता आणि इच्छाशक्ती यांची जोड दिली तर काय बदल होऊ शकतात, त्याचे हस्ता गाव हे चांगले उदाहरण आहे. गाव औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात वसले आहे. हस्ता गावाने एक प्रकारे विकासाचा आदर्श घालून दिला आहे. ‘ल्युपिन’ नावाची फार्मा कंपनी त्या गावात विकासाचे काम 2012 पासून करत आहे.

गाव २०१२ च्या पूर्वी असुविधांचे माहेरघर होते असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई होती, आरोग्याची वानवा होती, शिक्षणाची परिस्थिती ठिकठाक होती, आरोग्याच्या सुविधादेखील चांगल्या नव्हत्या. तशा परिस्थितीत गावाचा विकास साधणे हे मोठे आव्हान होते. ते गावकऱ्यांनी ‘ल्युपिन’च्या सहकार्याने पेलले.

‘ल्युपिन फाउंडेशन’च्या प्रकल्प अधिकारी स्नेहल काटेकर म्हणाल्या, की आम्ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या जबाबदारीच्या भावनेने हस्ता गावाच्या विकासासाठी मदत करण्याचे ठरवले. दारिद्र्य रेषेखालील गावांच्या पाहणीमधून त्या गावाची निवड करण्यात आली.

सरपंच मनोहर नीळ म्हणाले, की आमच्या गावचे बाबासाहेब शिंदे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात काम करतात. त्यांच्या मार्फत आमचा ‘ल्युपिन फाउंडेशन’शी संपर्क झाला.

हस्ता हे गाव औरंगाबादपासून पंच्याऐंशी किलोमीटरवर डोंगर उतारावर वसले असून तेथील लोकसंख्या 1952 आहे. तेथे जरुरीपुरता पाऊस पडे, पण तो वाहून जाई. गावकऱ्यांनी ते पाणी वाचवण्यासाठी धरणे-बंधारे हे काम प्रथम करून घेतले. त्यामुळे भूमीअंतर्गत पाण्याची पातळी वाढली. त्याचबरोबर ठिबक सिंचन गावात आणले. त्यामुळे शेतीला जरुरीपुरतेच पाणी दिले जाऊ लागले.

मनोहर नीळ दहावीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांना गावचा विकास व्हावा असे वाटत होते, पण मार्ग सापडत नव्हता, ‘ल्युपिन फाउंडेशन’च्या योजनेमुळे तो सापडला. नीळ यांची स्वत:ची तीन एकर शेती आहे. त्यात गहू व मका ही पिके होतात. नीळ चार वर्षांपूर्वी गावच्या सरपंचपदी निवडून आले.

‘ल्युपिन’चे दत्ता शेळके सांगतात, की “कामाच्या सुरूवातीचे दिवस कठीण होते. कोणी परंपरागत गोष्टी सोडण्यास तयार नव्हते. अनेक बाबतींत चुकीच्या रुढी आणि पद्धती अस्तित्वात होत्या.” तेव्हा त्यांना विकासकामांआधी गावकऱ्यांना प्रेरणा देणे महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली. त्यासाठी त्यांनी कार्यशाळा आयोजित केल्या, विकासाची वाट दाखवण्याचा प्रयत्न केला. योगायोग असा, की त्या सुमारासच मनोहर नीळ या बत्तीचस वर्षीय तरुणाने हस्ता गावाच्या सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांना नव्या पिढीची साथ होती आणि विकासासाठी लागणारा निधी उपलब्ध झाला या गोष्टींमुळे गावाचा विकास हळुहळू दृष्टिपथात येत गेला.

मनोहर नीळ यांनादेखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. गावातील प्रस्थापितांचा बाहेरील एनजीओ गावात येऊन असे काही काम करू शकते यावर विश्वास नव्हता. मनोहर यांनी ग्रामसभा घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ग्रामसभा उधळून लावण्याचा प्रयत्न काही वेळा झाला. पण मनोहर यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी जनतेत जाऊन प्रस्ताव मांडले. त्यांचा परिणाम दिसू लागला. पूर्वी गावात फक्त उच्चवर्गीयांकडे शौचालये होती. आता सगळ्या घरांत शौचालये बांधली गेली आहेत. महिला बचत गट हेदेखील विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे पाऊल होते.  प्रत्येक घरातील स्त्री कोणत्या ना कोणत्या बचतगटाची सदस्य आहे. ‘नाबार्ड’च्या माध्यमातून देखील स्त्रियांना सहाय्य करण्यात आले.

मराठवाडा आणि पाणीटंचाई हे तर समानार्थी शब्द असल्यासारखे आहेत. पण तशी परिस्थिती गावापुरती बदलली आहे. नालेखोदाईचे काम सहा-सात किलोमीटर झाले आहे. हस्ताला दोन वर्षांपूर्वी भयंकर पाणीटंचाई होती. शासनाने देखील पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबवली आहे. ‘ल्युपिन’तर्फे दर महिन्याच्या एक तारखेला आणि बारा तारखेला हेल्थ कँप भरवले जातात, त्यामुळे गावाच्या स्वास्थ्याचा विचार नियमित होतो. तशी काळजी घेतली जाते.

मराठवाड्यात आणि विशेषत: हस्ता गावात राजकारण आणि राजकारणी यांचा प्रभाव खूप आहे. अनेक तरूण मुले त्या सहज लाभकारी व सत्ताभिमुख क्षेत्राकडे ओढले जातात. राजकारणाशी निगडित अनेक वाईट गोष्टींकडे आकर्षले जाण्याच्या घटना गावात झाल्या, त्याचे मुख्य कारण – शिक्षणाचा अभाव. ‘ल्युपिन’ने शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली, स्पर्धा परीक्षांची माहिती दिली व तत्संबंधी प्रसार केला. पोलिसभरती आणि सैन्यभरती यांचेदेखील प्रशिक्षण योजले. त्यामुळे गावातील काही मुले शासकीय नोकरीत गेली आहेत. अकरा मुलांना औरंगाबाद येथील ‘ल्युपिन कंपनी’च्या कारखान्यात रोजगार मिळाला आहे. शालेय शिक्षण अधिकाधिक आनंदी व्हावे म्हणून मुलांना खेळणी, दप्तरे दिली. सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना समान दर्ज्याच्या वस्तूंचे वाटप करण्यात येते. अंगणवाडीची भिंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली आहे. संगणक प्रशिक्षण केंद्रदेखील सुरू करण्यात आले आहे. कालानुरूप इ-लर्निंगची सुविधादेखील आहे.

‘स्मार्ट ग्राम योजने’त हस्ता गावाला सरकारदरबारी प्रथम क्रमांक मिळाला आहे. हस्ता गावाचा ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान योजने’त ‘टॉप वीस’ गावांत समावेश आहे. गावाला पाणी पुरवठा योजनेमुळेदेखील फायदा झाला आहे. मनोहर नीळ शासनाचे सहकार्य मिळत असल्याचे आवर्जून नमूद करतात.

विकास ही व्यापक आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गावाचा विकास करताना आधी मानसिकता घडवणे हे मोठे आव्हान असते. एकीचे बळ सगळी परिस्थिती बदलण्यास सहाय्यभूत ठरू शकते. हस्ता गावात नेमके तेच झाले आहे. म्हणूनच ग्रामसभा उधळून लावणारे लोक ग्रामसभा कधी होणार याची चौकशी करू लागले आहेत. ग्रामसभेत कोपऱ्यात बसणारा मनोहर त्याच गावाचे नेतृत्व समर्थपणे करत आहे. त्यावरून विकास शब्दाची व्याप्ती किती आहे ते कळते आणि हस्ता गाव हे त्याचेच प्रातिनिधिक उदाहरण आहे.

गणेश नीळ – 7350894507
मनोहर नीळ (गावचे सरपंच) 9822111105
मु.पो. हस्ता, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
स्नेहल काटेकर, ल्युपिन फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी – 9595402747

– रोहन नामजोशी

About Post Author

3 COMMENTS

Comments are closed.